विंदा करंदीकर

vindakarandikar बहुपेडी विंदा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित गेली ६५ वर्षे साहित्यक्षेत्रात आहेत. कवी, साहित्यिक, भाषांतरकार, निबंधकार अशा विविधांगांनी वावरणारे गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर यांचा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. भारतातील ज्ञानपीठ सारखा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे वि. स. खांडेकर आणि वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यानंतर विंदा मराठी साहित्यातील तिसरे साहित्यिक आहेत. भारतीय साहित्य क्षेत्रातील हा बहुमान खरं तर त्यांना केव्हाच मिळायला हवा होता, पण उशिराने का होईना त्यांचा योग्य तोच सन्मान झाल्याची प्रतिक्रिया साहित्य वर्तुळात उमटली.

ज्येष्ठ विचारवंत एल. एम. सिंघवी यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार निवड समितीची बैठक शनिवारी दिल्लीत पार पडली आणि लगेचच रविवारी ह्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. पाच लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले. माझ्यादृष्टीने रसिकांचे प्रेम हाच खरा सन्मान आहे. पुरस्कार वगैरे उपचार असतात. हा पुरस्कार म्हणजे माझ्या एकटयाचा सन्मान नाही, तर मराठी भाषा, कविता आणि काव्य परंपरेचा हा सन्मान आहे,’ अशा शब्दांत विंदांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

काव्यवाचनाचा प्रकार फारसा रूढ नसतानाही वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि विंदा या तिघांनी काव्यवाचनाच्या जाहीर कार्यक्रमांचे अनेक फड रंगवले आहेत. १९४९ साली प्रथम प्रकाशित झालेल्या ‘स्वेदगंगा’ पासून सुरू झालेला विंदांचा साहित्यिक प्रवास ‘मृद्गंध’, ‘धृपद’, ‘जातक’, ‘विरूपिका’ आदी काव्यसंग्रह; ‘स्पर्शाची पालवी’ आणि ‘आकाशाचा अर्थ’ हे दोन लघुनिबंधसंग्रह; ज्ञानेश्वरांच्या ‘अमृतानुभवा’चा अर्वाचीनीकरणाचा अभिनव प्रयोग; ‘परंपरा आणि नवता’ हा मराठी समीक्षालेख संग्रह; फाऊस्ट, राजा लिअर आणि ऍरिस्टॉटलचे काव्यशास्त्र आदी अनुवादीत ग्रंथ.

‘राणीचा बाग’, ‘एकदा काय झाले’, ‘सशाचे कान’, ‘एटू लोकांचा देश’, ‘पिशी मावशी आणि तिची भुतावळ’ हे काही बालकविता संग्रह. २००३ साली प्रकाशित झालेला ‘अष्टदर्शने’ या संग्रहापर्यंत येऊन पोहोचतो. ‘अष्टदर्शने’ या संग्रहात आठ तत्त्वज्ञांचे विचार त्यांनी सोप्या रचनांमध्ये मांडले आहेत. याच संग्रहाकरता त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आहे. आशयगर्भित पण सोपी शब्दरचना करणारे विंदा आपल्या कवितांतून वैश्विक सत्य धुंडाळत राहिले. त्यांची कविता प्रयोगशील आहे. विंदांच्या काव्यात व्यक्तिगत भावजीवनापासून सामाजिक वास्तवापर्यंतचे व्यापक अनुभव पाहायला मिळतात. विंदांना ललित पारितोषिक समितीचे क्रिटिक्स ऍवॉर्ड, सिनीयर फुलब्राईट, कबीर सन्मान, सोव्हिएत लँड नेहरू लिटररी ऍवॉर्ड, जनस्थान पुरस्कार तसेच साहित्य अकादमीची फेलोशिपही मिळाली आहे.

१९४९ च्या मे महिन्यात विंदांच्या ‘स्वेदगंगा’ या कवितासंग्रहाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. ‘स्वेदगंगा’ या कवितासंग्रहात अंतर्भूत कवितांची सामाजिक आशयाची कविता, व्यक्तिचित्रणात्मक, प्रेमविषयक, बालजीवनविषयक, चिंतनात्मक, देवगड-राजापूरकडील बोलीभाषेतील कविता अशी वर्गवारी करता येऊ शकते. स्वेदगंगा कवितासंग्रहातून पुढील तीन कविता घेण्यात आल्या आहेत.

समतेचे हे तुफान

उठलेऊठ ऊठ सह्याद्रे, घुमवित बोल मराठी खडे;
समतेचे हे तुफान उठले; उठले सागराकडे.

हीच मराठी जिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी;
शिवबाने तरवार घासली याच मराठीवरी;
हिच्या स्वागतासाठी झडले तोफांचे चौघडे.

टिळक, गोखले, फुले, रानडे, आगरकर वैखरी –
स्वातंत्र्याच्या पाच मशाली जळती वेदीवरी;
ह्या ज्योतीवर दीप पेटवा चला भविष्याकडे.

स्वतंत्रतेचा मंत्र जयांना गर्भामध्ये मिळे,
तेच मराठे आम्ही;
आम्ही सह्याद्रीचे सुळे;
स्वराज्यांतुनी पुढे चला रे, चला सुराज्याकडे.

दर्याच्या भरतीच्या लाटा महाराष्ट्रअंगना
कंकणनादा भिउनी तयांच्या शत्रु सोडिती रणा;
वीज माळुनी वेणीवरती त्याही घुसल्या पुढे.

ऊठ खेडुता, पुन्हा एकदा झाडुनिया घोंगडी;
ऊठ मजुरा, पुन्हा मारण्या आघाडीवर उडी;
एकजूट ही पाहुन पडतिल अन्यायाला तडे.

तीर्थाटण

तीर्थाटण मी करित पोचलो नकळत शेवट तव दारी;
अन् तुझिया देहांत गवसली सखये मज तीर्थें सारी.

अधरावरती तव वृंदावन;प्रयाग सापडले नेत्री;
भालावरती ते मानस सर.

मानेवरती गंगोत्री;
गया तुझ्या गालांत मिळाली;
रामेश्वर खांद्यावरती;
मिळे द्वारका कमरेपाशी अन् काशी अवतीभवती.

मोक्षाचीही नुरली इच्छा;
नको कृपा याहुन दुसरी;
तीर्थाटण मी करित पोचलो नकळत शेवट तव दारी.

बेडकांचे गाणे

डरांव् डुरुक् डरांव् डुरुक्,
डरांव् डुरुक्
आम्ही मोठे राव;
डरांव् डरांव् डरांव्!

सागर म्हणती उगाच मोठा,
भव्य किती डबक्यांतिल लाटा!
सागर नुसते नाव;
डरांव् डरांव् डरांव्!

गंगाजळ ना याहुन निर्मळ;
या डबक्यांहुन सर्व अमंगळ;
बेडुक तितुके साव;
डरांव् डरांव् डरांव्!

खोल असे ना याहुन काही;
अफाट दुसरे जगांत नाही;
हाच सुखाचा गाव;
डरांव् डरांव् डरांव्!

चिखल सभोंती अमुच्या सुंदर;
शेवाळ कसे दिसे मनोहर;
स्वर्ग न दुसरा राव;
डरांव् डरांव् डरांव्!

मंत्र आमुचा ‘डरांव्’
आदी,’अनंत’ आणिक असे ‘अनादी’,
अर्थ कसा तो लाव; डरांव् डरांव् डरांव्!

‘मृद्गंधा’ कवितासंग्रह १९५४ साली प्रकाशित झाला. विंदाच्या कवितांमध्ये एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभिर्य, मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य ह्यांचा एकदम प्रत्यय येतो. हेच ‘मृद्गंधा’ मध्येही जाणवते. मृद्गंधा कवितासंग्रहातून पुढील कविता घेण्यात आल्या आहेत –

तेंच तें
सकाळपासून रात्रीपर्यंत
तेंच तें! तेंच तें!
माकडछाप दंतमंजन;
तोच चहा, तेच रंजन;
तीच गाणी, तेच तराणे;
तेच मूर्ख, तेच शहाणे;
सकाळपासून रात्रीपर्यंत
तेंच तें! तेंच तें!

खानावळीही बदलून पाहिल्या;
(जीभ बदलणे शक्य नव्हते!)
‘काकू’पासून ‘ताजमहाल’
सगळीकडे सारखेच हाल.
नरम मसाला, गरम मसाला;
तोच तोच भाजीपाला;
तीच तीच खवट चटणी;
तेंच तेंच आंबट सार;
सूख थोडे; दुःख फार!

संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे!

या स्वप्नांचे शिल्पकार
कवी थोडे; कवडे फार.
पडद्यावरच्या भूतचेष्टा:
शिळा शोक, बुळा विनोद
भ्रष्ट कथा, नष्ट बोध;
नऊ धागे, एक रंग;
व्यभिचाराचे सारे ढंग!

पुन्हा पुन्हा तेच भोग;
आसक्तीचा तोच रोग.
तेच ‘मंदिर’, तीच ‘मूर्ति’;
तीच ‘फुलें’, तीच ‘स्फूर्ती’
तेच ओठ, तेच डोळे;
तेच मुरके, तेच चाळे;
तोच ‘पलंग’, तीच ‘नारी’;
सतार नव्हे, एकतारी!

करीन म्हटले आत्महत्या;
रोमिओची आत्महत्या;
दधीचीची आत्महत्या!
आत्महत्याही तीच ती!
आत्माही तोच तो;
हत्याही तीच ती;
कारण जीवनही तेंच तें!
आणि मरणही तेंच तें!

ऊन हिवाळयांतील शिरशिरतां

ऊन हिवाळयांतील शिरशिरतां
स्थितप्रज्ञ काळया दगडावर,
मला वाटते क्षणभर फुटतो
दगडाला इच्छेचा अंकुर.

ऊन हिवाळयांतील हळदीचें
किरीट घालतें वृध्द वडावर!
मला वाटतें तळयांत पाहुन
हात फिरवतो तो दाढीवर !

ऊन हिवाळयातील कुडकुडतें,
कुशींत शिरतें दिसतां डोंगर;
मला वाटते त्यालाही मग
गरम झ-याचा फुटतो पाझर.

ऊन हिवाळयांतील भुळभुळतें
आजीच्या उघडया पाठीवर;
तिच्या भ्रमाला गमतें आपण
पुन्हा जरीचा ल्यालों परकर!

ऊन हिवाळयांतील हिरमुसतें
रुसतें, अन् माळावर बसतें;
मला वाटते त्यालाही पण
असेंच भलतें वाटत असते.