आयुर्वेद हे जगातील सर्वात पुरातन वैद्यक शास्त्र असून ते भारतीय वैद्यक शास्त्र आहे. जगात ६५ ते ७० प्रकारच्या वैद्यक शाखा उपलब्ध असून त्या सर्वांची जननी असे आयुर्वेदाचे स्थान आहे. परंतु (दुर्दैवाने) भारतीय उपखंडात ते सर्वाना पुन: पुन्हा समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. शाश्वत, सर्वार्थाने परिपूर्ण, बिनचूक असे हे वैद्यक शास्त्र अनेक वर्षाच्या पारतंत्र्यामुळे मागे पडले. परंतु पुन्हा सर्व जगाला त्याची किंमत कळून चुकली असून त्याचा प्रभाव सर्व जगभर निर्माण होत आहे. भारतीय समाजाच्या, संस्कृतीचे अभिन्न अंग असलेले हे शास्त्र स्वातंत्र्यानंतर सुध्दा राजाश्रय न मिळता राहीले. हा राजाश्रय व लोकाश्रय पुन्हा मिळवून देण्यासाठी अनेक वैद्यानी प्रयत्न केले. त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजेच वैद्य श्री. शिवानंद तोंडे लिखित ’कुर्यात सदा ऋतुशोधनम’ हे पुस्तक आहे.
ऋतुचर्या आणि पंचकर्म यांच्यावर वैयक्तिक आरोग्यासाठी आयुर्वेदाचा भर दिलेला आहे. तर पंचकर्माचे शोधन त्या त्या ऋतूत करून घेतले गेले तर आरोग्य किती सुस्थितीत राहू शकते हे या लेखांमधून सुंदर रितीने विशद केलेले आहे. जिथे जिथे आवश्यक असेल तिथेतिथे आयुर्वेदाच्या पारिभषिक शब्दांचा वापर केलेला आहे. पण बाकीची शब्दयोजना इतकी चपलख आणि सुंदर आहे की हे केवळ शास्त्रीय लिखाण न राहता ललित लेखनाकडे झुकायला लागते. लेखांची शीर्षके छान आणि समर्पक झाली आहेत. ”ऋतुशोधन आरोग्य पॉलिसी”, ”५/११ चा उतारा” ”आजार फार झाले, आरोग्य जपून ठेवा”, ”शरदाचं सांगण”, ”उपवास आणि उपहास”, ”वांतीदूत” ही काही उदाहरणे म्हणून सांगता येतील.
नियमित ऋतुशोधनाचे फायदे त्यांनी वर्णन केले आहेतच पण काही वेळा उपचार म्हणून वैद्यांना पंचकर्माचा वापर कसा करणे आवश्यक होते तेही त्यांनी सांगितले आहे. रोग्यांना होत असलेला त्रास आणि उपचारांनी त्यातून मुक्ती मिळाल्यावर होणारा आनंद त्यांनी सुरेख शब्दांत मांडला आहे. पंचकर्म आणि एकंदरच आयुर्वेदाच्या उपचार पध्दतीबद्दल काही वैद्यांकडून होणारा दुरुपयोग आणि इतर संधीसाधूंकडून होणारा अपप्रचार यांच्यावर त्यांनी निष्ठुरपणे कोरडे ओढले आहेत. त्यातून लेखकाची आपल्या कार्याबद्दलची निष्ठा आणि कळकळच व्यक्त होते.
आयुर्वेदाच्या विद्यार्थी आणि अभ्यासकांना हे पुस्तक खुपच उपयोगी ठरणार आहे. पण सामान्य लोकांनाही आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी उत्तम मार्गदर्शक आहे. उत्कृष्ट शैली आणि अधूनमधून नम्र विनोदाची पाखरण असल्याने पुस्तक वाचनीय झाले आहे.
पुस्तक – ’कुर्यात सदा ऋतुशोधनम’
लेखक – डॉ. शिवानंद तोंडे
प्रकाशक – डॉ. गोगटे प्रतिष्ठान
किंमत – रु. ३००/-