आमची ‘नंदी’

प्राणी-पक्षी माझे सांगाती मुख्यपान

माझ्या आयुष्यात निसर्गातील प्राणी-पक्षी फार लवकर आले कारण आमच्या पुण्याच्या घराभोवती असलेली बाग व त्यांची ओळख करून देणारे माझे आजोबा. त्यांच्या मांडीवर बसून हे अनौपचारिक शिक्षण झाले. त्यांच्यामुळेच कुत्री व मांजरे ही आमच्या घराचा एक अविभाज्य भागच बनलेले होते.

लग्न होऊन मी १९९६ साली पुण्यातून लखनौला गेले. तेथील भाषा, प्रांत, लोक, संस्कृती खूपच वेगळ्या. पण त्या सर्वांशी जुळवून घ्यायला मला मदत केली ती आमच्या नंदीने! कोण ही ‘नंदी’?

१९९९ साली ‘नंदिनी’ म्हणजे माझी ‘नंदी’ ही पांढरी, ५ वर्षांची गाय आमच्या घरी आली. त्या आधी गाय इतक्या जवळून बघण्याचा, तिच्या बरोबर राहण्याचा आणि तिला समजून घेण्याचा प्रसंग आला नव्हता. नंदी बरोबर माझी ओळख झाली आणि माझं जगच बदलून गेले. नंदी ही एक धष्टपुष्ट, रुबाबदार आणि मोठी काळी, धारदार शिंग डोक्यावर मिरविणारी हरियाणा जातीची गाय होती. तिच्या-माझ्यात एक अनाकलनीय व घट्ट असा मानसिक बंध तयार झाला. तिच्या बरोबरीच्या १४ वर्षांच्या सहवासात आम्ही दोघीही भावनिकरीत्या, अध्यात्मिकरीत्या नकळत एकमेकींत गुंतत गेलो.

माझा मुलगा त्यावेळी शाळेत जाई . त्याची शाळा सकाळी ७ला असे आणि शाळेची बस ६ वाजता येई. त्यामुळे पहाटे लवकर उठून मला सगळी तयारी करावी लागे. माझं स्वयंपाकघर मागे अंगणाच्या बाजूला होतं. त्यामुळे उठल्या उठल्या प्रथम नंदीचच दर्शन होत असे. मुलगा शाळेला गेला की तिच्या गौशालेची सफाई करून तिला मी चारा देत असे. ऋतुमानानुसार तिच्या चाऱ्यात योग्य तो बदल करावा लागे, चाऱ्यात इतर पौष्टिक गोष्टी व मीठ घालून दोन्ही हातांनी ते मिश्रण एकजीव करावे लागे. १४ वर्षे अशा प्रकारे ताजं अन्न मी तिला स्वतः च्या हाताने बनवून दिलं आणि तिच्या सर्व वेळा , सवयी पाळल्या. थंडीच्या कडाक्यात तिला बसण्यासाठी सुकं गवत, अंगावर ओढण्यासाठी गरम रजई आणि शेकोटीची व्यवस्था करावी लागे. रजईला मी बंद शिवून घेतले होते आणि ती विशिष्ट प्रकारे तिच्या गळ्यात व पोटावर बांधली की तिचा थंडीपासून बचाव होई . घरात बनवलेला किंवा बाहेरून आणलेला कुठलाही खाद्यपदार्थ ‘त्वदियं वस्तु गोविन्दः’ म्हणत मी नंदीला देत असे.

माझ्या आयुष्यातील चढ-उताराची नंदी साक्षीदार होती. अनेक कठीण प्रसंगात मन मोकळं करण्यासाठी ती माझी जिवाभावाची मैत्रीण बनली तर कधी तिच्या सान्निध्यात काही महत्त्वाचे निर्णय घेताना मला तिच्या कडून ऊर्जा मिळाली.आम्ही एकमेकींच्या भावना, दु:खे, बिनधास्तपणे एकमेककींबरोबर वाटून घेत असू. अनेक सुखाच्या प्रसंगी तिच्या गळ्यात पडून मी आनंदाश्रूना वाट मोकळी करून दिली आणि तिने आपल्या जिभेने चाटून मला त्याची पावती दिली. काही सांगायचे असले कि मी तिच्या गळ्यात हात टाकून बोलत असे, कधी रडत असे. आमच्या घरी येणाऱ्यांपैकी काहींचा हा कौतुकाचा, काहींचा अचंब्याचा तर काहींचा टीकेचा विषय होता. पण त्यामुळे आमच्या दोघींच्या नात्यात काही फरक पडला नाही उलट ते नातं उत्तरोत्तर अजूनच दृढ होत गेलं. गाईंच्या आजारपणावरचे बरेच देशी उपचार मी शिकून घेतले होते तसेच काही होमिओपॅथिची औषधे पण डॉक्टरी सल्ल्याने वापरून नंदी वर यशस्वी प्रयोग केले होते.

एकदा नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ह्लाला लखनौहून अलाहाबाद हा चार तासांचा प्रवास करावा लागला. पहाटेच नंदीला तिचे खाणे देऊन मी निघाले व लगेच घरी परतणार होते पण आम्हाला अलाहाबादलाच राहावे लागले. माझ्या शेजारणीला मी आमच्या घरी नसण्याची व नंदीकडे पाहण्याची, तिला सायंकाळचे खायला देण्याची सोय केलीच होती. रात्री घरी परतू शकणार नसल्याने मी शेजारणीला फोन केला तेव्हां तिने सांगितले, नंदी तिच्या गोठ्यातील जागा सोडून मुख्य गेटपाशी येऊन उभी होती, तिने खाण्याला स्पर्शही केला नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हां सकाळी उशिराने आम्ही घरी पोचलो तेव्हांही नंदी माझी वाट पाहत मुख्य गेटपाशी उभी होती. तिला थोपटल्यावर ती तिच्या नेहमीच्या जागी गेली व तिने चारा खाल्ला! हे सांगतानाही माझे डोळे भरून येतात. घरातील एखादे माणूस तरी अन्नत्याग करून असे वाटेकडे डोळे लावून बसते कां?

२०१० मध्ये नंदीमध्ये वृद्धापकाळाची लक्षणे दिसू लागली कारण ती आता १५ वर्षांची झाली होती. तिचे पाय वाकू लागले, तोलही जाऊ लागला, तिला उठता बसता त्रास होऊ लागला. अशातच एकदा ती पडली आणि त्या नंतर ती उठूच शकली नाही. तिच्या पायातील बळ कमी होत गेलं. ती चारा खाईनशी झाली. तेव्हा तिला एक मोठं भांड तूप आणि मीठ घालून वरण भात बनवून मी देई . भांड तोंडासमोर ठेवलं तर ती अन्नाला स्पर्श करत नसे पण मी हाताने भरवलं तर मात्र ते सगळं ती खाई. एकाच जागी बसून पायाला रग लागे म्हणून कोणाची तरी मदत घेऊन तिची कूस बदलावी लागे तसेच bed sore होऊ नयेत म्हणून विशेष काळजी घ्यावी लागे. हे सर्व करताना घरातील इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडण्याची कसरत चालू असेच. काही गरजेच्या गोष्टी आणण्यासाठी मला बाहेर जावं लागलं आणि नेमकं त्याच वेळेला हिला काही झालं तर, अशी शंका मनात येई.

तिने तिचा शेवटचा श्वास माझ्या साक्षीने घ्यावा हा हट्ट पण तिने पुरा केला. २४ जून २०१२ साली माझ्या मांडीवर डोकं ठेवून नंदीने आपले प्राण सोडले आणि माझ्या जीवनातील (आ)नंदीमयी पर्वाची सांगता झाली.

लेखक – क्षितिजा वागळे – kwagle.09@gmail.com

शब्दांकन – कल्याणी गाडगीळ – kalyani1804@gmail.com

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरुर कळवाव्यात.