अडगुलं, मडगुलं
अडगुलं, मडगुलं
सोन्याचं कडगुलं
रुप्याचा वाळा
तान्ह्या बाळा
तीट, टिळा.
|
ये ग ये ग सरी
ये ग ये ग सरी
माझं मडकं भरी
सर आली धावून
मडकं गेलं वाहून
|
कोण? कोण?
पहाट झाली – सांगत कोण?
कुकुद्मच् – आणखी कोण?
विठू-विठू पोपट – आणखी कोण?
ताजं-ताजं दूध – देत कोण?
गोठयातली हम्मा – आणखी कोण?
चोरुन दूध – पितं कोण?
म्यॉव म्यॉव माऊताई – आणखी कोण?
घराची राखण – करतं कोण?
भू: भू: कुत्रा – आणखी कोण?
बागेतली भाजी – खातं कोण?
मऊ मऊ ससेभाऊ – आणखी कोण?
|
चांदोबा लपला
चांदोबा लपला
झाडीत….
आमच्या मामाच्या
वाडीत….
मामाने दिली
साखरमाय….
चांदोबाला
फुटले पाय….
चांदोबा गेले
राईत….
मामाला नव्हते
माहीत….
|
ये रे ये रे पावसा
ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा
पाऊस पडला झिम् झिम्
अंगण झाले ओले चिंब
पाऊस पडतो मुसळधार
रान होईल हिरवंगार.
|
आपडी थापडी
आपडी थापडी
गुळाची पाडी!
धम्मक लाडू
तेल काढू!
तेलंगीचे एकच पाव
दोन हाती धरले कान!
चाऊमाऊ चाऊमाऊ
पितळीतले पाणी पिऊ
हंडा-पाणी गडप!
|
करंगळी, मरंगळी
करंगळी, मरंगळी
मधल बोट, चाफेकळी,
तळहात – मळहात,
मनगट – कोपर,
खांदा-गळागुटी-हनुवटी,
भाताचं बोळकं,
वासाचं नळक,
काजळाच्या डब्या,
देवाजीचा पाट,
देवाजीच्या पाटावर,
चिमण्यांचा किलबिलाट.
|
भटो भटो
भटो भटो
कुठे गेला होतात?
कोकणात
कोणातून काय आणले?
फणस
फणसात काय?
गरे
गर्यात काय?
आठिळा
तुम्ही खा गरे, आम्ही खातो गरे
म्हशीला काय?
चार खंड
|