कवी केशवसुत (१५ मार्च १८६६ – ७ नोव्हेंबर १९०५)

keshavsut कवी केशवसुत हे मराठी कवितेचे युगप्रवर्तक आहेत. त्यांनी एकोणिसाव्या शतकाचा मनोधर्म जाणला होता, आत्मसातही केला होता. म्हणूनच ते कवितेचे युगपरीवर्तन करू शकले. ‘नव्या शिपायाचा’ बाणा पत्करून त्यांच्या कवितेने व्यक्तिस्वातंत्र्याची, समतेची, क्रांतीची, नव्या मनूची “तुतारी” फुंकली. आधुनिक मराठी कवितेत केशवसुतांचा मान पहिला का आहे, तर त्यांनी रूढी-परंपराग्रस्त जग उलथून टाकण्याचा, समानतेची वागणूक देण्याचा आपल्या कवितेचा युगधर्मच आहे असे मानले. केशवसुतांनी इंग्रजी कवितांचे अवलोकन करून कवितेविषयी नवी दृष्टी स्वीकारली व ती मराठीमध्ये रूजवली.

नांगरल्याविण भुई बरी
असे कितितरी!
पण शेतकरी-
सनदी तेथें कोण वदा
हजारांतुनी एकदा!

या झपूर्झा कवितेत केशवसुत म्हणतात, हजारो लोकांतून एखादाच प्रतिभावंत निर्माण होतो. तसेच कवी केशवसुत हे काव्य विश्वाला अधिक प्रतिभा संपन्न करतात. ‘कविता आणि कवी’ या कवितेपासून ‘प्रतिभा’ या कवितेपर्यंत सतत बावीस वर्षे त्यांनी कविता लेखन केले आहे. काव्य, कला आणि प्रतिभा यांची स्वरूपे व कार्ये, सौंदर्यनिर्मितीच्या प्रयत्नांतले विविध अनुभव, विविध क्षेत्रांत होणारा प्रतिभावंतांच्या सामर्थ्याचा साक्षात्कार, या सर्वांवर दीड तपात त्यांनी कविता लिहिल्या. सृष्टी, तत्व आणि दिव्यदृष्टी, कल्पकता आणि कवी, दिवा आणि तारा, क्षणात नाहीसे होणारे दिव्य भास, कवितेचे प्रयोजन, आम्ही कोण, प्रतिभा अशा विविध प्रकारच्या त्यांच्या कविता आहेत. झपूर्झा आणि हरपले श्रेय यांची मूळ प्रेरणा या ध्यासातच आहे. दिव्य ठिणगी, शब्दांनो, मागुते या, रूष्ट सुंदरीस व फिर्याद या आत्मपर कवितांतही केशवसुतांनी काव्यजीवनातले स्वतःचे अनुभव वर्णन केले आहेत. मात्र ते अधिक वैयक्तिक स्वरूपाचे आहेत. काव्य किंवा कला यांच्या स्वरूपाचा अथवा प्रतिभेच्या कार्याचा विचार त्यात नाही.

“गाण्याने कविच्या प्रभाव तुमचा
वर्धिष्णुता घेइल
हातीं घेउनियां निशाण कवि तो
पाचारितो बांधवां
या, हो, या! झगडावयास सरस
हो, मेळवा वाहवा!
आशा, प्रेम, तसेंच वीर्य कवनीं
तो आपल्या गाइल”

कवी केशवसुत ह्यांची प्रसिध्द ’तुतारी’ ही कविता –

तुतारी

एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी

अवकाशाच्या ओसाडीतले
पडसाद मुके जे आजवरी
होतील ते वाचाल सत्वरी
फुंक मारीता जिला जबरी
कोण तुतारी ती मज देईल?

रुढी,जुलूम यांची भेसूर
संताने राक्षसी तुम्हाला
फाडूनी खाती ही हतवेला
जल्शाची का?पुसा मनाला!
तुतारीने या सावध व्हा तर!

चमत्कार!ते पुराण तेथुनी
सुंदर,सोज्वळ गोड मोठे
अलिकडले सगळे खोटे
म्हणती धरुनी ढेरी पोटे
धिक्कार अशा मूर्खांलागुनी

जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध! ऎका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी

प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा?
विक्रम काही करा,चला तर!

धार धरलिया प्यार जीवावर
रडतील रडोत रांडापोरे
गतशतकांची पापे घोरे
क्षालायाला तुमची रुधिरे
पाहिजेत रे!स्त्रैण न व्हा तर!

धर्माचे माजवुनी अवडंबर
नीतीला आणिती अडथळे
विसरुनीया जे जातात खुळे
नीतीचे पद जेथे न ढळे
धर्म होतसे तेथेच स्थिर

हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर
शूरांनो! या त्वरा करा रे!
समतेचा ध्वज उंच धरा रे!
नीतीची द्वाही पसरा रे!
तुतारीच्या ह्या सुराबरोबर

नियमन मनुजासाठी,मानव
नसे नियमनासाठी,जाणा;
प्रगतीस जर ते हाणी टोणा
झुगारुनी दे देऊनी बाणा
मिरवा नीज ओजाचा अभिनव!

घातक भलत्या प्रतिबंधावर
हल्ला नेण्या करा त्वरा रे!
उन्न्तीचा ध्वज उंच धरा रे!
वीरांनो! तर पुढे सरा रे
आवेशाने गर्जत हर-हर!

पुर्वीपासुनी अजुनी सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती
संप्रति दानव फ़ार माजती
देवावर झेंडा मिरवीती!
देवांच्या मदतीस चला तर!