ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके ह्यांना मांजरी फार आवडत. त्यावरचे त्यांचे ’मांजराचा गाव’ पुस्तक मागच्या पिढीने वाचलेही असेल. आजच्या पिढीला वाचनाकडे वळवायचे तर लेखनाबरोबरच पुस्तकाचे सादरीकरणही तितकेच दमदार हवे. प्रथम बूक्स प्रकाशनाने बाजारात नुकतेच आणलेले ’मनी माऊ’ हे पुस्तक दोन्हीची पूर्तता करते. चित्रकार ऋजुता घाटे ह्यांचे लेखन आणि चित्रांकन हे तीन ते सहा वयोगटासाठी योग्य आहे. नुकतेच पुस्तक हाताळायला लागलेल्या चिमुरडयांसाठी मांजरीची रंगीत चित्रे आणि त्यांचे हावभाव हे चांगले बौध्दीक खाद्य आहे. पुस्तकाचे प्रत्येक पान वेगळ्या रंगात आहे. लेखिकेने प्राथमिक वाचकांचा विचार करुन अंक आणि ’ऊ’ च्या आकाराचे यमक चांगले जुळवले आहे. माऊ, खाऊ, पिऊ, जाऊ, येऊ, भिऊ, चाऊ, काऊ, चिऊ, घेऊ, धाऊ, च्याऊ म्याऊ असे छोटयांच्या भावविश्वातले शब्द अधिक समर्पकपणे वापरले आहेत. थोडक्यात छानशी बालकविता लेखिकेने गद्यात चित्ररुपाने मांडली आहे. आई-बाबांनी हे पुस्तक ३-६ वयोगट असणा-या मुलांना जरुर वाचायला द्यावे.
– भाग्यश्री केंगे
पुस्तक – ‘मनी माऊ’
लेखक – ऋजुता घाटे
अगदी अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने १२ ते १९ वर्षे वयोगटातल्या मुलांच्या आरोग्याची जबाबदारी बालरोगतज्ज्ञांकडे सोपविली आहे. तोपर्यंत या वयातल्या तरूण मुलांची अवस्था ‘न घरका न घाटका’ अशीच होती. प्रौढपणी होणा-या आजारांची बीजे, तरूणपणी लागलेल्या घातक सवयी, व्यसने यातच रूजलेली असतात. तरूणपणी योग्य मार्गदर्शन, सल्ले, माहिती न मिळाल्याने आणि मानसिक ताणतणाव व त्यांचे गैरव्यवस्थापन झाल्यामुळे या गोष्टींची सुरूवात अजाणतेपणी होते हे लक्षात आले आहे. हे आजार झाल्यावर उपाययोजना करून डागडुजी करीत राहण्यापेक्षा ते होऊच नयेत यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. असा संकल्प जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे.
आता भारतातल्या एकूण लोकसंख्येच्या निम्म्याने २० वर्षाखालील मुलांची संख्या आहे. आजची १२ ते १९ वयातील मुले अजून २० ते २५ वर्षांनी भारताचे कर्ते नागरिक बनणार आहेत. त्यांच्या निरोगी शरीरांची आणि सुदृढ मनांची बांधणी आताच व्हायला हवी.
या धोरणाच्या पार्श्वभूमीवर पंचवीस वर्षापूर्वीच डॉ. साठे दांपत्याने या विषयाची निकड लक्षात घेऊन वयात येणा-या मुलांच्या लैगिक शिक्षण आणि त्यानुषंगिक कौटुंबिक जीवन यावर काम करण्यास सुरूवात केली, हे निश्चितच प्रशंसनीय आहे. इतकेच नव्हे तर गौरवप्राप्त आहे.
त्यांच्या पंचवीस वर्षांच्या शिकविण्याचा आणि हे काम करताना समृध्द होत गेलेल्या अनुभवाचा परिपाक म्हणजे हे पुस्तक आहे. मुलांशी बोलायला अवघड अशा विषयावर त्यांनी सखोलस्पर्शी, पण समजेल असे लिखाण केले आहे. वयात येतांनाची लैंगिक वाढ, बदल, त्यांचे प्रयोजन, समज-गैरसमज, युवक-युवती, जोडीदाराची निवड, विवाह, लैंगिक जीवन या गोष्टींबरोबरच आपले इतर शारीरिक व मानसिक आरोग्य कसे राखावे, हेही जबाबदारीने, आपुलकीने आणि वडीलकीने लिहिले आहे. लैंगिक स्वैराचारातून उदभवू शकणा-या आजारांबद्दल विशेषत: एड्स बद्दल सविस्तर लिहिले आहे. हे सर्व किशोरावस्था ओलाडणा-यांनाच नव्हे, तर त्यांच्या पालकांनाही ठाऊकच हवे, असे आहे.
हे लिहितांना समलिंगी लैंगिक आचार विचाराबद्दल माहितीसाठी माहिती म्हणून न देता, काळजीपूर्वक, सविस्तर लिहून त्यांना नेमके निषेधात्मक मत मांडले असते ते वाचकांच्या संभाव्य संभ्रम टळला असता. (लैंगिक शिक्षणाची मुळाक्षरे गिरवीत असताना दोन अर्थी शब्दयोजनांच्या कोटयांनी या नवसाक्षर जनतेला तोंड द्यावे लागेल नसते असे वाटते).
वृषणे (टेस्टिज) जन्मत: जर स्क्रोटममध्ये नसतील तर शस्त्रक्रिया करून ती जांघेतून किंवा पोटातून तिथे आणावी लागतात. या कामाला उशीर करू नये. दीड वर्षे वयाच्या आतच शस्त्रक्रिया करून घ्यावी. तरच त्यात मोठेपणी बीजनिर्मिती होऊ शकते. असा महत्वाचा संदेश प्रभावीपणे यायला हवा होता.
किशोरांकडे भावी पिढी म्हणून पाहिले जाण्याची आणि त्यांच्या ज्ञानात भर घालून त्यांची वर्तणूक सुधारण्याची कल्पना नवी आहे. योग्य ते, हवे ते आणखी प्रभावीपणे शिकवायला हवे आहे. जसजसे आणखी डॉक्टर या कामाला लागतील, तसतसे आणखी स्वास्थ्य वाड्.मय हाती लागेल. अशा वाड्.मयाची कधी नव्हती एवढी जरूरी आता आहे.
पुस्तक परिचय – ज्योस्तना पडळकर
पुस्तक – हे सारं मला माहीत हवं
लेखक – डॉ. अनंत साठे, डॉ. शांता साठे,
प्रकाशक – राजहंस प्रकाशन.
किंमत – रु. ८०/-