देखणा कॉपर

प्राणी-पक्षी माझे सांगाती मुख्यपान

गजबजलेल्या पुण्यातून लखनऊला आल्यानंतर सगळ्यात माझं पहिलं लक्ष वेधलं ते इथल्या वृक्षसंपदेने. माझ्या घराच्या आजूबाजूला अनेक जुनी झाडे डुलत होती. कडुलिंब, आंबा, पेरू, खोटा अशोक, गुलमोहर आणि औदुंबर. दरवर्षी ह्या झाडांचं जगणं मी माझ्या जगण्यासह अनुभवलं आहे. आणि ह्यांच्या संगतीत बागडणारे पक्षी हा खरे तर फार मोठा विषय.

बहुतेक प्रत्येकाची घरात बसण्याची एक आवडती जागा असते, चहा घेताना, टीव्ही बघताना बसण्याची. घरी कुत्रा असेल तर त्याचीही बसण्याची ठराविक जागा असते, तसेच पक्षांची पण स्वतःची खास जागा असते. माझ्या घरातील गच्चीच्या कठड्याला एका कोपऱ्यात एक बांबू बांधला होता. गच्चीवरील फुलझाडांच्या उन्हापासूनच्या बचावासाठी त्यावर हिरवा कपडा बांधला जाई. हा बांबू आजूबाजूच्या अनेक पक्षांचं बसण्याच आवडतं स्थान बनल होत . बुलबुल, मैना, चिमण्या, वटवट्या, दयाळ यासारखे व इतरही अनेक पक्षी बांबूवर बसून आपल्या भाषेत इतरांशी संवाद साधत, आणि आजूबाजूच्या परिसराची टेहळणी करीत.

नोव्हेंबर महिन्यापासून लखनऊला थंडी सुरू झाली की साहजिकच उन्हामध्ये गच्चीत जाऊन बसण्याची सवय होते. मग हातातलं काहीतरी काम घेऊन गच्चीत बसून ते करताना माझीही आजूबाजूच्या परिसराची टेहाळणी सुरू असे. गच्चीतील बांबूला मधोमध एक भोक होतं आणि आजूबाजूच्या झाडांवर वसाहतीला असणाऱ्या खारींची ह्या भोकात ये-जा चालू असे. या खारी म्हणजे कशाचीही तमा न बाळगता अव्याहतपणे लगबग करणाऱ्या. रात्र सोडली तर सारखी ह्यांची चौफेर चौकस लगबग सुरूच.

एकदा असाच एक तांबट (coppersmith barbet) पक्षी येऊन त्या भोकाचं निरीक्षण करताना मी पहिला. अनेक वर्षे पक्षांचं निरीक्षण केल्याने मला समजू लागले की तो ह्या भोकाचा वापर कसा करून घेता येईल ह्याचाच विचार करीत होता. कधी कधी काही झाडांच्या फांदीला रुपयाच्या नाण्याच्या आकाराचं भोक दिसतं तेच ह्याच घरटं.

दुसऱ्या दिवशी पण त्याने 2-3 दा त्या जागेला भेट दिली आणि बांबूवर बसून तो आजूबाजूचा अंदाज घेऊ लागला. मग त्याच्या खेपा वाढल्या आणि जास्त काळ तो आजूबाजूला राहू लागला. माझी तिथे असण्याची त्याला नक्कीच जाणीव होती आणि विशेष म्हणजे त्यावर त्याचा काही आक्षेप नव्हता. मनातल्या मनात त्याचे नांव मी कॉपर (copper) ठेवून टाकलं. कपाळावरचा शेंदरी रंगाचा घसघशीत टिळा आणि पाठीवरचा गवती हिरवा रंग मिरवणारा हा कॉपर फारच देखणा होता. मी गच्चीत नसले तर तो विशिष्ट “पुक पुक पुक “असा आवाज काढून मला तो आल्याची सूचना देत असे. माझेही लक्ष त्याच्या आवाजाकडे असे आणि त्याची हाक ऐकली की हातातलं काम सोडून मी पळत गच्चीवर जात असे. मला तिथे आलेलं बघून तो शांत बसे आणि काही वेळ तिथे घालवून परत उडून जाई.

असं चालू असताना, एक दिवस सूर्यास्त होऊन अंधार पडण्याची वेळ झाली असता मला त्याचा “पुक पुक पुक” आवाज ऐकू आला. खरे तर दिवसा अनेक खेपा घालणारा कॉपर दिवस ढळण्याच्या सुमारास अजिबात फिरकत नसे. तो रात्री कुठे बसतो, त्याचे कोणी इतर साथी आहेत का असे कुतूहल मला असे. त्याचा आवाज ऐकून मी पळतच गच्चीत पोचले तर हा त्या बांबूमधील भोकात बसला होता. म्हणजे त्या दिवशी तो रात्रीचा पाहुणा होता माझा! इतर कोणीही पाहुणा आल्यावर मला जेवढा आनंद झाला नाही तेवढा आनंद त्याक्षणी मला “कॉपर”ला बघून होत होता.

काय नातं होतं हे आमचं ? त्याचं हळू आवाजात “पुक पुक” चालू होतं आणि मीही त्याला खूप आनंद झाल्याचं सांगत होते. कसला संवाद हा? माझ्यापासून दोन फुटावर असलेल्या बांबूच्या भोकात रात्रीच्या थाऱ्याला आलेला कॉपर आणि त्याने माझ्यावर दाखवलेला विश्वास मला एका वेगळयाच आनंदाच्या लहरींवर घेऊन गेला. होता. आमचं हे नातं पुढील दीड महिना असंच दृढ होत गेलं. ह्या काळात ऊन खायला माझे कुत्रे पण माझ्याबरोबर गच्चीत येत. कॉपरला त्याबद्दल आक्षेप नव्हता. सकाळी उजाडलं की कॉपर उडून जात असे. दिवसातून 2-3 वेळा येऊन तो आपलं घर सुरक्षित आहे ही खात्री करून जात असे आणि संध्याकाळी मुक्कामाला येत असे. दीड महिना मला त्याचा सहवास मिळाला आणि नंतर अचानक त्याचं येणं बंद झालं. पुढचे काही दिवस आतुरतेने मी त्याची वाट बघितली. आजूबाजूला तो कुठे दिसतो आहे का हे डोळ्यात तेल घालून शोधलं. त्याचा आवाज आल्याचे भास अनेकदा झाले. पण त्याचा कुठेच मागमूस नव्हता. तो जसा अचानक आला होता तसाच तो अचानक गायब झाला – मनाला एक प्रचंड हुरहूर लावून.

एक आठवड्याने सहज म्हणून त्या बांबूच्या भोकात मी वाकून पाहिलं. त्याच एक छोटंसं मुलायम हिरवं पीस तो सोडून गेला होता माझ्यासाठी –त्याची आठवण म्हणून.

लेखक – क्षितिजा वागळे – kwagle.09@gmail.com

शब्दांकन – कल्याणी गाडगीळ – kalyani1804@gmail.com