वेळेचे महत्त्व

img ईशान नेहमीप्रमाणे उशीरा उठला. त्यामुळे सकाळची आवश्यक कामे त्याला घाईने आवरायला लागली. इतक्यात स्कूलबसचा हॉर्न ऐकू आला. “अगं आई, मला ‘टू नंबरला’ लागली आहे” ईशान काकूळतीला येऊन म्हणाला. “अरे केवढा उशीर झाला आहे, आता शाळेतच टॉयलेटला जा.” आई म्हणाली.

शाळेच्या रस्त्यावर खूपच रहदारी असल्यामुळे शाळेत पोहोचायला उशीर झाला. ईशान शाळेत पोहोचला तेंव्हा प्रार्थना होऊन वर्ग भरले होते. त्यामुळे टॉयलेटला न जाता त्याला सरळ वर्गात जावे लागले. जोशी टिचर अफ्रिकेचा धडा शिकवत होत्या. “मुलांनो, अफ्रिकेत रहाणार्‍या मांजरीसारख्या दिसणार्‍या मोठया प्राण्याचे नाव कोणी सांगू शकेल काय?” ईशानने अभावितपणे हात वर केला. सगळा वर्ग ईशानकडे उत्सुकतेने पाहू लागला. ईशान बिचारा दोन्ही पाय एकमेकांवर ठेऊन म्हणाला, “टीचर मी टॉयलेटला जाऊ?” टीचर रागावून म्हणाल्या, “मी सिंह ऐकलाय, वाघ ऐकलाय पण टॉयलेट कुठे ऐकला नाही. गप्प खाली बस.”

थोडयावेळाने छोटी मधली सुट्टी झाली. सारी मुले वर्गातून बाहेर पळत गेली. तुम्हाला माहितीये ना इमर्जन्सी असल्यावर धावणे किती अवघड होतं ते. दोन्ही पाय व पोट आवळून ईशान टॉयलेट पर्यंत पोहोचला तर भली मोठी रांग. त्याचा नंबर येईपर्यंत सुट्टी संपल्याची घंटा झाली सुध्दा. त्यामुळे ईशानला काही न करताच परत यावे लागले.

ईशानचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला. जिम्नॅस्टीकच्या तासाला उडया मारणे कठीण गेले. संगीताच्या तासाला सगळेच सूर बेसूर भासले. आवडत्या हिंदीच्या तासाला सुध्दा लक्ष लागले नाही. आता चित्रकलेचा शेवटचा तास चालू होता. एरवी रंगांशी मनसोक्त खेळायला, त्यांच्यात रमायला ईशानला खूप आवडायचं. पण आज मात्र ब्रश हातात पकडण सुध्दा कठीण जात होतं. त्याची अस्वस्थता मंजिरी टीचरच्या लक्षात आली. “ईशान, काही हवयं का?” टीचरेने विचारले. ईशान रडवेला होऊन म्हणाला, “टीचर मला खूप जोरात टॉयलेटला लागलीये हो. मी जाऊ का?” टीचर म्हणाल्या, “अरे आधीच नाही का सांगायचे. आधी जाऊन ये बर”

ईशान टॉयलेटला जाऊन आल्यावर टीचरने त्याला दिवसभर काय घडल्याचे विचारले. ऐकल्यावर टीचर वर्गाला उद्देशून म्हणाल्या, “मुलांनो वेळेच्या आधी थोडे लवकर उठून आपण दिवसाची सुरूवात केली पाहिजे. आपला रोजचा सकाळचा दिनक्रम जसे की अंघोळ, टॉयलेट, ब्रेकफास्ट व्यवस्थित झाला पाहिजे. त्यामुळे आरोग्य तर चांगले राहतेच पण घाई न होता दिवसाची सुरूवात चांगली होते. दिवस अस्वस्थतेत जात नाही. मग उठणार ना उद्यापासून लवकर?”

सगळ्या मुलांनी मोठयाने होsss म्हटले.

– भाग्यश्री केंगे

बोलण्याआधी विचार करावा

विकीचे तोंड खूप मोठे होते. विकी मोठयाने तोंडाचा ‘आss’ करायचा आणि तोंड पसरून हसायचा. तो होता सहा वर्षांचाच पण सारखे प्रश्न विचारायचा आणि दुस-यांच्या गोष्टीतही ढवळाढवळ करायचा. विकीची वाईट सवय काय होती माहितीये का? मागचा पुढचा विचार न करता विकी डोक्यात येईल ते पटकन बोलून मोकळा व्हायचा आणि त्यामुळे कायम अडचणीत यायचा. विकीला आपल्या बोलण्यावर किंचितही ताबा रहात नसे. डोक्यात विचार आले की सारे शब्द विकीच्या कानात घुमायला लागून, नाकावर आपटून, तोंडातून लाहयांसारखे पटापट बाहेर पडायला लागत. त्या दिवशी शाळेत सगळ्यांना बाईंनी लिहीण्याचा सराव करायला सांगितले. विकीसुध्दा मन लावून वळणदार अक्षर काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याने सहज वर बघितले तर ईशानी चुकीच्या पध्दतीने पेन्सिल पकडून लिहीत होती. बाई तिला समजावून सांगणार इतक्यात विकीच्या डोक्यात विचार आले, कानात घुमले, नाकावर आपटले आणि लाहयासारखे पटापट बाहेर पडले”, ईशानी तुला नीट पेन्सिल सुध्दा पकडता येत नाही का? ” बाईंना भयंकर राग आला. चष्मा नाकावर घेत त्या म्हणाल्या, ”विकी स्वत:चे काम सोडून दुस-यांच्या कामात नाक खुपसू नकोस”. विकीला खूप अपमानित झाल्यासारखे वाटले. सारी वर्गातली मुले विकीकडे रागाने बघत होती. शाळा संपेपर्यंत कोणीच त्याच्याशी बोलले नाही.

उदास झालेला विकी शाळेतून घरी जाता जाता विचार करीत होता. ”सगळे माझ्याशीच असे का वागतात? मला का कोणीच मित्र नाहीत?” घरी पोहोचेपर्यंत तोंडावर बराच ताबा झाला होता. घरात शिरल्या बरोबर त्याला चॉकलेट केकचा खरपूस वास आला. त्याची आई आणि बालवाडीत जाणारी छोटी बहिण मिनी केकवर रंगीत गोळयांनी सजावट करत होत्या. एकीकडे मिनी आईला रंग सांगत होती. ”आई, हा बघ लाल रंग”, आई, हा बघ पिवळा रंग”, हे पाहताच विकीच्या डोक्यात विचार आले, कानात घुमले, नाकावर आपटून, तोंडातून पटापट बाहेर पडले. ”आई, मला तर ह्या रंगाचे स्पेलिंग्सही माहित आहेत सांगू R…E…D, Y..E..L..L..O..W. विनी हे ऐकून हिरमुसली होऊन बेडरूममध्ये गेली. हे सारे पाहून आई रागावली आणि विकीला खूप ओरडली. विकीला वाईट वाटले. आई मला लहान बहिणीसमोर ओरडली माझा इतका अपमान. चॉकलेट केकची मज्जाच हरवली.

एवढयात बेल वाजली. मुलांचे लाडके नाना आजोबा आले होते. मुलांनी खुशीत येऊन आजोबांना मिठी मारली. आजोबांना विनी आणि विकीचे बदलणारे मूड चटकन समजत त्यामुळे आजोबांनी विकीला नाराजीचे कारण विचारले. विनीने सकाळपासून घडलेले आजोबांना सविस्तर सांगितले. आजोबांनी ‘हूं ! असे आहे तर सारे’ म्हणत मोठा श्वास घेतला आणि विकीला म्हणाले ”चल बाहेर फिरून येऊ या”. आणि क्षणात बाहेर निघाले सुध्दा.

आजोबा सर्वात प्रथम सैनिक शिक्षण देणा-या शाळेत विकीला घेऊन गेले. तेथे छोटया मुलांना घोडेस्वारी शिकवत होते. एवढया मोठया घोडयांवर विकीच्या वयाची मुले ताबा कसा मिळवायचा शिकत होती. प्रशिक्षित घोडेस्वाराचे कौशल्य तर पाहण्यासारखे होते. आजोबांनी विकीला म्हटले, ”बघ, विकी एवढया मोठया घोडयाला कसे काबूत ठेवले जातेय”. विकी सारे पाहून विचारात पडला.

आजोबा त्याला तसेच विचारात राहू देत म्हणले, ”चल तुला आणखी एक गंमत दाखवतो”. आजोबा एका ठिकाणी जेथे बांधकाम चालू होते तेथे घेऊन गेले. मोठया क्रेनच्या साह्य्याने दगड,माती एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी हलविण्याचे काम चालू होते. एवढया मोठया क्रेनला चालवत होता एक चालक. आजोबांनी विकीला म्हटले, ”बघ आपल्यासारखीच शक्ती असणारा चालक आहे तो. पण एवढया मोठया क्रेनवर ताबा कसा ठेवतोय.”

एवढयात त्यांना आगीच्या बंबाचा हॉर्न ऐकू येऊ लागला. थोडे पुढे गेल्यावर त्यांनी पाहिले की एका इमारतीला आग लागली होती आणि सारीकडे धावपळ चालली होती. हे पाहून आजोबांनी चौकशी केली. पोलिसांनी सांगितले एका दहा वर्षाच्या मुलाच्या हलगर्जीपणामुळे, काडेपेटीशी खेळत असतांना आग लागली. थोडावेळ थांबून आजोबा आणि विकी परत निघाले. जातांना विकी गप्प बसलेला पाहून आजोबांनी उजळणी केली. ”तगडया घोडयाला घोडेस्वार काबूत ठेवत होता”, ”मोठया क्रेनला चालक चालवत होता”, आणि ”एवढी मोठी आग एका छोटया काडीनेच लागली होती” ह्या सा-यामागचा विचार सांगू शकशील ?

विकी आता खरोखरीच विचारात पडला होता. आजोबांनी हसत सांगितले,”अरे विकी ह्या सा-या मोठया गोष्टींवर लहान किंवा छोटया गोष्टी नियंत्रण करीत होत्या. त्याचप्रमाणे आपल्या विचारांवर आणि तोंडावर काबू ठेवते, ती आपली जीभ. ह्या जीभेचा म्हणजेच बोलण्याचा वापर आपण विचारपूर्वक केला पाहिजे. प्रत्येक वेळेला स्पष्टपणे सांगितलेले विचार सांगितले तर समोरचा माणूस दुखावला जाऊ शकतो.

म्हणून बोलतांना आपल्या जीभेवर आपले नियंत्रण असावे”.

विकीला आजोबांचे बोलणे एकदम पटले पण तो म्हणाला ”आजोबा विचार आले की कधी एकदा बोलून मोकळा होतो असे होऊन जाते. मग काय करायचे ? आजोबा समजावणीच्या सुरात म्हणाले अरे हो मला मान्य आहे. ही गोष्ट मोठयांनासुध्दा लवकर जमत नाही. त्यामुळे तुला ही सवय विचारपूर्वक स्वत:ला लावावी लागेल. विकीला सारे पटले आणि त्यांनी आजोबांना तसे करण्यासाठी प्रॉमिस सुध्दा केले. लगेच तो म्हणाला चला आधी विनी आणि आईला ‘सॉरी’ म्हटले पाहिजे. आजोबा आणि विकी चॉकलेट केकवर ताव मारण्यासाठी घराकडे निघाले…

– भाग्यश्री केंगे

← अंकूर बालसंस्कार कथा मुख्यपान