सामर्थ्य ह्यात आहे. कवितेत प्रेम, वात्सल्य, भक्ती, स्फूर्ती, राग, द्वेष, लोभ, मत्सर अशा नानाविध भावभावनांचा अविष्कार होत असतो आणि कवि हे अतिशय सहजतेने साकारतो.
रुसलेल्या ढगांनी
एकदा मला सांगितलं
मला बरसायचंय
पण….. वारं नाही म्हणतंय.
मी म्हटल-
तुझ्यासारखीच माझी अवस्था,
मलाही हसायचंय
पण… मन नाही म्हणतंय.
मग,
मन मला म्हणालं
माझी काहीच अडचण नाही
बहुतेक तुझं नि त्याचं
प्रेम अपुरं पडतयं.
सर्व समावेशक अशा या संग्रहात कवी प्रेम या विषयात जास्तच रंगून गेलेले दिसतात. प्रतीक्षा, हूरहूर, अगतिकता, मिलन, भावविभोर आणि मार्मिकतेची किनार असलेलं दर्शन कवितेवर प्रेम करणाऱ्यांना या संग्रहात घडेल यात शंकाच नाही.
तू येतेसच कशाला
जर गप्प रहायचं असतं,
मन सैरभैर होतं,
आकाशाकडे टक लावतं.
झुळकेबरोबर अलगद
तुझ्या मनात डोकावतं,
आणि वादळ होऊन बाहेर पडतं.
तू येतेसच कशाला, जर गप्प रहायचं असतं
मला आवडेल
तुला सावरायला
जेव्हा तू दु:खी असशील,
मला आवडेल
तुझी समजूत घालायला
जेव्हा तू रागावशील.
मला आवडेल
तुला धरायला जिथे खाचखळगे असतील
मला आवडेल
गप्प रहायला
जेव्हा तू बोलशील
मला आवडेल
तुला जवळ घ्यायला
जेव्हा तू रडशील
मला आवडेल
तुझ्यावर प्रेम करायला
जेव्हा तू माझी होशील.
जड-अवघड. शब्दबंबाळ भाषा यापासून दूर राहून सहज, सोप्या, खुसखुशीत भाषेनं सजलेल्या या काव्यसंग्रहाला आणि कविला हार्दिक शुभेच्छा
कित्येक वर्षांनी भेटूनही
आपलं प्रेंम संपलेलं नव्हतं,
आयुष्याच्या मध्यांन्हाच्या उंबरठयावरही
आपलं तारुण्य सुकलेलं नव्हतं
मग, नेहमीप्रमाणेच
आपण पहिल्यांदा गप्पच होतो.
इतक्या वर्षांनी भेटूनही
काय बोलावं कळत नव्हतं.
नंतर बोलायला सुरुवात झाल्यावर
वेळेचं भानच हरपून गेलो.
त्या तारुण्याच्या स्वप्नात
डोळे मिटून वाहवत गेलो.
पण, संसारीक स्त्री सारखाच
तुझा हात अनाहूतपणे मंगळसुत्राकडे गेला.
तेव्हा मात्र मला
माझा वर्तमान आठवला.
– प्रमोद रानडे
पुस्तक – ओथंबलेले मुकेपण
लेखक – निलेश घोडके
प्रकाशक – सुविद्या प्रकाशन पुणे
किंमत – रु.४०/-
टिप – ग्राहकांना कुरियरचा खर्च वेगळा द्यावा लागेल.