आमचं नाशिक

वास्तविक नाशिकला “आमचं” म्हणायला माझा जन्म किंवा शिक्षणही नाशिकला झालेलं नाही. गेल्या सत्तर एक वर्षात माझा नाशिकचा एकूण मुक्कामही सहा महिन्यांपेक्षा कमीच झाला असेल. पण तसं असूनही नाशिक मला माझ्या अगदी पहिल्या फेरीपासूनच आपलं वाटत आलं आहे.त्याचं काय आहे की माझ्या आत्याचं सासर नाशिकला होतं. माझा जन्म, शिक्षण आणि पहिली नोकरी, सर्व काही मुंबईला झालं. पण वडिलांकडून नाशिकला आत्या रहाते हे बरेच वेळा ऐकलं होतं. मला एकंदर तीन आत्या आणि दोन काका होते. एक आत्या नाशिकला, दुसरी कोपरगांवला (शिर्डीजवळ) आणि तिसरी दौंडला रहायची. त्यामुळे दर भाऊबीजेला हे तीन भाऊ आळीपाळीने नाशिक, कोपरगांव किंवा दौंडला जायचे.

मी साधारणपणे पाच एक वर्षांचा असताना मला वडिलांबरोबर एका भाऊबीजेसाठी नाशिकला जाण्याचा योग आला. तोपर्यंत मी मुंबईच्या बाहेर असा फक्त वसईला गणपतीसाठी गेलो होतो, तेव्हढाच प्रवासाचा अनुभव. मुंबईच्या बाहेर आणि तेसुद्धा भारतीय रेल्वेने जाण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. (वसईचा प्रवास लोकलने केला होता.) त्यावेळी मुंबई ते इगतपुरी ह्या प्रवासात गाडीला विजेची इंजिने जोडत असत. त्यात आणखी नवल म्हणजे कसा-याला पुढचा घाट चढणं शक्य व्हावं म्हणून गाडीला आणखी एक इंजिन पाठीमागे जोडत असत. घाट चढून इगतपुरीला आलो आणि अहो आश्र्चर्यम! इथे गाडीची दोन्ही विजेची इंजिने काढली गेली आणि पुढे चक्क कोळशाचं इंजिन लावलं गेलं. वसईला जाताना मी कोळशाच्या इंजिनावर चालणा-या गाड्या पाहिल्या होत्या. पण अशा गाडीतून प्रवास करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. होता करता आम्ही नाशिकला पोहोचलो. इथे प्रकार आमच्या वसईसारखाच होता. तिथे लोकल गांवापासून पाच एक मैल दूर वसईरोडला (त्यावेळचं Bassein Road) थांबते. तिथून पुढे गांवात जायला S. T. घ्यायची. इथे गाडी नाशिकरोडला थांबली. बाहेर S. T. पकडून भद्रकाली बस स्टॉपपर्यंत गेलो. आणि तिथून पुढे टांग्याने आत्याच्या घरी.

आत्या (त्यावेळी) नवीन म्युनिसिपालिटीसमोर गर्गे वाड्यात रहायची. एकंदरीतच माझा भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास आणि आत्तापर्यंत नुसतं ऐकलेलं नाशिक प्रत्यक्ष पाहून माझ्यावर इतका परिणाम झाला की त्या क्षणापासून मी भारतीय रेल्वे आणि नाशिक या दोन्हीच्या प्रेमात पडलो आणि अजूनही आहे. त्या वयातही मी नाशिकपासून बरंच काही शिकलो. थंडीची हुडहुडी भरते म्हणजे काय हे त्या दिवशी संध्याकाळीच समजलं. पण दुस-या एका गोष्टीने मात्र त्यावेळीही चक्रावून टाकलं आणि आजपर्यंतही कोणी त्या गोष्टीचा समाधानकारक खुलासा देऊ शकलेलं नाही. रात्री ९ वाजता एकदम भल्यामोठ्या आवाजात भोंगा वाजायला सुरुवात झाली आणि चक्क पाच मिनिटे तो भोंगा वाजत राहिला. आता मी दादरलाच वाढल्यामुळे गिरण्यांचे भोंगे ऐकायची मला सवय होती. पण ते भोंगे फक्त गिरणीत काम करणा-यांनाच ऐकू जातील अशा बेताच्या आवाजात वाजायचे. हा भोंगा अगदी कर्कश्यपणे वाजत होता आणि जवळपास कुठेही गिरणी नव्हती. मी विचारणा केल्यावर उत्तर मिळालं की समोरच्या म्युनिसिपालिटीचं जे मोठं घड्याळ आहे, तिथून हा भोंगा वाजतो. पण का वाजतो या प्रश्र्नाला मात्र त्यावेळी कोणी उत्तर देऊ शकलं नाही. दुस-या दिवशी लक्षात आलं की हा भोंगा पहाटे पाच वाजतासुद्धा आक्रोश करतो!

त्यानंतर नाशिकला अनेक फे-या झाल्या. शाळेत असताना बहुतेक दर मे महिन्यात एखादी चक्कर व्हायची. हळू हळू लक्षात येत होतं की इथली मंडळी जरी मराठीच बोलत असली तरी त्यांचे उच्चार आमच्या चाळकरी मंडळींपेक्षा थोडे वेगळे होते. आमच्या चाळीतली बरीचशी मंडळी कोकणातली असल्यामुळे त्यांचं बोलणं खूपसं सानुनासिक असायचं. इथे तसा काही प्रकार नव्हता. एकदा गर्गे वाड्याच्या पुढच्या खोलीत उभा राहून समोरच्या रस्त्यावरून (मेन रोड) चाललेली वाहतूक बघत होतो. दुपारच्या रणरणत्या उन्हात घराबाहेर पडण्यापेक्षा ही करमणूक जास्ती सोयीची पडायची. ही गोष्ट जरी ५५ ते ६० वर्षांपूर्वीची असली तरी त्यावेळीही मेन रोड चांगलाच गजबजलेला असायचा. पाहता पाहता रस्त्याच्या उजव्या बाजूने शेळ्यांचा एक भला मोठा कळप चालत येताना दिसला. आता मुंबईला अगदी आंबेडकर रोडवरसुद्धा एखाद दुसरी गाय दिसायची. पण एव्हडा मोठा शेळयांचा कळप मी तोपर्यंत कधीच बघितला नव्हता. उजवीपासून डावीकडे रस्ताभर शेळ्याच शेळ्या. रस्त्यावरची बाकीची सारी वाहतूक बंद पडली. आणि त्या कळपाच्या मागच्या बाजूने (म्हणजे माझ्या उजवीकडून) खणखणीत आरोळी आली. “ए भो, अरे तुझी शेरडं जरा बाजूला दाबून घे की. समदा रस्ता काय तुझ्या x x च्या मालकीचा हाय का?” आता मुंबईला असा कोणी कोणाचा बाप वगैरे काढला असता तर प्रकरण हाताबुक्कीवर आलं असतं. पण इथे तसं काही झालं नाही. त्या धनगराने आपल्या शेळ्या अगदी थोड्याशा रस्त्याच्या एका बाजूला घेतल्या आणि मग त्या फटीतून तो आरोळी देणारा सायकलवाला पुढे निघून गेला.

संध्याकाळ झाली की मग मात्र एकच कार्यक्रम असायचा. आतेभाऊ, आतेबहीण आणि घरात जे कोणी मोकळे असतील त्या सर्वांनी गंगेवर जायचं. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे गंगेला पाणी नसायचच. आता बालाजी मंदिरापुढून सुरू होऊन पंचवटीला जोडणारा जो पूल झाला आहे, तो त्यावेळी नव्हता. तिथे सर्व जागा मोकळी होती. एका बाजूला थंड पेयांची दुकाने होती. आणि ठिकठिकाणी मकाजी किंवा कोंडाजी पैलवानांचा चिवडा विकणा-यांचे ठेले असायचे. रामकुंडापर्यंत चक्कर मारून झाली, नारोशंकराच्या देवळातली घंटा वाजवून झाली की मग एखाद्या ठेल्यावरून चिवडा घ्यायचा (वरती अगदी बारीक चिरलेला कच्चा कांदा पेरून) आणि बालाजी मंदिरासमोरच्या मोकळ्या जागेत बसून त्याचा समाचार घ्यायचा. नंतर तोंडात पेटलेली आग एखादं थंड पेय घेऊन शमवायची. त्यानंतर मात्र रात्रीचा भोंगा व्हायच्या आत घरी परत.

नाशिकला आजपर्यंत इतक्या फे-या झाल्या. पण एक गोष्ट मात्र मला कधीही जमली नाही – चित्रकला. माझ्या आत्याचे यजमान अत्यंत नावाजलेले चित्रकार (आणि शिल्पकार आणि छायाचित्रकार) होते. त्यांच नांव होत वा.गो.कुळकर्णी. ते त्यांच्या घरात चित्रकलेचे वर्ग चालवायचे. (त्यावेळी ते वर्ग ’चित्रकला विद्यालय’ या नांवाने चालत असत) मी एकदा दोनदा त्या वर्गात बसून चित्रकला शिकायचा प्रयत्नसुद्धा केला. पण छे. अजूनही मी नुसती सरळ रेघ काढायला गेलो (फुटपट्टीशिवाय) तरी ती वेडीवाकडीच येते आणि माझं मराठी हस्ताक्षर पाहिलं तर मी नक्कीच मोडीचा स्कॉलर असलो पाहिजे असा बघणा-याचा (गैर)समज होईल. आपल्याकडे म्हण आहे “ढवळ्याशेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गूण लागला.” ह्या पवळ्याला वाणही लागला नाही आणि गूणही! आता नाशिकच्या कॉलेज रोड भागातल्या बॉईज टाऊन रस्त्याला “कलामहर्षी कै. वा. गो. कुळकर्णी मार्ग”हे नांव देण्यात आलं आहे.

सगळ्या आठवणी आता खूप जुन्या झाल्या. मुंबई सोडून लंडनला आल्याला आता ४७ पेक्षा जास्ती वर्षे होऊन गेली. त्या काळात मुंबई आणि नाशिकमध्ये सुद्धा खूप बदल झाला आहे. आमचे गर्गे वाड्याशी संबंध सुटले. दोन्ही आतेभाऊ नाशिकच्या वेगवेगळ्या भागात रहायला गेले. तिथून गंगेवर जाणं आता पूर्वीसारखं सोपं राहिलं नाही. गंगापूर धरण झाल्यापासून वाहती गंगा फक्त पावसाळ्यातच दिसत असेल. नारोशंकराच्या देवळाची योग्य ती काळजी न घेतली गेल्यामुळे ती इमारत अत्यंत खतरनाक अवस्थेत उभी आहे. त्यामुळे देवळापर्यंत जाता आलं तरी आत जाऊन घंटा वाजवता येत नाही. केवळ मते मिळवण्यासाठी, 100 कोटी रूपये खर्च करून शिवाजीमहाराजांचा पुतळा अरबी समुद्रात उभा करण्याच्या बाता करणा-या सरकारला चिमाजी आप्पांनी वसईच्या किल्ल्यातून जिंकून आणलेली घंटा ज्या वास्तूत बसवलेली आहे, त्या वास्तूची पुनर्बांधणी करायचं सुचत नाही. पैलवानांच्या चिवड्यालासुद्धा पूर्वीचा तिखटपणा उरला नाही. पण या चिवड्यावरून आठवण झाली म्हणून सांगतो. इथे युरोपमध्ये काही वर्षांपूर्वी ” Buy one, get the second one free” ही विक्रीपद्धत सुरू झाली. माझी 100 % खात्री आहे, की ही पद्धत प्रथम नाशिकमध्ये सुरू झाली. लंडनवासी होण्याअगोदर मी एकदा नाशिकला आलो होतो. म्युनिसिपालिटीच्या बाहेर उभा असलेला एक माणूस चिवडा विकत होता. तो ओरडत होता “माधवजीका बढीया चिवडा, एक शेर चिवडा घेतल्यास एक शेर चिवडा फुकट.”

दोन एक वर्षांपूर्वी भारतात आलो होतो. त्यावेळी काही अपरिहार्य कारणामुळे नाशिकला येणं जमलं नाही. एरवी मी जवळ जवळ प्रत्येक भारत फेरीत नाशिकला येऊन गेलो आहे. आता पुन्हा योग कधी येतो ते बघायचं.

– मनोहर राखे, लंडन