‘इंडिया टू थाऊजंड ट्वेण्टी ए व्हिजन फॉर न्यू मिलेनियम’ हा ग्रंथ, विख्यात संशोधक व भारताचे राष्ट्रपती डॉ. डब्दुल कलाम यांनी लिहिलेला असून: कुशल अंतराळ वैज्ञानिक वाय. एस. राजन या मौलिक उपक्रमाचे सहलेखक आहेत. नाशिकस्थित लेखक अभय सदावर्ते यांनी या पुस्तकाचा केलेला भावानुवाद प्रसिध्दीच्या मार्गावर आहे. ‘राजहंस’ प्रकाशन व ‘अल्टिमेट असोसिएटस्’ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित होत असलेल्या या ग्रंथसिध्दीतील प्रास्ताविकाचा हा काही भाग सर्व संबंधितांच्या सौजन्याने.
भारताचा स्वातंत्र्य संग्राम अखेरच्या वळणावर असताना आम्हा दोघांचा जन्म झाला. ‘सारे जग निद्रेच्या कुशीत असताना १५ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारत मात्र आपल्या भाविष्याचा नियतीशी करार करण्यासाठी जागा झाला आहे,’ हे पंडित नेहरूंचे प्रसिध्द भाषण ऐकताना आमच्यापैकी एकाने माध्यमिक शिक्षण संपवत आणले होते, तर दुसरा अगदीच लहान म्हणजे आपले पहिले वहिले बोबडे बोल ऐकवू शकत होता, आम्हापैकी कुणालाही श्रीमंत व ख्यातकीर्त घराण्याची पार्श्वभूमी नव्हती.
नुकताच स्वतंत्र झालेला आपला देश विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोहोंची कास धरूनच जगामध्ये प्रगत राष्ट्र म्हणून उभा राहू शकेल, यावर आम्हा दोघांचीही असलेली दृढ श्रध्दा आम्हा उभयतांना एकत्र आणण्यास कारणीभूत झालेली आहे.
डॉ. विक्रम साराभाई या महान शास्त्रज्ञाच्या भविष्यवेधी दृष्टीला पंडित नेहरू आणि डॉ. होमी भाभा यांनी सक्रिय साथ दिल्यामुळे पुढे आमच्या सारख्यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाबाबात काम करण्याची संधी मिळाली, हे इथे नमूद केले पाहिजे. आपल्या पारंपरिक, कालबाह्य पध्दती सोडून देऊन, आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण प्रगतिपथावर जाऊ शकतो हा महत्त्वाचा संदेश उभ्या भारताच्या कानाकोप-यात विशेषत: सर्वदूर परसलेल्या सहा लक्ष भारतीय खेडयात पोहोचविणे हे या अंतराळ प्रकल्पाचे महत्त्वाचे काम होते. आपल्या देशात विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. त्याचे सर्वेक्षण करणे, आधुनिक जगात प्रवेश करताना या साधनसंपत्तीचा अधिकाअधिक उपयोग कसा करून घेता येईल, याचा अभ्यास करणे आणि या सर्वांच्या शेवटी सामान्यतल्या सामान्य भारतीयाला, त्याचे जीवनमान उंचावण्यासाठी कसा उपयोग करता येईल, यावर विचार करून त्यानुसार सूत्ररूपाने काही एक निश्चित कार्यक्रम आखून त्याची अंमलबजावणी करणे हे या अंतराळ प्रकल्पाचे सर्वाधिक महत्त्वाचे ध्येय होते. १९६० च्या दशकात जेव्हा आपला अंतराळ कार्यक्रम हा बाल्यावस्थेत होता तेव्हा या कार्यक्रमाचे ध्येय हे अनेकांना केवळ स्वप्नरंजन नव्हे तर ही उद्याची वास्तवता आहे, हे जाणवत होते आणि या एकाच जाणिवपोटी भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेत काम करणा-या आमच्यासारख्या अनेकांना बांधून ठेवले होते. आमच्या मते भारताला आधुनिक, प्रगत आणि प्रगल्भतेच्या पथावर नेणारी ही मोहीम होती. त्यात आम्हापैकी प्रत्येकाचा सहभाग आवश्यक होता. कारण त्यामुळेच भारतीय जनता सुखी होणार होती.
हा न परतीच्या वाटेवरचा खडतर प्रवास होता. बहुसंख्य वेळा अपयश आणि क्वचितच मिळणारे यश यांची सलग मालिका म्हणजे त्या काळी कामात घालविलेल्या रात्री आणि ते दिवस, एकमात्र ध्येयामागे जाण्याचे, बलशाली आणि समृध्द भारत घडविण्याचे. —-
आज निदान अंतराळ संशोधन क्षेत्रात तरी आपण अतिप्रगत झालो आहोत, ही किती समाधानाची बाब आहे ! आजच्या प्रगत संपर्क व्यवस्थेमुळे देशातील दुर्गम भागातही संदेशवहन सहज साध्य झाले आहे. भविष्यात येणा-या नैसर्गिक संकटांची चाहूल आपल्याला आता अगोदरच लागू शकते. भूगर्भामध्ये असलेले पाणी, खनिजे आदीचा अंदाज आपण चटकन बांधू शकतो. पर्यावरण संरक्षणासाठीही या प्रगत अंतराळ संशोधनाचा आपल्याला बहुमोल उपयोग होतो आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बळी तो कान पिळी याच एका तत्त्वाच्या आधारावर चालणा-या आजच्या जगात, भारताला आपले अनेक सामरिक डावपेच आणि धोरणे ठरविण्यासाठी आपल्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचा अमूल्य उपयोग होत आला आहे, हे काय वेगळे सांगायला हवे ?
अंतराळ संशोधन क्षेत्रातल्या आपल्या प्रगतीमुळे आपण कृषी, कला, विज्ञान या क्षेत्रात अनेकानेक प्रयोग करू शकलो आहोत. ज्यामुळे शेतीबाबतचे प्रगत तंत्र आपण आत्मसात करू शकलो. कलेची देवाणघेवाण, संकल्पनांचे आदानप्रदान सहजसाध्य झाले. सांस्कृतिक बंध सैल झाले, सामाजिक अभिसरण अधिक जलद होऊ लागले. या सगळया प्रक्रियेकडे पाहिले म्हणजे निश्चित समाधान वाटते. एवढी यशाची लखलखीत बाजू दिसत असूनही, दारिद्रयमुक्त झालेला, उद्यमशील, उत्तम सार्वजनिक आरोग्याचा धनी, सुशिक्षित बनलेला, अनेकानेक संशोधन प्रकल्प जिथे अहमहमिकेने राबविले जात आहेत. विज्ञान-तंत्रज्ञान जिथे पूर्णत्वाला पोहोचले आहे आणि या सर्वांमुळे सर्वसामान्य देशवासी किमान सुखी झालेला आपण आज पाहू शकत नाही, ही खंत मन ग्रासून टाकते. वास्तवात या सर्व बाबी कुठेतरी अर्ध्यावरच आल्यासारख्या वाटतात. जीवनाच्या काही क्षेत्रात निराशावादाने आपली मुळे खोल पसरली आहेत, हे चित्र अस्वस्थ करणारे आहे. काय आहे या सा-यांचे भविष्य ?
आमच्यासारख्याच विचार करणा-या आणि वरील प्रश्नाचे उत्तर शोधू पाहाणा-या अनेकांशी आमचा संबंध आला आणि त्या सर्वांबरोबर झालेल्या विचार मंथनातून तांत्रिक माहिती, तिचे भविष्य आणि परीक्षण करणारी संस्था अस्तित्वात आली ही निश्चित आनंद देणारी घटना होय. भारतासाठीच्या तंत्रज्ञानाचा २०२० पर्यंतचा वेध या शीर्षकाचा एक मोठा प्रकल्प या संस्थेने हाती घेतला.
शिक्षण, तंत्रज्ञान, विज्ञान, सरकारी प्रशासन, उद्योग, विविध प्रयोगशाळेत काम करणारे शास्त्रज्ञ इत्यादी अनेक क्षेत्रात वैशिष्टयपूर्ण काम करणा-या तज्ज्ञांचा या प्रकल्पात सहभाग होता. प्रत्यक्षाप्रत्यक्ष अंदाजे ५००० तज्ज्ञ या प्रकल्पात सहभागी झाले होते. या सर्वांकडून आलेल्या माहितीचे, विचारांचे, अहवालांचे, प्रश्नांचे संस्थेतील समित्या आणि उपसमित्या यांनी परिशीलन करून एक अहवाल तयार केला.
२ ऑगस्ट १९९६ रोजी माननीय पंतप्रधानांनी प्रकाशित केलेला हा अहवाल अनेक चित्रविचित्र सूचनांनी भरून गेला आहे. त्यात कधी पराकोटीचा आशावाद दृष्टीस पडतो, तर अनेकदा भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरडे ओढत ती कधीच सुधारू शकणार नाही आणि म्हणून भारताला अंधाराशिवाय दुसरा सोबतीच नाही, असे निराशेचे सूरही आळवलेले दिसतात. काहींनी ठराविक प्रश्न समोर ठेवून त्यावर ठोस उपाययोजना मांडली आहे, तर अनेकांनी भारतातील समृध्द नैसर्गिक साधनसामग्रीच्या अधिकतम उपयोगाची महती सांगितली आहे.
या विवेचनात आलेले विविध मुद्दे, अनेक तज्ज्ञांचे भारताबद्दलचे आणि इतरांबाबतचे अहवाल इत्यादी अभ्यासूनदेखील येत्या दशकात (२०२० पर्यंत) आपला देश एक विकसित, सामर्थ्यशाली, सध्या असलेल्या दारिद्रयापासून दूर, अधिक आरोग्यशील म्हणून उभा राहील याबद्दल आम्हाला तरी संशय नाही. येत्या दशकात भारतीय हे अधिक सुशिक्षित, सुदृढ आणि बुध्दिसंपन्न होतील. भारतीयांमध्ये असलेले स्वाभिमान, कष्टाळू वृत्ती, तंत्रज्ञानाची आवड आदी गुणांमुळे भारत विज्ञान, तंत्रज्ञान, व्यापार उदीम, संरक्षण आणि अर्थकारणाच्या क्षेत्रात एक उंच झेप घेऊ शकेल, हे निश्चित. (संक्षिप्त)
इंडिया टू थाऊजंड ट्वेण्टी ह्या पुस्तकाच्या मराठी अनुवादास प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर ह्यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यातील काही भाग खालील प्रमाणे-
१९७९ साली भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेच्या (‘इस्रो’ च्या) सर्वात मोठया ‘डॉ. विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राचे’ पहिले प्रमुख डॉ. ब्रह्मप्रकाश निवृत्त झाले आणि केंद्राचा दुसरा प्रमुख म्हणून भारत सरकारने माझी नेमणूक केली. भाभा अणू संशोधन केंद्रानंतर देशातील हे सर्वांत मोठे संशोधन केंद्र. त्या मंतरलेल्या काळात डॉ. कलाम यांना जवळून बघण्याची संधी मला मिळाली. चिकाटी, सातत्य, व्यासंग व माणसांना आपलंसं करून त्यांच्याकडून राजीखुशीने जास्तीत जास्त काम करवून घेण्याची हातोटी या त्यांच्या जमेच्या बाजू होत्या. सामान्य माणसाला आपण असामान्य आहोत असं ते वाटायला लावायचे ! रात्री बेरात्री त्यांच्या खांद्याला खांदा लावून डॉ. कलामांचे काम चालायचे तेव्हां त्यांची माणसे सुखावून अनभिषिक्त राजासारखी दिसायची आणि डॉ. कलामांच्याकडे ती राजांचा सम्राट अशा नजरेनं बघायची ! त्यांची ही शान इस्रोच्या मुख्यालयानेही कधी झाकोळू दिली नाही. तिथे बंगळूरला, कलामांचं काम जमेल तितकं सुकर करून देणारे प्राध्यापक सतीश धवन (इस्रोचे अध्यक्ष), श्री. टी. एन. शेषन (सहायक सचिव) यांच्यासारखी मंडळी कार्यरत होती. त्यात श्री. राजनही जबाबदारीच्या पदावर होते. कलाम-राजन संबंध हा इतका जुना व निकटचा आहे. दोन क्रियाशील मनांना एकत्रित करणारा. ‘इंडिया २०२०’ हा त्या मानसिक ऐक्याचा एक वैचारिक आविष्कार आहे.
कोणीतरी कुठंतरी बसलंय अन् वारेमाप स्वप्नं रंगवतंय असे हे पुस्तक नाही. स्वप्ने हवीतच. पण स्वप्नांना वास्तवाच्या कोंदणात घालण्याची ताकदही डॉ. कलाम व श्री. राजन यांच्या पुस्तकात मला दिसते. एक अधिक एक केव्हा शून्यही होतात याची त्यांना जाण आहे; पण तीनही हीऊ शकतात, याचीही ! नव्हे, तीनच व्हावेत, ते कसे होतील याची पध्दत शोधून काढण्याचा त्यांचा ध्यास मला ‘इंडिया व्हिजन २०२०’ मध्ये दिसतो !
– डॉ. वसंत गोवारीकर
पुस्तक – ‘भारत २०२०’
संयुक्त प्रकाशक –
पुस्तकाची किंमत – रू २५०/-