मिनू, एके दिवशी तिच्या घराच्या बागेत फिरत असतांना, चाफ्याच्या झाडाखाली तिला काहीतरी हालचाल दिसली. “अगं आई, लवकर बागेत ये. बघ काय आहे”, मिनू जोरात हाका मारत आईला बोलवत म्हणाली. आईने धावत येऊन पाहिले तर मैना निपचित पडलेली होती. “मिनू, अग ही मैना अजून जिवंत आहे. तिला उचलून आत आण” आईने काळजीने मिनूला सुचवले. मैनेला घरात आणल्यावर मिनूने कापसाच्या बोळ्याने पाणी पाजले. तिला थोडी तरतरी आली. मिनू मैना पक्ष्याला प्रथमच इतक्या जवळून पाहत असल्यामुळे जरा सुरुवातीला घाबरली होती. पण आता तिला बरे करायचे आहे म्हणून काळजी घेत होती. दोन दिवसांनी मैना पुष्कळच टवटवीत दिसू लागली. घरात थोडीफार इकडे तिकडे फिरु लागली.
मैनेची हालचाल बघून मिनूला खूपच आनंद झाला. तिने मैनेचे नाव प्रेमाने मिठू ठेवले. तिला चांगले वाटावे म्हणून बागेतून काडया-पाने गोळा करुन तिच्यासाठी छानसे घरटेही तयार केले. मिठू घरात फिरुन आली की घरट्यात जाऊन बसायची. शाळे व्यतिरिक्त मिनूचा संपूर्ण वेळ मिठूशी खेळण्यात जायचा. तिला मिठूचा खूपच लळा लागला होता. आता मिठूला चांगले उडता येऊ लागले होते. आईने मिनूला समजावून सांगितले, “मिनू राणी, मिठूला आता चांगले उडता येऊ लागले आहे. ती कुठल्याही क्षणी आपल्या घरातून उडून जाऊ शकते. समजा ती उडाली तर अजिबात नाराज व्हायचे नाही.” मिनूसाठी हे कठीणच होते.
दुसर्या दिवशी सकाळी घरटयात जाऊन पाहिले तर मिठू तेथे नव्हती. घरभर तिला शोधले पण सापडली नाही. मिनूला कळून चुकले की आता मिठू आपल्याला परत कधीच भेटणार नाही. तिच्या सवंगडयांना भेटायला ती आकाशात दूरवर उडाली आहे. मिनू उदास झाली. तिचा रोजचा वेळ आता कंटाळवाणा जाऊ लागला. मिठूची खूपच आठवण येत असे. असेच दिवस चालले होते. एके दिवशी सकाळी मिनूला खिडकीत ओळखीचा आवाज आला. डोळे उघडून पाहिले तर मिनू मोठयाने किंचाळलीच,” अय्या मिठू, तू?” मिठूही आनंदाने मिनूच्या गादीवर बसली. मिनूला तर इतका आनंद झाला होता. ती मनसोक्त तिच्या छोटया मैत्रिणीशी खेळली. थोडया वेळाने मिठू खिडकीतून दूर उडून गेली. ते पाहिल्यावर आई म्हणाली,” मिनू मला तुझे कौतूक वाटते. पिंजर्यात डांबून न ठेवता तू मिठूला मोकळे ठेवलेस त्यामुळेच ती तुझ्याकडे परत आली. मला खात्री आहे आता मिठू आपल्याकडे नेहमीच येत जाईल”. मिनूने आईला घट्ट मिठी मारली.
– भाग्यश्री केंगे
मदर्स डेसाठी अदिती आणि आखिलेषची जोरदार तयारी चालू झाली होती. रोजच्या दोघांच्या चर्चा, कागदावर सारखे गुपचूप लिहीणे आजोबा दोनचार दिवसांपासून पाहात होते. आज त्यांनी त्याबद्दल मुलांना विचाराचे ठरवलेच. “काय गं आदिती, काय गडबड चालली आहे? दोन चार दिवसांपासून तुम्ही दोघेही काहीतरी कामात आहात?”. आजोबांनी हा प्रश्न विचारल्यावर आदितीने घाबरुन खोलीत आई नाही ना ह्याची खात्री करुन घेतली. “अहो आजोबा, मदर्स डे आहे नां त्याची तयारी करतो आहोत.” आखिलेषने दबक्या आवाजात सांगितले. “मदर्स डे म्हणजे आपला मातृदिन होय” आजोबा समजूतीने म्हणाले. “मातृदिन नाही हो आजोबा, ‘मदर्स डे’!
आम्ही त्याच्या सेलिब्रेशनची तयारी करत आहोत.” आदितीने समजूत काढली. आखिलेष पुढे समजावत म्हणाला,” आजोबा मी इंटरनेटवर वाचले आहे मदर्स डेची सुरुवात प्रथम ग्रीक आणि रोमन लोकांनी ख्रिस्त जन्मपूर्व २५० वर्षांपूर्वी केली. निसर्गमातेचा उत्सव म्हणून सुरु केला गेलेला हा दिवस आपआपल्या मातांना प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. आता भारतीयही मातृदिना बरोबरच मदर्स डेही साजरा करतात. आम्हीही आईसाठी हा दिवस स्पेशल करणार आहोत.” आजोबांनाही ही माहिती नवीनच होती. पाश्चात्यांची प्रथा असली तरी आईसाठी मुले काम करता आहेत हे पाहून आजोबांना खूप आनंद झाला होता. ते उत्साहाने म्हणाले, “मुलांनो, मलाही तुमचा प्लॅन सांगा. मी सुध्दा तुम्हाला काहीतरी मदत करु शकेन”. आजोबांचे आश्वासन ऐकून मुलांनाही उत्साह आला.
आदिती सांगू लागली,” रविवारी आम्ही दोघेही आईच्या आधी उठून तिला सकाळचा चहा करुन देणार आहोत. त्यानंतर दुपारचे जेवणही आम्हीच करणार आहोत. बाबा आम्हाला पोळ्या करायला मदत करणार आहे.” आखिलेष पुढे म्हणाला,” आईसाठी आम्ही खास शुभेच्छापत्रही तयार केले आहे. साठवलेल्या पैश्यातून तिच्यासाठी छोटेसे गिफ्ट आणि आवडीचे मोगर्याचे गजरेही आणणार आहोत.” मुलांचे प्लॅन ऐकून आजोबा खूष झाले, “मुलांनो तुमचा मदर्स डे नक्कीच स्पेशल होणार आहे. मीही त्या दिवशी तुम्हाला कामात मदत करीन”. स्मार्ट कीड्स तुम्ही मदर्स डेच्या तयारीला लागला आहात ना?
– भाग्यश्री केंगे
रोज शाळा सुटल्यावर भूक लागल्यामुळे चिन्मय धावतच घरी यायचा. त्याची आई रोज त्याच्यासाठी वेगवेगळे पदार्थ करायची. कधी इडली, ढोकळा, थालिपीठ, नूडल्स अगदी रोज काहीतरी वेगळे असायचेच. शाळेतल्या मित्रांना त्याचा हेवा वाटायचा. एके दिवशी घरी आल्यावर आई झोपलेली होती. तो घाईने आई जवळ गेला. आईला ताप आला होता. त्याला पाहून क्षीण आवाजात आई म्हणाली, ” चिनू बेटा, मला ताप आल्यामुळे अजिबात उठवले जात नाही आहे. मी तुझ्यासाठी काही खायला करु शकले नाही. आजचा दिवस तू सकाळचीच पोळी-भाजी खा आणि दूध पी”. हे ऐकल्यावर चिनूला खूपच राग आला. “हे काय डब्याही तेच आणि आताही तेच ? मी नाही काही खात जा” चिन्मय धूसफूसत म्हणाला. शेवटी काही न खाताच तो चिडून खेळायला गेला.
आईला बरे नाही म्हणून संध्याकाळी बाबा स्वयंपाक करत होते. “चिनू आज तुझी मला मदत हवी आहे. मटार सोलून दे बरं”, बाबा पोळया लाटता लाटता म्हणाले. नाखुषीनेच चिनूने मटार सोलायला घेतले. त्यानंतर तांदूळ निवडले. “बापरे किती वेळ लागतो हे करायला.” चिनू वैतागला. बाबाही बराच वेळापासून स्वयंपाकघरात होते पण त्याच्या फक्त पोळया आणि भाजी करुन झाली होती. अजून कुकर लावायचा बाकी होता. “हो ना रे चिनू, आपण इतका वेळ स्वयंपाकघरात आहोत पण दोनच पदार्थ करु शकलो. आई रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ इतके पदार्थ कसे करत असेल ? ते सुध्दा आपली अजिबातच मदत नसतांना?”
बाबाच्या ह्या प्रश्नाने चिनूला आपले संध्याकाळचे वागणे आठवले. ताप आलेला असतांनाही आपण आईशी किती वाईट बोललो हे आठवून त्याला खूप वाईट वाटले. धावतच तो आईच्या खोलीत गेला. आईच्या जवळ जाऊन तिला म्हणाला , “आई मला माफ कर. तू आमच्यासाठी किती कष्ट घेतेस. मी मात्र तुला बर नसतांनाही खायला करायचा हटट केला. कधी कधी तर तू प्रेमाने कलेले, मी मात्र आवडत नाही म्हणून सरळ टाकून देतो. माफ कर मला आई”.
चिन्यमचे हे बोलणे ऐकून आईने त्याला जवळ घेतले. बाबाही समाधानाने स्वयंपाकघरात जेवणाची पान घ्यायला वळला.
– भाग्यश्री केंगे