बालनगरी

मुलांनो,

एकदा एक टोपी विकणारा माणूस दिवसभर हिंड, हिंड हिंडला. रात्र झाली आणि अंधार पडला. त्याने जवळची शिदोरी सोडली, चटणी-भाकरी खाल्ली व झाडाखालीच आडवा झाला. सकाळी जागा झाल्यावर, पाणी पिऊन डोक्यावर टोपी घालून तो पुढच्या प्रवासाला निघाला. टोप्यांचे गाठोडे घ्यायला जातो तो काय त्याच्या गाठोडयातल्या सगळया टोप्या नाहीशा झालेल्या. त्याने आजोबांनी सांगितलेली टोपीवाल्याची व माकडांची गोष्ट आठवून झाडावर पाहिले. खरोखरच सगळी माकडे टोपी घालून बसलेली. त्याने त्या गोष्टीतल्याप्रमाणे गाठोडे सोडून त्याचे चौकोनी कापड झाडाखाली अंथरले आणि स्वत:ची टोपी त्यावर टाकली. माकडेही त्या गोष्टीतल्याप्रमाणे टोप्या टाकणार म्हणून तो वाट पाहू लागला.

पण एकाही माकडाने टोपी टाकली नाही. तो वर पाहू लागल्यावर माकडांच्या म्होरक्याने सांगितले ‘अहो टोपीवाले दादा, तुमच्यासारखेच आम्हालाही आजोबा आहेत म्हंटल. आमच्या आजोबांनी आम्हाला टोपीवाला व माकडे ही गोष्ट सांगितली आहे’. हं………..! थोडक्यात काय माकडांची पुढची पिढी सुध्दा हुषार झाली.

हा झाला विनोद. पण आजकालची मुले मात्र खरोखर भलतीच हुषार झाली आहेत. त्यांना पुस्तके,कॅसेट्स् पुरत नाहीत. त्यांना हवा असतो काप्युटर. आणि या इंटरनेटच्या युगात त्यांना त्यापासून दूर राखण्यात काय हंशील?

याउलट मोठया माणसांच्या कॉम्प्युटरमधेही त्यांच्यासाठी खूप काही साठवलेलं आहे, हे त्यांना कळू द्यावं यासाठी ही बालनगरी ! मराठीवर्ल्ड.कॉमने खास मुलांसाठी निर्माण केलेली ही नगरी.

मुलांनो , इथे या. तुम्हाला खूपच गंमतजंमत वाचायला मिळेल. गोष्टी, कोडी, शब्दांच्या कसरती, बडबडगीते. एवढेच काय पण तुम्हाला स्वत:चे स्वत: बनवून खाता येतील असे पदार्थही करता येतील अशी सोय आम्ही केली आहे. ही बालनगरी आम्ही सुरू करतोय! हळू हळू ती गजबजू लागेल. त्यांत तुमचाही सहभाग , तुमच्या कल्पना यांना आम्ही खूप वाव देणार आहोत. मग तुम्हाला आई- बाबांमागे भुणभुण करायला लागणारच नाही. तुम्ही शहाण्यासारखे किंवा ‘देवा’सारखे आपले काप्यूटरवर स्वत:ला रमवू शकाल. आणि ही बालनगरी हे खास तुमच्यासाठी राखून ठेवलेलं हक्काच ठिकाण बरं!

चला तर या बालनगरीमध्ये बागडायला !