२००१ साली माझ्या हाती ‘My journey’ हे अब्दुल कलाम यांच्या इंग्रजी अनुवादीत कवितांचं पुस्तक पडलं. माझी मैत्रीण वर्षा गंद्रे हिने ते पुस्तक मला वाचायला दिलं होतं. पुस्तक वाचून मला आश्चर्याचा धक्काच बसला होता. मूळ तामिळ कवितांचा इंग्रजी अनुवाद मणीदर्शी या कवीने केला होता. भारताच्या पंतप्रधानांचे तत्कालीन प्रमुख वैज्ञानिक सल्लागार डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी केलेल्या त्या अतिशय भावदर्शी कविता होत्या.
एक तरुण फूल आईला विचारते की, आई आम्ही का बहरतो ? जर हा माणूस आम्हाला उद्ध्वस्त करतो. त्या बहरण्याचा आनंद तर आम्हाला मिळत नाही. असा निसर्गाने उद्विग्नतेने विचारलेला प्रश्न या कवितांमधून डोकावतो. तर दुसरीकडे सत्याचा शोध घ्या, कर्तव्यावर प्रेम करा आणि स्वप्नांवर विश्वास ठेवा. कोणतीही बाह्य शक्ती तुमचं स्वप्न उद्ध्वस्त करू शकत नाही.
अशा संदेशपर कविताही या पुस्तकात समाविष्ट होत्या. ह्या कवितांचा मराठीत अनुवाद करून त्या सर्वांपर्यंत पोहोचाव्यात असे वाटू लागले. यापूर्वीही मी २-३ पुस्तकं अनुवादित केली होती. पण ह्या कविता स्वतः कलामांनी लिहिलेल्या होत्या आणि यांद्वारे अब्दुल कलाम यांचा एक वेगळा पैलू लोकांसमोर आला असता. प्रयत्न करून बघू असा विचार करून अनुवादाला सुरुवात केली. थोडीशी चाचपडतच ‘आठवण’ ही कविता अनुवादित केली. तो अनुवाद मैत्रिणीला दाखवला. मैत्रिणीने खूप प्रोत्साहन दिलं, म्हणाली, तू कर सर्व कवितांचा अनुवाद! दरम्यान सुप्रसिध्द गायिका पद्मजा फेणाणींची भेट होण्याचा योग आला. त्यांनीही कवितांचा अनुवाद करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. मग एकेक कवितांचा अनुवाद करत गेले. मधल्या काळात डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती झाले होते. आत्तापर्यंत फक्त एक शास्त्रज्ञ म्हणूनच कलाम सर्वांना परिचीत होते. पण एक संवेदनशील कवी म्हणून ते लोकांसाठी अज्ञात होते. त्यांचा हा पैलू देखील लोकांसमोर आला पाहिजे, या हेतूनेच मी त्या कविता अनुवादित केल्या आहेत. प्रस्तुत कवितांच्या रुपाने त्यांच्या मनातील भावनांनाच शब्दरूप आले आहे. या कवितांमधून त्यांच्या स्वभावातील नम्रपणा, सर्वांना श्रेय देण्याची वृत्ती, निसर्गाविषयीची सजगता, कुतूहल आणि प्रेम जाणवते. राष्ट्राबद्दलची निष्ठा, घरच्यांविषयीची भावना, आपण निर्माण केलेल्या क्षेपणास्त्रांच्या वापराविषयीची साशंकता अशा सहसा उजेडात न आलेल्या त्यांच्या भावनाही ह्या कवितांमधून जाणवत राहतात. प्रस्तुत पुस्तकाला मा. श्री. अटलबिहारी वाजपेयी यांचा शुभेच्छा संदेश लाभला आहे. एका संवेदनशील कवीने दुसऱ्या सृजनशील कवीच्या पुस्तकाला संदेश देऊन कोतुक केले आहे.
असंख्य तेलाचे दिवे प्रकाशाला जन्म देतात !
अग्नीच्या यशानं आपल्या देशाला अत्युच्च अशा परमानंदाच्या अवस्थेत पोहोचवलं. जणू काही श्रेष्ठ अशा सगळया शक्तींच्या गर्वावर आम्ही मात केली होती. अग्नीची जोडणी चालू असताना एक घटना घडली. एक शास्त्रज्ञ जो जोडणीच्या कामात अतिशय हुशार होता त्याने साईटवरून आपल्या घरी फोन लावला. सर्व कुशल आहे ना, ते जाणून घ्यायला. कारण सतत चाळीस दिवस तो आपल्या घरापासून दूर होता. त्याच्या बायकोचा आवाज स्पष्ट येत नव्हता म्हणून वडिलांनी तिकडे सर्व काही ठीक असल्याचे सांगून तो घरी परत केव्हा येईल याची चौकशी केली.
काही दिवसांनंतर अग्नीच्या यशस्वी उड्डाणानंतर घरी परतल्यावर ह्या शास्त्रज्ञाला आपली पत्नी रडत असल्याचं आढळलं. त्याच्या मनातील भीतीनुसार त्याला असं समजलं की त्याच्या बायकोचा भाऊ आठडयापूर्वी एका अपघातात वारला होता. त्या कुटुंबाने ह्या दु:खाची झळ त्याच्यापर्यंत पोहोचू दिली नव्हती. ह्या दुखःद बातमीने अग्नीवरील त्याचे लक्ष विचलित होईल, त्याचे मानसिक संतुलन बिघडेल आणि त्याचा वाईट परिणाम त्याच्या महान कार्यावर होईल म्हणून त्यांनी ही काळजी घेतली. दोन्ही हात जोडून मी ह्या कुटुंबापुढे नतमस्तक होतो.
अदृश्य हात
दूर कोठेतरी बंगालच्या सागरात
जिथे समुद्र आहे खोल आणि लाटा आहेत उंच
तिथे विसावला आहे अग्नी साक्षात
गौरव भारताचा, प्रतीक, ज्ञान आणि वैभवाचा
सृजनाच्या शक्तीने राष्ट्र जागृत झालंय
निर्मात्यांच्या कौतुकानं जग अचंबित झालंय
समुद्रातील जलचरांनी अग्नीला वेढलंय
जाणून घ्यायला त्याच्या निमिर्तीचा स्त्रोत
तुला कुणी बनवल? तुला कोणी साकारलं
कोणी निर्माण केली ही
तंत्रवैज्ञानिक सुंदर कलाकृती
अग्नी थांबला, भूतकाळात डोकावून
विचार करून म्हणाला
तंत्रज्ञ वैज्ञानिक दिवस-रात्र काम करतायत
आनंदाने काळजी घेताहेत बनवताना प्रत्येक भाग
चहूबाजूनं तपासून घेतायत माझी प्रत्येक चाल
तहान भूक झोप सगळे एकवटलेत माझ्यात
दिवस आणि रात्र एक झाली आहेत
मला कार्यरत करण्यात
जलचर म्हणाले, तुला इतकं उत्तम
वैज्ञानिकांनी बनवलं?
अग्नीनं उतर दिलं, नाही केवळ वैज्ञानिक नाहीत
तंत्रविज्ञान आणि अतिशय कष्ट याबरोबरच
यशासाठी आवश्यक होती इच्छा आणि प्रेरणा
पण माझ्या निर्मात्यांच्या माता आणि पत्नी
ह्यांनीही केलाय तेवढाच त्याग माझ्या यशासाठी
कोणतीही समस्या इथपर्यंत पोहोचू दिली नाही
माझ्या निर्मात्यांना विचलित करेल अशी
मूकपणे त्यांनी देवाजवळ प्रार्थना केली
आशेचा दिवा लावला प्रत्येक दिवशी
लाखो अपेक्षांमध्ये मिसळले आशीर्वाद
आप्तेष्टांचे प्रेम आणि माया मुलाबाळांची
निर्मात्यांच्या स्त्रियांनी लावलेल्या दिव्यांच्या
ज्योतींमधून मी बाहेर आलो तेजासह
घेऊन आशेचा किरण दूरदृष्टी आणि प्रेम
शुचिर्भूतपणे उभा राहिलो ताकदीच्या बळावर
स्त्री आणि पुरुष जेव्हा येतात एकत्र
तेव्हा जागे होते प्रेम आणि सामंजस्य
आशेचे किरण आणि कर्तृत्व उजळते
राष्ट्र वाढते, भरभराट होते
सभोवताली पाहून अग्नी म्हणाला जलचरांना
असा मी झालो निर्माण असंख्य ज्योतींमधून
त्यागाच्या, बलिदानाच्या, मायेच्या, प्रेमाच्या
निर्मात्यांना धीर देणाऱ्या माय बहिणींच्या.
समुद्र हा माझ्या जीवनाचा भाग आहे.
त्याच्या खळाळत्या लाटा ही माझ्या हृदयाची लय आहे.
बंगालच्या उपसागरातील एक बेट ‘रामेश्वरम्’ तिथे मी जन्मलो. जेव्हा मी घरी असायचो तेव्हा सकाळी, दुपारी आणि रात्री समुद्र वेगवेगळया लयीत गर्जत असे. त्याचं हे गरजणं प्रत्येक मोसमातही वेगवेगळे असे.
माझ्या वडिलांनी एका सुताराच्या मदतीने एक नावाडी बोट बांधायला घेतली. त्यावेळी मी आठ वर्षांचा होतो प्रत्येक वर्षी बोट आकार घेताना मी पाहात होतो. चार वर्षांनंतर बोट समुद्रात उतरण्यासाठी तयार झाली तेव्हा विशेष नमाजाचं आयोजन करण्यात आलं. गरीब लोकांना जेवण देण्यात आलं. पुढे दहा वर्षे या बोटीने आम्हाला खूपच सुखाचं जीवन दिलं. माझ्या प्राथमिक शिक्षणाचा सगळा खर्च या बोटीनंच भागवला. एक दिवस एका मोठया वादळाने रामेश्वरमला वेढलं आणि बोट दिसेनाशी झाली. पुन्हा शोक व्यक्त करण्यासाठी, ईश्वरावर प्रेम करणाऱ्या माझ्या वडिलांनी नमाज आयोजित केला.
आठवण
जेव्हा मी उलगडतो पाने आठवणींची
तिथे असतात अनेक पऱ्या
वर्डस्वर्थच्या डॅफोडिल्ससारख्या
समुद्रकिनारा, सोनेरी वाळू ,खळाळत्या लाटा
फुलांवर शहारणारा पहाटवारा, निळया लाटा
किनाऱ्यावर ताल धरणाऱ्या, चंदेरी फेसांच्या
माझे बाबा बनवताहेत लाकडाची नाव
रामेश्वरमच्या किनाऱ्यावर फिरतोय आम्ही दोघं
‘पदनी’चव अजून मनात ताजी आहे
शंखांचा आवाज, भक्तांचा पायरव
अजून कानाला जाणवतोय
सगळं वातावरण कसं सुगंधित
परिमलात भरून गेलंय
एखाद्या दैवी जादूसारखं!
बाबा गर्क आहेत बनवण्यात लाकडी नाव
स्वर्गीय कलेसाठी जणू करताहेत प्रार्थना
तुकडया तुकडयातून साकारताहेत आकार
बीजापासून फुलं निर्माण करणाऱ्या निसर्गासारखा
बाबांची नाव सम्रुद्रावर झुलू लागली
एकरूप होऊन लाटांशी, वाऱ्याशी, निसर्गाशी
आकाश आणि सागर, लाटा आणि वारा
एकरूप होऊन वल्हवू लागले नाव
समुद्राच्या मुलांना खेळवण्यासाठी
मासे आणि जलचर जमले सभोवताली
जणू कलेला स्पर्श करून चुंबण्यासाठी
समुद्र, पक्षी, मासे आणि माणसं एकरूप झाले
पृथ्वीच्या घरात सलोख्याने राहण्यासाठी
पन्नास वर्षांनी दृश्य बदलले
नावा निर्माण न होता तयार होऊ लागल्या
साकारण्यापेक्षा आकारू लागल्या
निर्मात्याचा आत्मा त्यात नाही उरला
आणि निसर्गापासून मानव वेगळा झाला
आता विजेच्या नावा समुद्राचं हृदय कापू लागल्या
जिवाच्या भीतीने मासे पळू लागले
सकाळचा सूर्य भयभीत मुलासारखा
अंधाराच्या धुक्यातून डोकावू लागला
मानवाची निसर्गाशी पुन्हा
कोण ओळख करून देईल
पुन्हा कोण त्याला एकरूप करील
त्या महान निर्मात्याशी
निसर्ग आणि मानव हे निर्माण झालेत एकत्र
दोघे मिळून राज्य करतील तेव्हाच
नांदेल सुखशांती सर्वत्र.
माझे आईबाबा!
१९९० च्या प्रजासत्ताक दिनानं एक आनंदाची बातमी आणली. भारताच्या राष्ट्रपतींकडून मला पद्मविभूषणानं सन्मानित करण्यात आलं होतं. माझी खोली मी संगीतानं भरून टाकली. ते संगीत मला एका वेगळया काळात, वेगळया विश्वात घेऊन गेलं. मी माझ्या आठवणीतल्या रामेश्वरमला भेट दिली. आईने कवेत घेतलं. माझ्या वडिलांनी प्रेमानं माझ्या केसातून त्यांची प्रेरक बोटं फिरवली. जलालुद्दीनने मशिदीच्या रस्त्यावर जमलेल्या जमावासमोर ही बातमी जाहीर केली. लक्ष्मणशास्त्र्यांनी माझ्या कपाळावर तिलक लावला. फादर सोलेमननी त्यांच्या लॉकेटवरील पवित्र क्रॉसवर हात ठेवून मला आशीर्वाद दिला. मी पाहिलं प्रा. विक्रम साराभाई आनंदानं हसत होते. त्यांनी वीस वर्षांपूर्वी बीजारोपण केलेल्या वृक्षाचं फळ पिकलं होत. माझं हृदय कृतज्ञतेनं भरून आलं.
कृतज्ञता
जंगल वाढत होतं, फळं झाडांना लगडली होती
आईला बिलगलेल्या मुलांसारखी
झुडपातली रानफुलं जणू खेळत होती
धुळीत खेळणाऱ्या पोरांसारखी
मधमाश्या, फुलपाखरं गाणी गुणगुणत होती
अदृश्य हातांनी छेडलेल्या वीणेसारखी
वाघसिंह जंगली अस्वलं रुबाबात चालली होती
कामावर जाणाऱ्या माणसांसारखी
फडफडले पंख पक्ष्यांनी मारायला भरारी
विमान विमान खेळणाऱ्या मुलासारखी
वसंत ऋतु आला होता घेऊन स्पर्श जादूई
जंगलं बहरली होती नंदनवनासारखी
दिवस स्वप्नांच्या समुद्रात झुलत होते
अचानक हवा बदलली वादळासारखी
वीज कडाडावी तशी रोगाची साथ आली
लहान मोठया बिबळयांना गिळू लागली
दहाजण उरले, तेव्हा देवाची आठवण आली
सगळयांनी मिळून प्रार्थना केली
दयाळू देव प्रकटला, सगळे दिपले तेजाने
झुकले त्याच्या चरणावरती
जीवदान दे आम्हां, दु:ख निराशा घे तुला
म्हणताच दिव्य दृष्टी फिरली सगळयांवरती
रोगमुक्त होताच आला ताठा
नऊजण पळाले घेऊन सुखाचा साठा
एकच थांबला आभार मानायला
१. सगळीकडे प्रार्थनाच प्रार्थना वेदनेतून मुक्त होण्यासाठी !
माझ्या वडिलांकडून ईश्वर – मानव नात्याचं चित्र माझ्या अंतर्मनावर अशा रीतीने कोरलं गेलंय की ईश्वर हा सर्वशक्तिमान असून मी त्याचा आदर करावा, संकटात असताना त्याचा धावा करावा आणि तोच सुख आणि शांतीचा एकमेव स्रोत आहे. निराशेतून बाहेर येण्यासाठी मला नेहमीच ईश्वराची गरज भासली. मदर तेरेसा आजारी असून इस्पितळात आहेत असं जेव्हा मला कळलं तेव्हा तीव्र अशा व्याकुळतेनं मला घेरलं आणि मी तिच्या स्वास्थ्यासाठी सर्वशक्तिमान ईश्वरापुढे प्रार्थना करायला बसलो. अशा बऱ्याच जणांच्या प्रार्थना त्याच्यापर्यंत पोहोचून मदर पुन्हा मानवजातीची सेवा करण्यासाठी कलकत्त्यात परतली.
यातना
वारा वादळी आहे, पाणी खवळलंय
रात्र अधिकच अंधारी आणि भयाण
चांदण्या मंद लुकलुकतायत काजव्यांसारख्या
रितेपणानी उभ्या आहेत कुणाची तरी वाट बघत
कडाडणारी वीज दाखवते आकाशाचा प्रकोप
माझ्या हृदयात होतायत यातना आणि
वाटतंय रडावंसं ! का ?
अरे, मदर तेरेसा दु:खात आहे
जिने प्रेम केलं परमेश्वराच्या लेकरांवर
काळजी घेतली आई बनून सर्वांची
जिचं हृदय हे घर आहे सर्व बेघरांसाठी
जिने सेवा केली सगळया आजाऱ्यांची
ती कां आहे आजारी आणि दु:खी ?
आता उरलेल्यांचा सांभाळ कोण करेल
भटक्या माणसांना घरी कोण नेईल
खिन्न आभाळात विदीर्ण ढग
स्वर्गाच्या अश्रूंचा पाऊस टपटप
दु:खी निसर्गासह करूया प्रार्थना
हे ईश्वरा ! नको नेऊस तिला
तिची गरज पृथ्वीवरच अधिक आहे
तुझ्या मुलांची अजून थोडी काळजी
तिला घ्यायची आहे!
२. मूल रडतं, रडतं आणि झोपी जातं स्वप्नांसह !
जेव्हा मी लहान मूल होतो तेव्हा माझे वडील रोज संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी मला मशिदीत घेऊन जात. जेव्हा ते प्रार्थनेसाठी जमिनीवर गुडघे टेकून वाकत तेव्हा त्यांच्याप्रमाणे मीही जमेल तसे वाकण्याचा प्रयत्न करीत असे. बऱ्याच वेळा माझा मोठा भाऊ मुथाफ कमाल मला नीट वाकवण्याचा प्रयत्न करीत असे. नंतरच्या काळात रामेश्वरमच्या प्रत्येक प्रवासात माझे वडील मला त्याच मशिदीत घेऊन जात, अगदी मी पंचवीस वर्षांचा होईपर्यंत. एक दिवस त्यांचा निरोप घेताना मी त्यांच्या डोळयात अश्रू पाहिला. तो अश्रू नातवंडाचं प्रेम मागत होता.
पूर्वजांची इच्छा
जेव्हा मी झोपेत स्वप्नांच्या दुनियेत असतो
तेव्हा माझ्या आईबाबांचा शांत आवाज ऐकता
कुठे आहे आमचा नातू जो लावेल आमचं नाव ?
तू उजळवलंस आमचं नाव अभिमान वाटण्याजोगं
पण तुझ्यानंतर आमची आठवण ठेवेल कोण?
आवाज बसल्यासारखे माझे उत्तर मूक होते
त्यांच्या नजरेतील न्याय्य मागणीला
माझ्याकडे उत्तर नव्हते
सूर्य पृथ्वीला दर दिवशी करतो प्रकाशित
तसे आईबाबांचे शब्द स्वप्नात असतात घर शोधीत
ह्या शब्दांचा आत्मा सतत माझा पाठलाग करता
पूर्वजांचा अभिमान माझ्या जगण्याचा अर्थ विचारतो
राजांच्या वारसांनी साम्राज्ये धुळीला मिळवली
त्यालाही मूक इतिहास आहेच साक्षी
पण आपल्या कर्तृत्वाने घराण्याचं नावचालवणारेही असतात
सुगंध पसरवणाऱ्या वाहत्या वाऱ्यासारखे
स्वप्न तरंगतात अशांत लहरींवरज्यांना आहे निर्मितीची आंस
आगीचा झंझावात आणि प्रचंड ताकद यांचा हुकूम होतो
आकाशाला भेदायला ‘अग्नी’ झेपावतो
जीवनाला भीतीपासून भयमुक्त करतो
झाडावरचं फळ पडावं तशा शृंखला तुटून पडतात
आणि स्वप्न पुन्हा गोड झोपेत तरंगू लागतात
एका रात्री जेव्हा चंद्रमा आरक्त होता
वारा आपल्या सुगंधासह मंद वाहात होता
माझे आईबाबा माझ्या अंतर्मनात डोकावले
अश्रूभरल्या डोळयांनी अग्नीकडे पाहात होते
आनंदाने, दिमाखाने, आशीर्वाद देऊ लागले
त्यांच्या नातवाला ‘अग्नी’ लाजो प्रतीक होता ताकदीचं
आणि माझ्यानंतरही नाव टिकवणार आहे त्यांचं
– मराठी अनुवादक (ज्योतिका चितळे)
(‘हॅलो हॅम’, ‘प्रतिबिंब’ या पुस्तकांच्या लेखिका. अनुवादित लेख तरुण भारत, मराठी विज्ञान पत्रिका इ. मधून प्रसिध्द. ‘निशिगंध’ काव्यसंग्रह प्रकाशित. मराठी शब्दाला प्रतिशब्द देणारे छोटे ‘मराठी शब्दमंजुषा’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)
या कवितांपैकी काही निवडक कविता खास मराठीवर्ल्डच्या वाचकांसाठी आम्ही सादर करत आहोत.
पुस्तक – ‘माझी जीवनयात्रा’
एक व्यवसायिक आत्मकथा
लेखक – डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम
मराठी अनुवादक – ज्योतिका चितळे
प्रकाशक – हिंदुस्थान प्रकाशन
टिप – ग्राहकांना कुरियरचा खर्च वेगळा द्यावा लागेल.