झाडं डोलू लागली

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. त्यावेळी झाडे सतत उभी राहून कंटाळली होती. जाम वैतागली होती.

झाडांना वाटे,
आपण असं किती वर्ष सतत उभंच राहायचं?
हे असं वार्‍याच्या दिशेने फक्त आम्हीच का डोलायचं?
सगळया गोष्टी नेहमी आम्ही वरतूनच का पाहायच्या?
ऊन-पाऊस सगळयात आधी आम्हीच का झेलायचं?
भरदुपारी उन्हान भाजून निघताना आम्हीच इतरांना सावली का द्यायची?
पक्ष्यांनी आमच्याच अंगाखांद्यावर घरटी का बांधायची?

उभं राहून राहून कधी कधी पाय दुखतात.
वारा अडवताना कधी कधी फांद्या मोडून पडतात.

आम्ही बसायचं म्हणजे उन्मळून पडायचं?
आम्ही बसायचं म्हणजे का तुटून पडायचं?
नाही! कदापी नाही!!

आम्हाला पण बसता आलं पाहिजे.
मातीत पाय पसरता आले पाहिजेत.
फांद्या मुळं ताणून मस्त आळस देता आला पाहिजे.

आणि खरंच
दुसरा दिवस उजाडला. झाडं मातीत बसली.
अगदी आरामात पाय पसरून बसली.

झाडांना वाटलं, बरं झालं! छान झालं!! आता आराम.
पण झाडं बुटकी झाल्याने नवीनच गोष्टी घडू लागल्या.

माणसे येता जाता झाडं तोडू लागली.
उगाचच पायाखाली तुडवू लागली.
कुणीही यायचं, झाडावरची कितीही फळं तोडायचं.
हवं तर खायचं नाहीतर फेकून द्यायचं.

नारळ, आंबा, पेरू, चिकू, पपई, सफरचंद, केळी, काजू अशी फळंच झाडांवर दिसेनात.
अर्धवट खाऊन फेकून दिलेल्या फळांचा, झाडांच्या बाजूला खच पडला.
जातायेता कुणीतरी उगाचंच पानं-फुलं तोडत. झाडाखालीच फेकत.

वाघ, सिंह, हत्ती, जिराफ, कोल्हे, लांडगे, गेंडे, झेब्रे, असे प्राणी जंगलात झाडांवरच बसत नाही तर उभे राहू लागले.
पक्ष्यांना झाडावर घरटीच बांधता येईनात.
पक्षी आकाशात सैरावैरा उडू लागले.

पावसाचे ढग, बुटक्या झाडांमुळे थांबेनात. पाऊस काही येईनात.
झाडं रोड झाली. झाडं सुकत चालली.
आता,
झाडं वार्‍यासोबत डोलेनात.
माणसं, प्राणी झाडाच्या सावलीत येईनात.
झाडांच्या फांद्यावर पक्षी गाईनात. पिल्ल खेळेनात.
झाडांवरची सुंदर मधूर फळं कुणालाच मिळेनात.
मोहक सुवासिक फुलं तर पाहायला ही मिळेनात.

झाडांना वाईट वाटलं.
झाडं मनातल्या मनात रडली.
त्यांची पानं ओली झाली!

झाडांनी पुन्हा विचार केला.

आणि खरंच, तेव्हापासून….

सगळी झाडं आनंदाने उभी राहीली.
वार्‍यासंगे डोलू लागली.
ऊन – पाऊस झेलू लागली.
फळं फुलं देऊ लागली.
झाडावरती पक्षी आले.
झाडाखाली प्राणी विसावले.

आता,
फुलांनी सजलेली लहान मुले, झाडांच्या सावलीत खेळतांना फळं खाऊ लागली!
झाडांना मनापासून आनंद झाला.

झाडं वार्‍याशिवाय डोलू लागली.
फळा – फुलांनी बहरून गेली.

– राजीव तांबे