विश्वास पाटीलांची ‘चंद्रमुखी’

मराठीतील प्रथितयश कादंबरीकार श्री. विश्वास पाटील यांची ‘चंद्रमुखी’ ही कादंबरी नुकतीच हातात आली. एक यशस्वी नेता दौलत आणि तमाशातील कलावंतीण ‘चंद्रमुखी’ याची ही प्रेम कहाणी.

कादंबरी वाचताना पानोपानी जाणवते ते म्हणजे विश्वास पाटीलांनी तमासगिरांच्या जीवनातील बारकावे टिपण्यासाठी केलेला अभ्यास. कधी कधी हा अभ्यास कथानकापेक्षाही जास्त तीव्र वाटू लागतो.

कथानकामध्ये लेखकाने फ्लॅशबॅक तंत्राचा यथेच्छ वापर केलेला आहे. खासदार दौलतराव, त्याचा सासरा दादासाहेब, साडू नानासाहेब व बायको डॉली ही पात्रे एका बाजूला तर चंद्रमुखी, तिची आई व त्यांचा साथीदार हे दुस-या बाजूला आहेत. एकमेकांविरोधी असणा-या या ठेवणीमुळे नाटयाची एक घट्ट वीण कथानकामध्ये गुंफली आहे. सर्वस्वी भिन्न प्रकृतीच्या या दोन दुनिया अशा जवळजवळ आल्यामुळे वाढीस लागलेले प्रेम, वैर, हे या कादंबरीतून साकार होते.

कथानकाची ही वीण मराठी तसेच भारतीय कादंब-यांकरिता काही अभिनव म्हणता येणार नाही. मुळात श्रीमंत पुरूष आणि कलावंतीण या सूत्रावर आधारित ब-याच कथा, कादंब-या व चित्रपट येऊन गेले आहेत. उदहारणार्थ- रूपमती व बाजबहाद्दर, पाकिजा सिनेमा किंवा शाम बेनेगलचा झुबेदा किंवा व्ही शांतारामचा पिंजरा इत्यादि. या तुलनेत या कथानकात नवीन काहीच नाही. नवे आहेत, ते सद्यस्थितीतले संदर्भ… ज्यांना ‘बरखा बहार’ प्रकरण ठाऊक असेल, त्यांना अधिक सांगण्याची गरज नाही.

या सगळया प्रकारात वाचक मात्र एका चांगल्या प्रेमकहाणीस किंवा एका उत्तम राजकीय कादंबरीस मुकले आहेत. सत्तेच्या राजकारणाचे चित्रण करताना लेखकाने कथानकाचा वेग ठेवला आहे. तालुका ते मुबंई-दिल्ली हे सर्व चित्रीत करताना त्यांनी हातचं काही राखलं आहे, हे असंच वारंवार जाणवत राहतं. अगदी कादंबरीचा शेवट होतो, तेव्हाही ही अपूर्णतेची भावना वाचकांच्या मनामध्ये उभी राहते. हे प्रस्तुत कादंबरीचे यश की, अपयश हे प्रत्येक वाचकाने आपापल्यापुरते ठरविले पाहिजे.

कादंबरीतील सर्व शहरी पात्रांची भाषा तर फारच कृत्रिम वाटते, वा मूळ इंग्रजी वाक्यांचे शब्दश: भाषांतर केले असावे असे वाटते. एखाद्या सिनेमा किंवा टीव्ही मालिकेसाठी उत्तम संवाद लिहून या कादंबरीचा वापर निश्चित करता येईल असे वाटते.

देखणे मुखपृष्ठ व उत्तम निर्मितीमूल्य असलेली ही कादंबरी लेखकाच्या प्रास्तावित पंचनायिकांपैकी पहिली आहे. पाटलांनी जर पार्श्वभूमीचा फाफटपसारा कमी करीत पात्रांमधील भावना व संघर्षावर जास्त लक्ष दिले, तर त्यांच्या या मालिकेतील पुढील कथा कंटाळवाण्या होणार नाहीत. पाटील हे उत्तम कथा सांगणारे आहेत. ते जे लिहीतात, त्यामागे भरपूर संशोधन व अभ्यास असतो. त्यांच्या या व आधीच्या कलाकृतींत तो प्रकर्षाने जाणवतो. परंतु लेखक जर विषयाच्या जास्तच प्रेमात पडला तर, कथानक व त्यातील संयत नाटयाकडे थोडे दुर्लक्षच होते. किंवा ‘चंद्रमुखी’त तसे झाले आहे. तरीही मराठी कादंब-यांच्या संदर्भात विस्तृत कॅनव्हासवर चितारलेली लक्षणीय कादंबरी, म्हणून ‘चंद्रमुखी’चे मूल्य कायम टिकून राहील.