२२ जून १८९७ – भारताच्या स्वातंत्र्यासाठी पहिल्या हुतात्म्यांची अजरामर कहाणी

२२ जून १८९७ ह्या चित्रपटाची यंदा २५ वर्षे साजरी होत आहेत. रुद्रा होम व्हिडिओ ह्यांनी ‘मॉडर्न क्लासिक्स’ ह्या त्यांच्या चित्रपट मालिकेच्या अंतर्गत चित्रपटाची व्हिसीडी प्रदर्शित केली आहे. चित्रपट इंग्रजी सबटायटल्स मध्ये असून किंमत रु. १४९ आहे.

हा ऐतिहासिक चित्रपट दोन राष्ट्रीय तसेच दोन राज्यस्तरिय पारितोषिकांचा मानकरी आहे. सहचारी असणाऱ्या नचिकेत आणि जयू पटवर्धनांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट. चित्रपटाचे संवाद विजय तेंडूलकरांनी लिहिले असून पटकथा शंकर नाग आणि नचिकेत ह्यांची आहे.

चित्रपटाचे चित्रिकरण पुणे, वाई आणि मुंबई येथे झाले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळाचे प्रदर्शन, पात्रांची आणि स्थळांची योग्य निवड, दिग्दर्शकांची माध्यमांवरची पकड सिनेमाला खरोखर ‘क्लासिक’ बनवते.

कलाकार

प्रभाकर पाटणकर, रविंद्र मंकणी, उदयन दिक्षीत, वासूदेव पाळंदे, शांता जोग, अरुंधती राव, सुजल वाटवे, दिपाली कुलकर्णी, सतिश खरे, सदानंद बोरसे, श्रीकांत गद्रे, सुरेश भासळे, जयराम हार्डिकर, संजिव अंबिके, विकास देसपांडे, मुकुंद चितळे, जॉन आयर्विंग, सदाशिव अमरापुरकर, रॉड गिलबर्ट

कथा/संहिता – नचिकेत
पटकथा – शंकर नाग नचिकेत
संवाद – विजय तेंडूलकर

कथानक

वाल्टर रँड ह्या ब्रिटीश अधिकार्‍याची नेमणूक प्लेग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी करण्यात आली होती. रँड ने प्लेग आटोक्यात आणला तरी त्याची लोकांविषयी वागण्याची पध्दत चीड आणणारी होती. लोकांना बेघर करणे, घरांना धुरी देणे तसेच प्लेग बाधीत लोकांनी वापरलेल्या वस्तू जाळून टाकणे ह्या त्याच्या निर्घुण कृत्त्यांमुळे समाजात असंतोष होता.

दामोदर आणि बाळकृष्ण चाफेकर हे पुण्यातल्या प्रवचनकार हरिभाऊ चाफेकरांचे पुत्र. ध्येयवादी असणार्‍या ह्या बंधुंनी त्यांच्यासारख्या समविचारी तरुणांची एक संघटना स्थापन करून धर्म आणि राष्ट्रप्रेम दर्शवणारे कार्य सुरु केले. काल्पनिक आदर्शवादात रमणारी ही तरुणाई लोकमान्य टिळकांच्या लढाऊ आणि वास्तववादी विचारांनी प्रभावित झाली. त्याचे परिणाम ब्रिटिश राज्य, धर्म आणि भाषा ह्या बद्दलचा राग आणि संतापात झाले. प्लेग प्रतिबंधकाची अघोरी कृत्ये तसेच प्रिय मित्राच्या अकाली मृत्यूमुळे दामोदर रँड विरुध्द कट करण्यास उद्युक्त झाला.

२२ जून १८९७ ला दामोदरने रँडला मृत्युमुखी केले. दामोदर आणि त्याचे साथीदार विनासायास पळाले. इन्स्पेक्टर ब्रेवीन ह्याने द्रविड बंधूंच्या सहाय्याने दामोदरला शोधून काढून दामोदरच्या तोंडून गुन्हा कबूल करून घेतला. सेशन कोर्टाने जेव्हा मृत्युदंड सुनावला तेव्हा लोकमान्य टिळकांनी दामोदर निर्दोष असल्याचा दावा केला. पण हायकोर्टाचा निर्णय ठाम होता. आणि दामोदरला फाशी देण्यात आली.

कालांतराने बाळकृष्ण चाफेकरला हैद्राबादमध्ये अटक करण्यात आली पण निर्दोष असल्याचा त्याने दावा केला. इन्स्पेक्टर ब्रेविनने धाकटा बंधू वासूदेव चाफेकरला बाळकृष्ण विरुध्द पुरावा देण्यास सुचविले. पण देशप्रेम आणि ब्रिटिशांविरूध्द पेटून उठलेल्या ह्या चाफेकर बंधूंनी दोन खून केले तसेच त्यांचे दोन खूनांचे प्रयत्न यशस्वी ठरले. सरते शेवटी बाळकृष्ण, वासूदेव आणि त्यांचे मित्र ह्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.

चाफेकर बंधूंचे असामान्य धैर्य पुण्यातल्या तरुणांमध्ये उत्साहाची आणि देशप्रेमाची लाट घेऊन आले. भारताच्या स्वातंत्र्य लढयाचे तिघं चाफेकर बंधू आणि रानडे हे पहिले हुतात्मे आहेत. कालांतराने हरिभाऊ चाफेकर आपल्या तिन्ही विधवा सुनांसह दक्षिण मुंबईतल्या ठाकूरद्वार इथल्या कामत चाळीत स्थलांतरीत झाले. तरुण मुलांच्या मृत्यूनंतरही पित्याचे राष्ट्रप्रेम आपल्या प्रवचनातून जनजागृती करत होते. अखेर १९०० मध्ये हरिभाऊंचा मृत्यू झाला.

पुण्याजवळ चिंचवड येथे असणारा चाफेकरांचा वाडा आता स्मारक म्हणून घोषित झाला असून त्यांचे बांधकाम चालू आहेत. तसेच शाळांनाही ‘चाफेकर बंधू’ आणि इतर हुतात्म्यांची नावे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

ब्रिटीश अधिकारी वाल्टर रँड हा राणी व्हिक्टोरियाच्या राज्यभिषेकाच्या जल्लोषाहून घरी परततांना, गणेश खिंड, पुणे येथे चाफेकर बंधूंनी त्यांचा खून केला. तो दिवस होता २२ जून १८९७. हा सिनेमा ह्या सत्यघटनेवर आणि त्याच्या परिणामांवर आधारीत आहे.

सिनेमाचे चित्रण मुंबई, पुणे आणि वाई येथे मार्च आणि एप्रिल १९७९ मध्ये पार पडले. सिनेमातली पात्रं तसेच घटना अतिशय जिवंत आणि परिणामकारक झाली आहेत.

२२ जून १८९७ हा अतिशय अप्रतिम सिनेमा आहे. दिग्दर्शकाची माध्यमावरची पकड इतिहासकालीन काळ पडद्यावर जिवंत करते. २२ जून १८९७ हा सिनेमा म्हणजे इतिहासाला पुस्तकीपानांमधून मुक्त करण्यासारखे आहे. हा सिनेमा नितांत सुंदर अनुभव आहे.

पुरस्कार
दोन राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी – मार्च १९८०

रजत कमळ – राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट चित्रपट

रंग, वेशभूषा, स्थळ, काळ अप्रतिम अभिनय ह्या सार्‍यांची अप्रतिम पृथक्करणात्मक बांधणी म्हणजे २२ जून १८९७. चित्रपटात मूकपणे तसेच कमी शब्दात देशप्रेम व्यक्त होते.

रजत कमळ – उत्कृष्ट कला दिग्दर्शन (जयू)

सौम्य रंगसंगती, काळ उभा करण्याची हातोटी आणि अभ्यास, समर्पक आणि योग्य स्थळांची व कलाकारांची निवड हे सारे पैलु वेगळाच परिणाम साधतात. कला, दिग्दर्शन हे फक्त रंगमंच किंवा ‘सेट उभा करणे’ ह्या पेक्षा अधिक गहिर आहे. हे ह्या चित्रपटाच्या निमित्ताने जाणवते.

दोन महाराष्ट्र राज्य पुरस्काराचे मानकरी.
सर्वोत्कृष्ट चित्रपट – दादासाहेब फाळके पुरस्कार
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – नचिकेत आणि जयू

चित्रपट महोत्सव
कलकत्ता ८० – प्रादेशिक चित्रपट महोत्सव, एप्रिल १९८०
त्रिवेंद्रम, केरळ – प्रादेशिक चित्रपट महोत्सव, ऑक्टोबर १९८०

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
ला रोचेले, /फ्रान्स, जून १९८०
मॉन्ट्रेल , कॅनडा, ऑगस्ट १९८०
मन्नहिम – वेस्ट जर्मनी, ऑक्टोबर १९८०