दक्षिण गंगा ’कावेरी’

cauvery कुमारवयीन मुलांसाठी वेगळी अशी खास पुस्तके आपल्याकडे नसतात. छोट्यांची पुस्तके वाचायला कंटाळा येतो आणि मोठयांची वाचायला परवानगी नसते. प्रथम बूक्स प्रकाशनाने हा प्रश्न दर्जेदार पुस्तके बाजारात आणून केव्हांच सोडवला आहे. पुस्तकांच्या मालिकेत ’कावेरी’ हे वेगळ्या विषयांवरचे पुस्तक त्यांनी नुकतेच बाजारात आणले आहे. नावावरुन कावेरी ही कुठल्याश्या कथानकाची नायिका नसून ही कथा ’कावेरी नदीची’ आहे. ’गंगा’ नंतर नदीविषयी ११-१४ वयोगटाच्या मुलांसाठी ’कावेरी’ हे त्यांचे दुसरे पुस्तक. लेखिका ओरियोल हेन्री आणि छायाचित्रकार क्लेअर आर्नी यांनी कावेरीच्या प्रवाहाचा प्रवास कुर्गच्या पर्वतातील उगम स्थानापासून ते ती पूंपुहारमध्ये समुद्राला मिळेपर्यंत सतत चार महिने केला. कावेरीची साथ-सोबत असलेला हा प्रवास नदीतून, काठाने, हवाईमार्गाने करतांना, तिची बदलती रुपे आणि कर्नाटक व तामिळनाडू ह्या राज्यांतील बदलते देखावे, तेथील लोकांवर असलेला कावेरीचा प्रभाव ह्या दोघांनी पुस्तकरुपात सादर केला आहे. पुस्तकाचा आकार नेहमीपेक्षा वेगळा असून त्यातील छायाचित्रे आणि रेखाचित्रे पुस्तकाचा दर्जा वाढवतात. प्रत्येक पानांवर माहितीसोबत दिलेली चौकटीतली माहिती वाचकाच्या ज्ञानात भर टाकते.

भारतीय वेदांनुसार सप्तनद्यांना देवीदेवतां इतकेच महत्त्व देण्यात आले आहे. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा , सिंधू, कावेरी ह्या भारतातल्या प्रमुख नद्या आहेत. कर्नाटकात कोडगु पर्वताच्या शिखराजवळ उगम पावणारी कावेरी नदी जवळ असलेल्या अरबी समुद्राला न मिळता वाट बदलून तामिळनाडू राज्यातून जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. कावेरीचा हा प्रवास पुस्तकात चित्ररुपाने चटकन समजतो. कावेरीला दक्षिण गंगा किंवा कानडीत जीवननदी म्हणून संबोधले जाते. तिच्याविषयीच्या पौराणिक कथाही पुस्तकात आहेत. कावेरीचे पाणी शेतीसाठी, पिण्यासाठी, वीज निर्मितीसाठी, मासेमारी आणि वाळूसाठी उपयोगी कसे पडते ह्याचा पुस्तकात संदर्भ आहे. कावेरीचा हा प्रवास जाणून घेतांना रंगनटिट्टू अभयारण्य, श्रीरंगपट्टन तेथील टिपू सुलतानचा इतिहास, तलकाडच्या वाळवंटाच्या अजब शापाची कथा, भारतातील दुस-या क्रमांकावर असलेला शिवसमुद्रम धबधबा, होगेनेकल धबधबा अश्या अनेक ठिकाणांची माहिती बारकाव्यांसकट वाचायला मिळते. समुद्राच्या शेवटी मिळतांना कावेरीचे तीन नद्यांमध्ये विभाजन होते. समुद्राला मिळणारी झ-याच्या रुपातली कावेरी लेखिकेला एखाद्या कृश म्हाता-या माणसांप्रमाणे भासते. आपल्या पाण्याने आपल्या मुलांना (भारतवासियांना) जीवन देणारी जीवनदात्रीच जणू. पहिल्या पानापसून शेवटच्या पानापर्यंत लेखिकेसमवेतचा कावेरी पुस्तक प्रवास आपल्यालाही संपल्यासारखा वाटतो.

मराठी भाषांतर मूळ इंग्रजी पुस्तकासारखे करण्याच्या नादात काही ठिकाणी खटकते. ते अधिक प्रभावी करता आले असते. त्याचबरोबर पुस्तकातल्या इतर चित्रांसमवेत कावेरीचा प्रवासाचा नकाशा दाखवता आला असता तर मुलांसाठी योग्य होते. ह्या त्रुटी सोडल्यास कावेरी अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रत्येक शाळेत भूगोलाच्या तासाला वाचले जावे असेच आहे.

– भाग्यश्री केंगे

पुस्तकदक्षिण गंगा ’कावेरी’
लेखक – कावेरी
प्रकाशक – ओरियोल हेन्री
किंमत – रु. ६०/-