“अरे ए सौ, स्लिपिंग बॅग मध्ये पाणी शिरलंय”, रात्री २ च्या सुमारास टेंटमध्ये अम्या चुळबुळ करत उठत म्हणाला. गुरफटून घेतलेल्या स्लिपींग बॅग मध्ये कोंबलेलं अंग कसंबसं बाहेर काढत मी उठून पाहिलं. टेंन्टच्या वॉलचेन मधून थंड पाणी आत आलेलं. आषाढ अगदी जोमात होता. बाहेर पावसानं अक्षरशः थैमान घातलेलं. अहुप्याच्या कातळकड्यापासून शंभरएक मीटरवर आमचा टेंट फडफडत कसाबसा तग धरून होता. वारा नुसता भराटल्यागत घोंगावत होता. टेंटच्या खिडकीतून डोकावून वर पाहिलं. सुदैवानं आऊटर आणि टेंटचं नातं अजून शाबूत होतं.
माझ्या बाजूला महेश उर्फ कालिया आणि पलीकडे प्रतीश श्वासांना खर्ज लावून शांत (??) झोपले होते. निसर्गानं टेंटच्या आत घुसून आमच्यावर केलेल्या सिंचनाची त्यांना कल्पनाच नव्हती.
“अम्या, कसले कुंभकर्णासारखे झोपलेत रे हे दोघं”, इति मी.
“थोतरीत ढुशा देऊन उठव त्यांना…” अम्या बोंबलला.
“अरे झोप ना शांत”, प्रतीश झोपेतंच गुरगुरला.
“अरे झोप काय? इथं टेंटमध्ये तळं झालंय आणि तुम्हाला झोप कशी येतेय..” अम्यानं सत्य परिस्थितीची जाणीव करून देत म्हटलं. प्रतीश आणि महेश डोळे चोळत उठले.
बाहेर किर्रर्र काळोख, फूटभरावरचं देखील दिसणार नाही असं धुक्याचं साम्राज्य, बेभान पावसाकडून टेंटच्या छतावर वाजत असलेले ताशे…अशा परिस्थितीत बाहेर जाणार कसं? …आणि जाऊन तरी काय कप्पाळ दिवे लावणार? बरं, अहुपे गावात एखाद्या झापात जाऊन पडावं तर ते ही दोन फर्लांग लांब. गपचुप टेंटमधेच जे काही कोरडं मिळेल त्याने आतून टेंट पुसला आणि कशीबशी रात्र रेटली.
माझ्या नुकत्याच नवीन घेतलेल्या टेंटची स्ट्रेस टेस्ट घेण्याकरता ऐन आषाढात केलेल्या तिरंगीघाट-अहुपे-अहुपेघाट या ट्रेकमधला हा प्रसंग. वरुणराजानं घेतलेल्या या परीक्षेत माझा टेंट सपशेल नापास झालेला. पण नापास होता होता अनुभवांच्या शिदोरीत एका अविस्मरणीय प्रसंगाची नोंद करून गेला.
सकाळच्या पहिल्या कर्जत लोकलने मी, अम्या, कालिया आणि प्रतीश कल्याणला उतरलो. लगेचंच लालडब्याने मुरबाड गाठलं. तिथून धसई-पळु मार्गे रामपुरी आलो. हा परिसर म्हणजे देशावरून खाली कोकणात उतरणाऱ्या डोंगरवाटांची मांदियाळीच आहे. इष्ट्याच्या वाडीतून ढाकोब्याच्या पोटातनं चढणारा ईष्ट्याचा दरा किंवा दाऱ्या घाट, रामपूरच्या पूर्वेस असणाऱ्या दुर्ग किल्ल्याच्या कातळभिंतीवरून येंगणारा खुट्याचा दरा, त्याच्याच बाजूला रामपुरातून डोणी गावात चढणारा डोणीचा दरा किंवा त्रिगुणधारा घाट किंवा तिरंगी घाट, खोपिवलीतून देशावर जाणारा अहुपे घाट, पुढे सिद्धगडाच्या बाजूनं चढणारा भटीचा घाट, असे अनेक पुरातन घाटमार्ग या परिसरात डोंगरभटक्यांना खुणावतात. त्यातल्या त्रिगुणधारा घाटाने आम्ही चढणार होतो, पुढे डोणी मार्गे अहुप्यास जाऊन अहुप्याच्या पठारावर टेंटमध्ये मुक्काम, आणि अहुपे घाटाने खाली खोपिवलीत उतरणार होतो.
रामपुरातून वाटाड्या घेतला. म्हणाला “खुटं जायाचं पावनं ?”
त्याला म्हटलं “मामा, वरती डोणीपरतुर जायचं हाय….जरा डोणीच्या दऱ्याला लावून द्या, म्हंजी झालं. फुडं आमी जातु..”
त्यावर तो गप्प झाला. म्हटलं “काय झालं मामा?”
“आवं, आसाडामदी येवड्या पावसात कशापायी जाताव थीतून? पानी निस्तं धबाधबा अंगावर येतया.” इति मामा.
पण आमची खाज कुठे जिरत होती. आम्ही म्हटलं, “मामा, काळजी नका करू. आम्ही जाऊ नीट.”
मामा तयार झाले. आम्ही निघालो.
आषाढ सुरु होऊन पंधरवडा सरलेला. त्यामुळे लावण्या होऊन रोपांनी चांगला जम धरलेला. दुतर्फा शेतांतून एकसारख्या पातळीवर येऊन ती डोलायास लागली होती. वाट मिळेल तसे धावणारे लहानमोठे पाट त्यांना पाणी पुरवत होते. बूट कोरडे ठेवण्यासाठी वाटेतलं पाणी चुकवून दगडांवरून चालण्याचा प्रयत्न आम्ही कधीच सोडून दिलेला. रामपूरची घरटी आता दिसेनाशी झाली. डावीकडे दुर्ग किल्ल्याची भिंत अर्धी धुक्यात होती, तर मागल्या बाजूस नानाचा अंगठा, जीवधन ही मंडळी अजूनंही स्वतःला धुक्यात लपवून होती. तो नजारा पाहून सहज ओळी सुचल्या….
“धुक्याच्या रे शाली, धवल दिसती उंच अचली,
पहा ल्याली पृथ्वी, हरिततृणमाला मखमली.
प्रपातांच्या धारा, पडति धरणीच्या कर-तली,
सजे सृष्टी कैशी?, जणु नववधू आज नटली.”
समोर डोणीच्या दर्याची नाळ हळूहळू जवळ येत गेली. तिच्या माथ्याजवळ पडणारा अजस्र प्रपात वातावरणातील चैतन्यात भर घालीत होता आणि त्याचबरोबर किती चढायचंय याची जाणीव करून देत होता. साधारणतः तासभर शेतांच्या बांधांवरून, अवखळ पाटांमधून, चिखलमातीतून वाट तुडवून अखेर नाळेला भिडलो. मामांचा निरोप घेतला. वाट आता चांगलीच अंगावर येणारी झाली.
माथ्याजवळच्या त्या धबधब्याचं पाणी नाळेतील भल्या मोठ्या खडकांवर आपटत एखाद्या व्रात्य मुलाप्रमाणे उड्या मारत येऊन आम्हाला नखशिखांत भिजवत होतं. त्यात थयथयाट करणारा पाऊस पाण्यात अजून भर घालत होता. धबाबा वाहणाऱ्या पाण्यानं खडकांवरल्या आधाराच्या खोबणी देखील लपवलेल्या. पण करणार काय? तसंच खळाळत्या पाण्यात हात घालून थोडं चाचपून खोबणी शोधून पाणी अंगावर घेत आमची चढाई चालू होती. माझ्या पाठपिशवीत कपडे, थोडा शिधा, आणि त्याबरोबर टेंट ची गुंडाळी. त्यामुळे वजन आता खणखणीत बोलू लागलं होतं. जवळ-जवळ सत्तर-ऐंशी कोनातल्या नाकात दम आणणाऱ्या त्या चढाईमुळं आणि पाठीवरच्या वजनामुळं एक एक पाऊल टाकणं देखील मध्ये मध्ये नको होत होतं. माथ्याशी धुक्याच्या ढगांची ये-जा चालू होती. त्यात त्या धबधब्याचा लपाछपीचा खेळ अविरत चालू होता. त्याचं चैतन्य आम्हाला वर खेचत होतं. जणुकाही तो खळाळत आम्हाला सांगत होता,
“या पोरांनो, सावकाश या. निसर्गातलं अनुपम चैतन्य हाती घेऊन मी उभा आहे इथं तुमच्या स्वागताला…ते चैतन्य तुम्हावर ओतून तुमचे श्रम मी हलके करीन…या …या…”. ती त्याची साद आम्हाला वर चढवीत होती.
सुमारे दोन-अडीच तासांच्या खेची चढाईनंतर त्या एकमेवाद्वितीय प्रपाताच्या बुंध्याशी जाऊन आम्ही पोचलो. अहाहा…दोन-अडीचशे फुटांवरून फेसाळत पडणारी त्याची ती धार, जणू वैशाखाच्या तलखीनं तापलेल्या सह्याद्रीचं अंग शांत करण्यासाठी निसर्गानं ओसंडवलेला धवलशुभ्र क्षीरप्रपात….!! विलक्षण सौंदर्य…अलौकिक ऊर्जा…त्याच्या बुंध्यात पडून परत उडणाऱ्या उत्फुल्ल तुषारांनी सगळे श्रम कुठच्या कुठे विरून गेले. त्याच्या पोटात शिरून ते दणाणा पडणारं पाणी पाठीवर घेत सगळं शरीर हलकं करून घेतलं, आणि आम्ही डोणीकडे मार्गस्थ झालो.
पंधरा-वीस मिनिटांच्या सपाट चालीनंतर डोणीत शिरते झालो. एका धनगराच्या राहुटीत टेकलो आणि जेवलो. पाठपिशव्यांनाच टेकून जरा विसावा घेतला आणि अहुप्याकडे निघालो. अहुप्यास पोचेस्तोवर दुपारचे साडेतीन चार वाजले. गाव मागे टाकून अहुप्याच्या पठारावर आलो. पाऊस हलकासा उघडलेला. म्हटलं लागलीच आपलं खोपटं बांधून घेऊ. अहुप्याच्या कड्यापासून शंभरएक मीटर अलीकडे एका छोट्या ओढ्याजवळ टेंट पीच करायला सुरुवात केली. तेवढ्यात रानातून गावाकडं जाणारी एक मावशी आली आणि म्हणाली,
“पोरानु, काय करताव?”
आम्ही म्हटलं, “मावशी, रातच्याला हितंच राहनार…जरा आमचं खोपटं बांधून घेतु..”
मावशी म्हणाली, “आवं, काय येडं की खुळं झालासा….रातच्याला ढग भूतवानी गडगडत्यात…आन पिसाळल्यागत पाऊस पडतुया…त्यामदी कशापायी राहाताव…गावामदी चला…माज्या घराबाजूस धनगराचा झाप हाये, थितं टाका तुमचा डेरा…”
..पण आम्ही खरंच खुळे होतो…नव्हे सह्याद्रीनं आम्हाला खुळं केलेलं…पावसाळ्यातलं सह्याद्रीचं चैतन्य रमारोमांत भरून घेण्यासाठी आम्हाला तिथेच राहायचं होतं. निसर्गाच्या भन्नाट आविष्कारांचे साक्षी होण्यासाठी असा खुळेपणा करण्याला पर्याय नाही. मावशीस म्हटलं, “काळजी नगं करूस…आम्ही राहू हितंच…”…आम्ही खरोखरीच वेडे आहोत असं समजून मावशीनं आम्हाला समजावण्याचा नाद सोडला आणि ती गावाकडं चालती झाली.
टेंट पिच करून झाला. टेंटची भिंत आणि आऊटर यांच्या मधल्या जागेत गुडघ्यावर उभं राहून कपडे बदलले…आणि त्याच जागी स्टो मांडला…फक्कड चहा केला…आणि कड्यावर बसून भुरके मारायला सुरुवात केली. अंदाजे साडेतीन चार हजार फूट उंचीवर पसरलेलं विस्तीर्ण पठार. समोर दरीत झेपावणारे असंख्य धबधबे, डावीकडे शेताडी, तिवरून धावणारे बांध आणि त्या पल्याड पार भीमाशंकरापर्यंत गेलेली सह्याद्रीची रांग, मागे अहुप्याची कौलारू घरटी, उजवीकडे दुर्ग, ढाकोबा, जीवधन, खडा पारशी, नानाच्या अंगठ्यापर्यंत पहुडलेली सह्याद्रीची कातळरांग, सोबतीला धुक्यानं भरलेलं कुंद वातवरण आणि पार्श्वभूमीवर आजूबाजूस सैरावैरा पळणाऱ्या अवखळ ओढ्यांचं संगीत…!! स्वर्ग म्हणतात तो यापेक्षा वेगळा असूच शकत नाही.
पाऊस परत भरून आला. स्टो परत पेटवला. ओढ्यावरून पाणी आणलं..घरून भाजून आणलेली तांदूळ आणि मूगडाळ शिजत ठेवली..बाहेर पाऊस पिसाटल्यागत कोसळत होता. आम्ही आत गरमागरम खिचडी खालली आणि थोड्या वेळात पहुडलो. पाऊस आणि ढगांच्या त्या दणदणाटात देखील पडल्या पडल्या झोप लागली. जाग आली ती टेंटमध्ये शिरलेल्या पाण्यामुळे.स्लीपिंग बॅग ओली झाली तेव्हा. आपल्या टेंटचा पावसानं OTSDDP म्हणजे ऑन ड स्पॉट दणदणीत पोपट केलाय याची जाणीव झाली. तशीच रात्र काढली. सकाळी उठून नाष्ट्याला गरमागरम चहा आणि मॅगी केली. रात्रभर कोसळून पावसानं सुदैवानं जरा विश्रांती घेतलेली. त्यामुळे कड्यावर बसून नाष्ट्याचा मस्त आस्वाद घेतला. आजूबाजूचा हिरवाईनं बहरलेला सहयाद्री डोळ्यात साठवून घेतला आणि टेंट वाइंड अप करायला घेतला. सगळी आवराआवर करून पाठपिशव्या परत खांद्यावर चढवल्या आणि अहुपे घाटाच्या माथ्याकडे रवाना झालो. अहुपे घाट सुरु होणाऱ्या माथ्यावरून आम्ही राहिलेलो त्या पठाराचे आणि त्या जागेचे फोटो काढले. आपण अशा जागी राहिलो यावर विश्वास बसेना. ते दृश्य डोळ्यात साठवलं आणि खोपिवलीच्या वाटेवर उतरणीस लागलो.
आजवर त्या सह्याद्रीच्या आशीर्वादानं त्याच्या कुशीत भरपूर फिरलो. पण हाताच्या बोटांवरंच मोजता येतील असे काही ट्रेक होतात, ज्यांच्या स्मृती आठवणींचं मोहोळ कितीही धूसर झालं तरी ठळक राहतात. तशातलाच हा एक ट्रेक. सह्याद्री साद देतंच असतो….आपण त्याच्या सादेला निखळ मनानं “ओ” द्यावी, त्याचे आशिर्वाद घेऊन शरणभावानं त्याच्या अंगाखांद्यावर बागडावं….त्याच्या दालनातील स्वर्गीय नजारे पाहावेत, ते डोळ्यात साठवावेत….रंध्रारंध्रांत भरून घ्यावेत…ते दाखवल्याबद्दल सह्याद्रीचे मनोमन आभार मानावेत आणि त्याच्या पुढल्या सादेस पुन्हा “ओ” द्यावी. पुन्हा स्वतःला विसरण्यासाठी. हेच खरं…!!!
– सौरभ जोशी