काळजी दातांची

मोंटूचे बाबा त्यांच्या ऑफिसच्या कामानिमित्त देशात परदेशात जात असत. मोंटूचा मामाही अमेरिकेत होता. त्यामुळे सतत मोंटूला चॉकलेटचे विविध प्रकार खायला मिळत. चॉकलेट खातांना त्याला मजा येत असे परंतु चूळ भरायला किंवा दात घासायला मोंटूला प्रचंड कंटाळा होता. हळूहळू त्याचे परिणाम दिसू लागला. मोंटूचे वजन वाढायला लागले होते. त्याचे दात काळे होऊन किडायला लागले होते. कधी जर खूप थंड किंवा अती गरम पदार्थ खाल्ले तर त्याच्या दातातून कळा येत असत. अश्या वेळी त्याला अत्यंत रडू येत असे. आईबाबा त्याला ह्या गोष्टीवरुन खूप समजावत पण त्याला अजिबात समजावून घ्यायचे नसायचे.

एके दिवशी झोपलेला असतांना त्याला कुणाचा तरी रडण्याचा आवाज आला. त्याने इकडे तिकडे पाहिले परंतु कोणी दिसेना. थोडयावेळाने आवाज अधिक मोठा झाला. त्याने नीट कानोसा घेतल्यावर लक्षात आले की आवाज तर त्याच्या तोंडातून येत आहे. त्याला अजिबात कळेना म्हणून त्याने आरश्यासमोर आ sss करुन मोठे तोंड उघडले. तर चक्क त्याचे मागचे चार दात म्हणजेच दाढा रडत होत्या. “ऊं, ऊं, मोंटू तू आमची नीट काळजी न घेतल्यामुळे बघ काय झाले?”

“मी..मी कुठे काय केले”, मोंटू ओशाळून म्हणाला.

“हो तूच हे सगळे केलेस. रोज आठ-दहा चॉकलेट्स खायचास. खाल्ल्यावर चूळ भरायचा नाहीस. रात्री दात घासायचा नाहीस. सकाळचे तुझे दात घासणेही घाईचेच असते. त्यामुळे चॉकलेट आणि अन्नाचे सगळे कण आमच्या दातात अडकून रहातात. दिवसरात्र अडकून बसल्यामुळे आम्हाला किड लागली आहे. आमचा पांढराशुभ्र रंग तर काळाकुट्ट झाला आहे. ” दात रडत म्हणाले.

मोंटू दातांचे बोलणे ऐकून अधिकच ओशाळला. दात पुढे म्हणाले “आता तू कुठलाही गरम किंवा गार पदार्थ खाल्ला की आम्हाला किती त्रास होतो माहिती आहे का ? जोरदार ठणका बसतो. डॉक्टर काकांकडे गेल्यावर आता ते आम्हाला काढून टाकणार. तुझ्या हलगर्जीपणामुळे आमचे घर जाणार आहे. ऊं… ऊं… ऊं..”
“मोंटू अरे उठ, शाळेत जायची वेळ झाली आहे” आईची हाक आली.
मोंटू दचकून जागा झाला. “अरे म्हणजे हे फक्त स्वप्न होते तर”. मोंटूला अगदी हुश्श झाले. मात्र त्याने निश्चय केला दातांची काळजी घेण्याचा आणि दात घासायला बाथरुम मध्ये पळाला.

– भाग्यश्री केंगे

निसर्गाचे देणे

मिता कोकणातल्या छोटया खेड्यात रहायची. तिचे गाव शांत, सुंदर आणि समुद्राकाठी वसलेले होते. तिचे बाबा मासळी विकायचे आणि आई घरी पापड, लोणची करुन विकायची. ह्यावर त्यांच्या कुटूंबाचा उदर निर्वाह चालत असे. रोज सकाळी पहाटे उठून मिताही त्यांच्या बरोबर समुद्र किनारी जात असे. तिला सकाळच्या उन्हात चमकणारी समुद्राची वाळू खूप आवडत असे. वाळूत ती अनेक प्रकारची नक्षी काढत असे. समुद्रातले अनेक रंगी मासेही तिला खूप आवडत असत.

तिचे बाबा मासे पकडत तेंव्हा जाळ्यात अडकलेल्या माश्यांची तडफड तिला अस्वस्थ करुन जात असे. तिने एक दिवस तिच्या बाबांना विचारले,” बाबा, आपल्या सारखेच सगळ्यांनी रोजच मासे पकडले तर समुद्रातले मासे एक दिवस संपून जातील? मग सगळ्यांनी बाजारात जाऊन विकायचे काय आणि खायचे काय?” मिताच्या ह्या प्रश्नावर आई-बाबा दोघांनाही हसू आले.

त्या दिवशी रात्री मिताच्या आईला अस्वस्थ करणारे स्वप्न पडले. तिने स्वप्नात पाहिले की समुद्रातले सगळे मासेच संपून गेले आहेत. त्यामुळे त्यांना पैसे मिळणेच कठीण झाले आहे. आईने मिताच्या बाबांनाही हे स्वप्न सांगितले. दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे समुद्रावर जाण्याची तयारी झाली. मिताने बघितले की तिच्या आईने मासे ठेवण्याच्या नेहमीच्या टोपलीपेक्षा आकाराने लहान टोपली घेतली होती. तिला काही कळले नाही पण न विचारताच ती शाळेत गेली.

आल्यावर मिताने बघितले तर तिचे बाबा नारळाच्या झावळ्या करत होते. आई पापड करण्यात गुंग होती. आज दोघेही जण मासळी बाजारातून लवकर घरी आले होते. मिताने त्याबद्दल विचारताच आई म्हणाली,” मिता तुझ्या प्रश्नाने आम्हाला विचार करायला भाग पाडले आहे. आजपासून आम्ही ठरवले आहे की आवश्यकते नुसारच आपल्याला जितके मासे हवेत तितके मासे घ्यायचे. अधिक घेण्याचा हव्यास करायचा नाही. त्यामुळे आपला खर्च भागवण्यासाठी आम्ही इतरही उद्योग करायचे ठरवले आहेत. पण त्यासाठी निसर्गाची हानी मात्र अजिबात करायची नाही.” आईचे बोलणे ऐकून मिताने तिला अत्यानंदाने मिठी मारली.

– भाग्यश्री केंगे

जिद्द

मंजूच्या बोटांना जन्मापासूनच आपल्या सारखी पेरं नव्हती. त्यामुळे तिला वस्तू धरतांना, लिहीतांना, बटण लावतांना अशी रोजची कामे करतांना खूपच त्रास व्हायचा. पण मंजू जिद्दीने स्वतःची कामे कोणाचीही मदत न घेता पूर्ण करायची. मंजूला चित्रकलेची खूपच आवड होती. चित्र काढतांना तिला वेळेचे भान राहत नसे. एका रविवारी सकाळी तीन तास बसून बागेचे सुंदर चित्र रंगवले. चित्र पाहताच आईने आनंदाने मंजूला जवळ घेत म्हटले,”मंजू, तुझ्या हातात कला आहे. त्याला अधिकाधिक वाढवायचा प्रयत्न कर”. आईच्या बोलण्याचा मंजूवर खोलवर परिणाम झाला.

त्या रात्री आईबाबांचे बोलणे मंजूच्या कानावर पडले. आई म्हणत होती,”अहो, आता शाळेत स्पर्धा आहेत. आपण मंजूला नवीन रंग आणि काही कागद घेऊन देऊ या का?”. त्यावर बाबा वैतागलेल्या सुरात म्हणाले,” अगं, महागई किती वाढलेली आहे. शिक्षणाच्या भविष्याच्या द्रुष्टीने कितीतरी पैसा साठवायचा आहे. रंगाचे पैसे खर्च करणे आपल्याला शक्य नाही. तसे ही हातामुळे मंजूला फार काळ चित्रकला करता येईल असे मला वाटत नाही.” वडीलांचे हे शब्द ऐकून मंजूला रडूच कोसळले. सकाळी काढलेले चित्र तिने फाडून टाकले.

दुसर्‍या दिवशी उठल्यावर मंजू आईला स्वयंपाकात मदत करायला आली. आईने आश्चर्याने तिला त्याबद्दल विचारले. मंजूने कालचे संभाषण ऐकल्याचे सांगितले. आईच्या डोळयात पाणी आले. तिने मंजूला कुशीत घेत म्हटले,” मंजू आपल्या अपंगावर आपणच मात करायला शिकले पाहिजे. तुला माहिती आहे विल्मा रुडाल्फ ही अमेरिकन खेळाडू पोलिओमुळे दोन्ही पायांनी अपंग होती. पण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने ऑलिंपिक स्पर्धेत तीन सुवर्ण पदके मिळवून जागतिक विक्रम केला होता. मंजू तुझी स्थिती तर ह्यापेक्षा कितीतरी चांगली आहे. तुझ्या ह्या वाटचालीत तुला अनेक अडचणी येणारच आहेत. त्यावर मात करायला शिक.”

आईच्या बोलण्याने मंजूला खूपच हुरुप आला. आईला घटट मिठी मारत मंजू म्हणाला, ” हो आई, जर विल्मा करु शकते तर मी का नाही”

– भाग्यश्री केंगे