स्त्री जीवनातील अनुभवांना साहित्याच्या रूपात उतरवतांना फक्त कौटुंबिक आणि सामाजिक वास्तव परीस्थितीची चिकित्सा न करता, स्त्रीमनाच्या व्यथांची जाणीव करून देणारे मराठी साहित्य विभावरी शिरूरकर उर्फ मालतीबाई बेडेकर यांनी लिहिले. विसाव्या शतकाच्या तिस-या दशकात ह्या लेखिकेने स्त्रीमनाचा ठाव घेणा-या साहित्यातून समाजासमोर एक झंझावाती वादळ निर्माण केले. रूढीपरंपरापूर्ण समाजातील स्त्रीयांच्या दुःखद स्थितीचे सहानुभूतीने चित्रण करणा-या साहित्यातील पुरूषी औदार्यभावाला बाजूला ठेवून केवळ स्त्रीनिष्ठ जाणिवांतून स्त्रीप्रश्नांना वाचा फोडणारे साहित्य पहिल्यांदीच मराठीत आविष्कृत केले होते. स्त्रीस्वातंत्र्याच्या प्रश्नांची चर्चा करणारे हे साहित्य यापूर्वीच्या पुरूषी दडपशाहीला नकार देऊन स्वतंत्रपणे स्त्रीकेंद्री कलेचा शोध घेणारे ठरले.
स्त्रीयांच्या व्यथित मानसिक आंदोलनांना वाङमयरूपात सादर करणा-या या लेखिकेचे क्रांतीरूप पुरूषसत्ताक वाङमयात दुर्लक्षिले गेले असले, तरी स्त्रीयांचे मन साहित्यात उतरवण्यासाठी स्त्री साहितिकच असायला हवा. मराठी वाङमयाच्या इतिहासात इ.स. १९३३ ते १९४५ या काळात विभावरी शिरूरकर यांच्या लेखनाने एक वादळ निर्माण केले. १९३३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘कळ्यांचे निश्वास’ या संग्रहाने स्त्रियांच्या कथासाहित्यात परिवर्तनाला सुरूवात झाली. तसेच ‘ हिंदोळ्यावर’ आणि ‘ विरलेले स्वप्न’ या दोन्ही कादंब-यांनी हा प्रवाह अधिक व्यापक झाला. या सर्व लेखनाची निर्माती करणारी ‘विभावरी शिरूरकर ही व्यक्ति कोण ? या विषयी कुतुहल निर्माण झाले. विभावरी शिरूरकर बी .ए. या नावाने प्रसिद्ध होणारे लेखन श्रीमती मालतीबाई बेडेकर लिहित होत्या याचे रहस्य १९३३ ते १९४६ पर्यत सुमारे तेरा वर्षे उलगडले नव्हते. स्त्रीयांवरील एका व्याख्यानाप्रसंगी त्यांनीच ते प्रकट केले.
विभावरी शिरूरकरांनी स्त्रीकेंद्री कथा, कादंब-या , नाटकांचे लिखाण केले त्यात शबारी, लग्न की कौमार्य, पतिची निवड, शेवग्याच्या शेंगा, वहिनीच्या बांगडया, अंतःकरणाचे रत्नदीप, ताई हेच बरे, सुखाचे संसार, प्रेम विष की अमृत, तू, आई की दावेदारीण, रिकाम्या भांडयाचे निनाद, त्याग, बाबांचा संसार माझा कसा होईल, शिकारी, दोघांचे विश्व, खरे मास्तर, प्रेम की पशुवृत्ती, प्रेमाची पारख, मोरणी, एकच क्षण, पारध, हिरा जो भंगला नाही. यासारख्या साहित्याद्वारे विभावरी शिरूरकरांनी स्त्रीयांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या भावनात्मक समस्या समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला होता.
विभावरी शिरूरकर यांचे लेखन त्या काळच्या इतर स्त्री लेखिकांपेक्षा संपूर्णपणे नव्या शैलीचे होते. स्त्री-प्रश्नांची मानसिक बाजू त्यांनी फार प्रभावीपणे आपल्या कथांतून माडली, प्रौढ कुमारिकांच्या मनातला मानसिक कोंडमारा, कुरूप मुलींचे लग्नाचे प्रश्न आणि त्यांची मानसिक कुचंबणा, हुंड्याचे प्रश्न , प्रेमातील पाशवीपणा, अशारीर प्रेम, बाहेरख्यालीपणा इत्यादी स्त्रीजीवाचे अनेकविध बाजूचे दर्शन घडविण्यात त्यांच्या कथा यशस्वी झाल्या.
त्यांचे पुरूषांविषयीचे विचार या प्रसंगाद्वारे सांगता येईल, विभावरी शिरूरकरांचे पति विश्राम बेङेकर यांनी त्यांना लिन युटांगा या लेखकाच्या पूस्तकातील एक पान वाचून दाखविले , त्यात लिहिले होते, खरे म्हणजे संसार सुखाचा करणे सोपं आहे, उत्तम स्वयंपाकासाठी चिनी बायको करायची, शृंगारासाठी फ्रेंच, समारंभात शोभावी म्हणून गुलाबी सौंदर्याची इंग्रज मुलगी, दणकट राकट खेळाकरता साथी सवंगडी म्हणून जर्मन तरूणी आणि दळण कांडणापासून प्रवासातील पेटया डोक्यावर वाहून नेऊ शकेल अशी आफ्रिकन धसमुसळी! सगळ्यांशी एकदम लग्न केले म्हणजे झाले. यावर मालतीबाईची बंडखोर वृत्ती जागी झाली आणि त्या एकदम म्हणाल्या, “या युटांगला हे आज कळतं आहे. द्रौपदीला ते दीड हजार वर्षापूर्वीच ठाऊक होतं म्हणून तिनं एकदम पाच नवरे केले” मालतीबाई बेडेकर यांच्या मनात पुरूषसत्ताक समाजातील स्त्रियांच्या स्थानाचा प्रश्न किती खोलवर रूजलेला होता हे या उदगारावरून लक्षात येते. त्यामुळेच त्यांचा जहाल व नेमस्त स्त्रीवाद या दोन्ही भूमिकांतील तथ्यांश स्वीकारून ‘ न्यूक्लिअस अपरोच ‘ ठेवून स्त्रीवादाचा स्वीकार, ही मध्यममार्गी भूमिका मांडली आहे. स्त्रीयांच्या शोषणाच्या इतिहासाला स्त्रीयांच्या अस्मिता लढयाच्या ध्येयाशी जोडून वाङमयात शिलीभूत झालेला स्त्रीत्वाचा आशय खणून काढणे हे स्त्रीवादी जाणिवांशी सुसंगतच आहे . विभावरी शिरूरकर यांनी विविध स्त्रीकेंद्री पैलू अत्यंत समर्पक आणि आधुनिकतेला साजेसे मांडले आहेत.