श्री हरी

प्राणी-पक्षी माझे सांगाती मुख्यपान

माझ्या घरासमोरच्या आवारात डौलात उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला मी कल्पतरू म्हटलं तर वावग होणार नाही. ह्याचे गेली २५ वर्षे मी बारकाईने निरीक्षण करते आहे. तीन-चार प्रकारचे पक्षी ह्यावर दरवर्षी घरटी बांधतात. त्यात कावळ्याचे तर ठरलेलेच. उन्हाळ्याच्या सुरवातीला मोहर फुलला की त्यावर असंख्य कीटक आकर्षित होतात ज्यांना भक्ष बनवण्यासाठी कोळी जाळी विणून तयार असतात. झाडावर आंबा धरला की माकडाची टोळी, असंख्य पोपट,हळद्या यांची दिवसभर ये-जा चालू राहते. मुंग्यांच्या रांगाही वरखाली होताना दिसतात. चैत्र पालवी बरोबर कोकीळेला कंठही ह्याच झाडावर फुटतो. ह्या सगळ्यांबरोबर गुण्या गोविंदाने बिऱ्हाड करून राहणाऱ्या अनेक खारीही त्यात असतात. अव्याहतपणे लगबग करणाऱ्या, झाडाच्या पानापानांची ओळख असलेल्या, आल्या गेलेल्या पै पाहुण्यांची “चक चक” करून बातमी देणाऱ्या, शिक्रा पक्षी , मांजर दिसले की कलकलाट करून सगळ्यांना सावध करणाऱ्या.

मे-जूनच्या कडक उन्हाळ्यात संध्याकाळी लखनऊला अनेकदा वादळ येते. जोरदार वारा, प्रचंड धूळ यात झाडाच्या फांद्या तुटणे, पत्रे उडून जाणे हे ठरलेलंच. असेच एक वादळ येऊन शांत झाले पण रस्त्यावरून येणारा “छुक-छुटुक” हा आवाज मला शांत बसू देईना. हा तर खारीचा आवाज, आणि तोही अंधार पडल्यावर? दिवे गेल्यामुळे टॉर्चने शोध घेतल्यावर जखमी अवस्थेतील एक खारीचे पिल्लू सापडले – जेमतेम माझ्या हाताच्या अंगठ्याएव्हढे. त्याच्या मांडीवर, शेपटीवर जखम स्पष्ट दिसत होती. वादळाच्या तडाख्यात ते झाडावरून पडलं असावं. त्याला अलगद उचलून घरी आणलं. एवढ्या जवळून खारीच निरीक्षण करण्याची पहिलीच संधी होती. तेही माझ्याकडे टकामका बघत होतं. एका पुठ्ठ्याच्या खोक्यात वर्तमानपत्र पसरून त्यावर मऊ कापड घालून त्यावर त्याला ठेवून दिले. त्याला खायला काय आणि कसं द्यावं ह्याचा विचार केला.

पिल्लू फारच लहान असल्याने ते दूधच पीत असावं म्हणून घरी असलेल्या दुधात थोडं पाणी मिसळून ड्रॉपरने द्यायचे ठरवले. त्याला डाव्या हाताने उचलून, उजव्या हातात मिश्रण भरून ड्रॉपर त्याच्या तोंडाजवळ नेताच त्याने आपल्या पुढच्या दोन्ही हातांनी तो ड्रॉपर पकडला व पटकन दूध पिऊन टाकले ते प्रचंड घाईत. मला वाटलं हा उपाशी असावा. पण नंतर हे रोजचंच झालं. तो कायमच घाईत असे – म्हणजे in hurry. म्हणून त्याचे नाव “श्री हरी” ठेवले. त्याच्या जखमा बऱ्या होण्यास एक दीड महिना गेला तरीही त्याला मागच्या पायाच्या पंज्यामध्ये अजून ताकत नव्हती आणि त्याला तो नीट खाली टेकवू शकत नसे. आता तो दुधाबरोबर इतरही गोष्टी खाऊ लागला होता. शेंगदाणे, मक्याचे दाणे हे तर त्याचे विशेष आवडते.

माझ्याकडे असलेल्या कुत्र्यांशी श्री हरीचा संबंध येत नव्हता पण दोघांनाही एकमेकांच्या अस्तित्वाबद्दल जाणीव होती आणि त्यांचा एकमेकांबाबत काही आक्षेपही नव्हता. परंतु एक करडा बोका हल्ली संधी साधून येऊ लागला होता. एकदा त्या बोक्याने कुत्र्याला दिलेली दूध रोटीची वाटी कुठे ठेवली जाते हे शोधलं आणि त्याला उरलं सुरलं काहीतरी त्यात मिळालं तेव्हापासून त्याची रोज खेप होऊ लागली. तो बोका दिसला की श्री हरीची घाबरून कर्कश आरडाओरड सुरू होई. बोका निघून गेला तरी काही वेळ त्याचा कलकलाट चालू असे.

माणसांच्या अन्न पदार्थांवर ताव मारणाऱ्या श्री हरीला आता खोक्यात बंदिस्त राहणे अवघड वाटू लागले होते. क्षणार्धात तो लांब लांब उडया मारून जागा दिसेल तिथे तो सुसाट सुटत असे. बाहेरच्या जगाचा त्याला काहीच अंदाज नसल्याने त्याला फार जपावे लागे. रात्री शिवाय त्याला खोक्यात अजिबात बसायचे नसे आणि दिवसभर काहीतरी हुडकत, खोलीचा काना-कोपरा धुंडाळत, सामानाच्या मागे लपाछपी करीत त्याचा दिवस जाऊ लागला.

एक दिवस काही महत्वाच्या कामानिमित्त संध्याकाळी अंधार पडल्यावर मला बाहेर जावे लागले. नेहमीप्रमाणे मी श्री हरीला खोक्यात ठेवून वर जाळीचं झाकण ठेवलं होतं. खोलीचा दरवाजा नीट बंद आहे ह्याची खात्री करून मी निघाले.

दीड तासाने मी परत आले. दरवाजा उघडून आत आले तर खोक्यावर झाकलेली जाळी बाजूला पडली होती आणि खोकेही उलटून पडले होते. त्यात ठेवलेले पाणी बाजूला सांडले होते . चिंध्या जमिनीवर विखुरल्या होत्या. श्री हरी कुठेच दिसेना. त्याला अनेक हाका मारल्या पण काहीच उत्तर मिळेना. अंधार पडल्यावर तो अजिबातच खोक्यामधून बाहेर निघत नसे. मला काही समजेना की हा गेला कुठे. तेवढ्यात माझं लक्ष खोलीच्या आढ्याजवळ जवळ असलेल्या रोशनदान कडे गेलं. त्याची जाळी एका कोपऱ्यात फ्रेम मधून थोडीशी सुटलेली होती. पण तिथपर्यंत श्री हरी पोचण्याचा संभव नव्हता. बाहेरून आत येण्याचा प्रयत्न कोणी केला तर ते शक्य होतं. पण एवढ्या उंचीवरून येणार कोण? बोका? बापरे! माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी पटकन बाहेर जाऊन माझ्या मुलाला शिडी आणायला सांगितली आणि त्याला ती शिडी पकडायला सांगून मी रोशनदानपर्यंत पोचले. अनेक दिवस मी तिथे न पोचल्याने त्याच्या पुढील जागेवर धूळ साचली होती आणि त्यावर मांजराच्या पायाचे ठसे स्पष्ट उमटले होते. म्हणजे बोका आत आला होता तर! त्याने श्री हरी वर हल्ला केला होता कां ? पण बोका होता कुठे आणि श्री हरीचं नक्की काय झालय ? काहीच समजेना!

ही रोशनदानची सुटलेली जाळी मी वेळीच का दुरुस्त केली नाही असा दोष स्वतःला देत मी बोक्याचा शोध घेऊ लागले. एका जड पेटीच्या मागे तो गलेलठ्ठ बोका लपला होता. मी त्याला दरवाजा उघडून हाकलला. तो बाहेर पळत असतानाच सवयीचा “छुक छुटुक” आवाज कानी पडला. श्री हरीचाच होता तो आवाज! म्हणजे तो इथेच कुठेतरी होता! मला एकदम हायसं झालं! म्हणजे हे चिरंजीव बोक्याला घाबरून लपले होते कुठेतरी. खूपवेळ शोधाशोध केल्यानंतर फळीवर पुस्तकांच्या मागे बसलेला तो मला सापडला. त्या फळीच्या खाली असलेल्या पेटीजवळच बोका दडून बसला होता. म्हणजे मी वेळीच आल्याने पुढचे रामायण घडले नाही. श्री हरी थरथरत होता. बोक्याचा सामना केला होता त्याने. त्याला जवळ घेऊन मी तो सुरक्षित असल्याचं आश्वासन त्याला दिलं आणि माझ्या निष्काळजीपणामुळे त्याच्यावर असा प्रसंग आला म्हणून त्याची क्षमा मागितली.

माझ्या मुलाला सांगून जाळीला लगेच खिळे ठोकून घेतले. पण श्री हरी एवढा घाबरला होता की खोक्यामध्ये बसायला तयारच नव्हता. तेव्हापासून तो खोलीत पुस्तकांच्या मागे जाऊन लपून बसून रात्र काढत असे.

श्री हरी जवळजवळ ८-९ महिने आमच्याकडे राहिल्यानंतर त्याला मी हळूहळू बागेत मोकळा सोडू लागले. बागेत एका कोपऱ्यात पक्षी व इतर खारी खायला व पाणी प्यायला येत असत. सुरवातीला श्री हरी लांबूनच त्यांना बघत असे. मग हळूहळू त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या बरोबर वेळ घालवू लागला. पण अंधार होऊ लागला की त्याला परत घरी यायचं असे. व्हरांड्याच्या समोर असलेल्या बोगनवेलीच्या झुडुपावर बसून तो “छुक छुटुक” आवाज करे आणि मग मी त्याला उचलून आत आणत असे.

असे करताकरता काही दिवसांंनी श्री हरी पूर्णपणे इतर खारीं बरोबर सामावून गेला. नेहमी येणाऱ्या १०-१२ खारींमध्ये नेमका तो कोणता हे ओळखणं पण अशक्य झाले. कधीतरी ह्या खारींंपैकी एकजण व्हरांड्यासमोरील बोगनवेलीवर बसून आवाज देऊ लागला की हाच श्री हरी असावा असं मानून मी पुढे जाऊन त्याची विचारपूस करत असे. तो ही काही वेळ बातचीत करून मग उड्या मारत पळून जात असे.

आजही बोगनवेलीवर आवाज देणारी खार माझ्यासाठी “श्री हरी”च असते आणि त्याच्या-माझ्या गप्पा चालू असतात.

काही काळ माझ्या आयुष्यात येऊन श्री हरी मला अनंत आठवणी देऊन गेला ज्या मी सर्वांबरोबर वाटू शकते.

अशी ही श्री हरी कथा!

लेखक – क्षितिजा वागळे – kwagle.09@gmail.com

शब्दांकन – कल्याणी गाडगीळ – kalyani1804@gmail.com