पारंपारिक पेहराव

पोशाख सुरुवात ( मध्ययुगीन पोषाखाचे स्वरूप )

इसवी सनाच्या सातव्या शतकापासून पुढे मुसलमानी सत्ता भारतात उदयास येईपर्यंत भारतातील पोशाकांमध्ये अनेक बदल होते गेले. मात्र अकराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंतच्या काळात भारतीय पेहेरावावर मुस्लिम पेहेरावपद्धतीचा परिणाम झाल्याचे दिसून येते. तरीही भारतीय वैशिष्ट्य त्यात टिकून राहिलेच.

मुसलमानी अमलात मराठी पुरुष तंग तुमान व अंगरखा घालीत. पुढेपुढे खांद्यावर घट्ट बसणारा व पुढे सुटा असलेला लांब व सैल झगा (चोगा) घालण्याची पद्धत पडली. त्यानंतर अचकन (गुडघ्यापर्यंत पोहचणारा व पुढे गुंड्या असलेला लांब कोट-शेरवानी) प्रचारात आली. अठराव्या शतकाच्या शेवटी ब्राह्मण लोक डाक्क्याच्या मलमलीचा, भरतकाम केलेला तंग अंगरखा व रुंद लाल रेशमी काठांची नागपुरी धोतरे नेसत. बाहेर जाताना ते नडियादचा गडद लाल रंगाचा फेटा बांधीत. धोतर कधी कधी कमरेभोवती पायघोळ गुंडाळून घेऊन समोर गाठ मारीत. ही धोतरे उत्तम रंगाची वेलबुटीची किंवा भरतकाम केलेली असत. बंगाली लोक धोतर नेसत व अंगावर लांबरुद चादर (शाल) घेत. काही लोक फेटा बांधीत. सरदारवर्ग दरबारप्रसंगी जरीचा वा तत्सम घोट्याइतका लांब झगा वापरीत. महाराष्ट्रीय पुरुषाच्या डोक्यावर पागोटे, तिवट, पटका, मंदिल, फेटा व बत्ती यांपैकी काहीतरी असे. लहान मुले बंदाच्या टोप्या वापरीत. त्या जरीच्या किंवा मखमलीच्या देखील असत. श्रीमंतांची वस्त्रे जरीची, रेशमी व उंची लोकरीची असत. ते शालजोडी वापरीत. सामान्य लोक पासोडी वापरीत; तर गरीब लोक कमरेला लंगोटी’, खांद्यावर घोंगडी व डोक्याला छोटेसे मुंडासे गुंडाळीत, महाराष्ट्रीय स्त्रिया नऊवारी लुगडी नेसून अंगात खणाची चोळी घालीत. लग्न-मुंजीसारख्या समारंभप्रसंगी शालू वा पैठणी यांसारखी भरजरी पातळे नेसत व धार्मिक प्रसंगी रेशमी रंगीत वस्त्रे घालीत. विशेष प्रसंगी अंगावर शेला घेत.

मुसलमानांचाही असाच पेहेराव असे. ते विविध प्रकारच्या टोप्या वापरीत. वायव्य सरहद्द प्रांत (सध्या पाकिस्तानात) व पंजाबमधील (भारत आणि पाकिस्तान) मुसलमान पगडी घालीत. इतर भागांत राजे-सरदार वगैरे विशेष प्रसंगीच पगडी वापरीत. प्रथम मुसलमानी स्त्रियांचा पोशाख पुरुषांप्रमाणेच असे. फक्त रंग तेवढा वेगळा. बाहेर जाताना त्या बुरखा घेत. पुढेपुढे त्या सैल कपडे घालू लागल्या. तसेच डोळे व नाकाजवळ जाळी असलेला डोक्यापासून पायापर्यंत सर्वांग झाकणारा काळा किंवा रंगीत बुरखा त्या वापरू लागल्या.

परकर-पोलके

parkar polk पारंपारिक म्हणून नावाजलेले परकर-पोलके, मुलगी तीन वर्षांची झाली की मुलीची आत्या आपल्या भाची साठी पहिल्यांदा परकर-पोलके शिवायची. मुलगी वयात येईपर्यंत ती ते वापरत असे. हे परकर-पोलके मुखत्वे करून धटवाडी खणाचे असे. पूर्वी बायका घरातच ते शिवणकाम करीत असत. कमरेपर्यंत शिवलेले पोलकं आकर्षक दिसवं म्हणून फुगा बाही, पफ बाही कौतूकाने शिवली जात असे. केसांच्या घटट रिबीनी लावलेल्या दोन वेण्या, पायात पैंजण, पोटापर्यंत उंचीचा पोलका आणि पायाच्या लांबी इतका परकर असा बहुतेक मुलींचा पेहराव असे.

प्रिंटेड चिट चा कपडा वापरायची त्या काळी आवड होती. त्यावरची नक्षी ही नाजूक पण आकर्षक असायची. किशोरवयीन वयातील चंचलता, आणि दंग मस्ती लक्षात घेऊनच हा पेहेराव बनवला गेला होता. मुलींना खेळतांना परकराचा छानसा ओचाही बांधता यायचा. हल्ली पारंपारिक परकर पोलक्यात आधुनिक बदल करून आवडीने घातले जातात.