शेवटी जुनं ते सोनं हेच खरं..

finally-old-is-gold हे काही डबे भांडी माझ्या आईच्या संसारातले.. ती जाऊन चौदा वर्षे झाली पण तिची ही “संपत्ती” मला सतत सोबत करते. ही भांडी हाताळताना, त्यावरचं तिचं नाव वाचताना ती आसपास असल्याचाच भास होतो… कागदपत्रातून मिळणाऱ्या इस्टेटीपेक्षा हा वारसा हक्क अधिक मोलाचा आणि मायेचा! … आणि तसंही आपण बायका या भांड्कुंड्यांशी जरा अधिकच भावनिकरित्या जोडल्या गेलेल्या असतो, किंबहुना गुंतून गेलेल्या असतो…

पै न पै करून जमवलेली अशी तिची पितळेची भांडी, स्टील, प्लास्टिक, नॉन- स्टिक च्या राज्यात थोडी उपेक्षितच होत होती.अर्थात छान पितांबरीने लख्ख चकचकीत करून मी ती शोभेच्या वस्तू म्हणून एका कोपर्‍यात ठेवत असे.बैठकीत त्यांना दिलेला कोपरा म्हणजे माझ्या आईची हक्काची जागाच होती जणू! पण मग आता ठरवलंय की तिला मानाने स्वयंपाकघरात न्यायचं! माझ्यासाठी जरी ही प्रेमळ आठवण असली तरी तिच्यासाठी तो तिचा संसार होता!..

आज माझ्याकडे माणसं चार, स्वयंपाक ही तुलनेने आटोपशीर आणि भांडी मात्र सतराशे साठ! तिच्या वेळी माणसं भरमसाठ, स्वयंपाक अखंड आणि भांडी मात्र एव्हढीच जेमतेम! दोन सासवा, दिर, नणंदा, अमक्याचा भाऊ शिकायला, तमक्याची मुलगी स्थळं पहायला; “सहज आलो होतो भेटायला” म्हणत दोन्ही वेळंचं जेवून जाणारा सगासोयरा ;आज काय सत्यनारायण उद्या काय हळदीकुंकू…एक ना दोन…. स्वयंपाकघर सुटत नसे… पण सगळं कसं अगदी सहजपणे… तक्रार नाही की कौतुकाची अपेक्षाही नाही…सगळं स्विकारलेलं…

पुढे पुढे तिच्या स्वयंपाकघरात हळूहळू स्टीलची भांडी प्रवेश अर्ज दाखल करत गेली पण बहुतेक भांडी बोहारणीकडून साड्या, कपडे देऊन घेतलेली.. तासभर हुज्जत घालून अखेर सौदा पटायचा.. आपण कसं गोड बोलून कमी कपड्यात मोठं भांडं मिळवलं, असं आईला वाटे पण कुणी कुणाला “चंदन लावलंय” हे आम्ही जाणून होतो. बरं आम्ही मध्ये पडायची सोय नाही!!

finally-old-is-gold भांड्यांविषयीचा तिचा हा जिव्हाळा आज मला चाळीशीला समजतोय… कधी कधी वाटतं, “तुझं लग्न झाल्यावर कळेल तुला”, तू आई होशील तेव्हा लक्षात येईल “,” माझ्या वयाची होशील तेव्हा आठवेल “….. अशी वाक्य खरीच व्हायला हवीत का? वरकरणी रागीट वाटणारी ही विधानं एक प्रकारची भविष्यवाणी किंवा प्रेमळ उ:शाप तर नव्हे?

आता ‘प्लास्टिक हटाव’ , ‘नो नॉनस्टिक’ च्या नारेबाजी मध्ये या भांड्यांची चमक सोन्याहूनही पिवळी वाटतीये ! …
चिऊ काऊचा स्वयंपाक “सुलभ” करण्यासाठी माझ्या घरात अनेक साधनं आहेत त्यात ही भांडी किती तग धरू शकतील कोण जाणे पण लख्ख चकचकीत ह्या भांड्यातून आईचा चेहरा आणि त्या वरचं समाधान ही लख्ख दिसेल..

डॉ शरयू देशपांडे