न्यूझीलंडमधे वायकाटो विद्यापीठातील इंग्रजी भाषेशी संबंधित शाखेमधे काम करताना IELTS (International English Language Testing System) या परीक्षेशी माझा संबंध आला. परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांना न्यूझीलंडमधील विद्यापीठात प्रवेश घ्यायचा असेल तर ही परीक्षा पास होणे आवश्यक आहे. कोणत्या पदवीसाठी प्रवेश घेता त्यानुसार या परीक्षेत कोणती श्रेणी मिळणे आवश्यक आहे हेही ठरलेले आहे. बहुतांशी चिनी, त्याचबरोबर कोरियन, फिलिपिन्स वगैरे देशातील विद्यार्थी विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी या परीक्षेला बसतात. ही परीक्षा इंग्रजी भाषेशी निगडीत असून त्यासाठी इंग्रजी ऐकणे, लिहिणे, वाचणे व बोलणे अशा चार भागात ती घेतली जाते. ही मुळात ब्रिटिश लोकांनी आखलेली परीक्षा असून केंब्रिज विद्यापीठ, ब्रिटिश काउन्सिल यांच्या तर्फे जगभर ती घेतली जाते. विविध देशातील केंद्रातून – लंडन, ऑस्ट्रेलियातूनही त्याविषयीचे सगळे व्यवस्थापन केले जाते. भारतातून न्यूझीलंडमधे कायमच्या वास्तव्यासाठी येणा-यांनाही ही परीक्षा द्यावी लागत असल्यामुळे भारतातही ब्रिटिश काउन्सिलतर्फे ही परीक्षा घेण्यात येते.
परीक्षा अत्यंत काटेकोरपणे घेतली जाते व त्यासंबंधी कुठेही कोणीही काही फसवाफसवी करू नये म्हणून आटोकात दक्षता पाळण्यात येते. या परीक्षेची पर्यवेक्षक (Invigilator) म्हणून काम करताना या परीक्षेबाबत जी खबरदारी घेतली जात होती त्याचा जवळून परिचय झाला. ही माहिती जरूर जाणून घेण्याजोगी आहे. या परीक्षेला विद्यार्थ्याला जर दुस-या वेळेला बसण्याची गरज पडली तर नियमानुसार पहिल्यांदा दिलेल्या परीक्षेच्या तारखेपासून तीन महिन्याच्या आत दुस-यांदा परीक्षेला बसताच येत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही परीक्षा कोणत्याही देशातून दिलेली असली तरी परीक्षेच्या तारखेपासून ते निकालापर्यंतची त्या बाबतची सर्व माहिती संगणकाच्या सहाय्याने काही क्षणात मिळते. याबाबत खोटेपणाचा संशय आल्यास परीक्षेला बसण्याची कायमची बंदीही करता येते असा नियम आहे. एका चिनी विद्यार्थ्याने तीन महिन्याच्या आतच परीक्षेला बसण्याचा प्रयत्न केला. ही माहिती लगेच मिळाल्यामुळे त्याचे नाव रद्द करून त्याने भरलेली परीक्षेची फीसुध्दा जप्त केली गेली. हे मी स्वत: पाहिले आहे.
याखेरीज परीक्षेला बसणा-या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा नुकताच काढलेला फोटो, त्याचा पासपोर्ट, त्याची सही, फोटोतील व्यक्ती व समोरची व्यक्ती तीच आहे ना हे इतके वेळा तपासले जात होते की मी एखाद्या पोलीस डिपार्टमेंटमधे तर काम करीत नाही ना असा संशय मला आला. परीक्षेची वेळ सेकंदापर्यंत काटेकोरपणे पाळली जात होती. कॉपी करण्याची कोणतीही संधी मिळू नये म्हणून पेन, पेन्सिल व पासपोर्टखेरीज कोणतीच वस्तू परीक्षेच्या हॉलमधे न्यायला परवानगी नव्हती. परीक्षेचे पेपर घेऊन येणारी व्यक्ती परीक्षेच्या दिवशी सकाळी फक्त एक तास आधी परीक्षाकेंद्रावर हजर झाली म्हणजे चुकून पेपर फुटण्याची वगैरे काही भानगडच नको. विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्थाही फक्त अर्धा तास आधी करून त्यांचे क्रमांक त्या त्या बाकडयावर चिकटविण्यात आले. तोंडी परीक्षा घेताना परीक्षक विद्यार्थ्याला आधीपासून ओळखतो का याची कसून तपासणी करण्यात आली. काचेची तावदाने असलेल्या खोल्या वृत्तपत्रांचे कागद चिकटवून त्यातून बाहेर काही दिसणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली. तोंडी परीक्षा संपल्यानंतर तो विद्यार्थी ज्यांची तोंडी परीक्षा अजून व्हावयाची आहे अशा विद्यार्थ्यांना भेटू शकणार नाही अशी खात्री केली होती. मोबाइल फोनवरून कुणी बाहेर कुणाशीही संपर्क साधू नये म्हणून फोन परीक्षा हॉल बाहेर ठेवायला लावण्यात आले. परीक्षेच्या वेळात जर कुणाला लघवीला जायचे असेल तर विद्यार्थ्याच्या बरोबर पर्यवेक्षक जाई.
एकीकडे या व्यवस्थापनाचे कौतुक वाटत होते तर एकीकडे इतकी काय मोठी लागून गेली आहे ही परीक्षा असेही मनात आले. पण नंतर मात्र लक्षात आले की इंग्रजांना आपल्या भाषेचा किती अभिमान आहे! या परीक्षेचे महत्त्व, आणि मानमरातब त्यांनी किती वाढविला आहे. तो वाढविताना सगळया जगभर त्याचा दबदबा, शिस्त निर्माण करण्यात ब्रिटिशांना नक्कीच यश आले आहे. आणि या बाबत कौतुक वाटत असतानाच परीक्षाहॉलमधे ‘माझ्या मातृभाषेची काय स्थिती आहे’ हा विचार माझ्या मनात आल्याशिवाय राहिला नाही.
आपल्याला मातृभाषेविषयी प्रेम नाही वगैरे आरोप मला मुळीच करायचे नाहीत. तसेच ही भाषा टिकली पाहिजे, तगली पाहिजे म्हणून नुसती वर्तमानपत्रात किंवा मराठी साहित्य संमेलनात खंत व्यक्त केले की झाले असेही मला वाटत नाही. खरा प्रश्न येतो तो त्यासंबंधी काहीतरी ठोस काम करण्याचा. त्याविषयी आराखडा आखून हिकमतीने तो आराखडा प्रत्यक्षात राबविण्याचा! त्याबाबत काय करता येईल याविषयीच्या काही कल्पना मांडाव्यात म्हणून हा लेखप्रपंच!
मराठी बोलल्या जाणा-या जिल्ह्यांत मराठी वृत्तपत्रे निघतात. काही शहरातील अगदी गाजलेली वृत्तपत्रे सोडल्यास अनेक वृत्तपत्रात शुध्दलेखनाच्या इतक्या अतोनात चुका असतात की मजकूर वाचताना त्या मजकुरापेक्षा भयानक शुध्दलेखनाकडेच लक्ष जाते. साजूक तूप घातलेला गरम गरम मऊसर भात खाताना मधेच एखादा गारेचा खडा लागून जी स्थिती होते तीच ते शुध्दलेखन वाचताना होते. हे चुकीचे लेखन खेडोपाडी लोकांच्या हाती पडते. वृत्तपत्रांना त्यांच्या सामाजिक जाणीवेची, भाषिक जबाबदारीची जाणीव कधी दिली गेली आहे कां ?
अगदी साहित्यिक उच्च भाषेच्या पुस्तकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्यासारखी असते. ती सर्वसामान्यांना परवडत नाहीत हेही आपण समजावून घेऊ या. पौराणिक किंवा धार्मिक साहित्य मात्र खूपच कमी किंमतीत सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोचत असते. कहाण्यांचे पुस्तक घ्या, आरत्यांचे पुस्तक घ्या त्यातील चुकांबाबत कधी कुणाला काही खटकते कां ? आरती म्हणताना आपण नक्की काय म्हणतो आहोत याचा कधी कुणी विचार केला आहे कां?
मराठी भाषेच्या परीक्षा घेतल्या जातात. पुण्यातील मराठी साहित्य परिषदेच्या ऑफिसमधे काही कामानिमित्त जाण्याची वेळ आली. तेथील ग्रंथालय इतके कोंदट आहे की विचारायची सोय नाही. मी कोंदट जागेविषयी बोलत नसून तेथील एकूण वातावरण – कर्मचा-यांच्या वृत्तीबाबत बोलत आहे. पुस्तके ही वाचायला द्यावयाची वस्तू नसून एकूण मोजणी करून कडया कुलुपात बंदिस्त करून जपणूक करण्यासाठी आहेत असा समज होईल तिथे जाणा-याचा ! परीक्षा घेणा-यांना जर त्याविषयी काही प्रेम असेल तर ही वागणूक निश्चितच बदलेल. याविषयी कधी कुणी मोकळेपणाने चर्चा केली आहे कां ?
आपण सध्या ज्या युगात जगतो आहोत ते संगणकाचे युग आहे याविषयी आता कुणाचे दुमत नसावे. या संगणकाचा उपयोग करून आपण आपल्या मातृभाषेची कितीतरी सेवा करू शकतो. याबाबत अनेकांनी प्रयत्न केले आहेत पण ते एकांडया शिलेदारासारखे. मराठी भाषिकांनी एकत्रितपणे ते कां करू नयेत?
भारताबाहेर परदेशी रहाणा-या अनेक मराठी लोकांना आपल्या भाषेविषयी काहीतरी करावेसे वाटते. परदेशी गेल्यावर तर आपल्या भाषेचे महत्त्व कित्येकपटीने अधिक वाटते. त्या दृष्टीने इंटरनेटचे महत्त्व निर्विवाद आहे. पण या माध्यमाचा खरोखर किती उपयोग केला जातो ? मुळात कोणताही मराठी भाषिक असो त्याला कोणतीही वेबसाइट पहायची असेल तर एकदा व फक्त एकदाच व एकच फॉंट संगणकावर उतरवून घेतला की झाले असे कां करता येत नाही ? प्रत्येकाने मराठी लिहिण्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर बनवायचे. त्यापेक्षा एकच प्रमाणित असे सॉफ्टवेअर बनविले व त्याचा जगभर प्रचार केला तर? हे सोपेही नाही कां?
भारतीय लोकांच्या संगणकाबाबतच्या कौशल्याचा अमेरिकेने प्रचंड फायदा उठविला. मग याच कौशल्याचा उपयोग करून मराठीतून अगदी सहज पाठविता येईल अशी घरी बसल्या शिक्षणाची संधी का प्राप्त करून दिली जात नाही?
अगदी अलीकडच्या काळात निर्माण केला गेलेला मराठी शब्दकोष संगणकावर सहज उपलब्ध असणे ही परदेशात रहाणा-या मराठी भाषिकांची गरज आहे. तसेच सुदैवाने मराठीत आता इतक्या विविध प्रकारचे साहित्य निर्माण होते. ते जर संगणकावर उपलब्ध झाले तर मराठी भाषिक पैसे देऊन नक्कीच ते वाचतील. मात्र आख्खी पुस्तकेच्या पुस्तके चांगल्या पध्दतीने व सुलभरित्या उपलब्ध मात्र करून दिली गेली पाहिजेत.
माणसाच्या भौतिक प्रगतीबरोबर भाषाही विस्तारली जाते. पूर्वी संगणकच नव्हते तेव्हां ‘संगणक’ हा शब्द भाषेत वापरण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. पण आता मात्र संगणकाशिवाय आपले पान हलत नाही. मग त्याबाबतची विशिष्ट शब्दप्रणाली का नाही निर्माण करावयाची ? ही भौतिक प्रगती होत असताना, नवनव्या कल्पना व कार्यक्षेत्रे धुंडाळली जात असताना इंग्रजी भाषा जशी समृध्द होता गेली तशी मराठी भाषा कां नाही झाली ? आपण त्या त्या संबंधीचे नवनवे शब्द निर्माण करून ते प्रसारित करणे हे किती गरजेचे आहे !
आपले उत्तमोत्तम साहित्य विविध भाषांमध्ये अनुवादित होण्याची एक मोठी गरज आहे. त्यासाठी काही लेखकांनी नक्कीच वैयक्तीक पातळीवर प्रयत्न केले आहेत. पण मराठी साहित्य परिषदेने एखादा उपक्रम त्यासाठी राबविला आहे कां ?
भारतीय सिनेमा सृष्टीचे जनक म्हणून दादासाहेब फाळके यांचे नाव अभिमानाने घेतले जाते. त्यांनी जे इवलेसे रोपटे लावले त्याचे आता ‘बॉलीवुड’ नावाचे जंगल झाले आहे. मराठी सिनेमाच्या इतिहासामधे ‘प्रभात’ने एक सुंदर लेणे खोदले आहे. त्यानंतरही व्ही शांताराम, राजा परांजपे वगैरेंसारखे दिग्गज निर्माण झाले. आपल्या या सुंदर चित्रपटांचा खजिना जगापुढे उलगडण्यासाठी त्या चित्रफितींना इंग्रजीमधे सबटायटल देऊन त्या जगाच्या कानाकोप-यापर्यंत पोचविण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. ‘प्रभात’च्या दामल्यांनी हा प्रयोग त्यांच्या चित्रफितींपुरता नक्की केलेला आहे. पण तो पुढे नेणे गरजेचे आहे.
‘बोलकी पुस्तके’ नावाची एक संकल्पनासुध्दा फार उत्तमरित्या राबविण्यासारखी आहे. धकाधकीच्या आयुष्यात विशेषत: शहरवासीयांना पुस्तके वाचायला फुरसतच मिळत नाही. जर ही पुस्तके संक्षिप्तरित्या वाचून त्याच्या ध्वनीफिती बनवून बाजारात आणल्या तर हळुहळू त्यांना नक्की मागणी निर्माण होईल. परदेशातील मराठी माणसे तर नक्कीच हौसेने त्यावर झडप घालतील. विनोदी भाषणे, चांगल्या पुस्तकांचे वाचिक अभिनयाने परिपूर्ण वाचन करून त्याच्या ध्वनिफिती केल्यास त्यांना नक्कीच अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळेल. गो. नि. दांडेकरांच्या ‘पडघवली’ व ‘पवनाकाठचा धोंडी’ या दोन कादंब-यांचा असा संच सध्या बाजारात उपलब्ध केला गेला आहे. मराठी माणसांना त्याचे खरोखर खूप अप्रूप वाटते.
परदेशात अत्यंत समृध्द अशी ग्रंथालये असतात. तेथील नागरिकांना विनामूल्य पुस्तके घरी वाचायला मिळतात. नागरिक जो कर सरकारला देतात त्यातून ग्रंथालयांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. जी मराठी माणसे आपला देश सोडून परदेशात कायमचे वास्तव्य करायला आलेली असतात त्यांनी विनंती केल्यास त्यांच्या भाषेतील पुस्तकेही ग्रंथालयात उपलब्ध करून दिली जातात. न्यू झीलंडमधील ग्रंथालयातील कर्मचा-यांशी या बाबत मी चर्चा केली असता त्यांनी सांगितलेला अनुभव विदारक होता. ऑकलंड सिटी लायब्ररीतील लोकांनी भारतीय लोकांसाठी कोणती पुस्तके निवडायची याबाबत भारतातील एका मध्यस्थाशी संधान साधले असता मुळात त्या मध्यस्थाने पुस्तकांच्या किमती अवास्तव फुगवून सांगितल्या. त्या किंमती योग्य असतील असे मानून पुस्तकांची मागणी केली, पैसे भरले परंतु ही पुस्तके न्यूझीलंडमधे पोचलीच नाहीत ही सर्वात खेदाची गोष्ट. इतकी अनास्था अनुभवल्यावर कोणती परदेशी संस्था तुमची पुस्तके आणण्यासाठी खटपट करेल?
अनेक अंगांनी विचार केल्यास नवनवे मार्ग सापडतील. ‘केल्याने होत आहे रे’ हे सर्वांना ठाऊक आहे, पण ‘आधी केलेच पाहिजे’ यावर आता भर द्यायला हवा. यासारख्या अनेक कल्पना लोकांच्या मनात असतील. यादृष्टीने काही प्रयत्न केले जावेत ही या मागची तळमळ आहे. तुम्हाला या विषयी काय वाटते?
– कल्याणी गाडगीळ (न्यूझीलंड)