सृजनशीलतेचा ध्यास असणा-या मंजुषा गोसावी
वयाच्या पन्नाशीपासूनच आजकाल माणसाला सेवानिवृत्तीचे वेध लागायला लागतात. ५८ ते ६० या वयात निवृत्त झालं की आता सगळं संपलं, करण्यासारखं काहीच उरलं नाही म्हणत रिकामा वेळ भूतकाळातले हिशोब करत कसातरी घालवणं, त्यामुळे येणारे, प्रथम मानसिक व नंतर शारीरिक आजारपण झेलत बसायचं हे दृश्य सर्वत्र दिसतं. मंजुषा गोसावी यांच्यासारख्या साठी ओलांडलेल्या, तरीही समाजात काही ना काही कार्य करत, आपल्याजवळ जे आहे ते दुस-यांना निरपेक्ष बुध्दीनं देणं ह्या भावनेनं सेवनिवृत्तीचा काळ व्यतीत करणा-या व्यक्ती, आजच्या युगात सर्वांनाच मार्गदर्शक ठरतील.
१९५९ साली चेंबूर हायस्कूलमधून मी ११ वी पहिल्या क्रमांकाने नुसती पास नाही झाले तर संस्कृत मध्ये एन. आर. बिडकर व मराठीमध्ये व्ही.सी. तवकर पारितोषिकही मिळवली. माझी आवड म्हणून मी रुपारेल महाविद्यालयात कलाशाखेत प्रवेश घेतला. मानसशास्त्र या विषयाच्या अभ्यासात रुची निर्माण झाल्याने मी त्याच विषयात पदवी तीसुध्दा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. नंतर मात्र माझं कार्यक्षेत्र ह्या विषयाशी काहीही सबंध नसलेलं होतं आणि ते म्हणजे माझी ३५ वर्षाची रिझर्व बँकेतील नोकरी. सहाय्यक व्यवस्थापक म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेइपर्यंतचा माझा हा प्रवास म्हणजे नोकरी, वैवाहिक जीवन, मातृत्व, मुलींचं संगोपन आणि आर्थिक स्थैर्य यांनी परिपूर्ण होता.
मानसशास्त्राचा अभ्यास, बँकेतील नोकरीमुळे देशाच्या आर्थिक धोरणाचं आणि अर्थव्यवहाराचं ज्ञान ही माझी शिदोरी. तसचं स्त्रीमुक्ती चळवळीच्या मुखपत्रातून, बँकेच्या हाऊस जर्नलमधून, वृत्तपत्रातून स्फुट लेखन हे माझ्यातील सृजनशीलतेचं पेरलेलं बी स्वेच्छानिवृत्तीनंतर फोफावत गेलं. १९९९ साली कुसुमाग्रजांच्या कवितांवरील संहिता ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ आणि त्यावर आधारीत १० काव्य वाचन-भाषणाचे प्रयोग हे पहिलं सृजन. पृथ्वीचे प्रेमगीत, कोलंबसाचे गर्वगीत, स्वप्नांची समाप्ती, स्वातंत्र्यदेवीची विनवणी या त्यांच्या प्रसिध्द कविता असल्या तरी सामाजिक सामिलकीचा संदेश देणा-या त्यांच्या कविता लोकांपर्यत पोहचल्या नव्हत्या. पंचपक्वानांनी भरलेल्या ताटात जेवणा-यांनी ज्यांच्या ताटात काही नाही अशांचा विचार करावा. सावलीत असणा-यांनी उन्हातल्यांना सावलीत कसे आणावे हा विचार करावा, असे त्यांना वाटे. हे प्रत्यक्षात आणायचे असेल तर आपल्या ह्रदयातील तारका विझू देता कामा नये हा त्यांचा विचार मी लोकांपर्यंत पोहोचविण्याचा अल्पसा प्रयत्न केला.
भाषेवर प्रभुत्व यावं, मुलांचं वाचन निर्दोष, दर्जेदार असावं याचं बीज पेरण्याचा प्रयत्न ८ ते १२ वयोगटासाठी अभिनव वाचन कार्यशाळा चालवून मी सध्या करत आहे. संस्कारहीनता असतांना आर्थिक समृध्दी आली तर त्याचे रुपांतर चंगळवादात होते. राहणीमान उच्च हवंच पण त्याबरोबर अभिरुची संपन्नताही हवीच. उत्तम कथा, कविता, मनोरंजक पध्दतीने शास्त्र, भूगोल, गणित मी मुलांपर्यंत पोहोचवलं. यासाठी चित्रकला, हस्तकला, सुलेखन, इकेबाना यांचा उपयोग मी केला. मुलांनी केवळ परीक्षार्थी बनू नये. अभ्यास आणि कला हे उत्तम जीवन जगण्याचे मार्ग आहेत असा माझा द्दष्टीकोन आहे.
माझं तिसरं सृजन म्हणजे २००५ साली ‘शिवा डॉनसिग’ ही माझी अनुवादित कादंबरी प्रकाशित झाली. मूळ लेखिका भारती कर्चनर. कोमल प्रीतीकथा आणि सामाजिक प्रश्न यांची कौशल्यपूर्ण गुंफण यात आहे. बालविवाह, छोटया मुलींची बाजारात विक्री, मुलगा होत नाही म्हणून स्त्रियांना टाकलं जाणं, भारतीय व अमेरिकन संस्कृतीचे चांगले व वाईट पैलू, भ्रष्टाचार, आदिवासीचे प्रश्न असूनही ही कादंबरी सुंदर ललित कलाकृती आहे. स्वान्त सुखाय केलेल्या माझ्या या तिहेरी सृजनात सामाजिक परिमाण हा महत्वाचा बिंदू आहे.
या तीनही प्रकल्पात माझ्या पतींचं मला सहकार्य लाभलं आहे. त्यांच्या बागकामाच्या छंदातून ते फुलांची जोपासना करतात तर अभिनव वाचन कार्यशाळेत मी मुलांची अभिरुची जोपासते.
‘बस्ती बस्ती परबत परबत गाता जाए बंजारा , लेकर दिलका इक तारा’
या सुंदर हिंदी गाण्यातील अंतर्नाद ही माझ्यातील सृजनातील प्रेरणा आहे. पूर्वार्धात मी शैक्षणिक विषय निवडले या अंतर्नादातूनच. त्यानंतर माझे व्यावसायिक व्यवहारी जीवन. आता उत्तरार्धात परत हाच अंतर्नाद मला ऐकू येतो. त्यातून घडलं सृजनपर्व. कुसुमाग्रजांच्या कविता, वाचन कार्यशाळा आणि अनुवादित कादंबरी ‘शिवा डॉनसिंग’ यांनी मला मानसिक समाधान दिला आहे.
मुलाखत व शब्दांकन – सौ. कुंदा कुलकर्णी