कोणालाही या क्षणी जर असे सांगितले की,”डोळे हळुवारपणे बंद करा आणि डोळ्यापुढे केळीचे चित्र अजिबात आणू नका..” हे वाक्य पूर्ण होण्याच्या आत अनेकांच्या डोळ्यापुढे केळीचे चित्र उभे राहिले असेल.काहींना तर डझनभर केळीवर स्वत:च ताव मारतानाचेही चित्र दिसले असेल. तात्पर्य डोळे बंद करून शांत बसल्यावर केळीला डोळ्यापुढून हुसकावण्यासाठी महत्प्रयास करावे लागतील. अनेकांच्या बाबतीत घडणारा हा अनुभव. जी गोष्ट करायची नाही ती करण्यासाठी कोणती शक्ती आपल्याला भाग पडत असते? ही शक्ती म्हणजे क्षेपणास्त्रापेक्षाही वेगाने धावणारे आपले मन! या मनाचा प्रवास एकतर भूतकाळात किंवा भविष्यकाळात चालू असतो. या प्रवासात वयानुरूप बदल होतो.म्हणजे बालपण, तारुण्य, वृद्धापकाळ या तिन्ही अवस्थांमध्ये मनाच्या विचाराची दिशा,गती वेगळी असली तरी यात एक समान धागा असतो,तो म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांवर प्रतिक्रिया देत भविष्याचा विचार करत बसणे. हे स्वतःच्याही इतक्या नकळत घडत असते की,आपला वर्तमान क्षण हातून निसटतोय याचेही भान उरत नाही. का घडत हे असं? मनरूपी क्षेपणास्त्र निशाण्यावर कसे डागायचे याची साधना नसल्याने गुंतागुंत निर्माण होते आणि भलत्याच ठिकाणी स्फोट होतो.
स्वतःचंच मन किती वेदना देते हे कवी सौमित्रांच्या ओळीतून चपखलपणे दिसून येते.
माझिया मना जरा थांब ना पाऊली तुझ्या माझिया खुणा तुझे धावणे अन मला वेदना….
मनातील कोलाहल इथं अगदी अचूक पकडलाय. अशा या मानवी मनात रोज असंख्य लढाया सुरु असतात,स्वतःशीच! आपलेच मन जेव्हा शत्रू बनून समोर ठाकते तेव्हा जाणवते की जगातील कुठलीही शक्ती आपल्याला दु:खी करू शकत नाही..आपल्या स्वतःशिवाय!
ज्याप्रमाणे पायातील काटा काढताना वेदना होते;पण तो आपण काढला नाही तर कुरूप होते. त्याचप्रमाणे मनातील कचरा काढताना वेदना होतात. पण ती घाण काढली नाही तर आजार होतात. होय! हे सत्य आता विज्ञानानेही मान्य केलय. मन हे अवयव म्हणून दिसत नसले तरी त्याला आजार होतात. वैद्यकशास्त्रही आता त्यावर काम करतंय हे आजार शारीरिक आजारांप्रमाणे दिसून येत नाही;पण आतल्या आत पोखरणे मात्र चालू असते. मनाची कुतरओढ मनोकायिक आजारांना निमंत्रण देते. भारतात १९५१ साली मुंबईच्या केईएम रुग्णालयात पहिलेवहिले मानसोपचार केंद्र सुरु करण्यात आले. आता तर वाढत्या सायबर व्यसनांमुळे दिल्लीत सायबर क्लिनिक्स उघडण्याची वेळ आली आहे. आपल्याला मानसिक आजार आहे हे मान्य करणे,त्यावर उपचार करणे हे खूप अवघड आणि लज्जास्पद का ठरावे? समाजाच्या भीतीने ,लोक काय म्हणतील ? हीच चिंता सतत सतावत असते.
आपलेच मन असूनही आपले ऐकत नाही. आपण स्वत:कडे व्यवस्थित पाहू शकत नाही. स्वतःच स्वतःचे मित्र बनू शकत नाही. २ मिनिटे डोळे बंद करून त्याचा तळ गाठू शकत नाही. अमुक एका व्यक्तीला पाहिले की माझा संताप होतो. या प्रकारचे संवाद आपण ऐकत असतो. आपल्याला तहान-भूक लागली तर आपण खातो-पितो,स्वतःच्या गरजा पूर्ण करतो.भूक लागली म्हणून इतरांना दोष देत नाही.मग चुकांचे खापर इतरांवर का? आपण जे जसे आहे ते तसे शुद्ध स्वरुपात का पाहू शकत नाही? मनातील राग,द्वेषामुळे आपल्याला काहीही कळेनासे होते.मग आपण प्रत्येकाला काही ना काही लेबल चिकटवतो. स्वतःला तरी आपण जसं आहे तसं स्वीकारण्याचा प्रयत्न करतो का? स्वतःशी बोलतो का? स्वतःच योग्य सामर्थ्य जेव्हा लक्षात येत तेव्हाच हातून उत्तुंग कामगिरी घडू शकते. अन्यथा पृथ्वीवरील एक जीव जन्माला येऊन तसाच मरूनही जातो अशी माणसाची गत होते.
स्वामी विवेकानंद यांच्या मते ‘जेव्हा तुम्ही स्वतःशी बोलत नाही तेव्हा जगातील अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीशी संवाद साधण्यास तुम्ही मुकलेले असतात.’ आपल्या जिवंतपणाचे लक्षण असणाऱ्या श्वास आणि संवेदनांकडे बघण्यासाठी,त्यांना जाणून घेण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. यामुळेच स्वतःचे स्वतःशी भांडण चालू असते. ते थांबवून जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात.
तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाची वाद आपणासी
तेव्हा आता स्वतःशी संवाद साधण्यासाठी अंतरंगातील सागरात डुबकी घ्या आणि खोलवर शोधा आपल्या आत काय काय दडलंय ते!
– विशाखा एस. ठाकरे