टीव्ही आणि इतरही माध्यमांमधून लैंगिकतेचा मारा सुरू असतो. जे दाखवलं जातं ते अतिशय बटबटीत, अवास्तव, अतिरंजित व हिंसक स्वरूपाचं असतं. तरूण तरूणीच नाही तर लहान मुलांच्याही हे विकृत स्वरूपात सामोरं येतंय. त्यामुळे अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल अतिशय चुकीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचते.
ह्यामुळेच मुलांना लैंगिकता शिक्षण देणं हे पालकांसाठी अपरिहार्य असतं. मुद्दामहून दिलं नाही तरी आपल्या जगण्यावाचण्यातून आपण अनेक गोष्टी मुलांपर्यंत पोहचवत असतो. त्यातून काही शिक्षण आपोआपच होतं. त्यामुळे प्रत्यक्ष शिक्षण देण्याची जबाबदारी जरी तज्ञांवर टाकली तरी आपल्या दृष्टीकोनातून, बोलण्यातून आपण योग्य गोष्टीच पोहचवाव्यात यासाठी विचार व्हायला हवा. योग्य काळजी घेण्यासाठी काही गोष्टी माहीत असायलाच हव्यात त्यासाठी ‘काय सांगू, कसं सांगू’ हे डॉ. शांता साठे व डॉ. अनंत साठे यांनी लिहिलेले पुस्तक अतिशय उपयुक्त तर आहेच पण निरतिशय आवश्यक आहे.
साठे दापंत्य गेली पंचवीसहून अधिक वर्षे लैंगिकता शिक्षणाच्या क्षेत्रात काम करत आहेत. भारतीय कुटूंब नियोजन संस्थेच्या पुणे शाखेतर्फे १९७७ सालापासून ठिकठिकाणी कार्यशाळा घेऊन ते प्रबोधनाचं काम करत आहेत. त्यावेळी पालक-मुलांशी बोलतांना त्यांना असा अनुभव आला की मुळात पालकांच्याच मनात लैंगिकतेबद्दल अनेक गैरसमज आहेत. त्यांनी या संकल्पनेचा खोलवर जाऊन विचार केलेला नाही. याविषया पुरेशी माहिती, मूलभूत शास्त्रीय माहितीही ब-याच जणांना नाहीये. दुसरं म्हणजे संकोच आडवा येतो. ही कोंडी फोडायची निकड आहे. डॉ. साठे पतीपत्नींनी खास आईबाबांसाठी पुस्तक लिहून हे अतिशय महत्त्वाचं काम केलं आहे.
मुलग्यानाही मासिक पाळीविषयी माहिती असणं अधिक चांगलं, त्यामुळे त्यांची मुलींकडे बघण्याची दृष्टी बदलते. आईशी, बहिणीशी, पुढे जाऊन पत्नीशी त्याकाळात ते समजूतदारपणे वागतात. लैंगिकता हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग, पण ती भावना जीवनाला ग्रासून टाकणारी न होता ते संपन्न बनवणारी व्हायला हवी. त्यासाठी किशोरवयीनांही बोलतांना त्यातले धोके आणि जबाबदा-यांबरोबरच त्यातलं सौंदर्य, माधुर्य, हळूवारपणा आणि पारस्परिक आनंद (mutal) हेही उलगडून दाखवायला हवं. आणि त्यासाठी निव्वळ नरमादीपणापलीकडे जाऊन स्वत:ची स्त्री-पुरूष म्हणून ओळख व्हायला हवी. स्वत: इतकाच दुस-याचा आदर करणं, आत्मसन्मानाइतकाच दुस-याचा सन्मान जपण्याची तयारी हवी.
आजची समाजाची स्थिती बदलेली आहे. स्त्रीपुरूष एकमेकांच्या संपर्कात, सहवासात येण्याचं प्रमाण वाढलं आहे. लग्नं उशिरा होतात, संततिनियमनाची साधनं सहज उपलब्ध आहेत. त्यात आणखी आपणच मुलांना माहिती दिली तर ती प्रयोग करून पाहतील अशी पालकांना भीती वाटते. पण केवळ अज्ञानापोटी घडणा-या चुकीच्या, धोकादायक वर्तनाचं प्रमाण काळजी करण्याइतकं मोठं आहे. अशा परिस्थितीत आपण मुलांशी लैंगिकतेबद्दल बोलायचं टाळतो याचाच अर्थ त्यांना त्यासंबंधात मार्गदर्शन करायचं राहून जातं. ज्याची आज सर्वाधिक गरज आहे!
लैगिकतेविषयी मुलं आणि पालक दोघांच्या मानसिकतेचा, शंका, गैरसमजुती, अज्ञान, त्यांच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा या सगळयाचा अतिशय बारकाव्यानं, सहज सोप्या भाषेत समतोलपणे आणि साकल्यानं विचार केला आहे. हे पुस्तक वाचताना ठळकपणे जाणवतं. शिवाय सांगण्याची पध्दत ‘आम्ही सांगतो- तुम्ही ऐका’ अशी नाही तर ‘आपण बोलू या’ अशी सहज संवाद साधणारी आहे. असं हे पुस्तक ‘आजच्या’ पालकांना त्यांच्या वाटचालीत नक्कीच मार्गदर्शक ठरेल. फक्त आईनेच नव्हे तर बाबांनीही हे आवर्जून वाचाव.
पुस्तक – काय सांगू ? कसं सांगू ? खास आईबाबांसाठी
पुस्तक परिचय – प्रीती केतकर
प्रकाशक – राजहंस प्रकाशन
किंमत – रु. ८०/-