भाज्या-तोंडीलावणी मुख्यपान

ताकातले पिठले

साहित्य - एक वाटी बेसन, दीड वाटी ताक ,फोडणीचे साहित्य, बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती - पातेल्यात किंवा निर्लेपच्या भांड्यात तेल हिंगाची फोडणी करून गेस विझवा. त्यात ताक घाला. परत गॅस मंद आचेवर सुरु करून बेसन पीठ टाकत मिसळा. गोळी होऊ देऊ नका. पिठले हलवत राहा. खदखद्ले की त्यावर दोन मिनिटे झाकण ठेवा. घट्ट किंवा पातळ हवे त्यानुसार ताकाच्या प्रमाणात तुम्ही बदल करू शकता. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. गरम भाकरी सोबत खायला द्या. ताक व्हिटॅमीन क ने युक्त असून आंबट चव असल्याने नेहमीच्या पिठल्यापेक्षा वेगळे लागते. हरभरा बेसनमध्ये प्रोटीन्स भरपूर असतात.

मेथीचे पिठले

साहित्य - १ जुडी मेथी, ३-४ लसुण पाकळ्या, ,३/४ ते १ कप बेसन,१/२ कांदा बारीक चिरुन, फोडणीसाठी २ टेबलस्पून तेल, जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता, लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे

कृती - मेथी निवडून, धुवून बारीक चिरुन घ्यावी. कांदा घालणार असाल तर बारीक चिरुन घ्यावा. लसूण ठेचुन घ्यावा. एका कढईत तेलाची खमंग फोडणी करावी. त्यात लसूण घालून किंचित परतावे. त्यावर कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्यावा. त्यात चिरलेली मेथी घालून साधारण ३-४ मिनीटे परतावे. लाल तिखट, मीठ घालून एकदा नीट मिसळून घ्यावे. गॅस बारीक करुन मेथीमध्ये बेसन हळूहळू घालुन परतत जावे. साधारण ३/४ कप ते एक कप बेसन लगेल. मेथीला पाणी जास्त सुटले असेल तर बेसन थोडे जास्त लागण्याची शक्यता आहे. बेसन घालून नीट मिसळले गेले की कढईवर झाकण ठेवुन एक वाफ आणावी. गरम गरम पिठले भाकरी बरोबर वाढावे.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF