‘वेदो ऽ खिलो धर्ममूलम्’ अर्थात वेद हे सर्व धर्माचे मूळ आहे व ‘वेदा: सर्व हितार्थाय।’ म्हणजे या वेदातच सा-या मानवतेचे कल्याण, हित सामावलेले आहे. वेद! भारतीय संस्कृतीचा एक अमोल ठेवा!! जगाच्या वाङ्मयामध्ये वेदाइतके प्राचीनतम वाङ्मय कोणतेच नाही. जगातील अनेक देश, संस्कृती कालाच्या ओघात नष्ट झाल्या, परंतु आपली भारतीय संस्कृती टिकून आहे, कारण, त्यात चिरंतन मूल्ये आहेत. भारताच्या समृध्द परंपरेत सर्वाच्च स्थानी मानलेल्या वेद वाङ्मयाच्या अभ्यासाची आज खरी गरज आहे. मानवी संस्कृती ही केवळ उपयुक्त यंत्रसाधनेवरच अवलंबून नसते. त्यासाठी सामाजिक नितीमूल्यांची तात्त्वि बैठक आवश्यक असते. या वेदांतील पवित्र ऋचांचा अर्थ लोकांना समजावा, वेदांबद्दल समाजात जाण निर्माण व्हावी, एक संस्कारांनी युक्त असा समाज निर्माण व्हावा, या तळमळीने श्री. कस्तुरे यांनी अक्षरांच्या माध्यमातून वेदांमधील आशय स्पष्ट केला आहे. विस्मृतीत गेलेल्या वेदांच्या महतीचा पुनरूच्चार करण्याचा ‘वेदाक्षरे’ हा एक प्रयत्न आहे.
एकूण वेद चार –
१. ऋग्वेद- हा सर्वात आद्य व प्राचीन मानला जातो, २. यजुर्वेद, ३. सामवेद, ४. अथर्ववेद.
या चारही वेदांतील ऋचांचा अर्थ अक्षरांच्या माध्यमातून श्री. राम कस्तुरे प्रकट करतात. याकरता कागद, कॅनव्हास, काच लाकूड इ. आयुधांचा वापर करून त्यांनी त्याचे प्रभावीपणे प्रकटीकरण केले आहे. अक्षरनिर्मिती करताना, केवळ ब्रशचा वापर न करता, त्यासाठी निरनिराळी साधने त्यांनी स्वत: शोधून काढली आहेत. त्यांचा वापर निरनिराळया माध्यमांवर मोठया कौशल्याने केला आहे. प्रत्येक वेदाची व्याख्या, वेदाचा उपवेद, शाखा, गोत्र, छंद, देवता, ब्रह्मवाक्य यांचा अतिशय खोलवर अभ्यास करून त्यांचा वापर करून कलाकृती अधिक सौंदर्यपूर्ण बनविल्या आहेत.
ज्या राष्ट्रात ज्ञानी पुरूष व शूर पुरूष एकाच विचाराने राहतात, त्याच राष्ट्राची सर्वांगीण प्रगती होते हा अर्थ सांगणारी यर्जुवेदातील ऋचा व त्याचा अर्थ व्यक्त करताना बुध्दीजीवी वर्गाचे प्रतीक म्हणून लेखणी व शूर विचारांचे प्रतीक म्हणून भाला यांचे एकत्रिकरण करून एकाच संकल्पित आकारात दोन्ही प्रकारच्या व्यक्तींचे चिन्हात्मक प्रकटीकरण करून तो भाव यथार्थतेने व्यक्त केला आहे.
विद्यादेवतेला म्हणजेच शारदेला वंदन करणारी, शारदेचं महत्त्व, श्रेष्ठत्त्वं सांगणारी ऋग्वेदातील ऋचा मांडताना काळया पार्श्वभूमीवर पांढरी विद्यादेवता काढून बाजूला त्या सरस्वतीला वंदन करणारी ऋचा सौंदर्यपूर्ण पध्दतीने लिहून तो आदर व्यक्त केला आहे. वर्तुळ, त्रिकोण, चौकोन या भौमितिक आकारात मानवी जीवन वसलेले आहे. मानवी जीवनात चराचरात ॐ चे अस्तित्त्व दिसते. गडद पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगात मूळ आकार काढल्यामुळे चित्राला खूप उठाव आला आहे.
गायत्री मंत्राचे महत्त्व तर फार अनन्यसाधारण आहे. या मंत्राची शक्ती अफाट आहे. या सूर्यदेवतेची उपासना म्हणजे आपल्या अंत:करणात सदैव एक उर्जा शक्ती निर्माण करण्याचा महामंत्र आहे. या उर्जेचं, शक्तीचं प्रकटीकरण करताना, सूर्यवलयकार आकारात सुंदर देवनागरी लिपीत गायत्री मंत्र लिहीला आहे व त्या अक्षराच्या लेखनशैलीतूनच तो प्रकाशमान झाल्याचा भास होतो. सूर्यापासून निघणारी व आपल्याला सदैव प्रकाश देणारी सोनेरी किरणे गडद पार्श्वभूमीवर अधिक उठावदार दिसतात. अगदी मनात भरण्याजोगं हे चित्र आहे.
त्या दिव्य शक्तीचं म्हणजेच ॐ चं महत्त्व चारही वेदांच्या निरनिराळया ऋचांतून व्यक्त होतं. येथे श्री. कस्तुरे यांनी चार वेदांच्या नावाची फक्त आद्याक्षरे म्हणजेच ऋग्वेदाचा ‘ऋ’, यजुर्वेदाचा ‘य’, सामवेदाचा ‘सा’, अथर्ववेदाचा ‘अ’ यांच्या अद्याक्षरांत ॐचं प्रतिबिंब पाहावयास मिळतं. हे खरोखर खूप अवघड आहे. अशा प्रकारची निर्मिती करताना स्वत: अक्षरलेखनकाराला एका अध्यात्मिक योगसाधनेत स्वत:ला झोकून द्यावं लागतं. त्या परब्रह्माशी जेंव्हा तुमचा आत्मा एकरूप होतो, तेंव्हाच उत्स्फूर्त फटकाऱ्यांनी ॐ च्या दिव्यशक्तीचा अनुभव येतो.
सामवेद हा पूर्णपणे शास्त्रीय संगीतावर आधारित आहे. शांत, शीतल रंगसंगतीचा वापर करून गायनात सर्वश्रेष्ठ स्थानावर असलेल्या ॐ चा ध्वनी, नाद एका विशिष्ट अक्षरशैलीने लिहून एक अध्यात्मिक पातळीवर ती कलाकृती अनुभवता येते. त्या ॐ चं, संगीताचं उत्कृष्ट मिलन आपल्याला ह्या चित्रात दिसतं. सप्तस्वरांचा श्लोक (सा, रे, ग, म, प, ध नि) एका विशिष्ट अक्षरशैलीत लिहून सप्तस्वरांचा नाद अक्षरशैलीत घुमतोय असा भास होतो. येथेच श्री. कस्तुरे यांचे यश आहे.
मित्रत्त्वाची मैत्रीची भावना व्यक्त करणारी यजुर्वेदातील ऋचा खूप अर्थपूर्ण आहे. अक्षरलेखनातून ही मैत्री व्यक्त करताना चारही ‘मि’ हे अक्षर लिहून ‘मि’च्या वेलांटीमुळे ही चार अक्षरे एकमेकांत इतकी सुंदर गुंफली गेली आहेत की, मैत्रीचे एक अतूट, दृढ, घट्ट नाते या वेलांटीमुळे समर्थपणे व्यक्त झाले आहे. असे दृढ मैत्रीचे संबंध आपल्याला चारही दिशांनी मिळो, म्हणजेच प्रेमाचे, मैत्रीचे नाते चहुबाजूंनी लाभो- सुंदर प्रकटीकरण आहे.
आम्ही सर्वांनी नेहमी एकमताने बोलावे, एकत्र राहावे. आपली मने एक व्हावीत. सर्वांचा मंत्र एकच असावा. तन, मन, सभा एकत्र यावी, तुमचे सहजीवन शांतीमय सफल होवो, ही भावना ऋग्वेदातील ऋचांत व्यक्त केली आहे. आजच्या युगात ही भावना व्यक्त होत आहे, म्हणून याचे महत्त्व आहे. हा अर्थ व्यक्त करताना ज्याप्रमाणे आदिवासी लोक हातात हात एकत्र घेऊन गोलाकार आकारात एक मनाने जशी नाचतात/फिरतात तशी ही अक्षरे गोलाकार फिरत आहेत. या एकात्मतेतच समृध्दी आहे, म्हणून समृध्दीचं प्रतीक म्हणून हिरवा रंग वापरला आहे.
इंद्र, मित्र, वरूण अग्नी या देवता एकाच परम तत्त्वाची निरनिराळी रूपे आहेत हे सांगताना एका वर्तुळाच्या केंद्र स्थानापासून निघालेली चार पाती, त्या चार पातीच्या आकारात या चार देवतांची नावे लिहीली आहेत. व तो परब्रह्म, परमात्माच आपले आयुष्य गतीमान ठेवतो, त्या ब्रह्माची ही निरनिराळी चार रूपे आहेत, असे मानावे. अशा प्रकारचे प्रतीकात्म चित्र जर घरात ठेवले तर निश्चितच घरामधील उर्जा खेळती राहू शकते. उत्कृष्ट ऋचांची निवड, उत्स्फूर्तता, फटकारे, नवसाधनांचा प्रयोग करून केलेला तंत्रअभ्यास, एकंदर सर्व कलाकृतीमध्ये मूळ गाभा असलेल्या अध्यात्माचं प्रतिबिंब दिसणे ही फार मोठी तपश्चर्या आहे. कलासाधनेसोबतच अध्यात्मिक साधनेतूनच हे व्यक्त होते, हे प्रत्येक कलाकृती पाहताना जाणवते.
सर्व मानवांनी स्वरूपवान, बलवान, वीर्यवान व्हावे. नेहमी यज्ञाची पूजा करावी व आनंदोत्सव साजरा करावा हे सांगणारी ऋग्वेदातील ऋचा खूप अर्थपूर्ण आहे. हा भाव व्यक्त करताना यज्ञकुंडाच्या आकारात मूळ ऋचा लिहून त्याच्या चहूबाजूला अक्षररूपी रांगोळी काढून उत्साहाच्या वातावरणाची निर्मिती अक्षरलेखनातून यशस्वीपणे व्यक्त केली आहे. मध्यभागी चार ‘त’ एकत्र करून त्यांचं स्वस्तिक तयार केलं आहे. प्रत्येक मूळ ऋचांच्या अगदी जवळ जाणारे कलाआविष्कार श्री. कस्तुरे यांना साधले आहेत.
श्री. कस्तुरे यांनी अनेक दूरदर्शन मालिका तसेच मराठी चित्रपटांचे अक्षर नामांकन केले आहे. ‘पिंपळपान’ ही दूरदर्शन मालिका तसेच ‘भेट’ हा चित्रपट ही काही अलिकडची उदाहरणे. नेहरू सेंटरतर्फे निर्माण केलेल्या माहितीपटात संगणकावर देवनागरी लिपीत वेदऋचा लिहून त्या फिल्मचे नामांकनही त्यांनी केले आहे.
एक सुसंस्कारित समाज निर्माण व्हावा व वेदांचे पुनरूज्जीवन व्हावे यासाठी श्री. राम कस्तुरे हे सातत्याने कलानिर्मिती करीत आहेत. कलेच्या माध्यमातून वेदांचे जतन करण्याचा ध्यास श्री. कस्तुरे यांनी घेतला आहे. अशीच वेदसेवा व अक्षरांचं प्रकटीकरण त्यांच्या कुचल्यातून घडत राहो, ही वेदचरणी प्रार्थना. मराठीवर्ल्ड प्रतिनिधी