श्री वामनराव प्रभुदेसाई यांच्या आयुष्यातील सुवर्णकण ‘ध्येयसाधना’
एखादे आत्मचरित्र म्हटले की त्यात त्या व्यक्तीचे कार्य, अनुभव, अडचणी व त्याला त्यांनी दिलेली टक्कर याचे उद्बोधक विवेचन असते. पण पितांबरीचे ‘बाबा’ उर्फ श्री. वामनराव प्रभुदेसाई यांचे ‘ध्येयसाधना’ पुस्तक वाचतांना ह्याच गोष्टींना संस्काराचे केवढे पाठबळ असते ह्याची जाणीव होते. आईवडील, काकाकाकु, चुलत भावाचे मामामामी, गुरुस्थानी असलेले प. पू. गोळवलकर गुरुजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एवढेच नव्हे तर संघातील गीते सुध्दा संस्कार करत गेले. छोटयाश्या गावातून आलेला विलक्षण आत्मविश्वास असलेला तरुण यशस्वी जीवनाची वाट शोधत मुंबईला येतो व नुसताच यशस्वी उद्योजक न होता समाजाचे ऋणपण फेडतो. त्यामुळे त्यांच्या जीवनचित्रात संस्कारांना किती महत्व आहे याची प्रचिती येते. संघाचे शिस्तीचे, देशप्रेमाचे संस्कार काय किंवा प्रेमळ मामीचे मायेचे संस्कार काय त्यांचे ऋण वामनरावांच्या प्रत्येक विचारात अधोरेखित झालेल्याची प्रचिती येते.
आज सर्वत्र स्वार्थ व आत्मकेंद्रीत वृत्ती बळावतांना दिसतात. अशा समाजात स्वत:साठीं कांही करावेसे न वाटता समाजाच्या सुखासाठी आनंदासाठी झटण्याचे ध्येय म्हणजेच ध्येयसाधना. ठाण्यातील एका खोलीच्या जागेपासून ते २२०० स्क्वेअर फुटांच्या मोठया घरांत ,एकत्र कुटुंबात हा जो तीस-पस्तीस वर्षांचा प्रवास आहे तो सरळ साधासोपा असणे शक्यच नाही तो खडतरच असणार. पैशांची चणचण, जागेची अडचण व संघकार्याचा ध्यास घेऊन गरिबीतून श्रीमंतीपर्यंत तेसुध्दा कुठेही ध्येयापासून विचलीत न होता केलेला यशस्वी प्रवास म्हणजेच ध्येयसाधना.
खडतर बालपण तरी पण समाधानी व त्यानंतर किशोरावस्थेत संघमय होणे हा आयुष्याला वेगळे वळण देणारा टप्पा ठरला. संघबंदी उठविण्यासाठी राष्ट्रव्यापी सत्याग्रह करावा लागला. त्या पहिल्या गटात वामनराव सामील झाले. चार महिने अत्यंत हालाकिचे दिवस कंठावे लागले. पण त्यातूनच घडला देशावर अतोनात प्रेम असलेला एक कणखर संघ कार्यकर्ता त्यावेळी विद्दयार्थीदशेतच त्यांचा निश्चय झाला की प्रथम स्वत:च्या पायावर उभे रहायचे व सर्व वेळ संघकार्याला वाहून घ्यायचे. म्हणून शिक्षण अर्धवट सोडून ते नोकरीत शिरले. तिथेही प्रचंड आत्मविश्वास घेऊनच. १७ वर्षाच्या सरकारी दुधयोजना, रेल्वे अशा नोकऱ्यांमधे स्वत:चा वेगळा ठसा त्यांनी उमटवला. युनियन लिडर म्हणून कामगारांच्या हिताचे उपक्रम राबवले व रेल्वेच्या इतिहासात कधी न घडलेली गोष्ट म्हणजे, इथे कामगार वर्गणी देण्यासाठी रांगा लावून उभे आहेत असा दिल्लीला रिपोर्ट गेला. इथे वाटचाल चालू असतांना मनात व्यवसायाची ओढ त्यांना गप्प बसू देईना. याला कारण त्यांच्या वडिलांची तशी इच्छा होती. त्याचबरोबर शालेय जीवनात टिळक, अगरकर यांच्या लेखनानी केलेले संस्कार. ज्यात परखड विचार असत की इंग्रजी सरकारची नोकरी न करता त्रास झाला, कष्ट पडले तरी उद्योगधंदा करून स्वतंत्र राहण्याचा संदेश. उपदेश हे नेते करत त्यातूनच स्वायत्ततेचे,स्वदेशीचे संस्कार घडून ते व्यवसायाकडे वळले. हा प्रवाससुध्दा रिक्षा व्यवसाय, परिवहन व्यवसाय स्वत:च असा वेगळेपणा दाखवतच झाला. त्यातूनच पितांबरी या घरगुती साधनांच्या उत्पादनाचा व्यवसाय जन्मला. ते इवलेसे रोप आज वृक्षरुपात उभे आहे. त्यात त्यांच्या सुपुत्राने अधुनिक तंत्रज्ञानाची भर घातली व त्यालाही वामनरावांनी प्रोत्साहन दिले.
थोडे दिवस पितांबरीच्या मार्केटिंगची जबाबदारी उचलली. आज व्यवसायाची पूर्ण जबाबदारी पुढील पिढीच्या सुपूर्द करुन कृतार्थ जीवन जगत आहेत. ठाणे जनता ब केचा आजचा व्याप व विस्तार यामागे त्यांनी सर्वार्थाने स्वत:ला वाहून घेतलेले आहे. फाउंडरमेंबर ते अध्यक्षपद असा तो प्रवास होता. त्यातही ब केची प्रगती व त्यासाठी झटणारे मनुष्यबळ उभे करणे व तशा त्यांची मानसिकता तयार करणे हा फार मोठा यशाचा वाटा त्यांच्याच पदरी जातो. केशवसृष्टी अध्यक्षपदावर असतांना विहीरी उपसून स्वच्छ करण्यापासूनवन औषधींच्या लागवडीपर्यंत,मैदान, कार्यालय, पंचकर्म केंद्र,ते कर्मचा-यांच्या निवाससी सोयीपर्यंत सर्व कामे पूर्णत्वाला नेली. आजही वयाच्या ७५ व्या वर्षीसुध्दा मेंबर म्हणून कार्यरत आहेत. भिवंडीजवळील अनगांव येथील त्यांच्या गोशाळेचे बीज त्यांच्या सरकारी दुध योजनेच्या नोकरीत पेरले गेले असावे. आज इथे १०० गाई व ६०० जनावरे आहेत. याला जोडूनच त्यांचा गोमय व गोनिम हा प्रकल्प उभे आहेत.
आपल्यावर झालेल्या संस्कारातून स्वत:ला घडवणे व दुस-यालाही घडवणारी वामनरावांची ध्येयसाधना युवा पिढीला आदर्शवत् आहे. उद्योग जगतात वावरणा-यांनी हताश निराश न होता पुढे कसे चालत राहीले पाहिजे ही शिकवण नक्कीच घ्यावी. नोकरीचीच वाट पहात नैराश्यमय जीवन जगणा-या आजच्या तरूण पिढीनी उद्योगांकडे वळण्याची प्रेरणा घेतल्यास आत्मचरित्र लिहीण्याचा वामनरावांचा उद्देश सफल होइल यांत शंकाच नाही. सुश्रेय प्रकाशनचे सौ. श्वेता गानु लिखित हे चरित्र विषयांची वर्गवारी करतांना व आयुष्यातले टप्पे दाखवतांना कुठेही धागा तुटल्यासारखे वाटत नाही. ओघवती सुटसुटीत वाक्ये, उत्कंठा वाढविणारी जीवनपटाची रचना यामुळे हे पुस्तक वाचनीय झाले आहे.
पुस्तक – ध्येयसाधना
लेखक – सौ. श्वेता गानु
प्रकाशक – सुश्रेय
खूप वर्षापूर्वीच्या एका सिनेमात आई आपल्या बाळाला ‘रडू नको रे चिमण्या, बाळा हसण्यासाठी जन्म आपूला’ सांगत असते. तेच नव्याने सांगण्याची वेळ आली आहे. खरं पहाता अगदी लहान मूल दिवसात स्वत:शीच ३०० ते ४०० वेळा हसत असतं. आनंदी रहाणं हा त्याचा स्वभावधर्म असतो. मूल मोठ होऊन जसजसा जगाचा अनुभव घेऊ लागतं. तसतसं गांभीर्य, स्वयंनियंत्रण, जबाबदारी,भीती असुरक्षितता यांच्या दडपणाखाली त्याचं हास्य आटू लागतं. नेहमीच्या जीवनातले ताणतणाव, चिंता यांनी तो हसायचं विसरतो.
खरं म्हणजे सजीवसृष्टीत केवळ माणसालाच हसता येतं पण तरीही प्रौढ झालेला माणूस ताणताणावापायी हसण्यापासून दूर रहातो. परिणामी अनेक रोग त्याला घेरु लागतात. त्यापासून दूर रहाण्याचा उपाय म्हणजे खळखळून हसणं. पण एखादा माणूस स्वत:शीच हसतोय असं दृश्य कोणी पाहिलं तर ते त्याला वेडा म्हणतील त्याला खरोखरचं वेड लागू नये असं वाटत असेल तर त्यानं हसलं पाहिजे. मुंबईचे डॉ. मदन कटारिया यांना laughing club ‘हास्यक्लब’ सुरु करण्याची कल्पना सात वर्षापूर्वी सुचली चार लोक एकत्र जमून मनाचा हिय्या करुन सार्वजनिक जागेत एकत्र हसू लागले. सुरवातीला हसण्यासाठी विनोदाचा आसरा म्हणून जोक्स सांगून ते हसवू लागले. पण तेच ते विनोद कंटाळवाणे होऊ लागल्याने कृत्रिमरीत्या हसण्याचा उपक्रम त्यांनी सुरु केला. तुम्ही कृत्रिमरित्या हसलात तरी शरीरपातळीवर त्याचे सुपरिणाम नैसर्गिक हास्यासारखेच होतात हे ही त्यांच्या लक्षात आले. हसण्यामुळे रोगनिवारक यंत्रणेत सुधारणा होते. वाढीव रक्तदाब नियंत्रणात येतो. खेळाडूंचा स्टॅमिना वाढतो. रोजच्या रोज सकाळी अर्धातास एकत्र येऊन एकमेकांकडे पहात गंमतीदार चेहेरे करीत वेगवेगळे हास्यप्रकार केले की दिवसभर प्रसन्न राहायला मदत होते हे ही त्यांना जाणवले. आणखी हास्यक्लब सुरु झाले. गावोगावी पसरले. त्यातून इंटरनॅशनल लाफ्टर क्लब काढण्याची कल्पना स्फुरली. हास्यभावनेतून जगाचा नागरीक निर्माण होऊ शकतो या जाणिवेतून जागतिक शांततेसाठी हा उपक्रम पसरवण्याचा प्रयत्न सुरु झाला.
हास्यामुळे होणारे शारीरिक आणि मानसिक फायदे हास्यक्लबची रचना, दैनंदिन कार्यक्रम, यांची माहिती देण्यासाठी डॉ. कटारिया यांनी Laugh for no Reason हे पुस्तक प्रसिध्द केले. ही चळवळ देशभरात पसरवायची म्हणजे हा संदेश प्रादेशिक भाषांमध्ये पोहचवला पाहिजे. त्याची सुरवात मराठी पासून झाली. या पुस्तकाचा मराठी अनुवाद नाशिकचे श्री. दिगंबर गाडगीळ यांनी ‘हसता हसता आरोग्य’ या शीषर्काने तयार केला. मराठी माणूस, त्यातूनही सुशिक्षित मराठी माणूस खळाळून हसताना दिसत नाही जणू ‘चिंता करितो विश्वाची’ असे ओझे त्याच्या शिरावर असावे, असा तो वागतो. मुंबईत जागतिक हास्य क्लब चळवळीचा उदय झाला. तिथे अमराठी लोकच अधिक उत्साहातं, पुढाकारानं भाग घेताना दिसतात. मराठी माणसानं आपल्या कोषातुन बाहेर पडावं, हसून खेळून जगाशी व्यवहार करावा. जीवनाशी संघर्ष करावा या हेतुनं या पुस्तकाचा अनुवाद केल्याचे गाडगीळ आपल्या प्रस्तावनेत म्हणतात. त्यांचा उद्देश सफल होवो.
आपल्या भागात हास्यक्लब सुरु करण्यासाठी काय करावे व सुरु केलेला हास्यक्लब पध्दतशीतपणे कसा चालवावा, गावपातळी पासून देशपातळीपर्यंत नव्हे जागतिक पातळीपर्यंत हे जाळे कसे मजबूत करावे याबद्दलचे मार्गदर्शन पुस्तकात आहे. पुस्तकात सुमारे २५ पाने प्रकाशचित्रांनी व्यापलेली आहेत. त्यातून विविध गंमतीदार हास्यप्रकारांचे दर्शन तर घडतेच त्याचबरोबर ही चळवळ जागतिक पातळीवर कशी पसरु लागली आहे हे ही लक्षात येते.
एकंदर हास्यक्लब चळवळीकडे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने हे पुस्तक उपयुक्त झालेले आहे.
पुस्तक – हसता हसता आरोग्य
लेखक – डॉ. मदन कटारिया, मुंबई.
अनुवाद – श्री. दिगंबर गाडगीळ, नाशिक.
प्रकशक – मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
किंमत – रु. ९० रुपये
टिप : ग्राहकांना कुरियरचा खर्च वेगळा द्यावा लागेल.