ओटस्, सोयाबीन, जवस, नाचणी, कुळीथ ही धान्ये वापरून केलेल्या रूचकर, आरोग्यदायी पाककृती.
मुलांना बाहेरच्या पदार्थांचे मोठे आकर्षण असते. बाहेरचे खायला द्यायला नको म्हणून जागरूक आया त्यासाठी पिझ्झा, केक्स वगैरे शिकून घेतात आणि घरच्या घरी बनवतात. परंतु मैद्यासारख्या घटकांचा वापर केल्याने त्यांचा हेतू पूर्णपणे साध्य होत नाही. या पार्श्वभूमीवर मी जवस, नाचणी, ओटस् इत्यादी पदार्थ वापरून पांरपारिक तसेच आधुनिक खाद्यपदार्थ कसे तयार करता येतील याचा गेले काही वर्ष अभ्यास केला. पौष्टिक अन्नाबरोबरच कमी उष्मांकाच्या पाककृतीही तयार केल्या आहेत.
या पुस्तिकेत पिटा ब्रेड, पिझ्झा या मुलांना आवडणा-या पदार्थांच्या सोयाबीन व ओटस् घालून पाककृती दिल्या आहेत. तसेच चॉकलेट, मिठाई, नानकटाई हे पदार्थ जवस, नाचणी, व ओटस् वापरून करता येतात. ह्या पाककृती सोप्यादेखील आहेत.
जागरूक पालकांना, विशेषत: आयांना डबा, नाश्त्यासाठी नवीन पदार्थ- टोफू, पराठा, ओटस् इडली, पौष्टिक चिक्की बार, रिच ऑम्लेट, विविध प्रकारचे डोसे, घावन, हांडवो, पुडिंग अशा पाककृतीही निश्चितच आवडतील. खवैय्यांना आवडणा-या पण तरीही डायटबद्दल जागरुक असणा-यांसाठी नाचणी मोमोज, नाचणी इडली, हांडवो, अगदी किंचित तुपाचा वापर करून केलेला ओटस् चा राजस्थानी पध्दतीचा चुरमा, मॅंगलोरियन पध्दतीची कुळिथाची इडली, सार, कॅदेल (शेट्टी पध्दतीचे सांबार) या पाककृती पुस्तिकेत दिल्या आहेत.
याशिवाय जवसाची मिठाई, सालसा, गोवन पध्दतीचा दोदोल (दुधळी), खानदेशातील मुटकुळे, शेंगोळे, कर्नाटकातील प्रसिध्द मुड्डे, कुळीथ-वांगी बिर्याणी, बेसनाचे पीठ न वापरता केलेला सोयाबीनचा खमण अशा पदार्थांच्या पाककृती दिल्या आहेत. तसेच कॉन्टिनेंटल पध्दतीचे ब्रोकोली-मशरूम-टोफू मॅजिक, ओटस्-खजूर सरप्राईज, पॅनकेक्स, थाई नूडल्स याही पाककृती यात समाविष्ट आहेत.
मधुमेही किंवा डायट-साशंक लोकांना ज्यांना कमीत कमी साखर खावी लागते अशासाठीही जवस-खजूर लाडू, ओटस्-शेवई इडली, जवस वापरून केलेले सॅलड, गुणकारी कोशिंबीर, आवाकाडू-जवस पराठा या पाककृती दिल्या आहेत. गरोदर तसेच बाळंतिणीसाठी काही लाडू, लापशी, मुड्डे, खिरी, जवस-ओवा भात उपयुक्त ठरू शकतील. प्रवासात न्यायला सोपे असे खजूर-जवस पोळी, खोया खाकरा, नाचणीसत्व बिस्किटे हेही सगळयांना आवडतील.
या सर्वच पाककृती कमी तेलात, वाफवून किंवा बेक करून, भाजून या प्रकारच्या असल्याने नेहमीच करून खाता येतील अश्याआहेत. शिवाय हे पदार्थ कुठल्याही हॉटेलमध्ये मिळणार नाहीत. त्यामुळे या हटके, रूचकर आणि आरोग्यवर्धक पाककृती लहानथोरांना नक्कीच आवडतील.
पुस्तक खरेदीसाठी आणि वितरणांसाठी संपर्क –
– वैशाली विनय हिंगे
vaishalihinge@gmail.com
‘सृजन@broad’ हे आहे नुकत्याच प्रकाशित झालेल्या कवितांच्या पुस्तकाचे आगळेवेगळे नाव. या कविता म्हणजे विविध खंडातील अनेकविध देशांमध्ये स्थायिक झालेल्या मराठी भाषिकांच्या भावना आणि अनुभवांचे कलात्मक सृजन होय.
या पुस्तकाची मूळ संकल्पना डॉ. भूषण केळकर यांची. ‘स्वदेश-आम्ही मराठी NRI’ हे त्यांचे सध्या अत्यंत गाजत असलेले पुस्तक. केळकरांनी जगभर विखुरलेल्या मराठी भाषिकांना कविता पाठविण्याचे आव्हान केले. जगभरातून आलेल्या ३०० कवितां मधून ७५ सर्वोत्कृष्ट कवितांची निवड करण्याचे काम प्रख्यात कवयित्री डॉ. अरूणा ढेरे व तरूणाईच्या गळयातील ताईत कवी श्री. संदीप खरे यांनी केले. या काव्यसंग्रहात निवडलेल्या १५ देशातील ५५ कवी-कवयित्रींच्या असून त्यातील विषयांमध्ये विविधता असूनही सर्व कवितांना ‘मराठीचा वास’ आहे. हा काव्यसंग्रह काँटिनेन्टल प्रकाशन ने १२ एप्रिल २००८ रोजी सुप्रसिध्द कवि श्री. सुधीर मोघे यांच्या शुभहस्ते पुण्यात प्रकशित केला.
या पुस्तकाचे आणखी वैशिष्टय म्हणजे हे पुस्तक ‘बहुमाध्यमी’ आहे. छापील पुस्तकाबरोबरच निवडक कवितांची सी.डी. या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेली आहे. या सी.डी. मध्ये कवितांचे अभिवाचन केले आहे डॉ. अरुणा ढेरे व श्री. संदीप खरे यांनी. या दृष्टीने हे बहुमाध्यमी कवितांचे पुस्तक आत्ता तरी मराठी भाषेत ‘एकमेव’ आहे. या सीडीला कार्पोरेट स्पॉन्सरशिप दिली आहे बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य व्यावसायिक ‘परांजपे स्कीम्स’च्या श्री. शंशाक परांजपे व श्री. हेमंत छत्रे यांनी.
यातील कवितांच्या विषयामध्ये विविधता आहे. निसर्ग, प्रेम या कवितांच्या हुकुमी विषयांबरोबरच दूरदेशी राहून मायदेशाची वारंवार येणारी आठवण, घरच्या मायेची ओढ, ग्लोबलायझेशनचे चांगले वाईट परिणाम, परदेशात राहिल्यामुळे मराठी भाषेतील बारकावे टिपतांना मुलांची होणारी गंमत असे अनेकविध विषय या कवितांमधून अनुभवता येतात. सर्व कविता मराठीत असल्यातरी अहिराणी भाषेतली कविता, कॉम्प्यूटर क्षेत्रातले तसेच जेनेटेक इंजिनिअरींग मधले इग्रंजी शब्द वापरून केलेले मराठी अशी ‘भाषांतर्गत’ विविधताही या कवितांमध्ये आढळते. मुक्तछंद, फटका, ओवी यांसारख्या विविध छंदातल्या कविता, तसेच विशिष्ट ठेका धरून म्हणता येण्याजोग्या कविता असे या पुस्तकाचे अंतरंग बहुरंगी, बहुढंगी आहे.
कवितेच्या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशनाच्या तारखेपासून महिन्याच्या आत संपल्यामुळे दुसरी आवृत्ती लगेच काढायला लागणे हे या पुस्तकाचे विक्रमी यश म्हटले पाहिजे.
पुस्तकाची किंमत १२५ रूपये असून प्रकाशकांचा पत्ता खाली दिलेला आहे.
पुस्तक – सृजन@broad
पुस्तक परिचय – देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर
प्रकाशक – काँटिनेन्टल प्रकाशन, पुणे
फोन क्रमांक – २४३३७९८२
bhooshankelkar@hotmail.com