कथा सांगणं हा आपल्या प्रत्येकाचा आवडीचा छंद असतो. काही जण ही कथा जशी घडली तशीच सांगतात. काही लोक ती रंगवून सांगतात. तिला हावभावाची जोड देतात, तर काहीजण चित्र काढून त्याआधारे घडलेली घटना सांगतात. यापेक्षा परिणामकारकरित्या कथा सांगणारे मग त्यासाठी चित्रपट हे माध्यम निवडतात. कथेच्या आडून समाजासमोर एखादा विषय मांडण्यासाठी चित्रपटाइतकं उत्तम माध्यम कोणतं नसेल. या माध्यमाचा उपयोग करायचं ठरवून देहविक्रय व्यवसायात ओढल्या गेलेल्या स्त्रियांच्या मानसिकतेवर सुमित्रा भावेंनी चित्रपट करायचं ठरवलं. ज्या समाजात मातृत्वाचा गौरव होतो त्याच समाजात स्त्रीला देहविक्रय करावा लागावा हे आपल्या समाज व्यवस्थेचं दुर्देव आहे. याविषयी जागृती करण्याच्या प्रयत्नांतूनच ‘दोघी’मध्ये सुमित्रा भावे यांनी दोन बहिणींची कथा मांडली आहे.
हा चित्रपट करण्यापूर्वी सुमित्रा भावे अनेक स्त्रियांना भेटल्या, त्यांचे विचार – भावना त्यांनी जाणून घेतल्या. या सर्व स्त्रिया काहीना काही कारणांनी अशा व्यवसायात आलेल्या होत्या. त्यांनी आपण या व्यवसायात कसे आलो ते सांगितलं, मात्र आपली नावं गुप्त ठेवण्याच्या अटीवर, कौटुंबिक दारिद्रय, कुटंबांत मिळणारी दुटप्पीपणची वागणूक, अनेक आपल्यापैकी एक असणे अशी अनेक कारणं सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांना आढळली. एक प्रकारच्या साचलेपणातून-स्टिग्मामधून या मुली वेश्याव्यवसायाकडे ओढल्या जातात.
पुण्यामध्येही हा व्यवसाय करणार्या अनेक मुली सापडल्या. प्रदेशानुसार, भौगोलिक स्थितीनुसार आणि नैसर्गिक आपत्तींनुसारही मुलींच या व्यवसायाकडे ओढले जाण्याचं प्रमाण बदलत आहे. असे सुमित्रा भावे यांच्या लक्षात आले. यामध्ये राज्यात पडणारा दुष्काळ हे फार मोठं कारण आहे. या दुष्काळामुळे अनेक कुटुंब देशोधडीला लागतात. आपलं कुटुंब वाचवण्यासाठी कित्येकदा आयाच मुलींना या व्यवसायात ढकलतात, एक प्रकारे प्रोत्साहितच करतात. ही बाब फारच विदारक परंतु सत्य आहे.
दोघी या चित्रपटाची गीतं जेव्हा ना. धो. महानोरांनी लिहिली तेव्हा ते गहिवरून गेले. त्यांच्या डोळयांसमोर त्यांनी पाहिलेल्या अशा मुली तरळून गेल्याचं सुनील सुकथनकर सांगतात. या चित्रपटाचं वेगळेपण म्हणजे इथं फक्त दोन बहिणींचं नातं सांगितलेलं नाही, तर त्या दोघींमध्ये अचानक पडलेली तफावत आणि त्यानंतर त्यांनी एकमेकींना सहाय्यभूत होणं ही नात्याची चमत्कारिक वीण इथं दाखवायचा प्रयत्न केला आहे. बाईला शेवटी बाईच मदतीला येते या सुत्राचा इथं भक्कम आधार घेतला आहे. एका बहिणीचा प्रवास जर सुदैवाच्या दिशेनं झाला आणि दुसर्या बहिणीचा दुदैवाच्या दिशेनं झाला तर सर्वसाधारणपणे दुसरी बहीण मेल्यावरच तिचा उदोउदो केला जातो. याही वृत्तीला चित्रपटात छेद देण्यात आला.
मामा आणि आई यांच्यामुळे मोठी बहिण शहरात येते आणि वेश्या बनते. मुलीकरवी कुटुंब चालावं ही यामागे अपेक्षा असते. रेणुका दफ्तरदार हिनं ही मोठी बहिण साकारली आहे. मेंदीमध्ये घालायला कात हवा असतांना तो चारचौघांदेखत पानवाल्याकडे मागायचा कसा म्हणून संकोचणारी बहिण पुढे धाकटीला सांगते, ‘चल कोपर्यावरून तंबाखू घेऊन येऊ’. अशाप्रकारे छोटया छोटया प्रसंगातून बहिणी बहिणींमधल्या संवादाची बदलणारी उंची या चित्रपटात दाखवली आहे. धाकटया बहिणीचं (सोनाली कुलकर्णी) लग्न ठरतं. तेव्हा मोठया बहिणीला बोलवायच्या आई विरुध्द असते, पण धाकटीच्या आग्रहामुळे मोठया बहिणीला बोलावलं जातं. पुढे नाटयमय प्रसंगातून आई विरघळते, मामालाही त्याच्या हातून घडलेल्या पापाची जाणीव होते आणि सुखान्त होतो.
१९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या दोघी या चित्रपटात एकूण ११ राज्य पुरस्कार आणि तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. उत्कृष्ट पार्श्वगायन (अंजली मराठे), उत्कृष्ट अभिनय (उत्तरा बावकर) आणि उत्कृष्ट सामाजिक आशय असलेला सिनेमा असे पुरस्कार मिळाले.
चांगला विषय, चांगला दिग्दर्शक, गुणी कलावंत आणि रुद्रासारखी चित्रपटाची गुणवत्ता ओळखणारी कंपनी असल्यावर दोघींची भट्टी न जमली तरच नवल. म्हणूनच आज १० वर्षांनंतर हा चित्रपट व्हिसीडी स्वरुपात येऊनही तो पाहावसा वाटतो.