मन वळवणे श्रेष्ठ

Sun, wind and Man उत्तरवारा व सूर्यनारायण यांची अधिक श्रेष्ठ व शक्तीमान कोण, याबद्दल एकदा खूप हमरी-तुमरी झाली. शेवटी ते सिध्द करण्याचा एक मार्ग त्यांनी निश्चित केला. रस्त्याने जाणा-या एका प्रवाशाला त्याच्या अंगावरील कपडे काढायला लावण्यात जो यशस्वी होईल तोच श्रेष्ठ व विजयी होय, असे दोघांनी ठरविले.

पवनराजाने प्रवाशावर पहिला हल्ला केला. सोसाटयाचा वारा सुटला. वा-याच्या त्या प्रचंड सोसाटयात सापडताच प्रवाशाने आपल्या अंगावरील कपडे आपल्या शरीराभोवती अधिक लपेटून घेतले. इतकेच नाही, तर वा-याने जेंव्हा अधिक उग्र स्वरूप धारण केले, तेंव्हा तर त्या माणसाने आणखी एक वस्त्र आपल्या अंगाभोवती लपेटून घेतले. अखेर कंटाळून जाऊन वा-याने आपण हरल्याचे कबूल केले, व त्या प्रवाशाला सूर्य नारायण कसे काय वागवतील, ह्या उत्सुकतेने वायुराज गंमत पाहू लागले…

सूर्य प्रथम उबदारपणे प्रकाशू लागला, तसा प्रवासी शांत झाला. त्याने बाहेरचे लपेटलेले वस्त्र बाजूस सारले. हळुहळू आपली प्रखरता वाढवीत सूर्य तेजाने तळपू लागला. अखेर उष्णता असह्य होत चालली, तसतशी आपल्या अंगावरील सारी वस्त्रे त्या प्रवाशाने एकामागून एक काढून टाकली. या नंतरही उष्णता आणखी असह्य झाल्यावर तो प्रवासी जवळच्या नदीत अंघोळ करावयास उतरला.

तात्पर्य – बळजबरीपेक्षा कुशलपणे दुस-याचे मन वळविणे, हेच जगात अधिक यशकारक असते, हेच खरे. झोटींगांपेक्षा प्रेमदेवताच जगाचा अधिक लवकर विकास करू शकते.

दुष्टांचा स्वभाव

एका धनगराला एक नुकतेच जन्मलेले लांडग्याचे पिल्लू मिळाले. ते त्याने आपल्या कुत्र्याच्या पिल्लांबरोबर वाढवले व मोठे केले.

याचा परिणाम असा झाला की ज्या ज्या वेळी एखादा लांडगा कळपातले मेंढरू पळवून नेई, तेंव्हा त्याचा पाठलाग करणा-या त्या धनगराच्या कुत्र्यांमध्ये तो पाळलेला लांडगा नेहमी सामील होई.

पण गंमत मात्र अशी की, त्या कळपावर दरोडा घालणा-या लांडग्याला न पकडताच परत येणे, त्या कुत्र्यांना कधी भाग पडले तर, त्यावेळी तो लांडगा तेवढा त्या दरोडेखोर इतर लांडग्याचा पाठलाग करी. अर्थात, धनगराचा लांडगाही शेवटी लांडगाच! त्या चोरीमध्ये नंतर तो इतर लांडग्यांशी गुपचूप भागीदारी करी. इतकेच नाही, तर बाहेरचे कोणी कळपातून मेंढरू न्यायला आले नाही तर, तो कळपांत वाढलेला लांडगा, स्वत:च गुपचूप एखादे मेंढरू ठार करी, व मेजवानीचा आनंद लुटी.

धनगर मात्र बेसावध होता. आणि मुख्य म्हणजे, त्या लांडग्यावर विश्वासून होता. एके दिवशी लांडग्याची बदमाशी धनगराच्या ध्यानी आली. आपण इतकी वर्षे पाळलेल्या व स्वत:च मोठे केलेल्या त्या लांडग्याला धनगराने एका झाडाला लटकावून फाशी दिले.
तात्पर्य – वाट्टेल तो प्रयत्न केला, तरी पाणी वळणावरच जाणार! दुष्टांचा नैसर्गिक दुष्टावा संस्काराने बदलून तो सज्जन होणे कधीच शक्य नाही.

तोकडया दृष्टिचे विचार

धुळीने भरलेले दोन प्रवासी. थकलेले, भागलेले, वणवण उन्हामध्ये उघडया रखरखीत रस्त्यावरून चालत होते. डोक्यावर भयंकर ऊन ‘मी’ म्हणत होते. इतक्यात रस्त्याच्या कडेला त्यांना एक मोठे झाड दिसले. मोठया आनंदाने ते तिकडे वळले. त्यांनी झाडाखाली आसरा घेतला. विसाव्यासाठी त्यांनी तिथेच बसकण मारली. दूरदूर विस्तारलेल्या झाडाच्या फांद्यांमुळे तिथे बराच गारवा होता. प्रवाश्यांचा कासाविस जीव झाडाच्या सावलीमध्ये सुखावला.

विश्रांती घेता घेता तिथे पहुडलेल्या एकाची नजर झाडाच्या फांदीकडे गेली. तो आपल्या सहप्रवाशाला म्हणाला, ‘फुकट हे एवढं मोठ्ठं झाड आहे. फळं धरत नाही. काही नाही. काय उपयोग या झाडाचा माणसाला? ‘

ते ऐकल्यावर संतापून झाड म्हणाले, ‘किती कृतघ्न रे तूं ! तापलेल्या उन्हातून इथे आलास तो माझा आसरा घेण्यासाठी. या क्षणी प्रत्यक्ष माझ्या सावलीत बसलेला आहेस, तरीसुध्दा तू मला निरूपयोगी म्हणून हिणवत आहेस…’

तात्पर्य – काही काही प्रकारची साधीसुधी सेवा फारच महत्त्वपूर्ण असली तरी तिचा उपयोग घेणा-यांना मात्र कसलीच कृतज्ञता वाटत नाही.

एकमेकांना साजेशी

एकसाप एकदा नदीत पडला. पुराच्या जोरदार प्रवाहाबरोबर तो वेगाने वाहून चालला होता. तेवढयात एक काटेरी झुडुप त्याच्याजवळून वाहात चाललेले त्याला दिसले. कसेबसे तो त्याच्यावर चढून बसण्यात तो यशस्वी झाला आणि मग ते सारे लाटांवर वेगाने खाली वाहात जाऊ लागले.

किना-यावर एक कोल्हा होता. काटेरी झुडुप व त्याच्यावर चढून बसलेला साप पाहून कोल्हा म्हणाला, ‘वा:! सुंदर! आत बसलेला तो प्रवासी आणि त्याला वाहून नेणारी ती नाव, दोन्हीही एकमेकांना कशी अगदी शोभून दिसतात!’

तात्पर्य – कधी कधी चांगल्याप्रमाणे वाईट गोष्टीही जगात परस्परांना साजेशा, शोभून दिसतात.

← इसापनीतीच्या गोष्टी मुख्यपान