श्वास

Shwaas मराठीवर्ल्डच्या सर्व वाचकांना ‘जागतिक दृष्टिदान दिना’च्या निमित्ताने मराठीवर्ल्डची ही खास भेट.

अलिकडे श्वास हा चित्रपट पाहिला. डोंबिवलीतील एका खाजगी संस्थेने त्याचा प्रिमियर शो आयोजला होता. ‘शो’च्या सुरवातीस लेखिक सौ. माधवी घारपुरे, चित्रपट निर्माते श्री. अरूण नलावडे यांचा सत्कारही झाला, व नंतर शो सरू झाला. बरेच दिवसांनी एक चांगला चित्रपट पाहता आला. थोडक्यात कथा अशी आहे…

एक छोटया मुलाला दृष्टिदोष निर्माण होतो. एका ऐवजी दोन वस्तू दिसणे, दूरचे न दिसणे इत्यादि. त्याचे आजोबा त्याला शहराकडे उपचारासाठी घेऊन जातात. उपचारानंतर घरी परत जायचा त्यांचा मानस! पण शहरात गेल्यावर मुलाच्या डोळयांचा एक्स रे काढल्यावर त्यांच्या लक्षात येते की दोन्हीही डोळयांच्या मूळाशी कर्करोगाची सुरवात झाली आहे. नेत्ररोपणानेही बरे होणार नसल्याने फक्त शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय त्यावर असतो. त्याने त्या मुलाची दृष्टी जाणार असते, परंतु कॅन्सर शरीरात पसरणार नसल्याने तसे करणे अपरिहार्य ठरते. तेंव्हा शस्त्रक्रिया हाच एकमेव मार्ग असल्याचा सल्ला डॉक्टर देतात. डॉक्टरांचा सल्ला मानून शस्त्रक्रियेला मान्यता देणे, त्याची कल्पना ह्या छोटया नातवाला देणे, गावी असणार्‍या आई-वडिलांना सांगणे, कळविणे याची सारी जबाबदारी आजोबांवरती येते. आजोबांच्या जीवाची घालमेल होते. शेवटी ते परवानगी देतात. डॉक्टर शस्त्रक्रिया करतात. व ते दोघेही सुखरुपपणे घरी जातात.

थोडक्यात सांगितलेली ही कथा प्रत्यक्ष पडद्यावर पाहायला हवीच! हॉस्पीटलमध्ये विविध चाचण्या करण्यासाठी, अर्ज भरताना खूप धांदल-गडबड होते. टेस्ट कॅन्सरसंबंधी आहे हे कळल्यावर आजोबांना धक्का बसतो. नातवाला या सार्‍याची कल्पना देणे आजोबांना होत नाही, व ते धाडस डॉक्टरमध्येही नसते. शस्त्रक्रियेबाबत आजोबा त्याच्या आईला टेलिफोनवर सांगतात. त्यांना हॉस्पीटलमध्ये एक समाजसेविका भेटते. ती त्यांना समरसून मदत करते, व त्यांच्या या प्रसंगात दु:खात पूर्णपणे सहभागी होते, अखेरपर्यंत मदत करते. हे सर्व प्रसंग उठावदार झालेले आहेत. हृदयाला जाऊन भिडतात.

शेवटचा प्रसंग तर लाजवाब म्हणायला हवा. शस्त्रक्रिया अचानकपणे एक दिवसाने पुढे ढकलली जाते. अचानक आजोबा नातवाला घेऊन गायब होतात. संपूर्ण हॉस्पीटलमध्ये धांदल उडते. सर्वजण लगबगीने शोधाशोध सुरू करतात. आसपासची हॉस्पीटल्स, रेल्वे स्टेशन्स इतकेच नाही तर शवागारे सुध्दा पाहायला सांगातात. दूरभाष खणखणतात. हॉस्पीटलमधील तेंव्हाची उडवा-उडवीची, टोलवा- टोलवीची भाषा, पत्रकारांनी तेवढयात हा प्रसंग एन्कॅश करण्याचा केलेला प्रयत्न अशा तपशीलांमधून हा सारा प्रसंग जिवंत केला आहे. इतक्यात आजोबा नातवासह येतात. मग डॉक्टर त्यांची खरडपट्टी काढतात. टाकून बोलतात. आजोबा शांतपणे सर्व ऐकून घेतात व सांगतात, ‘दृष्टि जाण्यापूर्वी नातवाच्या डोक्यांत, डोळयांत काय साठवले जाणार, तर त्या तुमच्या नर्सेस, औषधांचे वास, वॉर्डबॉईज् आणि आरडाओरडा… यापेक्षा चांगलं काहीतरी स्मरणांत राहावं हे मी मनात ठरवलं. त्याला उजेड, हवा, आनंद इत्यादि चांगल्या गोष्टी दाखवाव्यात म्हणून मी सटकलो.’ ते डॉक्टरांची माफी मागतात. मग डॉक्टरांच्यातील माणूस जागा होतो. व ते सर्व शस्त्रक्रिया लगेच करायची असे ठरवतात… नातवाच्या मनात सर्व आनंद भरून राहावा म्हणून… डॉक्टर ही शस्त्रक्रिया स्वखर्चाने करतात हा प्रसंग अप्रतिमरित्या वठलेला आहे.

चित्रपटांतील प्रमुख भूमिका सर्व कलावंतांनी सुरेखरित्या साकार केल्या आहेत. दिग्दर्शक संदीप सावंत यांनी नट अरुण नलावडे यांच्याकडून आजोबांची भूमिका घोटवून घेतली आहे. ते, ही भूमिका अक्षरश: जगले आहेत. त्यांच्या कारकिर्दीतील हा मैलाचा दगड ठरावा अशी ही चिरस्मरणीय भूमिका. बालकलाकार अश्विन चितळे उत्तम ! सर्वच सहकलाकारांच्या भूमिका दर्जेदार, उठावदार आहेत. नयनरम्य, चित्तवेधक असे छायाचित्रण, प्रसंगानुरूप असा पार्श्वसंगीताचा उपयोग, मध्येच विनोदाची थोडीशी पखरण, हे सारे चपखलपणे बसले आहे. कोकणातील-गावातील काही प्रसंग फ्लॅशबॅकने दाखविण्याचे तंत्रही छान जमले आहे.

कथा बंदिस्त आहे. कथेमध्ये अनावश्यक घुसडलेले प्रसंग नाहीत. गाणी इत्यादि फापट पसारा नाही. संपूर्ण चित्रपट हे एक जबरदस्त असे फर्स्टक्लास रसायन आहे. प्रत्येक सुजाण, सुसंस्कृत मराठी रसिकाने पाहावा असा हा चित्रपट आहे. मनाला अगदी आतपर्यंत भिडतो. त्यातील हृदयस्पर्शी बोलके प्रसंग बेहद भावतात. हृदयाच्या जागी दगड असेल त्याच्याच डोळयांतून अश्रू येणार नाहीत. न पाहिल्यास एक चांगला चित्रपट चुकल्याची चुटपूट कायम मनाला लागून राहील, असा हा चित्रपट !

जयंत करकरे

नॉट ओन्ली मिसेस राऊत

Not Only Mrs Raut मराठी चित्रपटांचे अस्तित्वच संपुष्टात आलंय, अशी चिंता व्यक्त होत असतानाच, अलीकडच्या काही काळात वेगवेगळया विषयांवरील वैविध्यपूर्ण असे मराठी चित्रपट हळूहळू येऊ लागलेत. यातले काही चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचले तर काहींचं अस्तित्व चित्रपट महोत्सवा पुरतेच मर्यादित राहिले. याच पार्श्वभूमीवर एक नवा मराठी चित्रपट प्रदर्शित झालाय, ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’.

चित्रपटाच्या नावावरूनच या चित्रपटाचे वेगळेपण जाणवते. या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांचे असून निर्माती आदिती देशपांडे नायिकेच्या भूमिकेत आहेत. या व्यतिरिक्त मधुरा वेलणकर, मिलिंद शिंदे, तुषार दळवी, मोहन जोशी, रवींद्र मंकणी, केतकी करंदीकर, वंदना गुप्ते, विक्रम गोखले हे जानेमाने कलाकार लहानमोठया भूमिकांत आहेत.

ही कथा आहे मिसेस विद्या राऊत (अदिती देशपांडे) या तरूण विधवेची. तिला बारा-तेरा वर्षांची एक मुलगीदेखील आहे. नवर्‍याच्या मृत्यूनंतर त्याने घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी लोकांच्या चकरा तिच्या घराकडे वाढू लागतात. तिच्या या परिस्थितीचा फायदा घेऊन तिचा कार्यालयीन बॉस कारखानीस (रविंद्र मंकणी) आपला मैत्रीचा हात पुढे करतो आणि एक दिवस संधी साधून आपली शरिरसुखाची इच्छा व्यक्त करतो. यासाठी विद्या राऊत नकार देते.

एकदा काही कामानिमित्त ती बाहेरगावी गेली असता कारखानीस तिच्या घरी जातो आणि तिच्या मुलीवर बलात्कार करतो. या सर्व पार्श्वभूमीवर न्याय मिळविण्यासाठी मिसेस राऊतला जो संघर्ष करावा लागतो त्या संघर्षाची कहाणी या चित्रपटात पाहायला मिळते. मराठी चित्रपटांच्या नेहमीच्या विषयांपेक्षा वेगळा विषय घेऊन त्यावर चित्रपट करण्याचे धाडस दाखविल्याबद्दल निर्माती आदिती व दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचे कौतुक केले पाहिजे.

परिस्थितीपायी वा अन्य कुठल्या कारणापायी ज्या स्त्रियांवर एकटं राहाण्याची वेळ येते, अशा स्त्रिया कुठल्याही पुरूषाला सहजपणे अव्हेलेबल होऊ शकतात, अशी एक मानसिकता तयार होताना दिसत आहे. या चित्रपटात एक संवाद अतिशय बोलका आहे, ‘ज्या बाईला कुणीही नसतं, ती कुणाचीही होऊ शकते’.

मिसेस राऊतच्या पार्श्वभूमीबरोबर आणखी एक उपकथा उलगडत जाते ती तिला न्याय मिळवून देणार्‍या तरूण वकिलेची (मधुरा वेलणकर). या दोघींनाही जगण्यासाठी वैयक्तिक पातळीवर संघर्ष करावा लागतोय. घरात सासरा (मोहन जोशी) आणि नवरा (तुषार दळवी) हे प्रसिध्द वकील असल्यामुळे आपणदेखील त्यांच्याप्रमाणे नाव कमवावे, असे तिला वाटत असते. तिच्या या इच्छेला घरातून वरवर प्रोत्साहन दिले जात असले तरी तिने मात्र आपले आयुष्य चूल आणि मूल या गोष्टीपुरतंच मर्यादित ठेवावे, असे सतत तिच्या मनावर बिंबवले जात असते. या दोन स्त्रियांच्या कहाणीतून हा चित्रपट उलगडत जातो.

आपल्या अभिनयाने अदितीने ‘मिसेस राऊत’ची व्यक्तिरेखा चांगल्याच तर्‍हेने फुलविली आहे. आणि त्यांना तितकीच चांगली साथ मधुरा वेलणकर हिनेदेखील दिली आहे. बाकी सर्वच कलाकारांनी आपापली कामे उत्तम केली आहेत.