घामाचा पैसा

img धन्नाशेटचा मुलगा राम अगदीच आळशी. घरांत गडगंज संपत्ती. एकुलता एक लाडाचा. काम कधी करावंच लागलं नाही. आता २१ वर्षाचा झाला. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल. दुसरे दिवशी त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले हे बघ आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल’ मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला. दुसर्‍या दिवशी आईकडून घेतला तिसर्‍या दिवशी मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर पडली स्वारी घराबाहेर काम शोधायला निघाली. पण काय काम करणार ? बारा वाजे पर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले. स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. ‘साहेब, इकडे आणा’. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. ‘बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?’ शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, ‘बाळा आता मला काहीं काळजी नाहीं कारण खर्‍या कष्टाची किंमत तुला आज कळली. दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम फेकली पण तुला राग आला नव्हता कारण त्या मागे कष्ट नव्हते.’ स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.

– सुमती निगुडकर

यशाचा घडा

वसिष्ठांची पत्नी अरूंधती ज्ञानी, विद्वान, पतिव्रता होती.
एकदा सूर्य अग्नी व वरूणासह वसिष्ठांच्या आश्रमात आले. तेंव्हा अरूंधती पाण्याचा घडा घेऊन नदीवर जायला निघाली होती. तिने तिघांना बसायला आसन दिलं आणि म्हणाली, ‘थांबा थोडं, आता नदीवरून एवढा घडा भरून आणते.’ त्यावर सूर्यदेव म्हणाले, ‘आई नदीवर कशाला? मीच मंत्रसामर्थ्याने देतो घडा भरून’ एवढे म्हणून त्यांनी मंत्रसामर्थ्याने घडा भरला, पण तो घडा १/२ रिकामाच राहिला. शेवटी तो पूर्ण भरण्याचे काम अरूंधतीने केले. नंतर ती म्हणाली कोणत्याही यशाचा ३/४ वाटा देवदत्त असला तरी १/४ भाग भरण्यासाठी मानवी प्रयत्नच लागतात. निढळाच्या घामाने उरलेला १/४ घडा भरणे भाग आहे.

– सुमती निगुडकर

लाख मोलाचा देह

एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्‍याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलावयाला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्‍याला खूप आनंद झाला. त्याच्या मनांत आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल.

वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, ‘हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण त्याबद्दल तु मला तुझे डोळे दे’
‘छे ! छे ! हे कसं शक्य आहे ? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.’ भिकारी म्हणाला.
‘बरं मग असं कर हात तरी देतोस कां?’ व्यापारी म्हणाला.

अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता.
व्यापारी म्हणाला ‘बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस ? कष्ट कर पैसे मिळवं’.

– सुमती निगुडकर

शासन

महाभारताच्या शांतीपर्वातील ही गोष्ट. शंख व लिखित नावंचे दोघे भाऊ यज्ञोपवित संस्कार झाल्यावर गुरूगृही विद्याध्यानासाठी गेले. संपूर्ण वेद वेदांगाचा अभ्यास करून गुरूची परवानगी घेऊन हे दोघे घरी परत आले. दोघांनीही दोन वेगवेगळया ठिकाणी आपले आश्रम बांधले. तिथे त्यांचे अध्यापनाचे काम सुरू झाले. बरेच दिवस झाले दोन्ही भावांची भेट नव्हती. लिखिताने शंखाकडे भेटीला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो गेला पण शंख कामानिमित्त बाहेर गेला होता. निराश झालेला लिखित परत निघाला. दुपारी बाराची वेळ भूक लागली होती. समोर शंखाच्या आश्रमातील आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते. एक छानसा पिकलेला आंबा लिखिताने तोडला व पुढे चालू लागला.

तेवढयात समोरून येणार्‍या शंखाने ते पाहिले व विचारले. ‘आंबा कुठे मिळाला ?’ शंख सहज म्हणाला ‘अरे ! तुझ्याच झाडाचा छान पिवळा धम्मक दिसला तोडला’. शंख शांतपणे म्हणाला ‘म्हणजे लिखिता तू चोरी केलीस झाडाच्या मालकाला न विचारता आंबा तोडलास’ लिखिताला आपली चूक कळली. शरमेने त्याची मान खाली झुकली. ‘शंखा माझ्या गुन्ह्याबद्दल मला हवी ती शिक्षा कर’ ‘काहीं गरज नाहीं त्याची जा आता पुन्हा असे घडणार नाही ह्याची खबरदारी घे’ शंख एवढे बोलून निघून गेला.

लिखित राजाकडे गेला. घडलेली सर्व हकीगत सांगितली. ‘राजा मला शिक्षा कर’ लिखित म्हणाला. ह्या विचित्र मागणीचे राजाला आश्‍चर्य वाटले. राजा म्हणाला ‘लिखिता तू म्हणतोस ते खरंही असेल पण चोरीची फिर्याद कुणीच केलेली नाही. गुन्हा शाबीत झाला तर शिक्षा’. ‘राजे पण गुन्हा शाबीत झाला तर ह्या गुन्ह्याला शिक्षा कोणती ?’ लिखिताने विचारले, ‘चोरी करणार्‍याचा हातच आम्ही कापतो’ राजा म्हणाला. राजाच्या समोरच लिखिताने राजा शासन करत नाहीं म्हणून आपणच आपला हात कापून टाकला’.

स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेणारी प्रजा उत्कृष्ट राज्य शासनाचे प्रतीक आहे.

– सुमीत कुलकर्णी

← आजीच्या गोष्टी मुख्यपान