वात्सल्य

monkey एकदा देवांनी जाहीर केले की, सा-या पशूंमध्ये ज्याचे मूल सर्वात सुंदर दिसेल त्याला एक मोठे बक्षिस मिळेल. ही सूचना ऐकल्यावर सर्व पशु आपापल्या मुलांना घेऊन प्रतियोगितेंच्या ठिकाणी हजर झाले. त्यातच एक माकडीण होती. तिच्या हातांच्या झुल्यात ती आपले चिमुकले पिलू झुलवत होती. नकटया, चपटया नाकाचे, अंगावर केस असलेले ते पिलू मजेशीर दिसत होते. डोक्याचा कोबीचा कांदाच जणू! एकंदरीत ते ध्यान पाहता सारे पशु खदखदा हसू लागले.

माकडिणीला जाणवत होते की तिची टर उडवित आहेत. माकडीणीने आपल्या चिमुकल्याला हृदयाशी अधिकच कवटाळून धरले आणि ती म्हणाली, ‘सुंदरपणाचे बक्षिस देवांनी हवे त्याला द्यावे. पण मला मात्र माझे मूलच सर्वात सुंदर दिसते आणि तेच माझे सर्वात मोठे बक्षिस आहे…’

तात्पर्य – आपले मूल कसेही असले तरीही प्रत्येक आई त्याच्यावरून सारे जग ओवाळून टाकते.

आशेची थोरवी

एक भुकेलेला डोमकावळा एका उंबराच्या झाडावर बसला होता. तो वाट पाहात होता. उंबराची फळे अजून पिकली नाहीत. ती कधीतरी पिकतील याची वाट पाहात तो तिथेच बसून होता.

हा डोमकावळा बराच काळ तिथेच बसला आहे, असे एका कोल्ह्याच्या लक्षात आले. तेंव्हा त्याने त्याला कारण विचारले.

डोमकावळयाने कारण सांगितल्यावर कोल्हा त्याला म्हणाला, ‘अरे वेडया, आशेने असा वाहून जाऊ नकोस. आशेमुळे माणसाला भ्रम तेवढा होतो. अशाने वाट पाहून कुणाचेच पोट भरत नाही.

तात्पर्य – केवळ आशा करणे व्यर्थ आहे. प्रयत्न हवा.

मैत्रीच्या मर्यादा

एका गावाच्या एका पेठेत एक कोळसेवाला राहात होता. जवळच एक धोबी राहावयास आला. त्या दोघांची चांगली ओळख झाली. कोळसेवाल्याला वाटले, ‘धोबी फार चांगला मनुष्य आहे. आपल्या अर्ध्या घरात तो राहीला तर सोबत होईल नि हळुहळू परस्परांची मैत्रीही वाढत जाईल.’

एक दिवस कोळसेवाल्याने धोब्याला आपल्या मनातील विचार बोलून दाखविले. कोळसेवाला पुढे म्हणाला, ‘या महागाईच्या दिवसांत आपल्या खर्चात तेवढीच बचत होईल. शिवाय एकमेकांना सोबतही होईल!’

‘फार फार आभारी आहे. तुम्ही खरोखरच फार चांगले आहात!’ धोबी त्याला नम्रपणे म्हणाला. ‘बाकी सर्व ठीक आहे हो, पण तुमचं आमचं एकत्र राहाणं जमायचं नाही. कारण मी जीवाचा आटापीटा करून जे जे स्वच्छ करीत जाईन, ते ते एका क्षणांत काळंकुट्टं होईल, तुमच्या शेजारानं! माफ करा!!’

तात्पर्य – चांगल्या हेतूने होणा-या मैत्रीलाही परिस्थितीच्या नैसर्गिक मर्यादा असतात.

आंधळा सूड

एका सापाच्या डोक्यावर एक गांधीलमाशी बसली व दंश करून ती त्याला सतावून सोडू लागली.

साप त्यामुळे अगदी वेडापिसा झाला. काय करावे व तिच्या तडाख्यातून कसे सुटावे, हे त्याला मुळीच कळेना. रागारागाने तो तिचा सूड उगवण्यासाठी मार्ग शोधू लागला.

तेवढयात तेथून एक बैलगाडी जाताना त्याला दिसली. सापाने आपल्या शत्रूला ठार करण्यासाठी तत्काळ त्या बैलगाडीच्या चाकाखाली आपले डोके ठेवले. त्या चाकाखाली ती गांधीलमाशी चिरडून मेलीच, पण तिच्याबरोबर त्या सापाचीही सपाटपोळी झाली.

तात्पर्य – आपल्या शत्रूंना जिवंत ठेवण्यापेक्षा काही लोक त्यांच्याबरोबर स्वत:चाही मृत्यु झालेला पत्करतात. सूडाने आंधळी झालेली माणसे आत्मघात व समाजघातच करतात. सूडबुध्दीने जगाचे एकूण अकल्याणच जास्त होते.

कोळी आणि चिमुकला मासा

एक कोळी होता. रोज मासे पकडायचे, ते विकायचे, आणि जे पैसे येतील त्यावर उपजीविका करायची असा त्याचा जीवनक्रम होता. एक दिवस, दिवसभर प्रयत्न करूनही त्याला मासे सापडले नाहीत. शेवटी संध्याकाळी त्याच्या जाळयात लहानसा मासा सापडला.

तो मासा, कसेबसे श्वास घेत कोळयाला म्हणाला, ‘बाबारे, मी तुझ्याकडे माझ्या प्राणांची भीक मागतो. मी इतका लहान आहे की, माझी बाजारात काहीही किंमत यायची नाही. कोणी मला खाल्ले तर त्याचे पोट देखील भरणार नाही. माझ्या शरीराची अजून वाढ व्हायची आहे. कृपा कर. मला पुन्हा पाण्यात सोडून दे. मी मोठा गरगरीत झाल्यावर माझा मेजवानीसाठी उपयोग होईल. त्यावेळी मला विकून तुला खूप पैसे मिळतील. आज तू मला सोडून दे.’

कोळी त्या माशाला म्हणाला, ‘उद्याचे कोणी पाहिले आहे? शंकांनी घेरलेल्या उद्याच्या लाभासाठी आजच्या हातात गवसलेल्या लाभावर पाणी सोडणे अगदी मूर्खपणाचे कृत्य होईल. त्यामुळे मी तुला सोडू शकत नाही.

तात्पर्य – झाडातल्या दोन पाखरांच्या मागे लागून, हातातले एक गमावून बसण्यात अर्थ नाही.

← इसापनीतीच्या गोष्टी मुख्यपान