अष्टविनायक

महाराष्ट्रातील ठिकाणे

श्री. वरदविनायक – महड

varadvinayak गाणपत्य संप्रदायाचे आद्य प्रवर्तक, ऋग्वेदातील प्रसिद्ध मंत्रद्रश्त्ये व गणानं त्वा या मंत्राचे प्रवर्तक ऋषी गृत्समद यांनी श्री वरदविनायकाची येथे स्थापना केली. गृत्समद ऋषींनी आपल्या मातेला श्राप दिला होता. त्याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी येथील अरण्यात ओम गं गणपतये नमः या मंत्राचा अनेक वर्षे जप केला. गणेश प्रसन्न झाल्यावर त्यांनी गणेशास प्रार्थना केली की त्यांनी येथेच राहून भक्तांची मनोकामना पूर्ण करावी. इच्छा पूर्ण करणारा म्हणून त्यास वरद विनायक म्हटले जाऊ लागले. या मंदिराबाबत एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या माणसाने शोध घेतला व त्याला मूर्ती मिळाली. त्याच मूर्तीची येथे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. भाविकांसाठी २४ तास उघडे असणारे हे एकमेव देऊळ आहे. शिवाय दुपारी १२ पर्यंत स्वहस्ते गणेशाची पूजा करता येते. मंदिरात १८९२ पासून सतत नंदादीप तेवत आहे. भक्तांना वर देणारा वरदविनायक. १७२५ साली पेशवे काळात हे मंदिर बांधण्यात आले. हे मंदिर कौलारू, घुमटकर असून पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या चारही बाजूंना दोन-दोन हत्ती कोरलेले आहेत. मंदिराच्या पश्चिमेला देवाचे तळे आहे तर उत्तरेला गोमुख आहे. मंदिरावर नागाची नक्षी असलेला सोन्याचा कळस आहे. मंदिराला दगडी नक्षीकाम केलेली महिरप असून गाभा-यात वरदविनायकाची दगडी सिंहासनावर बसलेली मूर्ती आहे. गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख व डाव्या सोंडेची आहे. पुण्यातील पेशवे हे थोर गणेशभक्त होते. माधवराव पेशव्यांचे थेऊरला निधन झाल्यावर त्यांना सती गेलेल्या रमाबाईंची समाधी तेथे आहे. मंदिराच्या आवारात थोरल्या माधवरावांची कारकीर्द वर्णन करणारे कलात्मक दालन आहे. हे दालन निरगुडकर फौंडेशनच्या वतीने तयार करण्यात आले आहे.

स्थान : तालुका खालापूर, जिल्हा रायगड, पिन.को. ४१० ०२०

अंतर : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर खालापूर व खोपोलीदरम्यान हाळ या गावाजवळ.

खालापूर-हाळ १ कि.मी., खोपोली-हाळ ३ कि.मी., हाळ-महाड १ कि.मी., पाली-४० कि.मी., ओझर-लेण्यान्द्री १५० कि.मी.

निवास : भक्तनिवास (दूरध्वनी-९५२१९२, २६६९१२)

महाड-पुणे मार्गावरील दर्शनीय ठिकाणे : खोपोली- योगीराज गगनगिरी महाराज यांचा आश्रम.

खंडाळा : थंड हवेचे ठिकाण.

लोणावळा : थंड हवेचे ठिकाण. ‘मनशक्ती’ रेस्ट न्यू वे आश्रम. वळवण धारण.

कारले : लेण्या व एकविरा देवीचे स्थान.

देहू : संतश्रेष्ठ तुकोबांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान.

चिंचवड : मोरया गोसावी यांची संजीवन समाधी.

श्री. चिंतामणी – थेऊर

Chintamani येथील गणेश मूर्तीची स्थापना कपिल मुनींनी केली. कपिल मुनींजवळ एक चिंतामणी नावाचे रत्न होते. हे रत्न त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करीत असे. एकदा गणासूर त्यांच्या आश्रमात आला असता त्यांनी या रत्नाच्या सहाय्याने त्याला पंच पक्क्वन्नाचे जेवण दिले. हे पाहून गणसुर स्तंभित झाला. त्यास रत्नाचा मोह निर्माण झाला. त्याने कपिल मुनींकडे या रत्नाची मागणी केली व त्यांनी नकार देताच गानासुराने ते रत्न हिसकावून घेतले. कपिल मुनींनी गणेशाची उपासना केली. विनायकाने प्रसन्न होऊन येथील कदंब वृक्षाखाली गानासुराचे पारिपत्य केले. तेव्हा मुनींनी विनायकाच्या गळ्यात ते रत्न बांधले. तेव्हापासून गणेशाला चिंतामणी नावाने संबोधले जाऊ लागले. गौतम ऋषींच्या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी इंद्राने याच गणेशाची आराधना केली असेही ऐकिवात आहे. या क्षेत्राचे व्यवस्थापन चिंचवड येथील मोरया गोसावी संस्थेकडे आहे. चिंचवडच्या मोरया गोसावींनी तपश्चर्या केली असता विनायकाने वाघाच्या रुपात त्यांना दर्शन दिले.

मुळा व मुठा नद्यांनी वेढलेल्या या थेऊर गावाला पूर्वी कदंब तीर्थ वा चिंतामणी तीर्थ म्हटले जात असे. कदंब वृक्षाच्या खाली हे मंदिर वसलेले आहे. या उत्तराभिमुख मंदिराच्या महाद्वारात प्रवेश केल्यानंतर प्रशस्त आवारात मोठी घंटा असून तेथे शमी व मंदार वृक्ष आहेत. पुढे सभामंडपात यज्ञकुंड आहे. त्यापुढे गाभा-यात डाव्या सोंडेची शेंदूर लावलेली चिंतामणीची स्वयंभु मूर्ती आहे. या पूर्वाभिमुख गणेश मूर्तीच्या डोळ्यात माणिक रत्न आहेत.

स्थान : तालुका – हवेली, जिल्हा- पुणे, पिन. को. ४१२ ११०

अंतर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ पासून जवळ.

पुणे – हडपसर- लोणी- थेऊर फाटा २०, थेऊर फाटा ते थेऊर ५, पुणे २५.

थेऊर – केसनंद -वाघोली – पुणे ३०.

थेऊर-केसनंद-लोणीकंद-शिक्रापूर-रांजणगाव ४४.

थेऊर-केसनंद-लोणीकंद-शिक्रापूर-तळेगाव -खापोली-महाड व पाली ९९.

थेऊर-केसनंद-लोणीकंद-आळंदी-चाकण-नारायणगाव ते ओझर व लेण्याद्री १०९ कि.मी.

उरुळीकांचन : म. गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र.

भुलेश्वर : पुरातन कलात्मक शिवमंदिर.

केडगाव बेट : नारायण महाराज यांचा आश्रम व दत्ता मंदिर.

फुलगाव : स्वामी स्वरूपानंद स्थापित भीमे वरील गुरुकुल पद्धतीचा श्रुतीसागर आश्रम व वेदांत रिसर्च सेंटर.

तुळापुर : भीमेकाठी पुरातन संगमेश्वर मंदिर. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक. नौका विहाराची सोय.

मरकळ : भीमेकाठी विपश्यना केंद्र व नौका विहार.