“शहाण्या माणसानं तुमच्या गावात राहणं हे पाप आहे. तुम्ही लोक भल्याला गाढव कराल. बस, झाली एवढी नोकरी पुरे झाली. मी वर अर्ज करतो आणि बदली करून घेतो दुसर्या गावी.” हे सात्त्विक संतापाचे उद्गार आहेत राजाराम मास्तरांचे. राजाराम मास्तर व्यंकटेश माडगुळकरांच्या “बनगरवाडी” या कादंबरीतील महत्त्वाचे व मुख्य पात्र. १९५५ मध्ये प्रकाशित झालेली बनगरवाडी ही कादंबरी प्रादेशिक कादंबर्यांमध्ये मोडते. मराठी साहित्यात १९४५ पासून अमुलाग्र बदल होत गेला. फडके, खांडेकर, माडखोलकरांच्या कल्पनारम्य प्रेमकथांमधून कादंबरी बाहेर पडून ती वास्तवतेच्या पातळीवर आली.
हा काळ नवकथांचा काळ म्हणून ओळखला जातो. याच जोडीला विशिष्ट प्रदेशाचे प्रतिनिधीत्व करणार्या कादंबर्यांचा उदय याच्या आगेमागेच झाला. र.वा.दिघे, श्री. ना.पेंडसे, गो.नि. दांडेकरांनी निसर्गाशी नाते सांगणार्या, मानवी भावभावनांचे चित्रण करणार्या कादंबर्या लिहायला सुरूवात केली. मराठी कादंबरीला नव्या विकासाच्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न या त्रयींनी केला. याच जोडीबरोबर आणखी एक नाव घेता येईल ते तात्या तथा व्यंकटेश माडगुळकर यांचे. खर्या अर्थाने प्रादेशिक कादंबर्यांचे जनक म्हणून श्रीनांना ओळखले जाते. श्रीनांनी ज्याप्रमाणे हर्णे, दापोली परिसराची पार्श्वभूमी आपल्या कादंबर्यांमध्ये विकसीत केली, त्याच प्रमाणे माडगुळकरांच्या लिखाणातही माणदेशचा परिसर चित्रित झाला आहे.
माडगुळकरांची बनगरवाडी माणदेशच्या परिसरातील धनगरवस्तीच्या पार्श्वभूमीवर घडते. या कादंबरीचा नायक राजाराम विठ्ठल सौंदणीकर नव्यानेच शिक्षक म्हणून बनगरवाडीत दाखल होतो. परंतु सरकारांच्या काळातील शिक्षक म्हणून ही त्यांची पहिलीच नेमणूक. नोकरीवर पहिल्यांदाच रुजू होण्यासाठी आलेल्या राजारामाला बालट्यांच्या धमकीशी सामना करावा लागतो. त्यामुळे आपण बरे आणि आपले काम बरे असा हेतू ठेवून तो गावात राहायला लागतो. ३०-३५ घरांची वस्ती असलेल्या या गावात त्याला शाळा सुरु करण्यासाठी कारभार्याची समर्थ साथ मिळते. शाळा नियमित सुरु होते आणि स्वत:च्या नकळत राजाराम गावातल्या लोकांमध्ये आरामात मिसळून जातो.
गावात विविध समस्यांच्या सोडवणूकीत त्याला कारभार्याबरोबर मान मिळायला लागतो. संसाराच्या प्रश्नांबरोबरच गावातले इतरही तंटे तो कारभार्याबरोबर सोडवायला लागतो. दर आठवड्याला गावाकडे जाताना लोकांची कामेही तो करायला लागतो. लोकांची लिहून दिलेली पत्रे पोस्टात टाकणे, मनिऑर्डरी करणे अशा प्रकारची तो कामे करतो. मास्तरला काहीच अशक्य नाही असा भोळाभाबडा विश्वासही या गावाकर्यांमध्ये असतो. यामुळेच शेकूसारखा माणूस पेरणीसाठी गावातून कोणाकडून तरी बैल घेउन दे अशीही विनवणी करतो. पण ती मागणी तो पूर्ण करू शकत नाही. शेकूची गरज आपण भागवू न शकल्यामुळे त्याची बायको नांगराला दुसर्या बैलाच्या जागी जुपूंन घेते हे ऐकल्याने मास्तर हताश होतो. ही येडीबागडी धनगरं आपल्यावर किती विश्वास टाकतात याने तो अस्वस्थ होतो. गावात रहायचे तर गावकर्यांना होईल तेवढी मदत करायला हवी. याच हेतूने रामा धनगराचे बुचडा छाप राणीच्या पैशाची तालुक्याला जाऊन मोड आणण्याच्या परोपकारात त्याला पैसे चोरीला गेल्याने मनस्तापही भोगावा लागलेला आहे.
अशी मदत करत असतानाच कारभार्याच्या अंजीने दिलेली चोळी शिवून आणण्याचे कामही मास्तर करतो. ’मास्तर आपलेच आहेत’ त्यांना काम सांगितले तर बिघडले कोठे ? या भुमिकेतून अंजी काम सांगते. मास्तरही गावातल्यांच्या उपयोगी पडायचे या भूमिकेतून तिचे काम करतात. बालट्याला हे माहित होते आणि कारभार्याकडे तो मास्तराची कागाळी करतो. कारभारी मास्तराशी अबोला धरतो. अखेर आठवड्याभराने काराभारी आपल्या मनातील शंका बोलून दाखवतो.
आपल्या आतापर्यंतच्या वागणुकीतून कारभार्याला आपल्याबद्दल विश्वास वाटत नाही हे समजल्यावर मास्तराला सात्विक संताप येतो. आपण चांगल्या भावनेने लोकांच्या उपयोगी पडतोय हाच आपला मूर्खपणा झाला असे त्याला वाटते. आपण बदलीच करून घ्यावी असे त्याला वाटते. पण कारभार्याचे समाधान होते आणि दोघांमधील अबोला दूर होतो.
एकीकडे शाळा सुरळीत चालत असतानाच गावात एखादी कायम स्वरूपी वास्तू असावी असा विचार करून मास्तर गावकर्याच्या मदतीने तालीम बांधून घेतो. पंत सरकारांच्या हस्ते तालीमचे उद्घाटन होते. मास्तरमुळेच आपल्या गावात राजा आला आपल्या आयुष्याचे सार्थक झाले याचे कारभार्याला समाधान वाटते.
काही दिवसानंतरच कारभा-याचे निधन होते. कारभार्याच्या निधनानंतर गावाचे रूपच पालटते. गावात दुष्काळ पडतो. सारी वस्ती गावातून बाहेर पडते. दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन मास्तरची गावातून बदली होते. तो रिकाम्या गावातून बाहेर पडतो.
माडगुळकरांनी कादंबरीत या मुख्य कथानकाबरोबर इतर उपकथानकेही रंगवली आहेत. सताचे लांडगा मारणे, जगन्याचे प्रेमप्रकरण, शेकू-अंजीचे प्रेमप्रकरण, आयुब, आनंदा रामोशी यांचे मास्तरांचे प्रेम, तालीम बांधत असतानाच बाळा धनगराचा आडमुठेपणा, बालट्याला झालेली मारहाण अशा अनेक प्रसंगांनी धनगरांच्या विविध स्वभावाचे चित्रण केले आहे. याचबरोबर धनगरांचे खडतर जीवनही यात येते. सुगीच्या काळातले त्यांचे जगणे आणि दुष्काळ पडल्यानंतरची त्यांची झालेली वाताहत कादंबरीत अनुभवायला मिळते.
गावातल्या शाळामास्तरांबरोबरचे गावकर्यांचे नाते पाहिल्यानंतर पूर्वीच्या काळातील ग्रामीण भागातील शिक्षण प्रक्रियेची आठवण होते. पूर्वीच्या काळी गावात जेव्हा एखादे शिक्षक रूजू व्हायचे त्यानंतर त्यांचाही गावात असाच मुक्काम असायचा. शाळेत मुलांना आणण्यापासून त्यांना सुरूवात करावी लागायची. गावातल्या लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते असायचे. गावातले रितीरिवाज, परंपरा, सण, उत्सव, विविध समस्या या सार्यांबरोबरच त्यांचे एक प्रकारचे ऋणानुबंध असेच जुळलेले असायचे. त्याकाळात शिक्षकांना मास्तर, गुरुजी असे संबोधले जायचे.
कालांतराने या सार्यांमध्ये बदल होत गेले. शिक्षणाची प्रक्रिया बदलली. मास्तरांच्या जागी सर आले. सरांचा गावातला मुक्काम सकाळी १० ते ५ एवढाच राहायला लागला. सरांचे गावात येणे मोटारसायकलवरून व्हायला लागले. शिक्षणाबरोबरच शिक्षकांच्या शाळाबाह्य कामांच्या जबाबदार्या वाढल्या. जनगणना, कुटुंबनियोजनाचे कार्यक्रम, मतदार यादी अशा कामात शिक्षक अडकत आहेत. हे कमी म्हणून विविध संघटना, पक्ष या कामांमध्ये शिक्षकांचा सहभाग वाढत आहे.
शिक्षकांनी आपल्या नोकरीच्या ठिकाणी वास्तव्य करावे असे शासन आदेश आता निघत आहेत. पण त्याकडे कोणी फारसे गांभिर्याने पहात नाहीत. नाही म्हणायला गेल्या चार पाच वर्षापासून गावातल्या जलस्वराज्य प्रकल्प, ग्रामस्वच्छता अभियान, संपूर्ण स्वच्छता अभियान या उपक्रमात शिक्षक सहभागी होत आहेत पण ते गावाबद्दलच्या जिव्हाळ्यातून नव्हे तर इन्क्रिमेंट वाढवण्याच्या हेतूने हे नाकारून चालणार नाही.
त्यामुळे शिक्षक आणि गावकर्यांमधील जिव्हाळा हा अशाच बनगरवाडीसारख्या कादंबर्यांमधून पहायला मिळणार. बनगरवाडीचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे या कादंबरीचा १२ भांषांमध्ये अनुवाद झालेला आहे. याच जोडीला अमोल पालेकरांनी बनगरवाडीवर चित्रपट काढलाय. चित्रपट आणि नाटकांचे दिग्दर्शन करणारे चंद्रकांत कुलकर्णी यांनी राजाराम मास्तर अप्रतिम उभा केला आहे. त्यांच्याबरोबर चंद्रकांत मांढरे, उपेंद्र लिमये, सुषमा देशपांडे, हेमू अधिकारी, नंदू माधव या कलावंतांनी तेवढीच समर्थ साथ दिलेली आहे. देबू देवधरांनी तेवढ्याच नजाकतीने बनगरवाडी चित्रण केलेले आहे. एक संवेदनशील चित्रपट म्हणून संग्रही असायलाच हवा.
– भारती गोवंडे (लातूर)