सरला ऋतु वासंतिक…
मोजकेच पण दर्जेदार लेखन करणा-या मराठीतील विख्यात कवयित्री वासंती मुझुमदार यांच्या साहित्य मैफलिची आठवण आजही मराठी मनावर रेंगाळते. माधव ज्युलियन यांची ‘वेड आधी सांग कोणी लाविले’ ही कविता त्या गात होत्या. तिरक्या रेलून बसल्या होत्या. त्यांनीच त्या कवितेला चाल दिली होती, व आपल्या सुरेल्या आवाजात त्या ती कविता सादर करीत होत्या. वासंती मुझुमदार… त्यांनी सादर केलेली कविता किंवा कलाकृती अशी असायची की जी रसिकांनी आवर्जून ‘ऐकावी’, ‘वाचावी’ व ‘पाहावी’… ललित लेखन, कविता व चित्रकला या कलांचा त्रिवेणी संगम त्यांच्या ठिकाणी जुळून आला होता. अभिजात शास्त्रीय संगीत, वाद्यवादन, छायाचित्रण इ. गोष्टींची त्यांना आवड होती.
सत्यकथा, मौज परिवारातील कलावादी व वैशिष्टयपूर्ण लेखिका म्हणून त्यांची एक खास ओळख मराठी रसिकांना होती. ‘सहेला रे,'(१९८३) व ‘सनेही’ एक कवितावली, (१९९७) हे त्यांचे लोकप्रिय कवितासंग्रह. याशिवाय, ‘नदीकाठी'(१९९२, दुसरी आवृत्ती १९९५) व ‘झळाळ'(२००१) हे दोन ललित लेखसंग्रह सुध्दा सुपरिचित आहेत. वासंती मुझुमदार यांची काही संपादित पुस्तके देखील प्रसिध्द आहेत. ‘श्री. पु. भागवत: व्यक्ती आणि संपादक’, रूची संगीत विशेषांक या दोन्ही ग्रंथाली प्रकाशनाच्या पुस्तकांचे त्यांनी संपादन केले. श्री. पु. भागवत यांनी लिहिलेल्या ‘साहित्याची भूमी’ च्या संपादनाची धुरा वासंती मुझुमदार यांनी सहजी सांभाळली. ‘रूची’ आणि ‘साहित्याची भूमी’चे मुखपृष्ठ देखील त्यांनीच चितारले, सजविले होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक कलांचा मेळ हा स्फूर्तीदायी तसाच नवदृष्टिदायी होता. Indian Heritage हा त्यांचा ग्रंथ I.C.S.W.ने प्रसिध्द केला.
त्यांच्या ब-याच ग्रंथांना शासनाचे वाङ्मय पुरस्कार मिळाले आहेत, हे त्यांच्या साहित्यिक कर्तृत्त्वाचे द्योतकच आहे. ‘सहेला रे’ कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा केशवसुत पुरस्कार, इंदौर साहित्यसभेचा तात्यासाहेब सरवटे पुरस्कार, वर्धा साहित्यसभेचा बा.सी. मर्ढेकर पुरस्कार, केंद्र शासनाचा उत्कृष्ट निर्मिती हा प्रकाशकाचा पुरस्कार, इत्यादि पुरस्कार लाभले. ‘नदीकाठी’ ह्या ललित लेखसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा अनंत काणेकर प्रथम पुरस्कार, भैरूरतन दमाणी पुरस्कार, यशवंतराव चव्हाण कराड पुरस्कार तसेच ‘अक्षरधन'(बोरीवली) यांचा ‘उत्कृष्ट साहित्यिका’ पुरस्कार मिळाला. झालंच तर, त्यांच्या ‘झळाळ’ ह्या लेखसंग्रहास श्री. ज. जोशी पुरस्कार, साने गुरूजी उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार- असे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले.
वासंती मुझुमदार ह्या एक उत्तम चित्रकारही होत्या. ‘मौज’ प्रकाशनाच्या अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे त्यांनी तयार केली होती. यामध्ये इंदिरा संत, वसंत बापट, तारा बनारसे, श्री. पु. भागवत, आशा बगे, गौरी देशपांडे आनंद यादव, बा. भ. बोरकर, श्रीनिवास वि. कुलकर्णी, कवी पाडगावकर इत्यादि प्रतिभावंतांच्या पुस्तकांचा समावेश आहे. मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरी येथे त्यांची दोन तैलचित्रांची प्रदर्शने, ताज आर्ट गॅलरी येथे एक प्रदर्शन, सिधराणी आर्ट गॅलरी, त्रिवेणी कला संगम, नवी दिल्ली येथे तैलचित्रांचे एक प्रदर्शन त्यांनी भरविले. ललित कला अकादमी, नवी दिल्ली यांच्या राष्ट्रीय कला प्रदर्शनासाठी त्यांच्या चित्रांची निवड झाली होती.
अनेक वेळा त्यांनी काव्यवाचन तसेच कविसंमेलनाच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले होते. मुंबई दूरदर्शनवर शब्दांच्या पलिकडले, शरदाचे चांदणे, सुंदर माझं घर, पर्यावरण इत्यादि सदरांत त्यांनी भाग घेतला. मुंबई दूरदर्शनने सादर केलेल्या ‘गंधर्वसूर’ ह्या पंडित कुमार गंधर्व ह्याच्यावरील विशेष लघुपटामध्ये तसेच मुलाखतीतही त्यांचा सहभाग होता. ‘उंच उंच माझा झोका’ (‘प्रतिभा आणि प्रतिमा’) हा इंदिरा संतांवरील एक तासाचा कार्यक्रम दूरदर्शनने सादर केला. त्यावेळी निसर्गाच्या पार्श्वभूमीवर चित्रित केलेल्या या कार्यक्रमामध्ये वासंतीताईंचे सूत्रसंचालन उठावदार होते. १९८६ सालातील प्रतिभा आणि प्रतिमा हा कार्यक्रम खुद्द वासंती मुझुमदार यांच्यावरच चित्रीत केला गेला. त्यावेळी पुणे विद्यापीठाच्या प्रभाकर नारायण परांजपे यांनी वासंती मुझुमदार यांची मुलाखत घेतली. चित्रकार म्हणून त्याची ‘स्त्रीविविधा’ या कार्यक्रमामध्ये मुलाखत झाली.
१९९३ सालात परभणी जिल्हा साहित्य संमेलनाच्या त्या प्रमुख पाहुण्या होत्या. त्याच वर्षी कव्यरसिक मंडळ, डोंबिवली आयोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यानीं भूषविले. ‘कवितेची बोली’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. मुंबई दूरदर्शनच्या चित्रपट निवड समितीच्या त्या सदस्य होत्या. एवढेच नाही तर अखिल भारतीय फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या सल्लागर मंडळामध्ये देखील त्याची नियुक्ती झाली होती. उ. अ. ण्. ठ. या बालकल्याण समितीच्या त्या प्रमुख समुपदेशक होत्या. अलिकडच्या काळात रूग्णशय्येवर असतानासुध्दा त्यांनी दिवाळी अंकांसाठी लेखने केले होते. लोभस व ऋजु स्वभावाच्या वासंतीबाई आपल्या आयुष्यातील सुख:दुखांकडे सोशिकतेने बघत असत.