तृषार्त पृथ्वीवर जेव्हां ही वर्षाऋतूचे आगमन होते तेव्हांचा आनंद काय वर्णावा?
सोसाटयाचा वारा, ढगांचा गडगडाट आणि लकाकणा-या विजांच्या कडकडाटांत जेव्हां ही आकाशांतली धनदौलत पृथ्वीवर सांडू लागते त्यावेळी अवघे विश्व हर्षविभोर होऊन जाते. या पावसाचे वर्णन अनेक कवींनी
केले आहे मग गोव्यातल्या पावसांत भिजणा-या कविश्रेष्ठ बा.भा.बोरकरांच्या प्रतिभेला अतिसुंदर पर्जन्यगीतें सुचली तर नवल ते काय ? ज्येष्ठांत पावसाला सुरूवात होण्यापूर्वी आकाशांत मेघ दाटून येतात त्यावेळचे वर्णन ते असे करतात –
‘झाले अंबर
झुलते झुंबर
हवेत अत्तर तरते गं……….क्षितिजीं आले भरते गं……’
तर सत्तर वर्षांपूर्वी ढगांकडे पाहून त्यांनी म्हटलंय…
गडद निळे गडद निळे जलद भरूनि आले
शीतल तनु चपलचरण अनिलगण निधाले॥
धुंद सजल हसित दिशा
तृणपर्णी सज्ज तृषा
तृप्तीचे घन घनात बघुनि मन निवाले॥
टप टप टप पडति थेंब
मनिंवनिंचे विझति डोंब
वत्सल ये वास भूमि आशीर्वच बोले……जलद भरूनि आले॥
तो पहिला पाऊस…अहाहां…’अंभोदांनी गगन भरले…..’
पाणीभ-या ढगांनी सारे आकाश भरून गेले आणि…
‘फांदीसारखी झुकते सांज।
जांभळासारखे पिकती ढग
हवेत गारवा जड होऊन।
पेंगुळपांगुळ होते जग॥ ‘
जांभूळ पिकले की खाली पडते, ढग पिकले…आणि पाणी होऊन जमिनीवर आले.
किती सुंदर कल्पना !
मग आतूर मनाने तो म्हणतो…बघ बघ सखी…
”दिशा दिशातून आषाढाच्या श्याम घनांना पूर
तृणाप्रमाणे मनेंहि झाली चंचल तृष्णमयूर॥”
इतका हा मोहमयी ऋतू ! अगं….
”चुरल्यागत सखि मरवा। मिरमिरते तरल हवा
ये कवेंत या हवेत। या सम नच ऋतू हिरवा॥”
हा आषाढ रात्रंदिवस कोसळतोच आहे. सगळीकडे पाणीच पाणी झालंय. अरे किती धोपटून काढतोयस सगळ्यांना ? जरा उसंत दे.
रे थांब जरा आषाढ घना। बघू दे दिढीभरून तुझी करूणा ॥धृ॥
कणस भरू दे जिवस दुधाने। देंठ फुलांचा अरळ मधाने
कंठ खगांचा मधुगानाने। आणीत शहारा तृणपर्णा…रे थांब जरा आषाढघना !
पण या आषाढघनाला जरासा थांब म्हटले तर तो खूपच थांबला. चांगलीच ओढ दिली पावसाने. सगळीकडे चिंतेचे वातावरण पसरले. पण मग परत एकदा सा-या जगाला पावसाची चाहूल लागली हे कसे घडले ? अहो प्रत्यक्ष धरणी मातेचेच पत्र गेले ना त्याला!
”मंद झाले ऊन, व्योमी सातरंगी सायकाला
लांब गेले पत्रभूचें थांबलेल्या पावसाला”
आणि ढग आले- येई घना। अजुन पुन्हा अजुन पुन्हा
चाहूल लागून तुझी। हर्ष वना विहंगजना.”
पावसाच्या या पुनरागमना नंतरचे अत्यंत सुंदर वर्णन झाले हवेचेंच दही मधे- बोरकरांनी असे केले आहे.
”लक्ष आंचळांनी दुभे। निळी आकाशाची गाय
भिजणा-या तृप्तीवरी। दाटे संतोषाची साय॥”
‘झुरूमुरू झुरूमुरू। धारा लागती या झरूं
हरपले होते ते ते। पाहे हळूच अंकुरूं॥ ‘
झाले हवेचेंच दहीं। मातीलोण्याहून मऊ। पाणी होऊनियां दूध। लागे चहूकडे धावूं॥
चहूंकडे धावणा-या या दुधाबरोबरच श्रावणमास अवतरतो.
आला गं श्रावण आला गं श्रावण। सृष्टीचा लावण्यराज
मोतिया वृष्टीला घेऊन सोबत। लेवून सुवर्णसाज
आणि श्रावणाच्या या स्त्रवण्याने…….
”मनातले सल रूजून आता। त्याचा झाला मरवा रे”
अशी गंधमयी किमया घडते.
पण ही नटूनथटून सजणाकडे निघालेली अभिसारिका-तिला रागच आलाय् या श्रावणसरींचा. त्याच्यामुळे तिचा सारा साजशृंगार विसकटून गेलांय्. आता कशी जाणार ती त्याच्याकडे ? तशीच गेली. तो वाट पाहील ना ! आणि त्यानेही तिला तशाच ओलेत्या बाहूंनी कवेंत घेतले.
” धटिंगण पावसाने बाई उच्छाद मांडिला
माझा फुलांचा शृंगार ओली चिखली सांडला. ”
तर समुद्र बिलोरी ऐना या कवितेत श्रावण म्हणजे सृष्टीला लागलेला पाचवा महिना अशी वेगळीच कल्पना बोरकरांनी केली आहे. ते म्हणतात –
समुद्र बिलोरी ऐना। सृष्टीला पांचवा म्हैना ॥धृ॥
कटीस अंजिरी नेसूं। गालात मिस्किल हसू
मयूरपंखी, मधुरडंखी। उडाली गोरटी मैना॥
लावण्य जातेस उतू। वायाच चालला ऋतू
अशाच वेळी गेलीस कां तू। करून जिवाची दैना….. सृष्टीला पाचवा म्हैना॥
श्रावण स्पर्शाने पाकोळयांनाही जाग येऊन त्या उडायला लागल्या, तेव्हा ती अधांतरी बागच आहे असे त्यांना वाटले…
पाकोळयांना जाग। अधांतरी बाग ॥
रंगांचा उत्सव। चाले जागोजाग॥
तेवढयात फुलपांखरेही आली. श्रावणाने अंगांगावर विविध
अशी काही शिपंण केलीय की बस !
बोला कुणा कुणा हवे फुलपांखरांचे थवे
जादुगार श्रावणाच्या कर्णकुंडलीचे दिवे॥
कोणी उन्हेरी चंदेरी कोणी अंजिरी, शेंदरी
मोरपिसापरी कोणी वर्ख ल्यालेले भर्जरी॥
कुणा अंगी वेलबुट्टी, चित्रचातुरी गोमटी
इंद्रधनुचेही वर्ण होती पाहून हिंपुटी॥
त्यांच्या लावण्याने दुणा येथे श्रावणाचा हर्ष ॥
अशा मोसमी, गोव्यात खरेच या एक वर्ष॥
अशा सुंदर मोसमात फुलपाखरांनी नटलेल्या श्रावणदर्शनाचा हर्ष अनुभवण्यासाठी एखाद्या वर्षी खरंच तुम्ही गोव्यात याच असे आमंत्रण द्यायला बोरकर विसरत नाहीत.
तेवढयात संध्याकाळ होते आणि अंधारात काजवे चमकायला लागतात. ते घरातही येतात. तो म्हणतो-
नको म्हणू झाले फार आज घरांत काजवे
जाण भाग्यानेच आले दिवे हिरवे हिरवे
जणू आपल्या महालातल्या डोलणा-या हंडया होऊन त्यांनी आपल्या शृंगारालाच शृंगारले आहे….. होय ना प्रिये ?
तर ‘दीस उधळायाचे’ कवितेत म्हणतात-
सोनवर्खी उन्हामघ्ये चांदवर्खी सरी। वेलीवेलीतून रास खेळतात परी ॥
गर्द चोहीकडे चारा दूध झाले धानीं। कावळयाच्या डोळयापरी जिथे तिथे पाणी॥
मग ?…. असे दीस काय सखी घरी बसायचे?
कानी वारे भरूनिया उधळायाचे, कानी वारे भरूनिया उधळायाचे॥
अशा या पावसाच्या सरी यायला लागल्या की सारे जग कसे मधुबन होऊन जाते. त्या गोपी, तो कृष्ण……कदंबसुध्दा ओलाचिंब होऊन थरथरतो. स्वत: बोरकरांची आवडती आणि लोकप्रियही असलेली कविता-
सरीवंर सरी आल्या गं
सचैल गोपी न्हाल्या गं
गोपी झाल्या भिजून चिंब
थरथर कांपति कदंब निंब
वेली ऋतूमति झाल्या गं… सरीवर सरी आल्या गं.
दुधात गोकुळ जाय बुडून
अजून आहे कृष्ण दडून
मी-तू पण सारे विसरून
आपणही जाऊ मिसळून
सरींवर सरी आल्या गं।
दुधात न्हाणुनि घाल्या गं – सरींवर सरी……
एवढा पाऊस झाल्यावर ते पाणी जाणार कुठे ? ते धावणारच, पळणारच आणि शेवटी उंचावरून खाली पडून
त्याचा ”दूधसागर” धबधबा होणारच.
हांस खदखदून असा। हांस दूधसागरा ॥
लासल्या गिरीदरीत। फेंक फेस पांढरा ॥
हास्यी तव वेदघोष। सृजनाचा दिव्य तोष ॥
जीवनकल्लोळ हर्ष। वर्षंवी शुभंकरा…..हांस दूधसागरा॥
हा पाऊस पाण्याबरोबरच मानवी जीवनात आंनदांचीही बरसात करतो.
म्हणून तर बोरकर म्हणतात……
जोवर हा पाऊस पडतो जगात। वेडा मोर नाचतो वनात॥
पहाटेची किरणें भुलून। हिरे वेचित फिरती तृणांत ॥
तोवर सुखास अंत नाही। माणुसकीला धोका नाही ॥
चंद्रमौळी संसार आपला। दु:खांत देखील ओका नाही॥
मग श्रावणांतला ऊन पावसाचा खेळ सुरू होतो. फार दिवसांनी सोनियाची उन्हें आल्याने चिंब भिजलेली साळीची बालकें ती ऊब जणूं पिऊन घेऊन आनंदित होतात.
जणू काही जरतारी आंगी। माथा शिरपेंच ल्याली
पाणियाच्या वाक्या- वाळे। पायी घेऊन नाचली
गेला वारा गंधांगुली। त्याच्या गालांना लावून
मेघ सारून आकाशें। त्यांना घेतले चुंबून
त्यांना पाहून फुटलें। हसू राजेश्री श्रावणा
लोणियाने बळावला। त्यांच्या ओठातला दाणा॥
आता घरोघरची अंगणे सुध्दा श्रीमंत-ऐश्वर्यवंत झालेली असतात. अळू फोफावलेलं असतं. मोगरीला नव्या फांद्या फुटलेल्या असतात. क्रोटनची लाल पाने डोलत असतात. चारी कोप-यात न्हात्या-वित्या पपया पाऊस सांडत असतांना पानांच्या छत्र्या ढाळीत असतात. तुळशी वृंदावनाला गर्द शेवाळाने वेढलेले असते आणि दुर्वांकुरांनी त्याचे माथे मोहरून गेलेले असते. औषधींची झुडुपे इतस्तत: दाटलेली असतात. वारा सर्वत्र फुलांचा सुगंध मुक्तपणे वाटीत असतो. हे सर्व बघायला कोकिळ देखील पावसांत भिजत तिथे येतो. बोरकर म्हणतात-
वृष्टींत सोनवर्खी सृष्टी इथे उधाणे
धा, गा, तुम्हीही सारे या कोकिळाप्रमाणे
सारे पाणी पृथ्वीला दिल्याने हळूहळू आकाशात ”ढवळे ढवळे ढग खवल्यांचे” यायला लागतात आणि
”सरी ओवल्यागत ओघळती। हरळीवरती निळसर बगळे” – असे पक्षी यायला लागतात.
उन्हाने सजलेले छोटेसे गांवही आपला चेहरा पाहण्यासाठी –
उंचावरून झुकें जरासें
निळया तळयाच्या पारज कांठी…..
सरत्या श्रावणाची शोभा काय वर्णावी ? किती त्याचे कौतुक ?
हळद लावुनी आलें ऊन। कुंकुमाक्षता फुलांमधून ॥
झाडांमधुनी झडे चौघडा। घुमते पाणी लागून घून ॥
या रसरसत्या वातावरणात तोही रमून जाऊन म्हणतो –
लावण्याचा लागुन बाण। तृप्तीलाही फुटे तहान ॥
मला खोवू दे तुझ्या कुंतली। एकच यांतिल पान लहान ॥
आणि बघता बघता वर्षाऋतूची संपूर्ण सुशोभा घेऊन भद्र भाद्रपद आला सुध्दा.
हंसू मुलायम फुलावरिलसे
खुले निरागस ऊन
भाद्रपदातिल तृप्त नदीतून
निळी मदालस धून ॥१॥
पांग फिटुनि उचलले पांगले
शुभ्र हंससे मेघ
हिरव्या गिरिंना देई गिलावा
अवचित पारज रेघ ॥२॥
सयशी सर येऊनिया जाते
संतपण सोडीत
गात ह्दय हे सहज विरहते
लक्ष स्नेह जोडीत ॥३॥
असा हा बोरकरांचा आनंददायी कवितापर्जन्य ! सर्व रसिकांना सुखावणारा, मोहविणारा, मात्र त्याचा आनंद उपभोगण्यासाठी गिरीदरीत, नदीकाठी, झुळझुळत्या झ-यावर धबधब्याच्या तुषारांत…..असे कुठेतरी भिजायला गेले पाहिजे हो ना?
सरीं मधे……
सरीवंर सरी आल्या गं। सचैल गोपी न्हाल्या गं
वनात गेला मोर भिजून। गोपी खिळल्या पदीं थिजून
वेली ऋतूमति झाल्या गं। सरीवर सरी आल्या गं.
अशा सरीवंर सरी आल्या…. सरीवर सरी……..
सौ. अंरूधती मधुकर जोगळेकर – नाशिक