निसर्गानं माणसाला एक मेंदू दिला आणि दोन मनं दिली.
एक, आतल्या आत जगणारं. दुसरं, बाहेरचं बघणारं.
दोन डोळे दिले. एक निरीक्षणासाठी. दुसरा परीक्षणासाठी.
भावनांची खोली आणि विचारांची उंची, मनुष्यत्व साकारते.
जेव्हा वेदना कळते, तेव्हा संवेदना जळते.
या जळण्यातून पीळ सुटतात आणि वेढेही बसतात.
एकीकडे म्हणणेही असते आणि एकीकडे कण्हणेही असते.
अशा आवेगाला मिळतो वेग. वेणामधून जन्मते टयँहँssss!
त्याला रूढ भाषेत म्हणतात कविता. ग्रह जाणून घेण्यासाठी
संख्येच्या गरजेनुसार संग्रह!
‘देव देश अन् प्रेमासाठी’ मन:पूर्वक वाचले.
या आत्ममग्न कवीला, अज्ञाताचा शोध हवा आहे.
‘ओम’काराची आस आहे. आईचा भास आहे.
देवघरात जळणार्या समईतील आजी अजून ताजी आहे.
सूर्यास्तासारखे मावळणे हवे आणि हरवलेल्या बालपणाचे खिदळणे हवे.
जगणे आणि जिवंत राहणे यातील फरक न कळणार्या
पामरांची कवीला दया येते, कीव येते.
विशुध्द नशेकडे त्याचा कल आहे, मुंबई की दुबई हा त्याला सल आहे.
एवढे सारे सांगून कवी म्हणतो, मी कुणाचा?
तेव्हा धनेश, कवी सार्यांचा असतो. कारण सारे कवीचे असतात.
अंतर्यामी ठसतात. काळजात घुसतात.
म्हणून कविता लिहावी. दुरून पाहावी. ईश्वरास वहावी.
-जगदीश खेबूडकर
पुस्तक – देव, देश अन् प्रेमासाठी…
लेखक – धनेश जूकर
प्रकाशक – संवेदना प्रकाशन
किंमत – रु. ६०/-