२३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन आणि जगप्रसिध्द साहित्यिक शेक्सपिअरचा जन्मदिन आणि मृत्यूदिनही! वाचन संस्कृतीच्या चर्चेशिवाय पुस्तकदिन पोरकाच. वाचन संस्कृतीवर आलेली अवकळा व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट यांचा अकारण सकारण संबंध जोडला जातो आणि संबंधाचा सबळ पुरावा देण्यासाठी अलीकडच्या मुलांच्या वाचन सवयीवर अमर्याद चर्चा होऊन पूर्णविराम दिला जातो. अलिकडची मुलं वाचत नाहीत. मुलांना पुस्तक उपलब्ध नाही. ही विधाने जितकी खरी वाटतात तितकेच प्रश्नही निर्माण करतात व तिथेच थांबतात. मात्र आजच्या दिनाच्या औचित्याने आडातले पोहणा-यांना नक्कीच आणता येईल.
एखाद्या गोष्टीची सवय किंवा शिस्त लावायची असेल तर ती आपण टाकून ठोकून लावू शकतो. सकाळी एक तास व्यायामाची सवय व्यायाम करायला लावून लागू शकते. पण व्यायामाची गोडी त्याने निर्माण होणार नाही. वाचनाच्याही गोडीचं तसंच आहे. मुलांना ”आता वाचत बसा बरं का रे! उगीच हुदंडू नका!” असं म्हणून खोलीत कोंडून घातलं तर मुल वाचतील, कारण दुसरा पर्याय नाही आणि पुस्तक हातात आहेत पण वाचनाचा आनंद अशा सक्तीच्या वाचनाने कसा मिळेल? वाचन ही फक्त क्रिया घडेल. त्या कृतीचा आनंद मिळणार नाही. वाचनाची गोडी लागून आनंद निर्माण व्हायला तसं वातावरण असणं ही मुलगामी गरज आहे. त्यादृष्टीने पालक, शिक्षक, ग्रंथपाल सर्वांनाच महत्वाची भूमिका बजावता येईल. पालकाचाच विचार करायचा झाला तर किती घरात मुलांना वाचनासाठी उदयुक्त केलं जातं? ”अभ्यास कर!” हा मंत्र सतत मुलांच्या कानावर बिंबवला जातो. अभ्यासाव्यतिरिक्त इतर पुस्तके मुलांना घेऊन देणं हे सामान्यत: घडत नाही. याला काही सुजाण पालकांचे अपवाद असतीलही, पण सामान्यता अभ्यासाचं पुस्तक घेऊन मुलं बसली आहे. आई वडील ते कौतुकाने बघताहेत अशावेळी त्यांच्या तोंडावर समाधाना फुललेलं दिसेल. तेच मुल इतर कुठलं पुस्तक हातात घेऊन बसलेलं दिसलं की कंपाळावर सुक्ष्म आठया चढल्याच! ”काय रे काय वाचतो आहेस?” परीक्षाजवळ आली आहे ना? अभ्यास झाला का? हा प्रश्न येतोच. परीक्षा जवळ आली की मुलांनी फक्त अभ्यासाची पुस्तकं वाचायची? अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी थोडावेळ इतर वाचनात घालवणं गरजेचं असणं हे पालकांना का समजू नये?. सतत एक तंत्री काम असलं की मोठी माणसं विरंगुळा म्हणून दुसरं काही तरी शोधतातच. मुलांनाही असा विरंगुळा मिळाला तर ती जास्त ताजीतवानी होऊन तल्लख मेंदूने अभ्यास करतील.किती पालक स्वत: पुस्तकं वाचतात? घरात मोठी माणसं पुस्तक वाचन करीत असतील तर लहानपणापासून मुलाला वाचन या क्रियेचं कुतूहल निर्माण होतं. आई-वडील किंवा घरातलं मोठं माणूस पुस्तक वाचत असेल तर एखादं दोन-तीन वर्षाच मुल त्यावेळी अगदी गप्प राहून मिळेल तो कागदाचा कपटा पुढे ठेवून वाचण्याचे नाटक करतं. एका परीने ते मोठयांच अनुकरण करतं. पण त्याचबरोबर वाचण या गोष्टीत काही तरी वेगळं आहे, काहीतरी आनंददायी आहे, त्यात रंगून जाणं याला खात्रीचा काहीतरी अर्थ आहे हे त्या बालमनात नकळत रुजण, वाचनाची गोडी निर्माण होण्याची पहिली पायरी इथे सुरू होते.
खरं तर घरातली मोठी माणसं आणि मुलं एकाचवेळी शांतपणे वाचत बसली आहेत हे दृश्य टिपून ठेवण्यासारखं आहे. पण हे किती घरात घडतं? ”मुलांच्या आणि आमच्या वाचनाच्या वेळा जमत नाही”. हे कारण नेहमीचच.मुलं टिव्ही बघतात, त्यांच्यावर नको त्या कार्यक्रमांचे परिणाम होत असतात. असे म्हणणा-या पालकांनी टिव्हीला सुंदर पुस्तकांचा पर्याय मुलांना दिला आणि वाचनासाठी शांत जागा आणि वातावरण उपलब्ध करून दिलं तर टिव्हीकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. मोठया घरांमध्ये स्वतंत्र खोली देणंही शक्य असतं मात्र ती खोली त्यांच्या आवडत्या पुस्तकांनी भरलेली असायला हवी. असा प्रयोग केलेला आणि सफल झालेला आहे. ज्यांनी केला नाही त्यांनी करून पाहण्यासारखा आहे.
बाललेखिका लीलाताई भागवत यांनी मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी सांगितलेला (मराठी बालसाहित्य, प्रवाह आणि स्वरूप) प्रयोग आज दशक बदलले तरी या प्रयोगातले संदर्भ मात्र तेच लागू होतात असे वाटते. याच अनुषगांने मुलांच्या वाचनासाठी धडपड करणारे काही प्रयोग व मुलांचे वाचनाचे काही अनुभव –
नीला कचोळे एक गृहिणी. तिचा मुलगा आता इंजिनिअरींग शिकतोय. नीलाला वाचनाचा संस्कार तिच्या वडिलांकडून मिळाला. साहजिकच वाचनातील आनंद मुलालाही मिळावा, सवय लागावी म्हणून सुरूवातीला तिने मुलाला पुस्तक आणून देण्याचं काम केलं. तेव्हा रशियन जुनी पुस्तक खुल्या स्टॉलवर, गाडीवर मिळायची. रिकाम्या वेळात नीला पुस्तकं त्याच्या पुढयात टाकू लागली. स्वत: नीलाने ‘इनव्हिझीबल मॅन’ तिस-या इयत्तेत असतांना वाचलं होतं. त्याचा मराठी अनुवाद नीलाने मुलाला वाचायला दिला. पण तो काही केल्या वाचेना, पुस्तकांकडे वहेना. नीला म्हणते, “मी जाम घाबरले, अवांतर वाचन नाही म्हणजे काय? आपला मुलगा वाचनातील आनंदाला पारखा राहील या भीतीनेच नंतर मी अशा अनेक दुपार घालवल्या. मग भलेही वाचू नकोस पण पाच मिनिट पुस्तक समोर धर. तो अगदी अळमटळम करायचा. पण घेऊन बसायचा. शिवाय मी एक करायची त्याला वाचून दाखवताना इंटरेस्टिंग भाग आला की वाचन थांबवायच. एक दिवस असंच केलं असतांना मुलाने पुस्तक अक्षरश: हातातून ओढून घेतलं नी वाचायला लागला. तेव्हापासून आजपर्यंत वाचतोच आहे. टेक्निकल साईड आहे, तरी प्रचंड वाचतो. त्याला वाचनाची सवय लावतांना केलेल्या सक्तीच्या प्रयोगाचं आता हसायला येत खरं पण मनोरंजनाचा एक हक्काचा मार्ग आपल्या मुलाला दाखवला याचं समाधान वाटतं.”
भाग्यश्री केंगे, स्वत: सॉफ्टवेअर व्यावसायिक. मुलाना वाचन सवय लावताना तिने शास्त्रीय आधार घेतलाय. मुळातच भाग्यश्रीचा गर्भसंस्कारावर विश्वास आहे, पंरतू सध्या गर्भसंस्कारासाठी जी पॅकेजेस उपलब्ध आहेत, त्यापेक्षा वय वर्षे ६ पर्यंतची मेंदू विकसनाची प्रक्रिया तिला महत्वाची वाटते. मेंदूचा विकास व्हायचा असेल तर त्याला खाद्य् पुरवायला हवं. भाग्यश्रीने याबाबत एक नवखा प्रयोग केलाय. मुलं लहान असतानाच त्यांच्या खेळण्यात पुस्तकांची ओळख करून दिली. त्याचा परिणाम असा झाला की मुलगी दीड वर्षाची असल्यापासून शब्द ओळखायला लागली व नंतर मुळाक्षर शिकली. भाग्यश्री म्हणते, ” आमच्या घरची पुस्तकं कधीच आवरून ठेवण्यासाठी नसतात. चोवीस तास पुस्तकाचं कपाट उघड असतं. कदाचित तो पसारा वाटेल, पण माझ्यासाठी मुलांच्या खोलीतलं ते त्याचं अवकाश आहे. तसेच पुस्तकं जशी वाचायची असतात तशी ती जपायचीही असतात. हे मुल्य ही जाणिवपूर्वक मुलांमध्ये रूजवलयं. त्यामुळे वाचनालयाचं फाटक पुस्तक घरी आलं तरी ते दुरूस्त करून दिलं जातं. मुलां-मुलांमध्येच पुस्तकांची देवाण घेवाण होण्यासाठी पुस्तक भिशीचा प्रयोगही भाग्यश्रीने केलाय. दर महिन्याला माझ्याकडे कोणाचं पुस्तक येणार इथपासून ते त्या पुस्तकात काय आहे? कसं आहे? आवडलं इ. पर्यंत आपोआपच चर्चा मुलांमध्ये सुरू होणे. मुलांचा कल, वय, आवड, भाषा, आजूबाजूचं वातावरण बघून मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी पुस्तक निवडणं यात पालकाचं कौशल्य आहे. भाग्यश्री म्हणते, ” सहा रूपयाची पालक जुडी घेताना पालक पनीरच्या डिशसाठी सत्तर रूपये विना तक्रार मोजले जातात. पुस्तक विकत घेतांना खुपदा असंच काहीसं घडतं आणि मग अगदी सुमार रंगीत चित्र नसलेली, अनाकर्षक पुस्तकांत रमायला मुलं का कू करतात.”
पुस्तक आणि मुलांसाठीचा इलेक्ट्रॉनिक मिडीया अगदी हातात हात घालून मैत्री करू शकतात. उदा. काही पुस्तकांच्या वेबसाईट उपलब्ध आहेत. त्यावरील चित्र दाखवून मुलचं पुस्तक वाचण्याचं औत्सुक्य वाढवता येऊ शकेल. इ-बुकची ओळख करून देऊनही त्याच कार्यक्रमांच्या पुस्तकांबाबत मुलांना माहिती करून देता येईल. असे विविध प्रयोग भाग्यश्री करते. अगदीच सगळं मुल्यांवर आधारलेलं, पारंपारिक, पंचतंत्रातलं असायला हवं असा आग्रह नाही. मुलं अशातच रमायला हवी, त्या आशयातून त्याच बालविश्व समृध्द व्हायला हवं नि त्याचं पोषण व्हायला हवं एवढच!
पुलंच्या गटण्याप्रमाणे, इयत्ता दहावीतील अमोघ पुस्तक वेडा. खरं तर पुस्तक वेडा म्हटल्यावर त्याचं कौतुक वाटायला हवं. पण या कौतुकाच्या मागे पुस्तकाचा शोधलेला आधार. नोकरीनिमित्त आईपासून दुरावलेला व आजीच्या सहवासात वाढणा-या अमोघने आपोआप पुस्तकांना जवळ केलय. एकटेपणा घालविण्यासाठी अमोघ हातात पडेल ते वाचून फस्त करतो. वाचनाचं वेड, सवय, लागण्याचं कारण काही का असेना पण वाचन क्रिया व यातून मिळणारा आनंद मुलांना समजायलाच हवा. पुढे मुलांनी त्याचा उपयोग कसा करायचा ते त्यांनी स्वत: ठरवावं. पण वाचनक्रिया व त्यातील आनंदाची ओळखच झाली नाही, रूजली नाही तर सुंदर अनुभवाला मुलं वंचित राहतील हे मात्र नक्कीच!
– सुलभा शेरताटे (नाशिक)