गुलू गोगलगाय हिरवळीवर बसून कितीतरी वेळ विचार करीत होती.कालपासून तिच्या पाठीवरचा शंख ती कुठे विसरली होती कोण जाणे. रोज अंगावर ओझे घेऊन फिरायचा तिला अगदी कंटाळा आला होता. एक दिवस जरा शंखाशिवाय चालून बघावे असे वाटणे अगदी स्वाभाविक होते. कारण तिच्या हळु हळू चालण्यामुळे सगळेजण तिला ‘गुलू’ ऐवजी ‘हळूबाई’च म्हणत. शंख काढून ठेवल्यावर भराभरा चालून बघण्याच्या घाईत ती तो कोठे ठेवला हेच चक्क विसरली होती. ‘चिव, चिव’ खडकावर बसून पाण्याचे चार थेंब पिणार्या चिऊताईंनी विचारले ‘आज एवढा कसला विचार करतेस?’ ‘अग, माझा शंख हरवलाय. जरा सापडवून देतेस का?’
‘छे ग बाई. आज मला मुळीसुध्दा वेळ नाही. तूच बघ ना इकडे तिकडे’ चिऊताई ठसक्यात म्हणाल्या.
झाले! गुलूच्या डोळयातून अगदी पाणीच यायला लागले. तिला जर असे दोन पाय असते तर आत्ता टुणटुणत जाऊन तिनेच शंख आणला नसता कां?
‘हुं ! चलावे तर आता. हळूहळू चालायला लागले की रस्ता सापडतो’, गुलू मनाशी म्हणाली.गवतातून जाता जाता आपली शिंगे उचलून तिने इकडे तिकडे पाहिले. पलीकडे वारूळात मुंग्यांची लगबग चालू होती. गुलू हळूहलू चालत त्यांच्याजवळ गेली. एवढयात काही मुंग्यांचे तिच्याकडे लक्ष गेले.
‘ए, ती हळूबाई बघा’
‘हो ना एवढी मोठी दिसते पण चालते किती हळूहळू! नाहीतर आम्ही बघा. एवढयाशा वेळात कुठल्या कुठं जाऊ!’
‘बायांनो ! माझा शंख जरा हुडकून आणून देता का?’ ओठापर्यंत आलेले शब्द गुलूने परत गिळले व तिथून काढता पाय घेतला.
चालून चालून तिला अगदी दमायला झाले होते. मध्येच थांबून तिने गवतावर चमकणारे दवबिंदू प्याले. हळूहळू थकव्याने तिला झोप येऊ लागली. पण आज शंख कुठे होता ताणून द्यायला. छे ! छे! वैतागून ती मटकन् खालीच बसली. असा कित्ती वेळ गेला कुणास ठाऊक. हळूच डोळे चोळत तिने इकडे तिकडे पाहिले. समोरच्या गवतफुलावर एक सुंदर फुलपाखरू बसले होते. आपल्या पंखांची उघडमीट करीत ते गुलूकडे पहात होते. ‘ए, शुक शुक!’ गुलूने हाक मारली. फुलपाखराने ताबडतोब उडण्याचा पवित्रा घेतला. आता मात्र गुलूला क्षणभर स्वत:चाच राग आला. हे तेलकट काळे शरीर शंखाप्रमाणे सोडून द्यावेसे तिला वाटले. डोळे विस्फारून ती फुलपाखराचे मखमली अंग व फुलाफुलावरील नृत्य पाहू लागली. इकडे तिकडे बागडताना कसे कोण जाणे ते फुलपाखरू गुलूजवळ उतरले.
‘गुलू काय ग शोधतेस?’
‘माझा शंख हरवलाय तो शोधून काढतोस का?’
‘हे बघ. आता थोडया वेळाने संध्याकाळ होईल. त्या हिरव्यागार कुरणात शंख शोधण्यापेक्षा तू पुढे जा. तिथे तळयाकाठी तुला डुलोबा कासवदादा भेटतील. ते देतील हं तुझा शंख तुला.’ मान डोलावून गुलू हळुहळू पुढे निघाली.
गवताचे जंगल पार करताना तिच्या अगदी नाकी नऊ आले. मध्येच थोडा वेळ थांबून तिने विसावा घेतला. एवढयात तिला पलीकडून आवाज ऐकू आला. ‘डरा व ,डरा व, डरा व ,डरा व !’ .हुश्श! आले तर एकदाचे तळे! आकाशातून पंख फडफडावत जाणारी बगळयांची माळ बघताच तिने दिशा बदलली व थोडयाच वेळात ती तळयाच्या काठावर आली. आता कासवदादा कुठे शोधायचे बरे? विचारात पडलेली गुलू हळूच तिथल्या एका दगडावर टेकली. सूर्य मावळला होता. आकाशाचा निळा रंग काळसर होऊ लागला होता. मधूनमधून एखादी चांदणी हळूच डोकावून पहात होती. तळयात फुललेल्या कमळांचा व पाणगवताचा वास सगळीकडे पसरला होता. पश्चिमेकडून येणार्या वार्याच्या थंडगार झुळकांनी हळूहळू गुलूचे डोळे पेंगायला लागले. नकळत ती त्या दगडावरच आडवी झाली. मध्येच तिला जाग आली. कारण हवेतील थंडाव्याने ती अगदी काकडून गेली होती. रोज ऊबदार घरात झोपायची सवय असल्याने आज ही बोचरी थंडी चांगलीच जाणवत होती. इतक्यात तिला एक विचित्र भास झाला. ती बसलेला दगडच हळूहळू चालायला लागला. डोळे चोळून पुन्हा तिने खाली नजर टाकली. तो काय! तिच्या आश्चर्याला पारावारच उरला नाही. ती मस्तपैकी कासवदादांच्या पाठीवरच बसली होती. तिने खाली उडी मारली. क्षणभर थांबून कासवदादांनी तिच्याकडे पाहिले.
‘कासवदादा, मला माझा शंख शोधून द्याना’ तिने काकुळतीला येऊन म्हंटले. ‘हात्तीच्या शंखच हवाय का तुला, थांब इथे. मी पहिल्यापेक्षाही छानदार आणून देतो! मग तर झालं?’
कासवदादांनी डुलत डुलत तळे गाठले अन् पाण्यात बुडी मारली.
बापरे! आता कधी येणार हे?
अंधारात गुलूला फारच भिती वाटायला लागली.
पण एवढयात ते पाण्याबाहेर आलेसुध्दा! त्याच्या तोंडात एक पांढरा शुभ्र शंख होता. तो गुलूपुढे टाकत ते म्हणाले, ‘हे घे, तुझे नवीन नवीन घर!’
ओ हो ! पांढरेशुभ्र व पहिल्यापेक्षा छानदार असे ते घर पहाताच गुलूने क्षणातच ‘शुभ रात्री’ म्हणून कासवदादांचा निरोप घेतला व घरात शिरून आपले थकलेले डोळे मिटले !!
– विनया साठे