गुढीपाडवा आणि कालगणना

अनंत युगांपूर्वी (खरतर जेव्हा युगात मोजायला काळ देखील सुरू व्हायचा होता तेव्हा), जेव्हा हे जग नव्हते, सत् किंवा असत् दोन्ही नव्हते. अंतराळ हि नव्हते आणि काळ हि नव्हता. नास॑दासी॒न्नो सदा॑सीत्त॒दानीं॒ नासी॒द्रजो॒ नो व्यो॑मा प॒रो यत्-फक्त होता नितळ अंधार. आणि निर्गुण.. निराकार.. अनादी.. अनंत असा ..”तो” त्याला म्हणे इच्छा झाली.“एकोहं बहुस्याम”… स्वतःच अनेक रुपात प्रकट होण्याची …मग क्षीरसागरी “तो” विष्णू म्हणून प्रकटला आणि त्याच्याच नाभीकमळी “तो”च ब्रह्मा झाला.या ब्रह्माने मग रचली हि सगळी सृष्टी -१४ भुवने, तिन्ही लोक, देवता मानव, दानव, नद्या पर्वते, झाडे, झुडपे या सगळ्या रुपात “तो”च नटला.. आणि त्या क्षणी सुरु झाला काळ… या काळाला मोजायचे कसे ? मग “तो”च वेगवेगळी एकके झाला.

एका सेकंदाचा १/१६८७ व भाग म्हणजे त्रुटि,
३०० त्रुटि =१ बोध
३ बोध = १ लव
३ लव = १ निमेष-डोळ्याची पापणी लावण्यास जेवढा वेळ लागतो तो काळ
३ निमेष = १ क्षण
५ क्षण = १ काष्ठा
१५ काष्ठा = १ लघु
१५ लघु = १ घटी
२ घटी = १ मुहूर्त
५ ते ७ घटी- १ प्रहर

८ प्रहर = १ अहोरात्र (अह: – दिन)
७ अहोरात्र = १ सप्ताह
१५ अहोरात्र = १ पक्ष (१ कृष्ण, १ शुक्ल)
२ पक्ष = १ मास (मास – महिना)
२ मास = १ ऋतु
३ ऋतु = १ अयन
२ अयन – १ संवत्सर = देवांची १ अहोरात्र
१ संवत्सर चक्र म्हणजे ६० वर्षे
माणसांची ३६० वर्षे म्हणजे देवतांचे एक वर्ष-दिव्य वर्ष

दिव्यवर्ष हे प्रमाण मानून युगांची कालगणना केली जाते. प्रत्येक युगाला संध्या मुख्य युग आणि संध्यान्त असतो.
१ कलि युग म्हणजे १२०० दिव्य वर्षे
१ द्वापर युग म्हणजे २४०० दिव्य वर्षे
१ त्रेता युग म्हणजे ३६०० दिव्य वर्षे
१ कृत युग म्हणजे ४८०० दिव्य वर्षे

१ महायुग म्हणजे ४ युगे = 4320000 मानवीय वर्षे
१ मन्वंतर म्हणजे ७१ महायुगे – प्रत्येक मन्वंतरात नवा इंद्र,नवा मनु व नवे सप्तर्षी
१ कल्प म्हणजे १४ मनु-अर्थात ब्रह्मदेवाचा एक दिवस
एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस-रात्र होतो.
ब्रह्मदेवाच्या दिवसात सृष्टी उत्पन्न होते आणि रात्रीत ती लय पावते.
ब्रह्मदेवाचे आयुष्य १०० वर्षे असते.
असे १००० ब्रह्मदेव झाले की विष्णूची एक घटका होते.
असे १००० विष्णु झाले की रुद्राचा एक पळ होतो.
असे १००० रुद्र झाले की आदिमायेचा अर्थात महाशक्तीचा अर्धा पळ होतो.

अति सूक्ष्मापासून तर अति विराट पर्यंत अनादी अनंत असा हा काळही कालगणना सुरु झाली त्याचे प्रतिक म्हणून साजरी होते वर्षप्रतिपदा. या दिवशी भारतात प्रचलित अनेक कालगणनांपैकी शालिवाहन शकाचा वर्ष आरंभ होतो.या दिवशी ब्रह्मध्वजाचे पूजन करावे, ब्रह्माचे पूजन करावे आणि ब्रह्मदेवाची पूजा झाल्यानंतर विपळे, पळे, घटिका, प्रहर …. युगे इ. सर्व कालविभागांचीदेखील पूजन करावे असे शास्त्र सांगते.त्याच बरोबर नवीन वर्षाच्या पंचांगाचे पूजन करून पंचांगफळ ऐकावे. यानुसार ब्रह्माच्या आयुष्याची ५० वर्षें उलटून गेली असून ५१व्या वर्षाचा पहिला दिवस चालू आहे.

ब्रह्मदेवाच्या एका वर्षात ३६० दिवस असतात. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या एका वर्षात ३६० x ८,६४,००,००,००० = ३,१,१,०,४०,००,००,००० मानवी वर्षे होतात. अर्थात ३ महापद्म, १ निखर्व, १ खर्व, ४० कोटी मानवी वर्षे!!!

हे पंचांगफळ वाचतांना आपल्याला ही जाणीव होते की विश्वाच्या तुलनेत आपलं अस्तित्व, आपली हयात अगदी क्षुल्लक आहे.तरी देखील अणू पासून ब्रह्मांडात पर्यंत कालमापनाच्या एककात “तो”च विराजमान आहे याचा देखील साक्षात्कार घडतो.विराट अशा या वैश्विक कालगणनेचे स्मरण करत आपली छोटीशी कालगणना, त्यातल छोटंसं वर्ष, त्याचा पहिला दिवस साजरा करावा.
नववर्षाचे स्वागत करायची यापेक्षा सुंदर पद्धत काय असणार.

ब्रह्माच्या दुसऱ्या परार्धातील श्वेतवाराह कल्पातील वैवस्वत मन्वंतरातील कलियुगातील प्रथम चरणातील शालिवाहन संवतानुसार१९४४ शुभकृत नाम संवत्सराच्या चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा!!!

हे नवीन वर्ष शुभकृत शुभ कारक असावे हीच “त्या”च्या चरणी प्रार्थना!!!!

#विनय_उवाच
vinayjoshi23@gmail.com
चैत्र प्रतिपदा शालिवाहन शके १९४६
चैत्र प्रतिपदा विक्रम शके २०८१
चैत्र प्रतिपदा युगाब्द ५१२५
२० सौर चैत्र १९४६