साहित्य अकादमीची मानकरी ठरलेली अपर्णा वेलणकर यांची मुलाखत
साधारण दहा वर्षांपूर्वी ‘छमीया’ नावाची एक कथा माझ्या वाचनात आली. कथा वाचून लेखिकेशी भेटण्याची उत्सुकता होतीच आणि योगायोगाने अपर्णाशी ओळख झाली. अल्पावधीत एक सृजनशील वृत्तपत्रकार ते साहित्य अकादमीची मानकरी, एका डॉक्युमेंटरीची पटकथाकार व दिग्दर्शिका हा प्रवास जाणून घेण्यासाठी मराठीवर्ल्डने अपर्णा वेलणकरांशी मारलेल्या मनमोकळया गप्पा-
अनुवादक म्हणून प्रवास
अपर्णा तिच्या अनुवादक असण्याच्या भूमिकेला छानसे समर्पक नाव देते Transcreation तिच्या मते शब्दशा अनुवाद न करता, मूळ लेखक समजावून घेऊन, वाचक आणि भाषा विचारात घेऊन स्व:निर्मिती करणे म्हणजेच Transcreation. तिने स्वत: कधी ‘अनुवादकाचा’ अभ्यासक्रम पूर्ण केलेला नाही. पण अनुवाद करतांना लेखक, वाचक आणि अनुवादक ह्या तिघांमध्ये बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करते. तिच्या ह्या प्रवासात भेटलेल्या पुस्तकाबद्दल आणि लेखकाबद्दल भरभरुन बोलते.
मला मराठी साहित्यात कायमच स्त्रीचा कमकुवतपणा अधिक जाणवला. संघर्ष किंवा प्रॉब्लेम्स हे स्त्री-पुरुष दोघांनाही असतात. महत्त्वाचं काय तर आपले स्त्री किंवा पुरुष असणं बाजूला सारुन त्यावर मात करणं ह्या पार्श्वभूमीवर शोभा डेंच ‘सिलेकटिव्ह मेमरी’ अधिक भावलं. योगायोगाने मेहता पब्लिशिंगचे सुनिल मेहता त्यांच्या मराठी अवृत्तीच्या तयारीत होते. दरम्यान ब-याच लेखकांकडून नमूनादाखल लेखन मागवण्यात आले आणि त्यातून माझी निवड झाली. पुस्तकाचा अनुवाद करतांना मला ‘page 3’ कल्चर जवळून बघायला मिळाले. शोभा डें एक व्यक्ती म्हणून मला खूप भावल्या त्यांच्याशी चांगले ‘कनेक्ट’ होता आले. ह्या उच्चभ्रू वर्गातले सगळेच लोक कचकडी किंवा बेगडी नाहीत. किंबहूना ही लोकं पैसा आणि सत्ता अधिक कौशल्याने हाताळतात. शोभा डें मूळे आपल्या मूल्यांचा बाऊ न करता, ती आपल्या रोजच्या आयुष्यात कौशल्याने कशी वापरावीत हे मला जवळून बघायला मिळाले. शोभा डेंची बाहेरच्या जगात आणि घरात अशी अतिशय दोन भिन्न व्यक्तिमत्व आहेत. आणि त्यांना त्याच्या विषयी अभिमान आहे. त्यांची आणि त्यांच्या मुलांमधली intensity खूपच जवळून अनुभवायला मिळाली आणि त्याचा उपयोग speedpost हे शोभाजींचे पुस्तक मराठीत आणतांना झाला. मी अनुवादित केलेले त्यांचे ‘Spouse’ ही प्रकाशनाच्या मार्गावर आहे. सिलेक्टिव्ह मेमरीला मिळालेली शांताबाई शेळकेंची दाद मला महत्त्वाची वाटते. शांताबाईंनी स्वत:हून गौतम राजाध्यक्षांना (प्रख्यात फोटोग्राफर) सांगितले की मराठी आवृत्ती इंग्रजीपेक्षा अधिक भावपूर्ण झाली आहे.
अरुंधती रॉय ह्याचे ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्स’ पहिल्यांदा वाचल्यावर मी त्यात अजिबात रमले नव्हते. मला नॉन-फिक्शन लिखाण अधिक भावते. मेहता पब्लिकेशन्सनी विचारल्यावर जवळ जवळ नकारच दिला होता. मग काही वरिष्ठांनी, “समजा तू नाही तर कोण ?” हे सूचवायला सांगितल्यावर मी ठामपणे हे काम हाती घ्यायचे ठरवले. ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्स’ करतांना माझ्या संयमाची परीक्षा होती एका अत्यंत वेगळया कल्चरची ओळख आणि अभ्यास मला करुन घ्यायचा होता. मी स्वत: केरळमध्ये गेलेले नाही. त्यामुळे कल्चरल संदर्भ समजावून घेण्यासाठी मी काही दिवस केरळी कुटूंबात राहिले. त्यांच्या संस्कृतीचा बारकाईने अभ्यास केला उदाहरणार्थ त्यांची ‘अवियलची भाजी’, ‘मातृसत्ताक’ पध्दती इत्यादी रोजच्या जीवनातल्या छोटया छोटया गोष्टी तपशीलवार जाणून घेतल्या हे पुस्तक अनुवादीत करतांना भाषेचा चोळामोळा करुन, तिला तोडून मला नवनिमार्तीचा आनंद गवसला. माणसं आणि भावना समजावून घेतल्यामूळे त्याचा दर्जा राखला गेला. ह्या कष्टाच चीज म्हणून की काय ‘साहित्य अकॅडेमीचा’ मानाचा पुरस्कार ‘गॉडला’ जाहीर झाला. मी पुरस्काराची अपेक्षा केली नव्हती पण आनंद निश्चितच खूप झाला.
डेबोरा एलिस हीचा ‘Bread Winner’ चा अनुवाद हा आणखी थरथराक अनुभव होता. सतत युध्दाच्या छायेत वावरणारे आणि तालिबानच्या अत्याचारांना भोगत असणा-या काबुलवासीयांचे चित्रण म्हणजे ‘द ब्रेडविनर’. स्मशानातली हाड उकरुन आपला उदर निर्वाह चालवणा-या ‘परवाना’ नावाच्या ही मुलीची गोष्ट. ह्या पुस्तकाला अमेरिकेतलं मानाचं ‘रेड मेपल अवार्ड’ नामांकन मिळालं आहे. ह्या संदर्भात डेबूराशी संवाद साधण आणि ‘रेड क्रॉसचं’ कार्य समजावून घेण मला खूप काही शिकवून गेलं आता मी Parvana’s journey आणि Mudcity ही पुस्तक मराठीत आणत आहे.
पुस्तके लिहायची घाई नाही
मी स्वत:ला लेखक न समजता पत्रकारच समजते आणि मला ते अधिक आवडतं. पत्रकार म्हणून मला नेमकं, मोजकं आणि आशयपूर्ण लिहायची सवय होती. पण पुस्तकांमुळे मी भाषेशी खेळायला शिकले. भाषेच्या मागे न जाता content वर लक्ष केंद्रित करुन भाषेला वळवायला शिकले. अनुवादक म्हणून काम करतांना मी लेखक म्हणून समृध्द होतच आहे. पण मला स्वत:च्या पुस्तकांची अजिबात घाई नाही. मला non-fiction लिहायला अधिक आवडेल. सध्या मी ६० – ७० च्या काळात अमेरीकेत गेलेल्या भारतीयांवर पुस्तक लिहीण्याच्या तयारीत आहे. आज आपण ख-या अर्थाने ग्लोबल व्हिलेजचा अनुभव घेत आहोत. कालांतराने सा-या विश्वाचे एकच कल्चर ‘ग्लोबल कल्चर’ म्हणून ओळखले जाईल. नंतर परत माणूस आपल्या मूल्यांकडे वळेल ह्याची मला खात्री आहे. हे ‘सरक्युलर डायनॅमिक्स’ समजावून घ्यायला, मनाचे कगोंरे टिपायला मला निश्चितच आवडेल. माझा इंग्रजीत लिहिण्याचा सुध्दा मानस आहे आपल्या लेखनाला आधिक विस्तारीत वाचक मिळावा ही माझी आंतरीक इच्छा आहे.
दिग्दर्शिकेच्या भूमिकेत
माझ्या मते तुमचे जर concepts clear असतील. आशय माहित असेल तर अभिव्यक्त व्हायला कुठलही माध्यम चालतं. डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे ह्यांच्या कार्यावर डॉक्युमेंटरी करण्याची संधी आली तेव्हा म्हटलं करुन पाहूया. ‘अरण्यातील प्रकाशवाटा’ डॉक्युमेंटरीची पटकथा आणि दिग्दर्शनाचा हा अनुभव निश्चितच समृध्द करणारा होता.
आवडते लेखक
विजय तेंडूलकरांचे लेखन मला कायमच प्रभावित करत आले आहे. मागच्या पिढीतले असूनही त्यांचं लेखन समकालीन वाटतं तसेच काळाच्या पुढेही वाटतं. तेंडूलकरांची पुस्तके आयुष्याच्या वेगवेगळया टप्प्यावर वाचल्यास प्रत्येकवेळी नव्याने समजतात. अनुवादकांपैकी मीना कर्णिक ह्यांचे Not without my daughter मला अधिक भावलं. त्यांच्या इतकी अनुवादनाची ताकद आपल्यात यावी असं मला मनापासून वाटतं.
समकालीन लेखकांमध्ये मिलींद बोकील ह्यांचे ‘जनांचे अनुभव’ तसेच निळू दामले ह्यांची अफगाणिस्तानवरचे लेखन खूप भावले. अरुणा ढेरे मला कवियत्री, लेखिका आणि व्यक्ती म्हणून खूप भावतात. त्यांची अभ्यास करण्याची वृत्ती तसेच एखादा विषय सामान्य लोकांना समजेल इतक्या सोप्या शब्दात मांडण्याची हातोटी थक्क करणारी आहे. आपल्या वडिलांच्या संस्काराची जाण, नम्रता त्यांना एक व्यक्ती म्हणून मोठे करतात.
गुरुंचे मार्गदर्शन
कोल्हापूरला असतांना माझ्या बारावी बोर्डाच्या परीक्षेनंतर ‘पुढारी’ वृत्तपत्रात काही कामानिमित्त गेले असतांना दत्ता सराफ ह्यांच्याशी परिचय झाला. ह्या ओळखीतून सहज म्हणून निवडणुकांसाठी त्यांनी वृत्तपत्रातून काम करायला सांगितले. तो वृत्तपत्रिकारितेचा माझ्यावर झालेला पहिला संस्कार. लवकरच चारशे रुपये दरमहा पगारावर मी अर्धवेळ काम सुरु केलं, पण प्रत्यक्ष कामाचे तास मात्र दहा-बारा असायचे. माझी कामाबद्दल कुरकूर नव्हती कारण ते काम मला आवडत होते. ह्या कामातून माझी करियरची दिशा निश्चित झाली. बोर्डात येऊन सुध्दा मी सायन्स शाखा सोडून दिली.
कमी वयात (अठराव्या वर्षी) मला उत्तम कामाच्या संधी मिळाल्या. त्यामुळे अनुभवांच गाठोड मोठं होत होतं. पण माझ्या लिखाणात सराफसरांना डामडौल अधिक जाणवायचा. शेवटी त्यांनी मला ६ महिने काहीच न लिहीण्याची सक्ती केली. कुठेही अभिव्यक्त न होता फक्त प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करणं, अनुभव घेणं हे निश्चितच माझी मॅच्युरिटी वाढविणारं होत. सहा महिन्याच्या शेवटी आपण छोटया बळावर किती मोठया उडया मारतो आहोत ह्याची जाणिव झाली. क्षणभराकरिता न लिहीता आयुष्यभर पुरेल असं लिहायचं मनानी घेतलं. सराफसरांमुळे मी भाषेच्या मागे न जाता आशयावर लक्ष द्यायला शिकले. वाचक वर्ग लक्षात घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचायला शिकले. सराफसरांच्या मते नाण इतकं खणखणीत हवं की दगडावर आपटल्यावर सुध्दा वाजलं पाहिजे. नुसती प्रतिभा असून उपयोग नाही तर त्याला शिस्तीची जोड सुध्दा असावी. माझा दिवस पहाटेच्या लिखाणाने सुरु होतो. लिखाणाचं व्यवस्थापन करुन ते पाळायला शिकले. दत्ता सराफांचा माझ्या घडण्यात आणि आताच्या यशात बहुमोल वाटा आहे.
मराठीवर्ल्ड वाचकांना संदेश
मराठीवर्ल्डचं सातत्य, नवीन देण्याची धडपड ह्याचं मला निश्चितच कौतुक वाटत. पण मला खंत ह्याची आहे की मराठीचं एक्सप्रेशन भूतकाळातल्या वैभवावर वर अवलंबून आहे. पण मग वर्तमान काळातले एक्सप्रेशन थिटे आहेत का ? सध्याच्या मराठी साहित्यात काळाच्या ओघात टिकेल असं साहित्य निर्माण झालं पाहिजे त्यातली वाढ महत्त्वाची अभिव्यक्तीचं माध्यम नाही. ह्याचा अभ्यास नविन पीढीने केला पाहिजे.
मुलाखत व शब्दांकन – सौ. भाग्यश्री केंगे
युध्दाच्या प्रासंगिक खुमखुमीनं अधून मधून उन्मत्त होणा-या आपल्या (आणि शेजारच्या) देशातल्या प्रत्येकाला परवाना भेटावी, बॉम्बगोळयांच्या भडक्यात जळून जळून वांझ झालेल्या जमिनीत सुंदर फुलांचं नाजूक रोपटं रुजवण्याचं तिचं स्वप्न आपल्यापैकी प्रत्येकाला बघता यावं, ‘शहाणपण’ नसेल, तर किमान ‘समज’ यावी – एवढं नक्की वाटतं.
मराठीवर्ल्डच्या वाचकांसाठी ‘द ब्रेडविनर’ मधला काही भाग येथे डाऊनलोड करा.