श्रेष्ठ मराठी लेखिका; लोकसंस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक; समाजशास्त्र, मानववंशशास्त्र व बौध्दधर्म यांच्या अभ्यासक आणि लेखन-विचार-स्वातंत्र्याच्या झुंजार पुरसकर्त्या. जन्म इंदूर येथे. शालेय शिक्षण मुंबई, नगर, नाशिक, धारवाड, पुणे येथे. १९२७ साली त्या मॅट्रिक उत्तीर्ण झाल्या. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबई येथे झाले. १९३२ मध्ये त्या पहिल्या वर्गात बी.ए. (संस्कृत व इंग्रजी) झाल्या. १९२९ साली शिक्षण स्थगित करून म. गांधीच्या राष्टीय चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. १९३५ मध्ये त्या एम्.ए. झाल्या. त्यासाठी ‘इंडियन कल्चरल हिस्टरी’ शाखेत ‘अर्ली बुध्दीस्ट ज्युरिसप्रूडन्स’ या विषयावर त्यांनी प्रबंधलेखन केले. पीएच्.डी. च्या प्रबंधासाठी ‘सिंथिसीस ऑफ हिंदू ऍड ट्रायबल कल्चर्स ऑफ सेंट्रल प्रॉव्हिन्सेस ऑफ इंडिया’ या विषयावर त्यांनी संशोधन कार्य केले; परंतु प्रबंध सादर केला नाही. त्यांच्या प्रबंधातील निवडक भाग परदेशी नियतकालिकांतून प्रसिध्द झाला होता. म. गांधी, टॉलस्टॉय, हेनरी डेव्हिड थोरो, मिल, रॉबर्ट ब्राउनिंग, राजारामशास्त्री भागवत, डॉ.केतकर ही दुर्गाबाईंची काही प्रमुख प्रेरणास्थाने होत.
गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे येथे दोन वर्षे (१९५८-६०) समाजशास्त्रविभागाच्या प्रमुखपदी त्या होत्या. तसेच साहित्य-सहकार ह्या मासिकाचे वर्षभर (१९५७) संपादनही त्यांनी केले. हे अपवाद वगळयास त्यांनी संशोधन-लेखन यांसाठी नोकरी-व्यवसायापासून मुक्तता घेतली. त्यांचा पहिला इंग्रजी ग्रंथ ‘अर्ली बुध्दीस्ट ज्युरिस्प्रूडन्स’ (१९३८) हा होय. तसेच त्यांचा पहिला मराठी ग्रंथ्र ‘राजारामशास्त्री भागवत’. व्यक्तिचित्र व वाङ्मयविवेचन (१९४७) आणि पहिला मराठी ललितग्रंथ ‘महानदीच्या तीरावर- गोंडजीवनावरील नवलिका’- (१९५६) हा होय.संशोधन वैचारिक लेखनाने दुर्गाबाईंनी लेखनास प्रारंभ केला. समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, लोकसाहित्यशास्त्र या विषयांवरील त्यांचे लेखन मुख्यत: इंग्रजीत आहे. भाषाशास्त्रावरिल ‘ए डायजेस्ट ऑफ कम्पॅरेटिव्ह फिलॉलॉजी’ (१९४०); बौध्द व जैन धर्मांच्या अभ्यासातून हाती आलेल्या प्रेमकथांच्या अन्वयार्थांवर आधारित ‘रोमान्स इन सॅकिड लोअर’ (१९४६); व आदिवासींसाठी काय काम करावे याचे मार्गदर्शन करणारी सुबोध विवेचंपर पुस्तिका ‘ए प्रायमर ऑफ ऍंथ्रॉपॉलॉजी’ ही (१९५०) मध्ये लिहिलेली पुस्तके आहेत. ‘रायडल इन इंडियन लाईफ’ ज्यात वेदकाळापासून कलगीतु-यापर्यंत कोडी आहेत व मृत्युबद्दलची विशेष प्रसिध्द आहेत. भारतीय लोकसाहित्याच्या संशोधनावर आधारित ऍन आउटलाइन ऑफ इंडियन फोकलोअर (१९५६) व रिडल इन इंडियन लाइफ, लोअर ऍड लिटरेचर (१९६६) हे त्यांचे काही इंग्रजी ग्रंथ. त्यांचे बरेसचे महत्त्वाचे लेखन लेखरूपांतही आहे. हिंदुइझम ऍड इट्स प्लेस इन द न्यू वर्ल्ड सोसायटी (१९४७) हा डॉ. केतकरांच्या समाजशास्त्रीय ग्रंथाचा दुर्गाबाईंनी केलेला अनुवाद होय.
शास्त्रीय भूमिकेतून भारतीय लोकसाहित्याचा जागतिक संदर्भात मूल्यमापनात्मक विचार करणा-या लोकसाहित्याची रुपरेखा (१९५६) या ग्रंथात दुर्गाबाईंनी सांस्कृतिक अभिसरणाची प्रक्रिया सांगून भारतीय लोकजीवनाच्या दीर्घ परंपरेतून प्रतीत होणारे सांस्कृतिक एकात्मतेचे सूत्र विशद केले. धर्म व लोकसाहित्य (१९७५) या ग्रंथामध्ये या दोहोंचे परस्परसंबंध सामाजिक मानवशास्त्राच्या द्दष्टिकोनातून पारखून घेतलेले आहेत. रवींद्रनाथांच्या लोकसाहित्य या ग्रंथाच्या अनुवादाला (१९६०) जोडलेल्या प्रस्तावनेतून ही दुर्गाबाईंची लोकसाहित्याभ्याची वस्तुनिष्ठ, शास्त्रीय भूमिका स्प्ष्ट होते. या तात्त्वि अभ्यासाला पूरक असे त्याचे कार्य भारतातील विविध प्रांतांतील लोककथांच्या मराठी अनुवादाचे आहे. शिवाय व्ही.फॉसबोल संपादित पाली जातककथांच्या आधारे त्यांनी जातककथा मराठीत आणल्या (सिध्दार्थ जातक). हेनरी डेव्हिड थोरोच्या ग्रंथाच्या ‘वॉल्डनकाठी विचारविहार’ (१९६४) व ‘चिंतनिका’ (१९६८) या अनुवादांतून तसेच ऑगस्ट डर्ले लिखित थोरोच्या चरित्र्याच्या अनुवादातून (का कॉर्डंचा क्रांतिकारक, १९६९) त्यांनी या अमेरिकन तत्त्ववेत्त्याचे जीवनकार्य व विचार मराठीत आणले. आदिमतेशी तद्रूप होऊ पहाणा-या मुक्तचिंतक थोरोशी असलेले दुर्गाबाईचें वृत्तिसाधर्म्य ‘समुद्राची देणगी’ (१९५८) या ऍन मॉरो लिडबर्गच्या एकांतप्रियतेच्या तत्त्वज्ञानाची मांडणी करणा-या ग्रंथाच्या त्यांनी केलेल्या अनुदामागचेही प्रेरक कारण असावे. राजारामशास्त्री भागवत यांच्याशीही दुर्गाबाईंचे कौटुंबिक नात्यापेक्षाही द्दढ व जवळचे असे वैचारिक नाते आहे आणि त्यातूनच विद्याव्रती राजारामशास्त्र्यांचे चरित्र व त्यांच्या साहित्याचे संपादनकार्य निष्पन्न झालेले आहे. एक ज्ञानसाधक व समाजशास्त्रज्ञ म्हणून केतकरांविषयी दुर्गाबाईना आदरयुक्त आत्मीयता व विस्तृत पटावर सामाजिक स्थितीगतीचा आलेख काढू पाहणारी, सामाजिक अवर्तनाचे भान ठेवणारी स्वतंत्र वळणाची मराठी कांदबरी निर्माण करण्यातील केतकरांच्या श्रेयाची जाण, यातून ‘केतकरी’ कादंबरी (१९६७) हा त्यांचा समीक्षात्मक ग्रंथ निष्पन्न झाला.
साने गुरुजींनी प्रेरित केल्याने दुर्गाबाई प्रथम ललितलेखनाकडे वळल्या. महानदीच्या तीरावर ही गोंडजीवनातीलची प्रेमकथा त्यांची पहिली ललितनिर्मिती. पुढे दीर्घ आजारपणातील बंदिस्त एकांतवासाने त्यांना नव्याने ललितलेखनाची प्रेरणा दिली. ‘ऋतुचक्र’ (१९५६) या मराठीतील अपूर्व पुस्तकाचे लेखन त्यातून घडले. विविध ऋतूतील निसर्गाच्या बदलत्या लावण्यविभ्रमांचे चित्रांकन करणा-या या गद्यकाव्यास ललितनिबंधातून निसर्ग व मानव यांच्यातला गूढ ऋणानुबंध प्रतीत होतो. अभिजात रसिकता, सौंदर्यासक्ती, जीवनोत्सुक आशाप्रवण वृती, तीव्र संवेदनशीलता, तत्त्वज्ञवृती काव्यात्मता तसेच शास्त्रज्ञाचे डोळस, मर्मग्राही कुतुहल यांचे अपूर्व रसायन दुर्गाबाईंच्या व्यक्तिमत्त्वात आणि अनुषंगाने त्यांच्या ललित साहित्यात प्रत्ययास येते. ‘भावमुद्रा’ (१९६०), ‘पैस’ (१९७०), ‘डूब’ (१९७५) या संग्रहांतून कसदार ललित लेखनची एक स्वतंत्र बाजू दिसून येते. त्यांच्या संशोधक, जिज्ञासू वृत्तीचा एका वेगळया प्रक्रियेतून घडलेला स्वतंत्र्य आविष्कार त्यातही आढळतो. ‘पैस’ मधल्या विविध लेखांना एकवटणारे सूत्र दुर्गाबाईना प्रतीत झालेल्या धर्मकल्पनांच्या वेधाचे आहे. त्यांचे एका व्यापक, प्रगल्भ अर्थाने धर्मपरतेकडे जाणारे मन त्यातून दिसते. विद्वत्तेचा रसार्द्र, ललित आविष्कार असे पैस म्हणजे दुर्गाबाईंच्या ललित लेखनाचा एक उत्कर्षबिंदू आहे. ‘व्यासपर्व’ (१९६२) ही त्यांची आणखी एक कसदार निर्मिती. महाभारतातील प्रमुख व्यक्तिरेखांचा व त्यांच्या जीवनाचा सर्ज्रक अन्वयार्थ लावणारे हे व्यासपर्व अलौकिकतेचा, अमांनुषतेचा मानुषतेशी दुवा जोडून एका विशाल अनुभूतीचा प्रत्यय घडवते.
परंपरेच्या संचितातून लाभलेल्या कथाबीजांतून साधलेली नवनिर्मिती ‘पूर्वा’ (१९५६) या त्यांच्या कथासंग्रहात दिसते. ‘रुपरंग’ (१९६७) मधून त्यांनी काही व्यक्तिचित्रे सादर केली आहेत, तसेच आत्मवृत्तात्मक असे स्फुटलेखन प्रासंगिकात (१९७५) व ‘लहानी’ (१९८०) मध्ये आले आहे.
लोकसाहित्याच्या व्यासंगात बुडलेल्या दुर्गाबाईंच्या लेखनात लोकसाहित्याचा जिवंत रसरशीतपणा, मोहक साधेपणा, बोलभाषेची मांडणी आढळते, तशीच व्यासंग-चिंतन-मनन यांतून आलेली गहिरेपणाची डूबही. दूर्गाबाईंच्या लेखनातील मौलिकता, अस्सल भारतीयत्त्व, सनातनत्त्वाचा वेध घेण्याची शक्ती यांमुळे ललित निंबधाच्या क्षेत्रात त्यांनी एक नवा मानदंड निर्माण केला आहे.
आणीबाणीच्या काळात दुर्गाबाईंनी लेखन-विचार स्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार केला व त्यासाठी कारावासही पत्करला. विद्वत्ता, ज्ञानसाधना, नवनिर्मिती यांचे अनुशासन नोकरशाहीच्या हाती असू नये व ख-या लोकशाहीची प्रतिमा सिध्द करण्यास विचारवंतांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. ‘मुक्ता’ (१९७७) व ‘जनतेचा सवाल’ (१९७९) ही त्यांच्या त्या काळातील भाषणलेखांची संकलने आहेत.
कराड येथे भरलेल्या एक्कावन्नाव्या (१९७५) अखिलभारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. त्यांच्या पैस (१९७१) ह्या ग्रंथास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.