कुटुंबनियोजनाच्या पुरस्कर्त्या आणि ज्येष्ठ समाजसुधारक शकुंतला परांजपे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांचा आणि त्यांच्या कार्याचा घेतलेला हा छोटासा आढावा –
स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात महाराष्ट्रात अनेक कार्यकर्ते वेगवेगळया विषयांकरता सामाजिक कार्य करत होते. काही द्रष्टया समाज सुधारकांनी काळाची पावले बरोबर ओळखून आणि समाजाला दिशा दाखवून काही सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. त्यामध्येच एक होत्या महिला सामाजिक कार्यकर्त्या शकुंतला परांजपे.
रँग्लर र. पु. परांजपे यांच्या त्या कन्या. त्यांचा जन्म १७ जानेवारी, १९०६ सालचा. शकुंतला परांजपे, त्यांची आई, त्यांची आजी आणि त्यांची मुलगी प्रसिध्द दिग्दर्शिका सई परांजपे ह्या चारही पिढयांचे शिक्षण पुणे येथील हुजूरपागेत झाले. आपल्या वडिलांप्रमाणेच शकुंतला परांजपे ह्या देखील केंब्रिज विद्यापीठाच्या पदवीधारक होत्या. बुध्दिमत्तेचे, व्यक्तिस्वातंत्र्याचे आणि पुरोगामी विचारसरणीचे त्यांना घरातूनच बाळकडू मिळाले होते. शकुंतला परांजपे यांच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये अनेक प्रतिभावान मंडळींचा समावेश होता. या नातेवाईकांचे आचार-विचार यांचा काही अंशी परिणाम शकुंतला परांजपे यांच्यावर निश्चितच झाला होता. आद्य समाजसुधारक धोंडो केशव कर्वे आणि रँग्लर र. पु. परांजपे हे आते-मामे भाऊ होते. त्यामुळे र. धों. कर्वे हे शकुंतला परांजपे यांचे भाऊ आणि इरावती कर्वे ह्या वहिनी होत्या. तर शकुंतला परांजपे यांची आजी म्हणजे आईची आई यांचे दीर होते गोपाळराव जोशी, डॉ. आनंदीबाई जोशी यांचे पती.
साहित्य, समाजकारण, राजकारण अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी संचार केला. बुध्दिमान, स्वतंत्र विचारांची आणि बुध्दिला पटेल तेच करणारी स्त्री अशी त्यांची ओळख होती. शकुंतला परांजपे यांचं व्यक्तिरेखाटनाचं कौशल्य त्यांच्या लेखनातून अनेक ठिकाणी जाणवतं. ललित लेख, नाटक, कादंबरी असे वाङ्मय प्रकार त्यांनी हाताळले. कुटुंब नियोजनाच्या संदर्भात शकुंतला परांजपे यांनी केलेलं स्वातंत्र्यपूर्व काळातलं कार्य त्यांच्या विचारांची दिशा आणि झेप दाखवतं.
जेव्हा संपूर्ण देश ब्रिटिशांशी स्वातंत्र्याकरता झगडत होता, तेव्हा शकुंतला परांजपे ह्या स्वातंत्र्योत्तर काळात भारताला भेडसावू शकेल अशा प्रश्नाचं उत्तर शोधत होत्या. स्वातंत्र्योत्तर काळात देशाची वाढती लोकसंख्या ही देशाच्या प्रगतीला मारक ठरू शकते, हे त्यांना स्वातंत्र्यपूर्व काळात उमगलं होतं. त्यावर उपाय शोधून काढून त्या उपायासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती घडवून आणण्याच्या कामी त्यांनी स्वतःला वाहून घेतले. ते कार्य होते कुटुंब नियोजनाचे महत्त्व आणि उपयुक्तता लोकांना पटवून देण्याचे. ज्या काळी संततीनियमनाचे नाव घेणे हा देखील एक सामाजिक अपराध होता, त्या काळी एका स्त्रीने त्याकरता कार्य करणे म्हणजे मोठाच गुन्हा होता. पण तरीही न डगमगता, न अडखळता शकुंतला परांजपे यांनी कुटुंबनियोजनाच्या संदर्भात पुण्यातून काम सुरू केले. मुंबईत र. धों. कर्वे यांच्या कडून शिक्षण घेऊन आल्यावर त्यांनी पुणे येथे आपल्या राहत्या घरी कुटुंबनियोजनाचे केंद्र सुरू केले. नातेवाईकांची नाराजी तसेच ह्या संदर्भातील एखादी सभा गावात घेत असताना बायकांना येऊ न देण्याचा पुरुषांचा प्रयत्न अशा असंख्य अडचणींवर मात करत त्यांनी हाती घेतलेले कार्य निर्धाराने केले. १९६४ ते १९७० या काळात त्या राज्यसभा सदस्य होत्या. कुटुंबनियोजनाच्या मुद्दयावर जेवढे सामाजिक शिक्षण आपण घडवून आणले, जेवढे पैसे त्यावर खर्च केले त्याच्या काही मर्यादेपर्यंत जरी स्त्रियांच्या प्राथमिक शिक्षणावर केले असते, तर कदाचित कुटुंबनियोजनाच्या कार्यक्रमाचे अपेक्षित परिणाम साधले गेले असते, अशी खंतही त्या बोलून दाखवतात.
कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना १९९१ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तीन विविध समित्यांचा सदस्या म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. जागतिक बँक, फोर्ड फाऊंडेशन आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या कुटुंब नियोजन विभागाच्या सल्लागार म्हणूनही शकुंतला परांजपे यांनी काम पाहिले आहे. रॅमन मेगासॅसे पुरस्कारनेही ह्या ज्येष्ठ समाजसेविकेला सन्मानित करण्यात आले आहे. वृध्दापकाळाने वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचे पुणे येथे २००० साली निधन झाले. समाजसुधारणेची कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेल्या, निष्ठेने आणि तळमळीने समाजसुधारणेचे कार्य केलेल्या शकुंतला परांजपे या त्यांच्या कार्यामुळे मरणोत्तरही लोकांच्या स्मरणात राहिल्या आहेत.