मराठीतील अग्रगण्य विनोदी लेखक, नाटककार आणि मराठी रंगभूमीशी, चित्रपटसृष्टीशी नट, संगीतकार, पटकथालेखक, दिग्दर्शक इ. नात्यांनी निगडित असलेल्या या व्यक्तीचे नाव ठाऊक नसलेला मराठी माणूस मिळणे ‘गुलबकावली’च्या फुलासारखेच दुरापास्त आहे. मुंबईच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या, पुणे आणि मुंबई येथे एम्.ए.एल्.एल्.बी. हे शिक्षण घेतलेल्या ‘पु.लं.’नी मराठी मनावर अनभिषिक्त सम्राटासारखे राज्य केले. त्यांचे आजोबा वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ‘ऋग्वेदी’ हे कवी आणि लेखक होते. त्यांच्या साहित्यप्रेमाचे, सह्रदय विनोदबुध्दीचे संस्कार पु.ल. देशपांडे यांच्यावर बालपणापासूनच झाले होते. पुढे नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर आणि महाराष्ट्रातील एक प्रसिध्द हार्मोनियमपटू दत्तोपंत राजोपाध्ये ह्यांच्या सहवासातून त्यांनी नाटय आणि संगीत या क्षेत्रात प्रवेश केला. विसाव्या वर्षी वडील वारल्यानंतर कारकून, शिक्षक,प्राध्यापक अशा नोक-या करत करत ते आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर मराठी नाटयविभाग प्रमुख व नंतर दिल्लीच्या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाचे पहिले निर्माते व आकाशवाणीवरील अखिल भारतीय नाटयविभागाचे प्रमुख निर्माते अशा जबाबदा-या स्वीकारत गेले.
‘अभिरुची’ ह्या मासिकातून १९४३ च्या सुमारास त्यांनी लेखन करावयास सुरुवात केली. लेखन, नाटक व त्यातून चित्रपटसृष्टी असे एकेक कलेचे प्रांत ते जिंकत गेले. ‘तुका म्हणे आता’ (१९४८) हे त्यांचे पहिले नाटक रंगभूमीवर अयशस्वी ठरले. परंतु त्यानंतर रशियन नाटककार निकोलाय गोगोल ह्याच्या ‘द इन्स्पेक्टर जनरल’ या नाटयकृतीचे त्यांनी केलेले ‘अंमलदार’ (१९५२) हे मराठी रूपांतर लोकप्रिय ठरले. त्यातील अंमलदाराची त्यांची भूमिकाही गाजली. त्यानंतरच्या ‘तुझे आहे तुजपाशी’ (१९५७) ह्या नाटकाने यशस्वी नाटककार म्हणून ते गणले जाऊ लागले. ’भाग्यवान’ (१९५३), ‘सुंदर मी होणार’ (१९५८), ‘ती फुलराणी’, ‘तीन पैशाचा तमाशा’ ही नाटके मूळ इंग्रजी नाटकांची मराठी रूपांतरे असली तरी कथानकाची हाताळणी, त्याला स्वाभाविक मराठी रूप देण्याच्या दृष्टीने मूळ संवादांत आणि अन्य संदर्भात केलेले मार्मिक बदल, मुळातील प्रसंगांना चढविलेला खास मराठी पेहराव ह्यातून नाटककार म्हणून त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेचा आणि शैलीचा प्रत्यय येतो. साधे, सुंदर, मार्मिक संवाद हे त्यांच्या नाटयलेखनाचे वैशिष्टय आहे. ‘सारं कसं शांत शांत’, ‘छोटे मासे मोठे मासे’, ‘विठ्ठल तो आला आला’, ‘आम्ही लटिके ना बोलू’ ह्यांसारख्या एकांकिकेतून हे प्रत्ययास येते. ‘वयम् मोठम् खोटम् ‘ व ‘नवे गोकुळ’ ही त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेली नाटके. ‘पुढारी पाहिजे’ हे त्यांनी लिहिलेले लोकनाटय अत्यंत प्रभावी ठरले. त्यात जनतेचे पुढारीपण करू इच्छिणारे विविध राजकीय पक्षांचे लोक आणि प्रत्यक्ष जनता ह्यांच्यातील दरी त्यांनी खेळकर, विनोदी पध्दतीने दाखवून दिली आहे.
‘अभिरूची’ मासिकात त्यांनी १९४४ साली ‘भय्या नागपूरकर’ नावाचे एक लहानसे व्यक्तिचित्र लिहिले. त्यानंतर त्यांनी लिहिलेली अनेक व्यक्तिचित्रे १९६२ साली ‘व्यक्ति आणि वल्ली’ ह्या नावाने प्रसिध्द झाली. मराठी समाजात मुख्यत: मध्यम वर्गीय समाजात पहावयास मिळणा-या नमुनेदार माणसांची ती जिवंत, प्रातिनिधिक चित्रे आहेत. १९६५ मध्ये या पुस्तकास साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. आपल्या आप्तांची, स्नेह्यांची तसेच विविध क्षेत्रात त्यांना भेटलेल्या नामवंतांची त्यांनी काढलेली शब्दचित्रे गणगोत (१९६६ ) व ‘गुण गाईन आवडी’ (१९७५) मध्ये आहेत. खोगीरभरती (१९४६), नस्ती उठाठेव (१९५२), बटाटयाची चाळ, गोळाबेरीज (१९६०), असा मी असा मी (१९६४) आणि हसवणूक (१९६८) हे त्यांचे विनोदी लेखांचे संग्रह.
मार्मिक, सूक्ष्म, चोखंदळ आणि प्रसन्न विनोद हे सामान्यत: त्यांच्या सा-याच लेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ठय म्हणून सांगता येईल. अभिरुची संपन्न, कलात्मक, उपहास-उपरोध, विसंगती, वक्रोक्ती, श्लेष आदींचा उपयोग ते सारख्याच कौशल्याने करीत. पण पु.लं.चे खास वैशिष्ठय म्हणजे त्यांच्या विनोदात मर्मघातक डंख नसतो, कारण मानवी जीवनातील त्रुटींप्रमाणेच त्यातील कारुण्याची त्यांच्या विनोदाला जाण आहे. त्यामुळे त्यांचे लेखन हसविता हसविता अश्रुंनाही हळुवारपणे स्पर्श करते. त्याबाबतीत चार्ली चॅप्लीनला ते गुरूस्थानी मानत.
निरनिराळया कारणांनी घडलेल्या परदेशपर्यटनाविषयी त्यांनी अपूर्वाई (१९६० ), पूर्वरंग (१९६५), जावे त्यांच्या देशा (१९७४) ह्यांसारखी प्रवासवर्णने लिहिली. लहान मुलाच्या निरागसतेने आणि कुतुहलाने नवे देश आणि तेथील नवे अनुभव घेण्याची वृत्ती यामुळे ही प्रवासवर्णने अत्यंत सजीव झाली आहेत. शांतिनिकेतनात बंगालीच्या अभ्यासासाठी जाऊन आल्यावर त्यांनी लिहिलेली ‘वंगचित्रे’ अप्रतिम आहेत.
१९६१ नंतर नोकरीपेशा कायमचा सोडून विविध प्रकारचे नाटयात्म कार्यक्रम सादर करण्याकडे ते वळले. ‘बटाटयाची चाळ’ व ‘असा मी असामी ‘ या त्यांच्या पुस्तकावर आधारित एकपात्री प्रयोग मराठी लोकांनी डोक्यावर घेतले. एकाच व्यक्तीने अनेक पात्रांच्या भूमिका वठविताना त्यांच्या श्रेष्ठ अभिनयगुणांचा प्रत्यय लोकांना आला.
त्यांच्या सामाजिक ऋणांची भावना त्यांच्या लहान मोठया कृतींतून दिसून येते. राष्ट्रीय व सांस्कृतिक उपक्रमांच्या वृध्दीसाठी त्यांनी ‘पु.ल. देशपांडे प्रतिष्ठान’ स्थापन केले (१९६५). आणि स्वकष्टाने कमावलेल्यापैकी लाखो रुपयांच्या देणग्या दिल्या. पुण्याच्या बालगंधर्व नाटयमंदिराच्या उभारणीत त्यांचा मोठा सहभाग आहे. बाबा आमटेंच्या ‘आनंदाश्रम’, अनिल अवचट व सुनंदा अवचट यांच्या सहाय्याने उभे केलेले ‘मुक्तांगण’ अशा सामाजिक कार्यासाठी त्यांनी मुक्तहस्ते पैसा पुरविला.
भारत सरकारने १९६६ मध्ये ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा गौरव केला. १९६७ मध्ये त्यांना ‘संगीत नाटक अकादमी’ चे पारितोषिक मिळाले. १९६५ च्या नांदेड येथील मराठी नाटयसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९७४ मध्ये इचलकरंजी येथे झालेल्या सुवर्ण महोत्सवी मराठी साहित्यसंमेलानाचे ते अध्यक्ष होते.
पु.लं. सारखा प्रसन्नता वाटत जाणारा, लहान मुलासारखा निरागस, बहुरंगी, बहुरूपी माणूस ‘संभवामि युगे युगे’ असतो. ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व’ म्हणून जनसामान्यांनी एकमताने निवडलेला ‘माणूस’ त्याच्या नसण्याने अंतरलेला असला तरी पुस्तके, नाटके, कॅसेटस, संगीत, मराठी भावगीतांना दिलेल्या अप्रतिम चाली यांनी मराठी मनांना दशांगुळे व्यापूनही वर उरला आहे.
पु. लं. चा एक किस्सा
सवाई गंधर्वांचा पुतळा पुण्याच्या संभाजी पार्कमध्ये बसविला. त्या कार्यक्रमानंतर काही निवडक लोकांना डॉ. नानासाहेब देशपांडे यांच्या बंगल्यावर जेवण होते. ना. ग. गोरे, भुजंगराव कुलकर्णी, पं. फिरोज दस्तूर, डॉ. गंगूबाई हनगल, पु. ल. देशपांडे वगैरे लोकांना निमंत्रण होते. जेवणाचा बेत उत्तम होता. पु. ल. देशपांडे, ना. ग. गोरे व भुजंगराव कुलकर्णी यांच्यामध्ये पानावर बसले व म्हणाले, ” नाना, तुम्ही जेवणाचा बेत फारच उत्तम केला आहे, पण आज मला जेवण जाईल की नाही याची शंका आहे “. तेव्हां नानांनी विचारले, ” का हो पी. एल ? पोट बरोबर नाही कां? ” तेव्हा पु. ल. म्हणाले, ” तसं काही नाही नाना, पण माझ्या एका बाजूला नाग व दुस-या बाजूला भुजंग असताना मला कसे जेवण जाईल ? ”
आणि प्रचंड हशा पिकला.