प्राणी,पक्षी संगोपन – विश्वाला सुंदर बनविणे

प्राणी-पक्षी माझे सांगाती मुख्यपान

कोणाच्या घरी मांजर किंवा कुत्रा पाळला असेल तर घरी आलेल्या पाहुणे मंडळींचं अर्ध लक्ष तो कुत्रा किंवा मांजर जवळ तर येत नाही ना ह्या कडेच असतं. प्रवेशद्वारावर लावलेल्या ‘कुत्र्यापासून सावध रहा’ अशी पाटी वाचून धडकी भरणारे लोक कमी नाहीत. प्राणी पाळायचा म्हणणारे लोक आणि प्राणी पाळलेले लोक यांच्याकडे बघून अनेक जण नाक मुरडतात. पण पाळलेला प्राणी आपले आयुष्य किती तणावमुक्त बनवू शकतो आणि प्राण्यांचा सहवास आपल्याला काय काय शिकवू शकतो ह्याबद्दल थोडंस बोलू या.

गेले काही वर्षात माझा संपर्क अनेक कुत्री , मांजरे , गाई, पक्षी यांच्याशी आला आणि त्यांच्या एका वेगळ्या आणि समृद्ध विश्वाची मला ओळख झाली. प्राणी म्हटलं की त्याला जेवू घालणं, त्याचं संगोपन करणं, त्याच्यावर माया करणं हे सगळं आलंच. या सर्वांसाठी पाळणाऱ्याला त्यांच्याबरोबर बराच वेळ घालवावा लागतो. त्यामुळे आपोआपच पाळणाऱ्या व्यक्तीचा एकटेपणा कमी होतो. या प्राण्यांबरोबर घट्ट मैत्रीचं नातं तयार होतं. साहचर्याची भावना वाढते, आनंदी वाटतं. ह्या गोष्टींचा वैज्ञानिक पुरावा पण आता उपलब्ध आहे आणि हे सर्व बघता प्राणी पाळणाऱ्यांना नैराश्य येण्याची शक्यता कमी असते, असं म्हटल्यास आश्चर्य वाटायला नको. सजीव प्राण्यांबरोबर जबाबदारीने वागल्याने एक प्रकारची शिस्त माणसाच्या आयुष्यात येते. आपण थकलेले असू, मात्र आपल्या घरी आपण पाळलेला प्राणी आहे आणि त्याच्या देखभालीची जबाबदारी आपल्यावर असेल तर मग आपण अधिक कनवाळू बनतो. त्यावेळी आपण ‘मला काय हवं’ ह्याचा विचार करत नाही. ह्या प्राण्यांबरोबर काम करणं मेहनतीचं काम आहे. त्यामुळे हृदयाचं आरोग्य उत्तम राहातं. आपलं शरीर सक्रिय बनवून ठेवायला हे प्राणी, पक्षी मदत करतात.

प्राण्यांना बोलता येत नसलं तरी ते संवाद साधतात. फक्त त्यांचे संकेत आणि देहबोली आपल्याला समजायला हवी. त्यामधून “शब्देविण संवादा”च कौशल्य आपण आत्मसात करू शकतो आणि त्याचा आपल्याला उपयोगही होऊ शकतो. समाजातील इतर प्राणीमित्रांं बरोबर आपला संवाद वाढतो आणि असे अनेक लोक संपर्कात आल्याने आपला एकटेपणा दूर होतो. कुत्रा राखणदार असतो. घरात किंवा शेतात अनोळखी व्यक्ती दिसली तर कुत्रे सर्वात आधी माणसाला सावध करतात. प्राण्यांनी आपल्या मालकांना संकटाची सूचना देऊन सावध करण्याच्या घटना कमी नाहीत.

नंदी व तिची मुलगी दुर्गा ह्या दोन गाईंचा जवळपास १५ वर्षांचा सहवास मला लाभला. दुर्गा जन्मल्यापासून अखेरच्या श्वासापर्यंत माझ्या समोर राहिली. वासरू ते गाय हा तिचा प्रवास मी जवळून बघितला. एक वर्षांची दुर्गा खूपच चपळ आणि चौकस होती. आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी ती चौफेर लक्ष देत असे. तसेच तिचे कानही फार तीक्ष्ण होते. ब्रह्मक्षेत्र मध्ये कुठलीही नवीन व्यक्ती, कुत्रा किंवा इतर प्राणी दिसला तर ती उठून लक्षपूर्वक त्याचं निरीक्षण करत असे आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत असे. तसेच तिच्या आणि नंदीच्या गोठ्याजवळ अनोळखी व्यक्ती गेली तर हंबरून तिला ते न आवडल्याची सूचना देत असे.

असेच एकदा मध्यरात्रीनंतर, दुर्गाच्या हंबरण्याने मला जाग आणली. नेहमी रात्री शांतपणे बसून रवंथ करणाऱ्या गाई ह्या अवेळी का हंबरत आहेत हे बघायला मी गोठ्यापर्यंत पोचले. आजूबाजूला मला तर काहीच दिसेना. पण दुर्गाचा आवाज थांबत नव्हता. ज्या दिशेने बघून ती हंबरत होती तिथे जरा काळजीपूर्वक बघितल्यावर अंधारात काहीतरी हालचाल होते आहे असं जाणवलं. मी पटकन आत जाऊन माझ्या नवऱ्याला उठवल आणि काय झालं ते सांगितले. ज्या भागात मी हालचाल बघितली होती तो भाग शेजारच्यांच्या गच्चीचा होता. माझ्या नवऱ्याने फोन करून शेजारच्यांना झाल्या गोष्टीबद्दल सांगितले. पटकन आम्ही दोघे गोठयाच्या बाजूला गेलो. आमचा फोन जाताच शेजाऱ्यांच्या घराचे दिवे पटापट लागले. आणि त्या प्रकाशात दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या गच्चीवरून उड्या मारून पसार होताना आम्ही पाहिल्या. शेजारच्यांच्या गच्चीवर असलेल्या एका खोलीचे कुलूप तोडून त्यातील सामान पळवण्याच्या हेतूने ह्या व्यक्तींनी गच्चीवरून शिरकाव केला होता. पण अंधारातही दुर्गाच्या नजरेतून अवेळी झालेली ही हालचाल सुटली नाही आणि तिने लगेच त्याची सूचना दिली.

तेव्हापासून आमचे शेजारी दुर्गाच्या अति चौकसपणाबद्दल तिचे कौतुक करू लागले. तिला काही काही आणून खाऊ घालू लागले.

प्राणी आपल्यासाठी खूप काही करू शकतात, पण आपण त्यांच्यासाठी काय करतो ते महत्वाचे. एखादा प्राणी पाळण्याचा तुम्ही विचार करत असाल तर त्याला उत्तम आयुष्य जगण्याची संधी तुम्ही देता. ह्या प्राण्याबद्दल आदर ठेवून देखभाल केलीत तर खूप समाधानही मिळते. पाळीव प्राणी आपल्याला निरोगी, दीर्घायुष्य देतात. जंगली प्राणी सुद्धा हजारो वर्षापासून भूकंप, त्सुनामी, वणवा अशा संकटांची सूचना देत आले आहेत. आपण त्यांच्या पर्यावरणाची काळजी घेणं हा त्यांच्या सुरक्षिततेचा सर्वात योग्य मार्ग.

या तर्हेने सर्व प्राण्याबद्दल संवेदनशील राहून आपण आपल्या प्रयत्नातून हे जग अधिक सुंदर बनवू शकतो ह्यात शंका नाही.

करा तर मग विचार कोणता प्राणी पाळायचा ह्याचा !

लेखक – क्षितिजा वागळे – kwagle.09@gmail.com
शब्दांकन – कल्याणी गाडगीळ – kalyani1804@gmail.com